विवाहबाह्य संबंधांमुळे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार वाढतायेत का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तामिळ
(या लेखातील काही माहिती तुम्हाला अस्वस्थ करू शकते)
एका अधिकृत अहवालानुसार, भारतातील महिलांवर घरगुती हिंसाचार आणि पतीने अत्याचार करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. बहुतांशी महिलांचे पती विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांच्यावर अत्याचार करतात.
अशा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी कायदेशीर मदत उपलब्ध आहे का? या कायद्याचा वापर करून त्या अशा प्रसंगातून बाहेर पडू शकतात का? जाणून घेऊयात.
चेन्नईतील 32 वर्षीय चित्रा (नाव बदलले आहे) दोन महिन्यांपूर्वी मध्यरात्री तिच्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह घरातून निघून गेली.
तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे तिला समजलं. याविषयी तिने पतीला जाब विचारल्याने पतीकडून तिला वारंवार मारहाण केली जात होती.
तो हिंसाचार ती सहन करू शकली नाही आणि तिने घर सोडले.
चित्रासारख्या अशा हजारो महिला आहेत ज्यांनी आपल्या पतीला विवाहबाह्य संबंधांविषयी विचारलं असता त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
'मला माझ्या पतीने मारहाण केली'
बीबीसी तमिळ सोबतचा तिचा अनुभव शेअर करताना चित्रा सांगते की, तिने सरकार अनुदानित निवारा केंद्रात एक आठवडा घालवला. तिला वैद्यकीय मदत आणि कायदेशीर मदत देण्यात आली.
ती सांगते, "पतीने मला मारताना माझं लहान मूल रडू लागलं. माझी मुलगी बोलायची बंद झाली. एका आठवड्यानंतर ती बरी झाली."
चित्राच्या संपूर्ण शरीरावर लोखंडी रॉडने मारलेल्या जखमा होत्या.
"परिस्थिती अशी होती की मला ताबडतोब घर सोडावं लागलं. माझ्या पतीच्या आईवडिलांनी त्याच्या या संबंधांना पाठिंबा दिल्याने मी तिथे राहू शकले नाही. माझ्या मित्रामार्फत मी सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मला जेव्हा समजलं की, घरगुती हिंसाचाराचे बळी तात्पुरत्या निवारा केंद्रात राहू शकतात, तेव्हा मी तिथे गेले."
कायदेशीर मदत
चित्राला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची (2005) माहिती देण्यात आली. तिला तीन वेळा मारहाण झाल्यानंतर ती तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आली. तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांविषयी तिने पतीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र त्यानंतर तिला होणारी मारहाण आणखीन वाढली. तिला होणाऱ्या त्रासाची माहिती तिला तिच्या पालकांना द्यायची नव्हती.
चित्रा सांगते, "कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आल्याने तपास सुरू झाला. सध्या माझ्या पतीने मुलांच्या देखभालीसाठी आणि माझ्या खर्चासाठी महिना 7,000 देण्याचं मान्य केलं आहे. त्याला विवाहबाह्य संबंधातून बाहेर पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्याने मला मारल्याबद्दल माझी माफी मागितली. मला अभिमान वाटतो की मी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला."
कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार कशी करावी?
कौटुंबिक हिंसाचाराबद्दल बोलण्यास आणि इतरांची मदत घेण्याच्या अनिच्छेमुळे चित्रासारख्या अनेक महिलांना हिंसाचार सहन करावा लागतो, असे सुरक्षा अधिकारी सांगतात.
समाजकल्याण आयुक्त अमुदवल्ली सांगतात की, हिंसाचाराच्या तक्रारीसाठी महिला, विशेष हेल्पलाइन क्रमांक 181 वर किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांकडे मदत मागू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
अमुदवल्ली सांगतात की, "कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवलेल्या तक्रारीत पीडित महिलेला 60 दिवसांच्या आत मदत पुरवली जाते. तक्रारदाराला वैद्यकीय मदतीची गरज असेल तर तीही पुरवली जाते. महिला तिच्या पतीच्या घरी सुरक्षितपणे राहू शकते का, याबाबत चौकशी केली जाते. आवश्यक असल्यास, तक्रार करणाऱ्या महिलेला तात्पुरत्या निवारा केंद्रात ठेवले जाते. अशी प्रकरणं सुरक्षा अधिकारी हाताळतात."
तक्रारदाराची स्थिती लक्षात घेऊन बचावकार्यही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कमाल शिक्षा किती आहे?
या कायद्यामुळे स्त्रीला तिच्या पतीच्या घरी किंवा तिच्या पालकांच्या घरात राहण्याची हमी मिळते.
सोबतच महिलेला तिच्या निवासस्थानी 'हिंसामुक्त घरात' राहण्याची सुरक्षा प्रदान केली जाते.
तसेच, हिंसाचार पीडित महिलेला 60 दिवसांच्या आत त्वरित आवश्यक ती मदत दिली जाते.
महिलेच्या कुटुंबातील कोणताही पुरुष सदस्य जो तिच्यावर अत्याचार करतो त्याच्यावर या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. या प्रकरणात वडील, भाऊ, पती, पतीचे नातेवाईक यांचाही समावेश आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता शांताकुमारी सांगतात की, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात जास्तीत जास्त एक महिना तुरुंगवास होतो. पण भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांचा वापर करूनच जास्तीत जास्त शिक्षा मिळू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
त्या सांगतात, "अनेक लोक फक्त घरगुती हिंसाचाराची स्वतंत्र केस म्हणून नोंद करत नाहीत. घटस्फोट प्रकरण, बालहक्क प्रकरण, हुंडा प्रकरणामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीचाही समावेश असतो. या कायद्याचा वापर अनेकांकडून केला जातो, कारण यामुळे स्त्रीला आवश्यक असलेले संरक्षण त्वरित मिळते."
कायदेशीर उपाय
भारतीय दंड संहितेच्या कलम 498 (अ) मध्ये जास्तीत जास्त तीन वर्षांचा तुरुंगवास आहे. अधिवक्ता शांताकुमारी सांगतात की, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवलेल्या तक्रारीमुळे केस आणखीन मजबूत होईल.
अधिवक्ता शांताकुमारी यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा, 2005 अंतर्गत महिलांना उपलब्ध असलेल्या तात्काळ उपायांची माहिती दिली.
- कलम 18 आणि 19: एखादी महिला राहत्या घरात संरक्षण आणि निवासासाठी डिक्री मिळवू शकते.
- कलम 20: पीडितेच्या आणि मुलांच्या देखभालीसाठी मदत मिळू शकते.
- कलम 21: मुलांसाठी आणि पीडितेसाठी तात्पुरता निवारा मिळू शकतो.
- कलम 22: पीडित महिला तिला झालेल्या नुकसान भरपाईचा दावा करू शकते.
जागरूकता वाढवली पाहिजे
स्त्रीवादी कार्यकर्त्या रेणुका म्हणतात की, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याबद्दल जागरूकता आणि तात्पुरत्या निवारा केंद्राची माहिती बहुतेक महिलांपर्यंत पोहोचलेली नाही.
रेणुका सांगतात की, अनेक महिला घरगुती हिंसाचाराची तक्रार करण्याचा विचार करत नाहीत. कारण त्यांना लहानपणापासूनच हिंसाचाराची तक्रार करू नये, तो सहन केला पाहिजे असं शिकवलं जातं.
रेणुका पुढे सांगतात की, "महाविद्यालये, कामाची ठिकाणे, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित जागरूकता कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. अनेक वेळा स्त्रिया हिंसेबद्दल बोलतात. मात्र कुटुंबासाठी हिंसा सहन केली पाहिजे असं सांगून त्यांना गप्प केलं जातं. ही समस्या कायम आहे कारण मुलींना संयम शिकवला जातो. हिंसा लगेचच थांबवता येत नसली तरी असा हिंसाचार चुकीचा आहे असा समज निर्माण करण्यास वेळ लागेल पण तो आवश्यक आहे."

रेणुका सांगतात की, समाजकल्याण विभागाकडे गेल्या एका वर्षात एकट्या चेन्नई शहरातून 650 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावरून या प्रकरणात गंभीर कारवाईची गरज असल्याचे दिसून येते.
"बहुतेक तक्रारी या पतीचे विवाहबाह्य संबंध सुरू झाल्यानंतरच्या आहेत. तुम्हाला हिंसेचा फटका बसला असेल, तर तुम्ही त्याची ताबडतोब नोंदणी करावी आणि ती व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नये. यासाठी सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावले पाहिजेत. ही जाणीव केवळ महिलांमध्येच नाही, तर पुरुषांमध्येही निर्माण झाली पाहिजे" असं रेणुका म्हणतात.
घरगुती हिंसाचाराची तक्रार करण्यासाठी महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक: 181
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








