You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bigg Boss Marathi : सुरेखा कुडचींना चहा-चपातीवरून ट्रोल व्हावं लागलं होतं, पण...
"मी 'बिग बॉस'च्या घरात हे डोक्यात ठेवून गेले होते की, मी जी आहे तसंच मला तिथे राहायचंय आणि मी राहिलेही तशीच. बाहेर आल्यावर मला जसं दाखवलं गेलं, त्याचं वेगळंच चित्र पहायला मिळालं. माझी खरी बाजू समोर आलीच नाही," अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"माझे खटके उडाले असतील किंवा मी जराशी कोणाला बोलले असेन तेच प्रोमो करून किंवा एपिसोडमध्येही दाखवलं. माझी प्रतिमा चिडखोर अशीच समोर आली. इतरवेळेस मी कशी राहिले, लोकांशी माझं काय बोलणं झालं हे लोकांना माहीत नाही.
मी ऑन स्क्रीन खाष्ट सासूची भूमिका करते, त्यामुळे लोकांना वाटलं ही अशीच आहे. पण मला आणि माझ्याबरोबर राहणाऱ्या इतर लोकांनाही माहितीये मी त्यांच्याशी कशी वागले," सुरेखा कुडची सांगत होत्या.
बिग बॉस मराठीच्या घरातून सुरेखा कुडची या एलिमिनेट झाल्या. अभिनेता अक्षय वाघमारेनंतर बिग बॉसच्या घराचा निरोप घेणाऱ्या त्या दुसऱ्या स्पर्धक ठरल्या.
'बिग बॉस'च्या घराचा निरोप घेतल्यानंतर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अमृता कदम यांनी सुरेखा कुडची यांच्याशी संवाद साधला. या घरातला त्यांचा अनुभव, तिथल्या इतर स्पर्धकांसोबतचे संबंध, काही प्रसंगांमुळे सोशल मीडियावर झालेलं ट्रोलिंग याबद्दल आम्ही सुरेखा कुडचींशी बातचीत केली. त्या मुलाखतीचा संपादित अंश इथे देत आहोत.
'बिग बॉस'मध्ये येण्याची पहिल्यापासून होती इच्छा
'बिग बॉस'साठी जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा वाटलं 'अरे, बापरे...' मला आनंदच झाला होता. माझी या शोमध्ये येण्याची खूप इच्छा होती, असं सुरेखा कुडची यांनी म्हटलं.
त्यांनी म्हटलं, की काहींची मतं या शोबद्दल वाईट आहेत. कशाला जायचं, चांगलं चाललं आहे आपलं. तिथे जाऊन बदनामही होतोच. पण मला तो अनुभव हवा होता.
"तिथे तुम्ही फोन घेऊन जाऊ शकत नाही. टीव्ही नसतो, पेन-पेन्सिल नेता येत नाही, पुस्तक नेता येत नाही. आणि मोबाईल हा इतका आवश्यक घटक बनलाय सध्या आपल्या आयुष्यातला, की मोबाईलशिवाय राहणं आपल्याला जमू शकतं का असाही विचार केला होता," असं त्यांनी सांगितलं.
घरच्यांची प्रतिक्रियाही तू जा अशीच होती, असंही त्यांनी म्हटलं.
जेव्हा खेळ कळला, तेव्हाच एलिमिनेट झाले
इतक्या लवकर घरातून बाहेर पडू असं वाटलं नसल्यांही सुरेखा कुडचींनी सांगितलं.
"अगदी शेवटपर्यंत नाही, पण आणखी एखाद महिना मी राहीन असं वाटलं होतं. पण शेवटी हा गेम आहे, कोणाला तरी बाहेर पडावं लागलंच होतं. त्यामुळे ठीक आहे, माझा प्रवास इथपर्यंतच होता अशी मी मनाची समजूत घातलीये."
त्यांनी म्हटलं, "पहिले दोन आठवडे मी कुठे दिसलेच नव्हते त्या घराला समजून घेण्यात, लोकांना समजून घेण्यात गेला. तोपर्यंत लोकांनी सुरूवात केली की तुम्ही कुठेच दिसत नाही आणि ते खरं होतं.
तिसऱ्या आठवड्यात मी खेळायला लागले. पण पहिल्या दोन आठवड्यात लोकांचे जे काही व्होट्स आले, कमेंट्स आल्या त्यामुळे मी नॉमिनेशमध्ये आले आणि बाहेर पडले. पण ज्या आठवड्यात मी खेळले कॅप्टन्सी पदापर्यंत जाऊन आले, त्याच आठवड्यात मी बाहेर पडले. जेव्हा खेळ कळला, तेव्हाच एलिमिनेट झाले."
चहा-चपातीवरून का झालं ट्रोलिंग?
घरातील एक स्पर्धक आणि अभिनेत्री सोनाली पाटील हिच्यासोबत नाश्त्याच्यावेळी चहा-चपाती बनविण्यावरून जो वाद झाला, त्याबद्दल सुरेखा कुडचींना ट्रोल केलं गेलं होतं.
त्याबद्दल विचारल्यावर सुरेखा कुडचींनी म्हटलं की, चहा चपातीवरून इतकं काही होईल याचा मला अंदाजच नव्हता. कारण जितकं ट्रोल केलं गेलं, तितकं ते झालं नव्हतं.
त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, तेसुद्धा त्यांनी सांगितलं.
"जो किराणा आमच्यासाठी येत होता, त्याच्यामध्ये फक्त पोहे येत होते. रवा, ब्रेड-बटर, खारी येत नव्हतं. त्यामुळे नाश्त्याला फक्त पोहे बनत होते आणि अंडी बनायची.
मी, विशाल, स्नेहा असे काही जण अंडीही नाही खायचो. सतरा दिवस आम्ही सलग पोहे खात होतो. मग माझ्या असं लक्षात आलं की, आदल्या दिवशीची कणीक मळून ठेवली होती. म्हणून मी म्हटलं चहा-चपाती खाऊया."
त्यांनी पुढं सांगितलं, "सोनाली पाटीलनं त्याला नकार दिला. सकाळसकाळी मी चपात्या कुठे करू, असं ती म्हणाली. मी म्हटलं की, मळलेलं पीठ आहे, त्याच्या फक्त चपात्या करायच्या आहेत. आणि पोह्यांच्या ऐवजी कर म्हटलं होतं. पोहे पण कर आणि हे पण कर असं नव्हतं म्हटलं.
पण सोनालीनं म्हटलं की, मी पोहे करायला घेतलेत. 'अगं, तू आता हातात कांदा घेतला आहेस. त्यापेक्षा पाच-सहा चपात्या लाट,' असं मी सांगितलं. त्यावर तिचा चेहरा पाहून मी विचारलं की, तू करणार आहेस की नाही? तिनं 'नाही ताई,' असं उत्तर दिलं. मी म्हटलं...अच्छा! माझं ते 'अच्छा', तिचं ते 'नाही ताई' हे सगळं म्युझिक वगैरे लावून अशाअर्थानं लोकांच्या समोर आलं की, त्यांना वाटलं मी खऱ्या अर्थाने व्हॅम्प आहे."
ट्रोलर्सचे आभारच मानते, कारण...
चहा-चपातीच्या या प्रसंगावरून ट्रोल करण्यांबद्दल बोलताना सुरेखा कुडचींनी म्हटलं की, मी माझी बाजू मांडलीये. पण ज्यांना कोणाला ट्रोल करायचंय ते म्हणतील की, ही काहीही सांगतीये. त्यांना अजून सांगायला जाऊन मी स्वतःला का त्रास करून घेऊ?
"अॅक्शनला रिअॅक्शन असते अनेकदा. पण दाखवताना एडिट करून दाखवलं जातं. समोरची व्यक्ती अशी वागलीये, म्हणून माझ्याकडून असं घडलं असेल याचा विचार कोणी करत नाही. काही मंडळी ना माझ्याबद्दल वाईट बोलण्यासाठीच बसवली गेलीयेत की काय असं वाटलं.
तीच ती आठ-दहा लोकं आहेत, ठराविक नावं आहेत, ज्यांनी या सगळ्या गोष्टी जास्त फेमस केल्या. त्यामुळे ज्यांनी वेळ काढून माझ्याबद्दल लिहिलं, चपातीबद्दल ट्रोल केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानते. कारण मी महिनाभरच बिग बॉसच्या घरात होते, पण त्यांनी मला प्रसिद्ध केलं," असा टोला त्यांनी ट्रोलर्सना लगावला.
सोनाली पाटीलसोबत कसं होतं नातं?
अभिनेत्री सोनाली पाटीलसोबत सुरेखा कुडचींचे सूर फारसे जुळले नाहीत, असं काहीसं चित्र बिग बॉसच्या घरात पहायला मिळालं.
त्याबद्दल सांगताना त्यांनी म्हटलं, "सोनाली पाटीलला मी ओळखत नव्हते. मी घरात आल्यावर तिनं माझं छान स्वागतही केलं होतं. पण तिचा आवाज वरच्या पट्टीतला लागायचा. त्यावर मी तिला पहिल्याच आठवड्यात म्हटलं होतं की, तू जरा हळू बोल. हे शांत घर आहे. ऐकायला येतं. त्यावर तिनं 'मी अशीच बोलते' असं उत्तर दिलं.
तिथून तिनं ते मनात धरलं असेल आणि तिच्या बाजूनं माझी एक छबी बनवली असेल. पण मला मी जशी नाहीये तसं वागायला, खोटंखोटं बोलायला नाही जमत."
"पण आम्ही एरव्ही एकमेकींशी चांगलंही बोललोय. छान राहिलोय. मस्करी केलीये. तिनं एकदा संध्याकाळी जेवण बनवलं होतं. उत्तम झालं होतं. मी तिला तेही जाऊन सांगितलं होतं. 'उत्तम जेवण झालंय, मी माझे सगळे शब्द मागे घेते,' असं म्हटलं. पण हे कुठं दिसलं की नाही, हे मला माहीत नाही," असंही सुरेखा कुडचींनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)