सेक्सवर्करच्या मारेकऱ्याचा 15 वर्षांपासून शोध आणि त्यासाठी लावलेल्या तिच्या होलोग्रामची गोष्ट

फोटो स्रोत, Dutch police
- Author, अॅना हॉलिगन
- Role, बीबीसी न्यूज, अॅमस्टरडॅम
एका तरुण सेक्स वर्करचा होलोग्राम नेदरलँड्सची राजधानी असलेल्या अॅमस्टरडॅम च्या वेश्यावस्तीला एकप्रकारे छळतो आहे.
फिकट झालेली डेनिमची शॉर्ट्स, बिबट्याच्या छापाची ब्रा, पोटावर आणि छातीभर पसरलेला टॅटू असलेली, कॉम्प्युटरद्वारे तयार केलेली 3 डी प्रतिमा समोर येते आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खिडकी ठोठावताना दिसते.
ती प्रतिमा पुढे वाकते, खिडकीच्या काचांवर श्वास सोडते आणि त्यावर "मदत" हा शब्द लिहिते.
ही प्रतिमा म्हणजे बर्नडेट "बेटी" झाबो (Bernadette Betty Szabo)
या 19 वर्षाच्या तरुणीचं प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी तयार करण्यात आलेला होलोग्राम आहे.
ती मूळची हंगेरीची होती आणि 2009 मध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर काही महिन्यांतच तिची हत्या झाली होती.
चाकूनं तिची हत्या करण्यात आली होती. या हत्येनं 15 वर्षांपासून पोलिसांना हैराण केलं आहे. या हत्येचा छडा लावण्यासाठी डच डिटेक्टिव्ह प्रथमच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
या कुप्रसिद्ध आणि धोकादायक अशा व्यवसायात पोट भरण्यासाठी म्हणून शेकडो तरुणी सेक्स वर्करचं काम करत आहेत. हत्या झालेल्या या किशोरवयीन तरुणीची प्रतिमा ज्या खिडकीमागून दाखवली जाते, त्याच्या आजूबाजूलाच हा शेकडो तरुणी व्यवसाय करतात.
कष्टाचं होतं झाबोचं आयुष्य
या सजीव होलोग्राममुळे या मृत तरुणीची आठवण करून देण्यास मदत होईल आणि तिच्या हत्येच्या न सुटलेल्या कोड्याकडे लक्ष वेधलं जाईल, असं या हत्येचा तपास करणाऱ्यांना वाटतं.
आतापर्यंत, बेटीच्या मारेकऱ्यांनं कायदा, पोलीस यंत्रणांना हुलकावणी दिली आहे. अॅन ड्रेजर-हीमस्कर्क या हत्येचा तपासण करणाऱ्या डिटेक्टिव्ह आहेत. मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नसला तरी अॅन मात्र त्याला पकडण्याचा दृढनिश्चय केलेला आहे.


त्या म्हणतात, "फक्त 19 वर्षांच्या एका तरुणीचं आयुष्यं इतक्या भयानक पद्धतीनं हिरावून घेतलं गेलं आहे."
डिटेक्टिव्हच्या मते, झाबोचं आयुष्य अतिशय कष्टाचं होतं आणि ती त्याला कणखरपणे तोंड देत होती.
वयाच्या 18 वर्षी ती अॅमस्टरडॅमला आली होती आणि लवकरच ती गर्भवती झाली होती. गर्भारपणाच्या काळात देखील तिनं काम करणं सुरूच ठेवलं होतं. बाळाला जन्म दिल्यावर देखील तिनं लवकरच पुन्हा कामाला सुरुवात केली होती.
नेमकं काय झालं होतं?
19 फेब्रुवारी 2009 च्या मध्यरात्रीनंतर दोन सेक्स वर्कर झाबोच्या खोलीत तिला पाहायला गेल्या. दोन ग्राहकांच्यामध्ये जो वेळ असतो तेव्हा त्या तिला पाहायला गेल्या होत्या. कारण या मधल्या वेळेत नेहमी झाबोच्या खोलीतून जे संगीत ऐकू यायचं ते त्या रात्री ऐकू येत नव्हतं.
प्लास्टिकनं झाकलेला पलंग, व्हॅनिटी टेबल आणि सिंक असलेल्या तिच्या छोट्याशा खोलीत जेव्हा त्या दोघी शिरल्या तेव्हा त्यांना बेटी झाबोचा मृतदेह दिसला.
बाळाला जन्म दिल्यानंतर तीनच महिन्यातच तिची हत्या झाली होती. एका चाकूनं तिची हत्या करण्यात आली होती.
तिच्या मुलाची व्यवस्था एका अनाथालयात करण्यात आली होती. त्याची आई कोण होती हे त्याला कधीही कळलं नाही. या भयाण वास्तव्यामुळे डिटेक्टिव्हना तिच्या मारेकऱ्याला शोधण्याची प्रेरणा मिळते.

या बातम्याही वाचा -
- के पॉप सेक्स स्कँडल : 'चाहत्यांच्या धमक्यांमुळे तणाव, दोनवेळा गर्भपात झाला'
- धोतऱ्याच्या फुलाचं विष वापरून 'लोकांकडून हवं ते करुन घेण्याच्या घटना’
- 'कोकेन गॉडमदर' म्हणून ओळखली जाणारी माफिया, जिनं आपल्या 3 पतींची हत्या केली
- बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो 20 वर्षं थांबला, कॅनडाचा पासपोर्ट घेऊन आला आणि...

तपास यंत्रणांचे अथक प्रयत्न
झाबोची हत्या झाल्याबरोबर पोलिसांनी तपास सुरू केला होता, मात्र अजूनही तिचा मारेकरी सापडलेला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि संभाव्य साक्षीदारांकडे चौकशी केली. मात्र त्यातून अद्यापतरी काहीही निष्पन्न झालेलं नाही.
लाल निऑन खिडक्यांमागे असलेल्या अर्धनग्न महिलांकडे पाहणारे बहुतांश लोक पर्यटक असतात. झाबोची हत्या करणारा गुन्हेगार परदेशातून आला होता असा संशय पोलिसांनी आहे.

फोटो स्रोत, Dutch police
आता पोलीस अॅमस्टरडॅमला ज्यांनी भेट दिली होती अशा पर्यटकांना या घटनेबद्दल काही माहित असल्यास ते सांगण्याचं आवाहन करत आहेत. गुन्हेगाराची माहिती देण्यासाठी समोर येणाऱ्या साक्षीदारासाठी पोलिसांनी 30,000 युरोचं बक्षीस देखील ठेवलं आहे.
या बक्षीसामुळे त्या वेळेस अॅमस्टरडॅमला भेट दिलेले लोक यासंदर्भात काही माहिती असल्यास ती देण्यासाठी समोर येतील असं त्यांना वाटतं.
सेक्स वर्करच्या आयुष्यातील अस्थैर्य
अॅमस्टरडॅममधील प्रसिद्ध वेश्यावस्त्या शहराबाहेरच्या "इरॉटिक झोन"मध्ये हलवण्याची योजना आहे. या विवादास्पद योजनेशी अॅमस्टरडॅममधील सेक्स वर्कर्सचा संघर्ष सुरू आहे.
हा संघर्ष सुरू असतानाच त्या भागात सुरक्षेचे विविध उपाय असतानादेखील सेक्स वर्करसाठी तो भाग किती धोकादायक आहे या गोष्टीची आठवण बेटी झाबोचा होलोग्राम सेक्स वर्कर्सना करून देत असतो.
लोकांच्या दृष्टीकोनातून ज्या महिला सेक्सचा व्यवसाय करतात त्यांना या प्रसिद्ध वेश्यावस्तीतून हलवल्यामुळे त्या आणखी मोठ्या धोक्यात सापडू शकतात, अशी चिंता तिथल्या सेक्स वर्कर्सनी व्यक्त केली आहे.
नेदरलॅंड्सच्या सर्वात व्यस्त अशा नाईटस्पॉटपैकी एका ठिकाणी हा हिंसक गुन्हा घडला आहे आणि त्याचे साक्षीदार समोर येत नाहीत, ही वस्तुस्थिती पोलिसांना आश्चर्यात आणि गोंधळात टाकणारी आहे.
अॅमस्टरडॅममधील या ऐतिहासिक वेश्यावस्तीत कधीकाळी वास्तव्यास असलेल्या आणि तिथे काम केलेल्या, या तरुण सेक्स वर्करचं डिजिटल अस्तित्व, तो होलोग्राम, तिथे वावरणाऱ्यांना तिच्या हत्येचा उलगडला अद्याप झाला नसल्याची आठवण करून देतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











