पुरुष जोडीदारावर अत्याचार करणाऱ्या महिलेला न्यायालयानं सुनावली शिक्षा

- Author, सारा इसाडेल
- Role, बीबीसी न्यूज
आपल्या कानावर आत्तापर्यंत महिलांवरील अत्याचारांच्याच बातम्या येत होत्या. मात्र, आता महिलांनीही पुरुष साथीदारांवर केलेल्या अत्याचाराच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
पुरुष जोडीदारावर अत्याचार केल्यानं ब्रिटनच्या वेल्समधील एका महिलेला न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे.
‘‘मला तिनं लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडलं. एवढंच नाही, तर टॉयलेटमध्ये जायलाही मज्जाव केला...’’ 41 वर्षीय गॅरेथ जोन्स आपली व्यथा सांगत होते. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनंच त्यांच्यावर हे अत्याचार केले आहेत.
‘‘ऑनलाईन मैत्रीचा हा कटू अनुभव सांगितल्यानं इतर पुरुषही वेळीच सावध होतील, म्हणून मी हे जाहीररित्या सांगतो आहे,’ असं गॅरेथ जोन्स यांनी म्हटलं आहे.
जुलै 2021 मध्ये जोन्स यांची सारा रिग्बी या महिलेसोबत ऑनलाइन मैत्री झाली. मात्र नंतर तिच्या अत्याचारांना कंटाळून त्यांनी अखेर त्यासंबंधी मदत करणाऱ्या ‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली.
‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’च्या माहितीनुसार पुरुषांवरील अत्याचार ही काही आता दुर्मिळ बाब राहिलेली नाही. सहा किंवा सात पुरुषांपैकी एक तरी पुरुष त्याच्या आयुष्यात अशा प्रकारे महिलेच्या अत्याचाराला बळी पडतो.


‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’ला असंही आढळलं, की ब्रिटनच्या वेल्समध्ये दरवर्षी 25 पैकी एका पुरुषाला आपल्या महिला जोडीदाराकडून हा त्रास सहन करावा लागतो.
या वर्षाच्या सुरुवातीलाच, चेशायरमधील विन्सफोर्ड येथील 41 वर्षीय सारा रिग्बी या महिलेला या अत्याचार प्रकरणी 20 महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावली. तिनं आपला पुरुष जोडीदार गॅरेथ जोन्सवर केलेला अत्याचार न्यायालयात सिद्ध झाला होता.
चेशायर पोलिसांनी सांगितल्यानुसार, ‘‘रिग्बीनं तिच्या जोडीदाराचा गळाही दाबला होता. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की केवळ स्त्रियांचाच पुरुषांकडून छळ होतो. परंतु या घटनेनं त्याची दुसरी बाजूही समोर आणली आहे."
एके ठिकाणी व्यवस्थापकाची नोकरी करणारे गॅरेथ जोन्स यांच्या सांगण्यानुसार, रिग्बी आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या नातेसंबंधांच्या दरम्यान त्यांना मित्र आणि कुटुंबापासून दूर राहावं लागलं. तसंच या काळात त्यांचं सुमारे 40 हजार डॉलरचं आर्थिक नुकसानही झालं.
त्यांना या काळात दररोज शिवीगाळ आणि अपमान सहन करावा लागला. रिग्बीच्या परवानगीशिवाय घरातील टॉयलेट, बाथरूमही वापरायला त्यांना परवानगी नव्हती.
त्यांच्या खाण्यापिण्यावरही तिनं बंधनं घातली होती. त्यामुळं दोन महिन्यांत जोन्स यांचं वजन 28 किलोनं कमी झालं. शिवाय ‘या अत्याचाराबद्दल कोणाशीही बोललास, तर तू माझ्यावर हल्ला केलास,’ असं पोलिसांना सांगेन, अशी धमकीही रिग्बीनं जोन्स यांना दिली होती.

रिग्बीला शिक्षा झाल्यानंतर पाच महिन्यांनी जोन्स यांनी याबाबत मौन सोडलं. ते म्हणाले, की ‘‘सुरुवातीला ती माझ्याशी फारच प्रेमानं वागली. अगदी ती माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. एखादी व्यक्ती एवढी प्रेमळ कशी असू शकते? असं मला वाटायचं.’’
चार महिन्यांतच तिच्या प्रेमात आंधळं होऊन, राहतं घर सोडून जोन्स रिग्बीच्या घरी राहायला गेले. त्यानंतर मात्र रिग्बीनं तिचं खरं रुप दाखवायला सुरुवात केली.
सर्व प्रकारच्या खर्चासाठी तिनं जोन्सकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. दर महिन्याचं 700 डॉलरचं भाडं आणि इतर बिलंही जोन्सनाच द्यावी लागली. घरावर मात्र जोन्सचा अधिकार नव्हता. तिनं घराची चावीही त्यांना दिली नव्हती. त्यांच्या खाण्या-पिण्यावरच काय, पण बाथरूम वापरावरही तिनं निर्बंध घातले होते.

रिग्बीनं केलेल्या छळाबद्दल जोन्स सांगत होते, "शिक्षा म्हणून तिनं मला उघड्या जमिनीवर झोपायला लावलं. मला अंघोळ, दाढी करण्याची किंवा टॉयलेट वापरण्याची परवानगी नव्हती. त्यासाठी मला सुपरमार्केट, पब किंवा रेस्टॉरंटचा आधार घ्यावा लागला.’’
"तिला बाहेर जायचं असेल तेव्हा मीही हातातलं काम सोडून घराबाहेर पडावं, असा तिचा दंडक होता. शिवाय तिच्यासोबत असताना इतर कोणाही नातेवाईक किंवा मित्रांशी बोलू नये, असंही रिग्बीनं मला बजावलं होतं. एवढंच नाही तर पुढचा वाद टाळण्यासाठी अगदी आईला पाठवलेला मोबाईलमधील मेसेजही मी डिलिट करून टाकत असे" असं जोन्स सांगत होते.
जोन्स पुढं म्हणाले, "मला चावणं, ओरबाडणं, लाथा मारणं हे तर नेहमीचंच झालं होतं. एकदा रिग्बीनं माझ्याकडं एका डिझायनर हँडबॅगची मागणी केली. आम्ही त्यावेळी लंडनच्या ‘हॅरॉड्स’मध्ये होतो. इथून मला एखादी तरी महागडी वस्तू विकत घेईपर्यंत मी तुला सोडणार नाही, असं ती किंचाळत होती. त्यादरम्यान तिनं मला जोराचा फटका मारला आणि बोचकारलं. त्यामुळं माझ्या दंडातून रक्त येऊ लागलं."

हे सगळं प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर अखेर जोन्स यांनी गुपचूप त्यांच्या आईची भेट घेतली आणि तिला सर्व कर्मकहाणी सांगितली. जोन्स सांगतात, ‘‘माझी कथा ऐकून आईला रडू कोसळलं. कुटुंबापासून आता फार काळ दूर राहता येणं शक्य नाही, असं मला त्यावेळी जाणवलं."
त्याच सुमारास गॅरेथ यांनी ‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’ल मदतीसाठी संपर्क केला. गॅरेथ घरगुती हिंसाचार सहन करत आहेत, यातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे हे त्या संस्थेच्याही लक्षात आलं.
गॅरेथची आई डियान डेबेन्स याबाबत म्हणाल्या, ‘‘सहनशील गॅरेथचा आम्हाला अभिमान वाटतो. आपलं मूल मग ते कितीही वयाचं असलं, तरी ते जर अशा प्रकारच्या त्रासातून जात असेल, तर आपल्याला फार वाईट वाटतं. त्यानं या नैराश्यातून लवकर बाहेर पडावं, असं मला वाटलं. मी जोन्सच्या चेहऱ्यावरच्या बोचकारल्याच्या जखमा पाहिल्या. मला विश्वासच बसत नव्हता, की एक माणूस दुसऱ्या माणसाशी असा वागू शकतो."
गॅरेथची कहाणी सांगताना ‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’चे चेअरमन मार्क ब्रुक्स यांनी त्याची प्रशंसा केली. हा प्रकार त्यांच्यासाठी काहिसा दुर्मिळ होता, असं ते म्हणाले.
"घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्या पुरुषांबद्दल फारसं ऐकायला मिळत नाही. त्याबद्दल अनेकदा बोललंही जात नाही आणि त्याबाबत फारशी जागरुकताही नसते, ’’ असं मत ब्रुक्स यांनी नोंदवलं.
गॅरेथला भविष्यात नवा प्रेमळ समंजस जोडीदार मिळेल, अशी आशा त्यांच्या आईला वाटते आहे. गॅरेथ मात्र अजून नव्या नातेसंबंधांसाठी मानसिक दृष्ट्या तयार झालेले नाहीत.

‘‘माझ्या अंगावर फक्त कपडे शिल्लक राहिले आहेत. बाकी तिनं मला सर्व बाजूंनी कंगाल करून ठेवलं आहे. मला आता पुन्हा आर्थिक सबळ व्हावं लागेल. नवं घर घ्यावं लागेल. मानसिकदृष्ट्या सावरावं लागेल आणि मगच नव्या नात्याचा विचार करता येईल. या अनुभवामुळं बऱ्याच काळासाठी मी आत्मविश्वास गमावला. त्यावर मला उपचार घ्यावे लागले. पुरुषांवर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि भविष्यात त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, म्हणून मी माझ्या या जीवन कहाणीची जाहीर वाच्यता केली,’’ असं जोन्स सांगतात.
या कहाणीतील वर्णनाप्रमाणं तुम्हालाही काही त्रास होत असल्यास ‘बीबीसी ऍक्शन लाइन’च्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











