बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो 20 वर्षं थांबला, कॅनडाचा पासपोर्ट घेऊन आला आणि...

फोटो स्रोत, GETTY IMAGES
- Author, प्रभाकर थमिलारासू
- Role, बीबीसी तमिळ
तंजावर जिल्ह्यातील पट्टुकोट्टईच्या थामरंगोट्टईचा रहिवासी असलेला वेलायुथम सहकारी भंडारमध्ये कर्मचारी म्हणून काम करायचा... 2014 मधल्या त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे कामावर जायला निघाला होता.
आवा वेलालार रस्त्यावरील आपल्या घरातून तो बाहेर पडत असताना एक हेल्मेटधारी व्यक्ती त्याच्या कारमध्ये शिरली, त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि तिथून पळ काढला. वेलायुथमचा जागीच मृत्यू झाला.
हत्येची साक्षीदार असलेली वेलायुथमची पत्नी वैरव मीनाक्षी हिने त्यावेळी साक्ष दिली होती की, मारेकऱ्याने मास्क लावला होता आणि हेल्मेट घातलं होतं; त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. परंतु काही स्थानिकांवर संशय होता. मात्र, पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही.
गेल्या वर्षी हेल्मेट घालून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वेलायुथमची पत्नी मीनाक्षीला अशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या घटनेत जबर जखमी झालेली मीनाक्षी हल्ल्यातून बचावली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, हेल्मेट आणि मास्क घातलेल्या दोन व्यक्तींनी थामरंगोट्टाईच्या वेलालार स्ट्रीट येथे राहणाऱ्या कार्तिकाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केलेला. मात्र यामध्ये कार्तिकाच्या फक्त मानेला दुखापत झाली.
या तीनही घटनांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचं पोलिसांना आढळून आलं.
गेल्या आठवड्यात सीबीसीआयडीने 10 वर्षांपासून फरार असलेल्या व्यक्तीला अटक केली. दहा वर्ष पोलिसांच्या हाती न लागलेला माणूस कोण होता? वेलायुथला मारण्याचं कारण काय होतं? मीनाक्षी आणि कार्तिकाला मारण्याचं प्रयोजन काय होतं?
नक्की काय घडलं?
वेलायुथमची हत्या ही 1994 मधील आत्महत्येचा बदला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
वेलायुथमची हत्या होण्याच्या 20 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1994 मध्ये वेलायुथमचा भाऊ बालसुब्रमण्यम याने त्याच गावातील 25 वर्षीय कलाचेल्वीसोबत लग्न केलं होतं. मात्र पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्याने कलाचेल्वी आई-वडिलांच्या घरी निघून गेली.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
त्यानंतर दोन महिन्यांनी पती-पत्नीच्या नात्यामधील शांतता टिकून राहावी यासाठी कलाचेल्वी ही पती बालसुब्रमण्यम याच्यासोबत राहण्यासाठी सासरी परतली. मात्र काही दिवसांतच कलाचेल्वीने आत्महत्या केली.
कलाचेल्वीचं निधन झालं तेव्हा तिचा 22 वर्षांचा धाकटा भाऊ बालचंदर सिंगापूरमध्ये काम करत होता. त्याने केवळ वेलायुथमचीच हत्या केली नाही तर वेलायुथमची पत्नी मीनाक्षी आणि स्वत:ची पत्नी कृतिका यांच्याही हत्येचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सध्या वेलायुथमच्या हत्येचा तपास करत असलेल्या सीबीसीआयडी पोलिसांनी सांगितलं की, बालचंदरने आपली मोठी बहीण कलाचेल्वीच्या आत्महत्येला वेलायुथम हाच जबाबदार असल्याचं डोक्यात ठेवून अनेक वर्षांपासून त्याच्या हत्येची योजना आखली होती.
20 वर्षांनंतर त्याने हत्या कशी केली?
या प्रकरणी बीबीसीशी बोलताना सीबीसीआयडीचे तपास अधिकारी रहमत निशा म्हणाले, “तो अनेक वर्षांपासून या परिसरात राहत नव्हता.”
हत्येपूर्वी आणि नंतरही तो गावात नव्हता, त्यामुळे त्याला भेटणं किंवा त्याची चौकशी करणंही शक्य नव्हतं, असंही ते म्हणाले.
सीबीसीआयडी पोलीस निरीक्षक रहमत निशा यांनी सांगितलं की, कॅनडामध्ये काम करत असलेला बालचंदर 2014 मध्ये श्रीलंकेला आला, नंतर कल्लाथोनी इथून समुद्रामार्गे रामेश्वरमला आला आणि तिथून कारने पट्टुकोट्टईला आला. त्याने वेलायुथमची हत्या केली आणि त्याच कारमधून पळून गेला.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
कलाचेल्वीच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे हे त्याला माहीत नाही, असं अथिरामपट्टणम येथील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. बालचंदर 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या हत्येची योजना आखत होता, असंही ते म्हणाले.
"बहिणीचा मृत्यू झाला तेव्हा बालचंदर सिंगापूरमध्ये कामाला होता. त्यानंतर 2004 मध्ये शहरात परत आलेल्या बालचंदरने एक योजना आखली. मात्र त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं असल्याने त्याने ते टाळलं.
त्यानंतर, बराचकाळ नियोजन केल्यानंतर त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने हत्या केली, हत्येपूर्वी किंवा हत्येनंतर शहरात न राहता त्याने हे घडवून आणलं,” असं अथिरामपट्टणमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
वेलायुथमची पत्नी मीनाक्षीला मारण्याचा प्रयत्न का केला?
वेलायुथमच्या हत्येचा तपास सर्वप्रथम तंजावर जिल्ह्यातील अथिरामपट्टणम पोलिसांनी केला. मात्र, त्यामध्ये कुणालाही अटक करण्यात आली नाही आणि तपास पुढेच सरकत नव्हता.
या प्रकरणी मीनाक्षीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. त्याधारे, वेलायुथमच्या हत्येचं प्रकरण 2016 मध्ये सीबीसीआयडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं.
मीनाक्षी म्हणाल्या की, जेव्हापासून हे प्रकरण सीबीसीआयडीकडे वर्ग करण्यात आलंय तेव्हापासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.
“मी हायकोर्टात याचिका दाखल केल्यापासून मला काही परदेशी नंबरवरून फोन येऊ लागले. जेव्हा जेव्हा मला तो फोन यायचा, तेव्हा मला भीती वाटायची. फोनवरील व्यक्ती मला याचिका मागे घेण्याची धमकी द्यायची. हा प्रकार अनेक वर्षं सुरू होता,” असं मीनाक्षी म्हणाल्या.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
याच पार्श्वभूमीवर, 8 फेब्रुवारी 2022 रोजी मीनाक्षी जवळच्या बाजारपेठेतून स्वत:च्या बाईकवर घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हेल्मेट आणि मास्क घातलेल्या दोघांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये मीनाक्षी यांच्या मानेला दुखापत होऊन त्या अपघातातून बचावल्या होत्या.
"मीनाक्षी या प्रकरणाबाबत गंभीर असल्याने बालचंदरने कॅनडातील त्याच्या मित्रांमार्फत मीनाक्षीला मारण्याचा कट रचला," असं निशा म्हणाली.
दरम्यान, मीनाक्षी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अथिरामपट्टणम पोलीस अधिक तपास करत आहेत.
बालचंदर कसा पकडला गेला?
अथिरामपट्टणम पोलिसांनी सांगितलं की, वेलायुथमची हत्या करून फरार झालेला बालचंदर 10 वर्षांपासून परदेशात होता आणि त्याचा स्वत:च्या पत्नीबद्दलही गैरसमज झाल्यामुळे त्याने तिलाही मारण्याचा प्रयत्न केला.
अथिरामपट्टणम पोलिसांनी सांगितलं की, बालचंदर गेल्या 30 डिसेंबरला पत्नी कार्तिकाची हत्या करण्यासाठी कॅनेडियन पासपोर्ट घेऊन त्रिची येथे आला होता आणि नंतर पट्टुकोट्टई येथे आलेला.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
“आधीच्या दोन घटनांमध्ये हेल्मेट घातलेली आणि कार व दुचाकीवरून येणारे लोक हत्येत सामील होते, यावेळी आम्हाला अशी माहिती मिळालेली की ते पट्टुकोट्टई नगर परिसरात फिरताना दिसलेत.
त्याआधारे आम्ही शोध घेण्यासाठी गेलो असता, बालचंदर आणि त्याचा दुचाकीवरील एक मित्र कार्तिकावर हल्ला करून पळून जात होते. त्यांचा पाठलाग केल्यावर तो बालचंदर असल्याचं समोर आलं,” असं अथिरामपट्टणम पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
पोलिसांनी बालचंदरला अटक करून सिंगापूर, कॅनडा आणि श्रीलंकेच्या बनावट पासपोर्टसोबतच धोकादायक शस्त्रे आणि दुचाकी जप्त केल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








