You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bigg Boss Marathi 3: शिवलीला पाटील 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडण्याचं कारण काय?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
बिग बॉस या कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
"माझा तेथे जाण्याचा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही.
"बिग बॉसमध्ये माझ्या जाण्याच्या निर्णयाने वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते अशा शब्दांमध्ये शिवलीला पाटील यांनी माफी मागितली आहे," असं त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
याआधी त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण देत बिग बॉस मराठी या शोला रामराम ठोकला होता.
'माझी तब्येत, माझं शरीर मला साथ देत नाहीये. माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्यामुळेच मी स्वतःहून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे,' असं म्हणत कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेतली होती.
बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनमधून घरातून बाहेर पडणाऱ्या त्या पहिल्या सदस्य ठरल्या
काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने त्या उपचारासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या.
शिवलीला बाहेर पडल्यामुळे बिग बॉसच्या घरातील वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या होत्या.
तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात येत असल्याचं बिग बॉसनं म्हटलं होतं. बुधवारी (29 सप्टेंबर) त्या उपचारांसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या.
'युवा कीर्तनकार ही ओळख, कीर्तनकाराचा वेगळा चेहरा, अध्यात्माचं मार्गदर्शन आणि यासोबतच अनलॉक इन्टरटेन्मेंट करायला, पुन्हा एकदा या संप्रदायाला वेगळं वळण द्यायला मी शिवलीला बाळासाहेब पाटील येत आहे 'बिग बॉस'च्या घरात,' असं म्हणत शिवलीला पाटील यांनी 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला.
कोण आहेत शिवलीला पाटील?
'बिग बॉस' मराठीचा तिसरा सीझन 19 सप्टेंबरपासून सुरू झाला. तसं तर 'बिग बॉसच्या घरात 15 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. पण काही नावं ही अगदी शो सुरू झाल्या दिवसापासून अधिक चर्चेत आहेत आणि त्यापैकीच एक नाव आहे कीर्तनकार शिवलीला पाटील यांचं.
शिवलीला पाटील या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आहेत. सोशल मीडियावर शिवलीला या लोकप्रिय आहेत, पण तरीही 'बिग बॉस'च्या घरात कीर्तनकार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण या शो चा फॉरमॅट आता प्रेक्षकांना चांगलाच माहितीये.
'मात्र स्वतःवर विश्वास असला तर सगळं नीट होतं. माझा स्वभाव आणि माझे विचार या जोरावर मी या घरात राहू शकेन,' असं म्हणत आपल्या बिग बॉसच्या घरात येण्याचं समर्थनच केलं.
'कीर्तनकार असताना बिग बॉसच्या घरात जाणं हाच एक मोठा टास्क आहे. कारण बिग बॉसच घर म्हटलं की भांडणं आणि भांडणं म्हणजे अध्यात्माची एकदम विरुद्ध बाजू. भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, या तुकोबांच्या अभंगाप्रमाणेच एक सुशिक्षित मुलगी सुसंस्कृत असू शकते, कीर्तनकार असू शकते आणि आपली मतं ठामपणे मांडू शकते हे दाखवून देण्यासाठी, लोकांचं मत बदलण्यासाठी मी बिग बॉसच्या घरात येत आहे,' असं शिवलीला पाटील यांनी घरात प्रवेश करण्याआधी म्हटलं होतं.
पण कीर्तनातून प्रबोधन करू पाहणाऱ्या कीर्तनकाराला अशा भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना रुचतंय का? ज्या सोशल मीडियावर शिवलीला यांची कीर्तन गाजतात, त्याच सोशल मीडियावर त्यांच्या बिग बॉसमधील एन्ट्रीनंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटल्या?
बिग बॉसच्या घरातील वाद, भांडण-तंटे यापासून त्या वेगळं राहू शकतील का? हे जाणून घेऊयाच. पण त्या आधी शिवलीला पाटील कोण आहेत, याचीही ओळख करून घेऊ.
वारकरी संप्रदायाचा वारसा
शिवलीला पाटील या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हे सुद्धा वारकरी संप्रदायातील कीर्तनकारच.
वडिलांकडून कीर्तनाचा वारसा मिळालेल्या शिवलीला या वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तन करत आहेत. ग्रामीण भाषेतून अगदी विनोदी पद्धतीनं त्या कीर्तन करतात.
शिवलीला यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही कीर्तनाचे कार्यक्रम केले आहेत. त्यांनी दहा हजारांहून अधिक कीर्तनं केली आहेत.
घरातलं वातावरण हे सांप्रदायिक असल्यामुळे आणि आई-बाबा सामान्य कुटुंबातले असल्यामुळे त्यांचा 'बिग बॉस'च्या घरात जायला विरोध होता, असं शिवलीला पाटील यांनी सांगितलं होतं.
'आपण कीर्तनकार आहोत, अध्यात्मात वाढलेली माणसं आहोत. हजार लोक आपल्यासमोर बसून ऐकतात, त्यांच्यासमोर सिद्ध करताना किती गोष्टींना जावं लागतं, असं त्यांना वाटत होतं. पण मी एक वाक्य मनात ठेवलं की किस्मत भी हिम्मतवालों का साथ देती आहे आणि मी धाडस केलं,' असं शिवलीला यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधी म्हटलं होतं.
'बिग बॉस'च्या घरात जाताना घरच्यांनी भरपूर सल्ले दिले. कधीकधी आपल्या रागावर आपला कंट्रोल नसतो, पण तिथं गेल्यावर व्यवस्थित बोललं पाहिजे असंही त्यांनी सांगितल्याचं शिवलीला यांनी म्हटलं होतं.
घरात आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भावूक का?
प्रसिद्ध चेहरा असल्यामुळे 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश मिळाला, तरी 100 दिवस या घरात टिकून राहण्यासाठी तुम्हाला तुमचा 'गेम' खेळावाच लागतो. स्वतः शिवलीला यांनाही त्याची कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी घरात आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भावनिक होत आपल्याला नेमकं कसं वागावं हे कळत नाहीये, म्हणत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला.
घरातील एक स्पर्धक मीनल शाहसोबत त्या बोलत होत्या.
'आईला काय वाटत असेल कळत नाहीये, कसं वागावं हे पण कळत नाहीये,' असं त्या म्हणतात.
'तू चांगलं खेळतीयेस. तुझी मतं एवढी क्लिअर आहेत. तुला काहीही वाटलं तरी मी नेहमीच सपोर्टिव्ह असेन,' असं म्हणत मीनल शाह त्यांची समजूत घालते.
त्याचवेळी तिथून जात असलेला अभिनेता विशाल निकम अभिनेता त्यांना 'माऊली, तुम्ही खूप स्ट्राँग आहात,' असं म्हणत शिवलीला यांना पाठिंबा देतो.
तृप्ती देसाई यांच्यासोबत वाद
एकीकडे शिवलीला यांची काही स्पर्धकांसोबत चांगलं बाँडिंग झाल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरातील वाद-विवादांपासूनही त्यांना राहता आलं नसल्याचं चित्रही आहे.
घरात आल्यापासून एका आठवड्याच्या काळात शिवलीला यांचे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासोबत वाद झाले.
या दोघी घरात आल्यावर आमनेसामने येऊ शकतात, याची झलक बिग बॉसच्या प्रीमिअरमध्ये पहायला मिळालं होतं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी शिवलीला यांना कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचा फोटो दाखवला आणि त्यांच्याबद्दल काय वाटतं, असं विचारलं. त्यावर शिवलीला यांनी म्हटलं की, तमाशाला जाणारा समाज कीर्तनाकडे वळवणारा प्रबोधनकार.
त्यानंतर महेश मांजरेकर यांनी शिवलीलांना तृप्ती देसाई यांचा फोटो दाखवला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, तृप्ती देसाई यांचं आंदोलन गाजलं होतं. पण त्यांनी इंदुरीकर महाराजांचा बोलण्याचा ओघ पाहिला, पण त्यांना जे सांगायचंय ते पाहिलं नाही.
हा विषय इथे नाही थांबला. घरात गेल्यानंतरही एकदा याच विषयावरून तृप्ती देसाई आणि शिवलीला या आमनेसामने आल्या.
झालं असं होतं की, शिवलीला, मीनल शाह, सुरेखा कुडची आणि तृप्ती देसाई गप्पा मारत होत्या.
त्यावेळी शिवलीला यांनी म्हटलं की, या तृप्ती ताई देसाई आहेत, ज्यांनी इंदुरीकर महाराजांविरुद्ध केस दाखल केली होती.
त्यावर तृप्ती देसाईंनी म्हटलं, 'त्यांची बरीच कीर्तने ही महिलांचा अपमान करणारी होती. आमच्या आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची बरीचशी कीर्तने यूट्यूबवरुन डिलिट केली गेली. म्हणजे जवळजवळ 80 टक्के कीर्तने डिलिट केली.'
"महिलांनी फेटा घालू नये महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाउन घालायचा का? हे इंदुरीकर महाराजांचं वक्तव्यं चुकीचं होतं. मला अनेक कार्यक्रमात फेटा घातला जातो. तूसुद्धा फेटा घालतेस," असं तृप्ती यांनी शिवलीला यांना उद्देशून म्हटलं होतं.
वीकेंड स्पेशल भागात तर शिवलीला आणि तृप्ती देसाई यांची महेश मांजरेकर यांच्यासमोरच वादावादी झाली होती.
वीकेंडच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांना एक टास्क दिला गेला होता. घरातील ज्या एका व्यक्तीला तुम्हाला काही सांगावसं वाटतंय, त्या व्यक्तिबद्दल बोला.
तृप्ती देसाई यांनी शिवलीला यांचं नाव घेतलं आणि म्हटलं की, "तुला स्वतःच्या बुद्धीचा वापर करताच येत नाही का? कोणी जे सांगेल तेच ऐकायचं. स्वतःचा काहीतरी विचार ठेव, बुद्धी ठेव. तरच तू पुढे जाशील. मला प्रबोधनकार, कीर्तनकार अशी कोणी मुलगी दिसलीच नाही."
शिवलीला यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं, "मला जे बोलायचंय ते मी बोलते. पण मी सगळ्यांचा मान राखून बोलते. मी ज्या कुटुंबात, वातावरणात वाढले, तिथे विनाकारण कोणाच्या तरी भांडणात किंवा विचारात आपला विचार घुसवू नये असं शिकवलंय. जिथे मला विचार पोहोचवायचा आहे, तिथे मी पर्सनली बोलते. मोठ्यानं बोललं, भांडणातच बोललं, म्हणजे विचार मांडले असं नाही. माझी काही मतं आहेत. ज्यावर मी ठाम आहे."
ज्यावर तृप्ती देसाई यांनी पण ती मतं दिसायला हवीत असं म्हटलं. यावर शिवलीला यांनी मला दिसण्यासाठी काही गोष्टी करायची गरज नाहीये.
शिवलीला पाटील यांची कीर्तनं
शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाच्या अनेक क्लिप्स या यूट्यूबवर उपलब्ध आहे. बऱ्याचशा क्लिप्स या तुफान विनोदी कीर्तन अशाच नावानं आहेत.
एका कीर्तनात त्या म्हणतात की, 'माणूस मेला की, मी नक्की जाते. सांत्वन करायला नाही, तर बायका कशा रडतात ते पाहायला जाते. 90 वर्षांचा म्हातारा मेल्यावर त्याची बायको म्हणत असते, देवा, त्यांच्याऐवजी मला का नाही नेलं? मला का नाही नेलं? देह का सोपा वाटला? देह जाणं ही दुःखाची गोष्ट वाटते का? देह जातोच, जावंच लागणार आहे त्याला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तिथे मनुष्याचे काही चालेना....'
'पोरींना सांस्कृतिक पोरं, धोतरवाली-माळकरी पोरं आवडत नाहीत. त्यांना टाईट जीन्सवाली मुलं आवडतात. फॅशन करा, पण शोभेल अशी. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे मिशी ठेवा. काहीही करा, पाणी घाला, पण मिशी ठेवा. सुंदर दिसते. मिशी असावी, दाढी असावी. सुंदर दिसायचं ना...आई-बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, चारित्र्यामध्ये कर्तृत्व असावं आणि देशाविषयी प्रेम असावं...देखणेपणं आपोआप येतं,' असंही त्या एका कीर्तनात म्हणतात.
व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे वगैरे आपले दिवस नाहीत. आपला एकच सण-19 फेब्रुवारी. शिवजयंती, ती साजरी केलीच पाहिजे, असं म्हणत त्या एका कीर्तनात शिवाजी महाराजांची शिकवण, मुलांवर करायचे संस्कार याबद्दल बोलतात.
सोशल मीडियावर ट्रोल
शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
कलियुगातले कीर्तनकार, असं म्हणत सोशल मीडियावर शिवलीला यांना ट्रोल केलं गेलं.
एका युजरने शिवलीला यांना उद्देशून म्हटलं आहे की, 'ताई चुकीचं आहे हे. तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुम्ही जात आहात म्हणजे अवघड आहे.'
'लोकांना ब्रम्हज्ञान सांगत होती पण स्वतः मात्र कोरडी पाषाण निघाली,' असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे.
वयस्कर बायकांना मालिका बघता म्हणून नाव ठेवत होती आणि स्वतः फालतू शो मध्ये जाते, असंही काही जणांनी म्हटलं आहे.
काहींनी मात्र मस्त खेळा शिवलीला ताई, असं म्हणून त्यांना पाठिंबाही दिला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)