'कोकेन गॉडमदर' म्हणून ओळखली जाणारी माफिया, जिनं आपल्या 3 पतींची हत्या केली

फोटो स्रोत, NETFLIX
- Author, यास्मीन रफो
- Role, बीबीसी न्यूज
कुख्यात ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार कोणाला माहित नाही. कोणाचीही भीती न बाळगणाऱ्या या कोलंबियन ड्रग माफियाने एकदा ग्रिसेल्डाविषयी बोलताना सांगितलं होतं की, "मी कधी जर कोणाला घाबरलो असेल तर केवळ ग्रिसेल्डा ब्लँको नावाच्या बाईला."
जे लोक दिसायला चांगले वाटत नाहीत अशा लोकांची या स्त्रीने हत्या केली होती.
ग्रिसेल्डा ब्लॅन्को अतिशय निर्दयी गुन्हेगारी मानसिकतेची स्त्री होती आणि 1970 - 1980 च्या दशकात मियामीमध्ये असलेल्या कुख्यात लोकांमध्ये तिचं नाव घेतलं जायचं.
आता या कुख्यात ड्रग माफिया स्त्रीच्या आयुष्यावर हॉलिवूड मालिका बनणार आहे. मॉडर्न फॅमिलीमधील सोफिया वगारा यात ग्रिसेल्डाची भूमिका साकारत आहे. नेटफ्लिक्सवर ड्रग्जच्या व्यापाराविषयी प्रसिद्ध असलेल्या नार्कोजचे लोक ही मालिका तयार करत आहेत. या मालिकेत सहा भाग असतील.
पण आपल्या तीन पतींची हत्या करणाऱ्या या 'कोकेन गॉडमदर'ची गोष्ट त्याहूनही रहस्यमय आहे.
1943 मध्ये कोलंबियामध्ये जन्मलेली ब्लँको लहानपणापासूनच गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली होती.
त्यानंतर एका श्रीमंत मुलाचं अपहरण केलं. पण त्याच्या पालकांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्या मुलाला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. त्यावेळी ग्रिसेल्डा ब्लँको फक्त 11 वर्षांची होती.
1964 मध्ये, वयाच्या 21 व्या वर्षी ब्लँको आपली तीन मुलं आणि पतीला बेकायदेशीरपणे न्यूयॉर्कला घेऊन गेली आणि तिथे गांजा विकू लागली.
ब्लँकोचं पात्र वठवणारी वगारा कोलंबियामध्येच जन्मली आहे. तिने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ग्रिसेल्डाचं सुरुवातीचं आयुष्य कसं होतं हे लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं आहे."
तिच्यावर तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी होती. तिच्याकडे जगण्याचं ना कोणतं साधन होतं ना ती शिक्षित होती.
या मालिकेचे निर्माते एरिक न्यूमन म्हणाले की त्यांना ग्रिसेल्डा ब्लँकोच्या "जटिल व्यक्तिरेखेचे मानवीकरण" करायचं आहे. कारण एखादा व्यक्ती काय करतो यासाठी त्याच्याकडे त्याचं त्याचं स्पष्टीकरण असतं. आणि हे तिचं स्पष्टीकरण आहे."
"अपमानास्पद नातेसंबंधातून बाहेर पडणारी ग्रिसेल्डा बऱ्याच स्त्रियांना स्वतःसारखी वाटू शकते."
सह-दिग्दर्शक आंद्रेस बेझ म्हणतात, "ती पुरुषांच्या जगात एकमेव अशी महिला होती जी स्वतःला सिद्ध करण्यासाठी दहापट अधिक मेहनत करायची."
"तिच्या आजूबाजूच्या माणसांचा पराभव करण्यासाठी ती तिची बुद्धिमत्ता वापरते. सुरुवातीला, लोकांच्या तिच्याकडून सकारात्मक अपेक्षा असतात, पण नंतर सर्वकाही बदलतं."
सामर्थ्यामुळे ती पशूसारखं वागू लागली
1970 मध्ये ब्लँकोने तिच्या पहिल्या पतीला ठार मारण्याचा आदेश दिला आणि ती स्वतः मियामीला निघून गेली. इथे तिची भेट ड्रग तस्कर अल्बर्टो ब्राव्हो याच्याशी झाली. त्याने तिला अंडरवर्ल्डच्या जगताशी ओळख करून दिली. यानंतर तिने अल्बर्टो सोबत लग्न केलं.
ब्लँकोची प्रवृत्ती हिंसक होती. अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये ती धाडसाने उतरली होती. तिने तरुणींच्या अंतर्वस्त्रांमध्ये कोकेन लपवून कोलंबिया ते अमेरिका अशी अंमली पदार्थांची तस्करी सुरू केली. आता ती संपूर्ण गुन्हेगारी उद्योगाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येत होती.
मियामीमध्ये अंमली पदार्थांच्या व्यापरावरून माफियांमध्ये वाद वाढू लागला होता. या रक्तरंजित लढाईत ब्लँको आणखीनच क्रूर बनली.
पुढे जाऊन तिला असं वाटू लागलं की, तिचा पती आपले पैसे चोरतो आहे म्हणून तिने 1975 मध्ये पतीची गोळ्या झाडून हत्या केली.
1983 मध्ये ग्रिसेल्डाने मियामी सोडताना तिच्या तिसऱ्या पतीची हत्या केली आणि त्यांच्या मुलाला मायकेल कॉर्लीओनला सोबत घेऊन गेली.
तिच्या क्रूर वर्तनासाठी तिला 'ब्लॅक विडो' म्हणून ओळखलं जायचं. 'ब्लॅक विडो' ही कोळ्याची एक प्रजात आहे, ज्यामध्ये मादी नराला खाऊन टाकते.

फोटो स्रोत, NETFLIX
ब्लँकोचं साम्राज्य झपाट्याने वाढलं आणि 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस ती जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली महिला बनली. अमेरिकेत दर महिन्याला तस्करी होणाऱ्या 1.5 टन कोकेनचा ती कारभार बघायची.
वगाराने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "माझ्या मनात असा विचार येतो की, ग्रिसेल्डा जेव्हा पहिल्यांदा मियामीला आली असेल तेव्हा आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं या हेतूनेच ती इथे आली असेल. पण या सगळ्यात ती इतकी गुंग झाली की सामर्थ्यामुळे ती पशूसारखं वागू लागली."
1980 च्या दशकाच्या सुरुवातीस, ब्लँकोला तिचं साम्राज्य सोडण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीकडून 1.5 कोटी युएस डॉलर मिळणार होते. पण तिने हे पैसे धुडकावले.
पुरुषी जगावर राज्य केलं
सोफिया वगाराच्या म्हणण्यानुसार, "ब्लँकोने मियामीच्या नार्को साम्राज्यावर दोन दशकांपर्यंत मजबूत पकड ठेवली. एवढं असूनही पूर्णतः पुरुषप्रधान उद्योगात एक स्त्री म्हणून काम करणं तसं अवघड होतं."
"तिने स्थानिक ड्रग्ज विक्रेत्यांसाठी एका माणसाला नियुक्त केलं होतं. कारण एखाद्या माणसाकडून सौदा आला तरच तो मंजूर व्हायचा."
खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, ब्लँकोने स्वतः व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
1980 च्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात अंदाजे 135,000 क्युबन लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.
या लोकांना मेरीलिटोस म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्यापैकी काही जण आधीच गुन्हेगारी टोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीच्या हत्यांमध्ये सामील होते.
ब्लँकोने याचा फायदा घेतला आणि त्यांना काम करण्यासाठी आपल्या टोळीत सहभागी करून घेतलं.
तिने हिटमॅन (पैशासाठी मारेकरी), पिस्टोलेरॉस (टोळी) यांचा स्वतःचा गट तयार केला. हे सगळे गुन्हेगार मोटारसायकलवरून केल्या जाणाऱ्या खुनासाठी प्रसिद्ध होते.

फोटो स्रोत, NETFLIX
बेझ सांगतात, "ब्लॅन्को बाहेरची व्यक्ती होती आणि तिने आपल्या जवळ अशाच लोकांना घेतलं जे बाहेरून आलेले आहेत. अशा व्यवसायात जिथे विश्वास मिळवणं आणि तो टिकवून ठेवणं कठीण असतं, तिथे तिला माहिती होतं की, ती नेमकं काय साध्य करू पाहते आहे."
बेझ पुढे म्हणाले, "हे सर्व लोक अपूर्ण होते. समाजाने घालून दिलेल्या नियमात ते बसत नव्हते. ग्रिसेल्डाला हे माहित होतं, आणि म्हणून तिने त्यांना जवळ करत आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं."
ब्लँकोच्या आयुष्यातील चढ-उतार पाहिल्यावर वगारा म्हणते, "मी स्वतः एक कोलंबियन, एक आई आणि एक स्थलांतरित आहे. एक स्त्री म्हणून ग्रिसेल्डाकडे पाहिलं गेलं. पण आजच्या काळातही स्त्रियांसाठी संधीची कमतरता आहे आणि त्यांना खूप कष्ट उपसावं लागतं."
स्त्री इतकी वाईट असू शकते?
1980 च्या मध्यात ग्रिसेल्डाला कॅलिफोर्निया मध्ये अटक करण्यात आली. यानंतर तिचं गुन्हेगारी साम्राज्य कोसळू लागलं आणि अगदी वर्षात संपूनही गेलं.
तिच्या दोन दशकांच्या गुन्हेगारी प्रवासाबद्दल, मियामीला अमली पदार्थांच्या विळख्यात आणण्यावर ही नवी मालिका बेतली आहे.
वगारा सांगते, "एक महिला अशी टोळी चालवत असेल याची कल्पना कुणालाही नव्हती. लोकांना प्रश्न पडतो की एखादी स्त्री इतकी वाईट कशी काय असू शकते?"
अंमली पदार्थांची तस्करी करण्यात एखादी स्त्री एवढी प्रबळ असू शकते असं पोलिसांना कधी वाटलंच नाही. आणि ते त्यांच्या मतावर ठाम होते.

फोटो स्रोत, NETFLIX
मियामी पोलिस दलात गुप्तचर विश्लेषक असलेले जून हॉकिन्स सांगतात, त्यांचे सहकारी आजही ही गोष्ट मान्य करत नाहीत.
जून 1970 च्या मध्यापासूनच ब्लॅन्कोला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
हॉकिन्स सांगतात, "ग्रिसेल्डा चार मुलांची आई होती आणि ती अशा जगात काम करत होती जिथे महिलांचं अवमूल्यन केलं जायचं. पण तिने दाखवून दिलं की तिच्याकडे जगण्यासाठी केवळ एकच पर्याय नव्हता."
ग्रिसेल्डाचा शेवट कसा झाला?
17 फेब्रुवारी 1985 रोजी, ब्लँकोला तिच्या घरी अटक करण्यात आली आणि तिच्यावर कोकेनचे उत्पादन, आयात आणि पुरवठा केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
तिच्यावर फर्स्ट-डिग्री हत्येच्या तीन गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले. या आरोपामुळे तिला पुढची दोन दशकं तुरुंगात घालवावी लागली.
ती जेव्हा तुरुंगात होती तेव्हा तिच्या चार मुलांमधल्या तीन मुलांची हत्या झाली. 2004 मध्ये जेव्हा तिची सुटका झाली तेव्हा तिला कोलंबियात पाठवलं गेलं. पुढचं आयुष्य तिने शांततेत काढलं.
3 सप्टेंबर 2012 रोजी, वयाच्या 69 व्या वर्षी तिला मेडेलिनमध्ये एका मोटरसायकलस्वाराने गोळ्या घालून ठार केलं.
ब्लँको जेव्हा तिच्या कारकीर्दीत वरच्या स्थानावर होती तेव्हा ड्राईव्ह-बाय शूटींग हा प्रकार तिनेच पुढे आणला होता. आणि अशा लोकांची तिने एक टोळी तयार केली होती. पुढे जाऊन त्याच पद्धतीने तिची हत्या करण्यात आली.

फोटो स्रोत, NETFLIX
बीबीसीशी बोलताना न्यूमन सांगतात, "तिच्या हत्येवरून तिच्याबद्दलचा खरा द्वेष दिसून येतो. 2012 मध्ये तर ती एक निरुपद्रवी स्त्री होती."
"शिवाय ती एकटीच राहत होती आणि तिच्या चार मुलांपैकी तीन मुलं मरण पावली होती."
"ती शून्यातून येऊन एका अद्भुत उंचीवर जाते. पण कथेच्या शेवटाकडे जाताना ती कथा शोकांतिका बनते."
ब्लँकोचं जीवन इतकं उत्कट असूनही, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तिला फारसं स्थान मिळालं नाही.
कोलंबियामध्ये जेव्हा मादक पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात व्हायची त्याच काळात वगारा लहानाची मोठी होत होती. ती सांगते, "या सगळ्या गोंधळात तिने ब्लँकोचं नाव कधीच ऐकलं नव्हतं. जेव्हा तिने ब्लँको विषयी ऐकलं तेव्हा तिचा या कथेवर विश्वासच बसत नव्हता."
"म्हणूनच मला ग्रिसेल्डाची भूमिका करावीशी वाटली. कारण ती एक आई, खलनायिका, प्रेयसी आणि त्याचवेळी मारेकरी देखील होती."
ग्रिसेल्डा नावाच्या या मालिकेचा प्रीमियर 25 जानेवारी रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








