बिग बॉसमध्ये सलमान खानने दिलेला सल्ला माझी मुलगी धुडकावून लावते - ब्लॉग

    • Author, रूपा झा
    • Role, बीबीसी हिंदी

बिग बॉस कार्यक्रमात स्पर्धकांच्या वागण्याला नैतिकतेची वेसण आहे का?

नववीत शिकणाऱ्या माझ्या मुलीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या आधीच्या वर्गशिक्षिकेला एक पत्र लिहिलं. त्या वर्गात असताना मुलांकडून सांगितल्या जाणाऱ्या रेप जोक्स संदर्भात तिने आक्षेप नोंदवला.

अशा स्वरूपाच्या जोक्समुळे वर्गातल्या मुलींना किती अस्वस्थ आणि विचित्र वाटतं याबाबत तिने लिहिलं होतं.

वर्षभरापूर्वी ती आणि तिच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींनी अशा जोक्सचा सामना केला होता. मात्र त्यावेळी या मुलांविरोधात तक्रार करण्याचं किंवा त्याबाबत शिक्षकांना सांगण्याचं धाडस त्या दाखवू शकल्या नाहीत.

वर्षभरानंतर अशाच स्वरुपाच्या बोलण्यामुळे तिला ते सगळं आठवलं. वर्गातील मुलांचा एक गट मुलींच्या शरीरावर, योनीबाबत, शरीराच्या विविध अवयवांबाबत शेरेबाजी करत होता. बलात्कारासारख्या हिंसक गोष्टीला किरकोळ असल्याचं ते बोलत होते. रेप जोक्स हसण्याखिदळण्याचा विषय झाला होता.

एका वर्षानंतरही तिच्या मनात हे सगळं तसंच्या तसं होतं. तेव्हा याविरोधात बोललो नाही याची रुखरुख तिच्या मनाला होती.

एक वर्षानंतर यासंदर्भात बोलणं किंवा तक्रार करणं योग्य आहे का असं तिने मला विचारलं. वर्षभरानंतर अशी तक्रार करणं म्हणजे लोकांना मुलींनीच काहीतरी चुकीचं केलंय असं वाटू शकतं. त्यामुळे तिने मला विचारलं.

बरं झालं तिनेच निर्णय घेतला, धाडस गोळा केलं आणि योग्य वेळी बोलायला हवा असा निर्धार केला. एक वर्षानंतर का होईना स्वत:साठी, मैत्रिणींसाठी ती उभी राहिली.

वेळ उलटून जाणं म्हणजे एखाद्या आक्षेपार्ह घटनेबाबत अमुक वेळेत बोललं नाही तर तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या खरेपणाविषयी शंका घेतली जाते. पहिल्या वेळेस, सुरुवातीला विरोध केला नाही, आक्षेप घेतला नाही मग आता कशाला अशी विचारणा केली जाते.

या मानसिकतेमागची कारणं धुंडाळणं कठीण नाही. या देशातली सर्वसामान्य माणसं सोडा, हिरो मंडळी सुद्धा मुलींना असं समजवतात की मुलांचं असं बोलणं थट्टामस्करी आहे, तुम्ही उगाचच याला महत्त्व देत आहात, मुलं बोलताना वाहवत जातात, त्यामुळे मुलांच्या अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करा.

सलमान खान काय म्हणाला होता?

एका मोठ्या टीव्ही वाहिनीवरच्या एका लोकप्रिय रिअलिटी शो दरम्यान सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खान सहभाही स्पर्धकांपैकी एका महिलेला असं सांगताना दिसला होता.

या कार्यक्रमात सदरहू महिला सहभागीने नोंदवलेला निषेध किंवा केलेला विरोध चुकीचं मानून तिलाच दोषी ठरवण्यात आलं.

सलमान खान बिग बॉस स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना, मुलींना हे सांगत होता की- तुमच्यावर कोणी आक्षेपार्ह टिप्पणी किंवा शेरेबाजी केली तर त्याकडे दुर्लक्ष करा, दुसऱ्या वेळीही दुर्लक्ष करा. तिसऱ्या वेळी आक्षेप नोंदवा आणि संबंधित व्यक्तीला स्पष्ट सांगा. याचा अर्थ आक्षेपार्ह बोलण्यावर कठोर कारवाईची आवश्यकता नाही.

एकप्रकारे 'बोट दिलं तर हात पकडणार' या मुलांच्या दृष्टिकोनाला सलमान खान पाठिंबाच देत होता.

... आणि बोलता बोलता वाहवत गेला असा त्याचा सूर होता.

बिग बॉस नावाच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो स्पर्धेत अभिजीत बिचुकले एका टास्कदरम्यान मदत करण्यासाठी देवोलीना नावाच्या महिला स्पर्धकाकडे चुंबनाची मागणी करत होता.

देवोलीना यांनी एक दोनवेळा त्यावर काहीही प्रतिसाद दिला नाही. पण नंतर त्यांनी याविरोधात आवाज उठवला. त्यांनी असं पाऊल उचलल्यानंतर देवोलीना यांच्यावरच लोक शंका घेऊ लागलेत.

गमतीगमतीत म्हटलं गेलं होतं, तुम्हाला वाईट वाटलं होतं तर पहिल्यांदाच तसं स्पष्ट करायला हवं होतं. एक तरुण मुलीची आई आणि एक महिला या नात्याने माझी मुलगी किंवा कोणत्याही मुलीने हा सल्ला ऐकावा असं मला वाटत नाही.

यालाच व्हिक्टिम शेमिंग अर्थात पीडितेला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलण्यासारखं आहे. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा ज्या गोष्टीचा विरोध केला नाही त्या गोष्टीचा अकराव्या वेळी किंवा नंतर कधीही विरोध करणं हा हक्क आहे ही छोटी गोष्ट समजणं एवढं कठीण आहे का?

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सलमान खान यांनी देवोलीना यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यातून पीडितेलाच आरोपी ठरवणं खूप सोपं आहे.

मुलीनेच काहीतरी केलं असेल

मुलीनेच काहीतरी केलं असेल इथपासून पुरुष पुरुषच असतो या वाक्यांमागची मानसिकता महिलांना पिंजऱ्यात बंद करतात. हे कुंपण भेदणाऱ्या मुलींपासून सावध राहा असा सल्लाही दिला जातो.

पुरुषांना त्यांच्या वागण्याच्या मर्यादेबाबत काहीही सांगितलं जात नाही, समज दिली जात नाही पण तुम्ही अशा परिस्थितीपासून दूर राहा असा सल्ला दिला जातो.

बघता बघता सोशल मीडियावर या घटनेवरून दोन तट पडले. महिला स्पर्धकाचं त्या पुरुष स्पर्धकाशी वागणं सर्वसाधारण होतं इथपासून चर्चा सुरू झाली.

एकाक्षणी तुम्ही कोणाबरोबर नीट वागत असाल, तुमच्या वागण्याबोलण्यात सहजता असेल तर नंतर त्या व्यक्तीच्या आक्षेपार्ह बोलण्यावर, हालचालींवर तुम्ही आक्षेप कसा घेऊ शकता असा युक्तिवाद केला जातो.

हे धक्कादायक आहे. पॉप्युलर कल्चर, पॉप्युलर कलाकार यामध्ये गणना होणारी मंडळी ज्यांच्याकडे समाज रोल मॉडेल अर्थात एक आदर्श म्हणून बघतात, त्यांच्या वागण्याबोलण्याचं समाजातील अनेकजण अनुकरण करतात, तीच माणसं महिलांना कुणी आक्षेपार्ह वागत-बोलत असेल तर दुर्लक्ष करा असं सांगतात.

पहिल्या वेळेस तुम्ही आक्षेप नोंदवला नाहीत तर नंतर तुम्हाला त्या माणसाच्या वागण्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही असं म्हणतात. त्या वागण्याला संधीसाधू ठरवत महिलेवरच शंका घेतली जाते.

कोणत्याही प्रकारची लैंगिक हिंसा किंवा आक्षेपार्ह बोलणं-हालचाली यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे अनेकदा लगेच समजत नाही. अनेकदा त्या महिलेला किंवा मुलीला धक्का बसलेला असतो.

घड्याळाची वेळ किंवा कॅलेंडरच्या तारखा महिलांनी आक्षेपार्ह वागण्याबोलण्याविरोधात कधी बोलावं हे निश्चित करू शकत नाहीत.

वाईट गोष्टींना सर्वसाधारण ठरवलं जाण्याच्या प्रक्रियेत पुरुष कळत नकळत सामील होतात. कोणी रोखलं नाही, कठोरपणे सांगितलं नाही, थांबवलं नाही तर भयंकर अपराध थट्टामस्करीच्या नादात सोडून दिले जाऊ शकतात.

हे पहिलंच प्रकरण नाही

मुलायम सिंह यादव यांनी 'मुलांकडून चूक होते' असं म्हणणं किंवा कर्नाटकच्या आमदारांनी बलात्कारासंदर्भात केलेलं वक्तव्य हे काही पहिलं नाही आणि शेवटचंही नसेल.

मुली, महिला आज बोलल्या तर पुढे जाऊन असं बोलणाऱ्या, वागणाऱ्या माणसांना रोखण्याचं धाडस होईल. त्या आरोपीला केलेल्या कृत्याची शरम वाटेल असं वातावरण तयार होऊ शकेल.

गोष्ट अतिशय स्पष्ट आणि रोखठोक आहे- नाही म्हणजे नाही. कॉन्सेंट म्हणजे परवानगीचा अर्थ समजणं एवढंही कठीण असू नये. त्यावेळचं गप्प राहणं किंवा थोड्या कालावधीनंतर आवाज उठवणं याला सहमती असल्याचं समजणं हा अन्याय आहे.

चित्रपटांमध्ये, रिअलिटी शो मध्ये, मास मीडियाच्या अनेक व्यासपीठांवर अशी मानसिकता स्वीकारणं नेहमीचं झालं आहे. कोट्यवधी लोकांचा आवडता अभिनेता अशा गोष्टींना खतपाणी घालत असेल मग शाळा महाविद्यालयांमध्ये रेप जोक्स तसंच देशात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या प्रसंगाबाबत आश्चर्य वाटायला नको.

सलमान खानसारखा सुपरस्टारपदी पोहोचलेला अभिनेता आणि असे कार्यक्रम सदरहू घटनेसंदर्भात चुकीची भूमिका घेतलेय असं न वाटता बेजबाबदार वागत असतील आणि चलता है म्हणून पुढे जात असतील तर हा गुन्हा आहे.

2019 मध्ये देशभरात '#मी टू' चळवळीच्या माध्यमातून असंख्य महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. त्यावेळी महिलांनी आयुष्यात आधी आलेल्या कटू अनुभवांना जगासमोर मांडण्याची हिंमत दाखवली होती.

काळ सरला म्हणजे जखमांचे घाव भरून निघत नाहीत याचं ते द्योतक होतं. जोपर्यंत त्या जखमा मनात भळभळत आहेत त्यांना कोणीही वेळेची मर्यादा घालून त्यावर पडदा टाकला जाऊ शकत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)