विमान हायजॅक करून खंडणी घेतली आणि पॅराशूटनं उडी मारून पळाला, 52 वर्षांनंतरही गूढ कायम

फोटो स्रोत, FBI
- Author, झुबेर आझम
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी
घटना होती 24 नोव्हेंबर 1971 सालची. डीन कूपर नावाच्या एका व्यक्तीने अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील सिएटलला जाण्यासाठी ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड विमानतळावरून एक तिकीट खरेदी केलं.
नॉर्थवेस्ट एअरलाइन्सच्या काउंटरवर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला शंका देखील आली नाही की समोर उभी असलेली व्यक्ती अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा गुन्हा करेल. आणि विशेष म्हणजे या घटनेला 52 वर्ष उलटून गेली तरीही याचा थांगपत्ता आजतागायत लागलेला नाही.
डीन कूपर हा सुमारे 40 वर्षांचा मृदुभाषी व्यक्ती अंगात पांढरा शर्ट आणि काळी टाय असा सूट परिधान करून आला होता. त्याच्याकडे पाहिलं तर तो एखाद्या व्यावसायिकासारखा दिसत होता. विमानात बसल्यानंतर त्याने स्वतःसाठी एक पेय मागवलं.
या विमानात कूपर व्यतिरिक्त 36 प्रवासी होते. जेव्हा विमानाने उड्डाण केले, तेव्हा दुपारचे तीन वाजले असतील. डीन कूपरने विमानातील हवाई सुंदरीला बोलावलं आणि तिच्या हातात एक चिठ्ठी दिली.
ती चिठ्ठी वाचून त्या हवाई सुंदरीच्या तोंडचं पाणीच पळालं. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की, डीन कूपर घेऊन जात असलेल्या बॅगेत बॉम्ब असून त्या हवाई सुंदरीने शांतपणे त्याच्या शेजारी येऊन बसावं.
डीन कूपर गायब कसा झाला?
गोंधळलेल्या हवाई सुंदरीला डीन कूपरने ब्रीफकेस किंचितशी उघडून दाखवली.
हवाई सुंदरीला त्या बॅगेत काही तारा आणि लाल काड्या जोडल्याचं दिसलं. तो बॉम्ब होता की आणखी काही हे कोणालाच माहीत नाही.

फोटो स्रोत, BETTMANN
गुन्हेगारीच्या जगतात आजही हे गूढ कायम असून आजतागायत एफबीआयला देखील हे कोडं सुटलेलं नाही.
या विचित्र घटनेमधील विशेष गोष्ट म्हणजे डीबी कूपर या नावाने प्रसिद्ध असलेल्या डीन कूपरने एकट्याने या प्रवासी विमानाचं अपहरण केलं होतं.
कर्मचार्यांना बंदी बनवून दोन लाख डॉलर्सची रोकड लंपास करून तो असा काही गायब झाला की आजही प्रश्न विचारला जातो की, डीन कूपरला आकाशाने खाल्लं की जमिनीने गिळलं?
पण ही घटना कशी घडली?
कूपरने हवाई सुंदरीला आपल्या मागण्या सांगितल्या, त्यानुसार दोन लाख डॉलर्स आणि पॅराशूट द्यायचे होते. कूपरकडून पैशांबाबत विशेष मागणीही करण्यात आली होती.
या रकमेत फक्त 20 डॉलरच्या नोटा समाविष्ट करायच्या होत्या. त्याने असंही सांगितलं होतं की, त्याला दिलेल्या नोटा एकाच मालिकेच्या नसल्या पाहिजेत. जर त्या एकाच मालिकेतील असतील तर त्याचा शोध घेणं सोपं होईल म्हणून त्याने ही मागणी केली होती.

फोटो स्रोत, FBI
कूपरने या चिठ्ठीत लिहिलं होतं की जर त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह विमान बॉम्बने उडवून देईल. हवाई सुंदरीने हा संदेश वैमानिकाला पोहोचवला. थोड्या वेळाने इंटरकॉमवर आवाज आला की तांत्रिक बिघाडामुळे विमान उतरणार आहे.
जहाजावरील प्रवाशांना काय सुरू आहे याची कल्पना नव्हती.
विमान उतरण्यापूर्वीच अधिकाऱ्यांना अपहरण झाल्याची माहिती मिळाली होती. अपहरणकर्त्याने पैशांसोबत पॅराशूट का मागवलं याचा प्रश्न पोलिस आणि एफबीआयला पडला होता.
बॉम्बची भीती
अपहरणकर्त्याने वैमानिकाला ताकीद दिली होती की विमान अशा ठिकाणी उतरव जिथे बाहेर प्रकाश असेल. पण आतील दिवे मंद कर जेणेकरून बाहेरून कोणीही आत पाहू शकणार नाही.
विमानाजवळ कोणतेही वाहन किंवा व्यक्ती आल्यास विमान उडवून दिले जाईल, अशी धमकी कूपरने दिली.
अधिकाऱ्यांनी विमान कंपनीच्या अध्यक्षांना फोन केला आणि त्यांनी अपहरणकर्त्याच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं सांगितलं. बॉम्बचा धोका लक्षात घेऊन प्रवाशांचे प्राण वाचविण्याला प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.

फोटो स्रोत, FBI
विमान कंपनीचा एक कर्मचारी पैसे घेऊन विमानाजवळ आला आणि फ्लाइट अटेंडंटने शिडी खाली उतरवली. आधी दोन पॅराशूट दिले आणि नंतर मोठ्या बॅगेत पैसे दिले.
त्याच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर कूपरने 36 प्रवासी आणि एका फ्लाइट अटेंडंटला विमानातून खाली उतरवलं.
पॅराशूटच्या मदतीने...
कूपरने दोन वैमानिक, एक फ्लाइट अटेंडंट आणि फ्लाइट इंजिनियर यांना सोडलं नाही. ते विमान घेऊन न्यू मेक्सिको सिटीकडे उड्डाण करण्याचे आदेश दिले.
विमानाचे संपूर्ण कर्मचारी कॉकपिटमध्ये उपस्थित होते आणि कूपर कॉकपिटच्या बाहेर होता. कूपरने वैमानिकाला विमान 150 नॉट्सच्या वेगाने दहा हजार फूट उंचीवर नेण्याची सूचना केली.
आता दुसऱ्यांदा उड्डाणाला सुरुवात होऊन वीस मिनिटं झाली असतील की विमानाचा लाल दिवा पेटला. याचा अर्थ कोणीतरी जहाजाचा दरवाजा उघडला होता.

फोटो स्रोत, FBI
पायलटने इंटरकॉमवर कूपरला उद्देशून विचारलं की, त्याला काही हवं आहे का, यावर कूपरने रागाने उत्तर दिलं - 'नाही.'
रहस्यमय अपहरणकर्त्याने बोललेले हे शेवटचे शब्द होते. यानंतर तो बेपत्ता झाला. कूपरने पॅराशूटच्या मदतीने पैशांसह विमानातून उडी मारली होती.
वीस डॉलर्सच्या नोटा
नंतर समजलं की त्याने फक्त वीस डॉलरच्या नोट का मागितल्या होत्या. कारण पैशाचं एकूण वजन एकवीस पौंड झालं असतं. जर डॉलरची रक्कम यापेक्षा कमी असती, तर वजन जास्त झालं असतं आणि उडी मारणं घातक ठरू शकलं असतं.
जर जास्त रक्कम असेल तर वजन कमी होतं. परंतु त्यांचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. मात्र एफबीआय हुशार होती आणि त्या सर्व नोटांवर 'एल' हे कोड लेटर होतं.
पण इथे प्रश्न असाही पडतो की कूपरने पॅराशूट मागवल्याचा संशय अधिकाऱ्यांना जर आला होता तर मग त्यांनी कारवाई का केली नाही?

फोटो स्रोत, FBI
खरं तर पोलिसांनी विमानाचा पाठलाग करण्याची योजना आखली होती. प्रथम एफ-106 विमान वापरण्याचा विचार केला गेला. परंतु कूपरने मागणी केल्याप्रमाणे हे वेगवान लढाऊ विमान इतक्या कमी वेगाने उड्डाण करू शकलं नसतं.
त्यामुळे इंटरनॅशनल गार्डकडून टी 33 विमानांची मागणी करण्यात आली होती. मात्र ही विमाने अपहरण झालेल्या प्रवासी विमानापर्यंत पोहोचेपर्यंत कूपरने उडी मारली होती.
कॉकपिटमधून बाहेर पडल्यानंतर
प्रवासी विमान सुखरूप उतरलं, मात्र कॉकपिटमधून बाहेर पडल्यानंतर कूपरचा काही नामोनिशाण नसल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. विमानात फक्त त्याची टाय आणि पॅराशूट होते.
असं मानलं जातं की ज्या ठिकाणाहून तो विमानातून बाहेर पडला ते पाहता तो मरून नामक तलावाच्या आसपासच्या जमिनीवर उतरला असावा.

फोटो स्रोत, FBI
एफबीआयने तातडीने परिसरात त्याचा शोध सुरू केला आणि शेकडो लोकांची चौकशी करण्यात आली. हळुहळु शोधाची व्याप्ती वाढवली पण यश मिळू शकले नाही.
असं वाटलं कूपर हवेतच गायब झाला. पाच महिन्यांनंतर अशीच आणखी एक घटना घडली ज्यामध्ये विमान अपहरण करून पैसे मिळवल्यानंतर आरोपीने पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारली.
मात्र यावेळी रिचर्ड फ्लुइड नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. एफबीआयचं असं मत होतं की हा तोच आरोपी होता ज्याला ते शोधत होते.
नोटांच्या सीरियल नंबर
पण जेव्हा फ्लाइट अटेंडंटला त्याचा चेहरा दाखवण्यात आला तेव्हा तिने सांगितलं की ही ती व्यक्ती नाही. डीन कूपरच्या यशस्वी अपहरणामुळे प्रभावित होऊन रिचर्डने हा गुन्हा केल्याचे समजतं.
बरीच वर्ष एफबीआयला काहीच पुरावे मिळाले नाहीत. असं म्हटलं गेलं की कदाचित कूपर उडी मारल्यानंतर वाचला नसावा.

फोटो स्रोत, FBI
त्यानंतर 1980 साली एका नदीजवळ एका मुलाला फाटलेल्या वीस डॉलरच्या नोटा सापडल्या. त्या एकूण 5800 डॉलर्स इतक्या होत्या एफबीआयला ही माहिती मिळाल्यावर त्यांनी सीरियल नंबर पाहिला.
या त्याच नोटा होत्या ज्या कूपरला खंडणी म्हणून देण्यात आल्या होत्या.
यामुळे या विचाराला आणखी बळ मिळालं की कदाचित कूपर रात्रीच्या वेळी जंगलाच्या मध्यभागी पडल्यामुळे जिवंत वाचला नसावा.
गूढ आणखीनच वाढत गेलं...
पण प्रत्येकजण या विचाराशी सहमत नाहीये. सापडलेल्या नोटा कूपरकडून उडी मारताना पडल्या असाव्यात आणि उरलेल्या पैशांसह तो सुखरूप उतरला असावा. अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यातही यशस्वी झाला असा अनेकांचा समज आहे.
अशा रीतीने या कोड्याचे गूढ आणखीन वाढले आणि डीन कूपर हे अमेरिकेतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व बनले. खरा डीन कूपर कोण होता आणि तो जिवंत होता की नाही हे कोणालाच माहीत नव्हतं.
बर्याच वर्षांनंतर, ऑगस्ट 2011 मध्ये मारिया कूपर नावाच्या एका महिलेने दावा केला होता की डीन कूपर तिचे काका होते.

फोटो स्रोत, FBI
मारियाने दावा केला की, विमान अपहरण झाल्याचं संभाषण तिने ऐकलं होतं. पण मारियाने असंही सांगितलं की तिच्या काकांनी विमानातून उडी मारल्यानंतर पैसे हवेत उडाले.
तोपर्यंत असे अनेक दावे करण्यात आले होते.
अमेरिकन इतिहास
पण या दाव्यातील मजेशीर बाब म्हणजे अपहरण झालेल्या प्रवासी विमानाच्या फ्लाईट अटेंडंटने मारियाच्या काकांचे छायाचित्र अपहरणकर्त्यासारखेच असल्याचं सांगितलं होतं. परंतु अधिकाऱ्यांचा या दाव्यावर विश्वास बसला नाही आणि डीन कूपरची फाईल बंद झाली नाही.
2016 मध्ये, कंटाळलेल्या एफबीआयने तपासासाठी जारी केलेली संसाधने इतर प्रकरणांवर वापरण्याचा निर्णय घेतला. 45 वर्षे तपास होऊनही एफबीआयला या गुन्ह्याची उकल करता आलेली नाही.

फोटो स्रोत, FBI
एफबीआयने स्पष्ट केलं की ते आता या प्रकरणात फारसे लक्ष देत नसले तरी कोणाकडे काही माहिती असल्यास ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
डीन कूपर हा अमेरिकन इतिहासातील एकमेव अपहरणकर्ता आहे जो कधीही पकडला गेला नाही. आणि त्याच्या स्मरणार्थ, दरवर्षी 24 नोव्हेंबर रोजी एफबीआय एक समारंभ आयोजित करते.
बिझनेस सूट, चष्मा घातलेले आणि पॅराशूट धरलेले लोक अजूनही एरियल टॅव्हर्नमध्ये जमतात आणि रात्री उशिरापर्यंत हा समारंभ चालतो
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








