अमेरिकेत आढळल्या मांस खाणाऱ्या अळ्या, माणसाच्या शरीरात त्या कशा शिरतात?

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मांस खाणाऱ्या अळ्यांचे प्रकरण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी (24 ऑगस्ट) मानवामध्ये न्यू वर्ल्ड स्क्रूवर्मचं पहिलं प्रकरण नोंदवलं आहे.
हा मांस खाणारा परजीवी अल-साल्वाडोरहून परतलेल्या रुग्णामध्ये आढळून आला. अल-साल्वाडोर न्यू वर्ल्ड स्क्रूवर्मचा अजूनही प्रादुर्भाव असलेला देश आहे.
अमेरिकेची सार्वजनिक आरोग्य संस्था सीडीसीने 4 ऑगस्ट रोजी हे प्रकरण खरं असल्याचं म्हटलं होतं.
रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून या स्क्रूवर्मचा इतर माणसांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये पसरण्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या पशू आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवेनुसार, न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म हे धोकादायक किडे आहेत.
स्क्रूवर्म माशा आकाराने घरातील माशांसारख्याच असतात किंवा थोड्या मोठ्या असू शकतात. या माशा निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या असतात, मागच्या भागावर तीन काळ्या पट्ट्या असतात आणि डोळे नारंगी रंगाचे असतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्क्रूवर्म गुरंढोरं म्हणजे जनावरं, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, कधी कधी पक्षी आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये माणसांमध्ये देखील आढळू शकतात.
त्यांच्या अळ्या जिवंत प्राण्याच्या मांसात जातात तेव्हा त्या गंभीर आणि कधी कधी प्राणघातक हानी पोहोचवतात.
न्यू वर्ल्ड स्क्रूवर्मची प्रकरणं क्यूबा, हैती, डोमिनिकन रिपब्लिक आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये दिसतात.

मादी स्क्रूवर्म माशा प्राण्यांच्या जखमेवर अंडी घालतात. अंड्यातून बाहेर पडल्यावर शेकडो अळ्या शरीरात किंवा मांसात प्रवेश करतात. जर यावर उपचार केला नाही, तर यामुळे मृत्यूही होऊ शकतो.
हे किडे किंवा अळ्या जखमेतील मांसात अशा पद्धतीने प्रवेश करतात जसं लाकडात स्क्रू घुसतो, त्यामुळे त्याचं नाव 'स्क्रूवर्म' असं पडलं.
हे गुरंढोरं आणि जंगली प्राण्यांसाठी खूप धोकादायक असू शकतात, आणि दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्याचा माणसांवरही परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Reuters
जखम असलेल्या माणसांमध्ये या अळ्या अधिक पसरण्याचा धोका असतो, विशेषतः जे लोक प्रभावित देशांमध्ये प्रवास करतात किंवा अशा प्राण्यांच्या किंवा गुरांच्या संपर्कात येतात ज्यात स्क्रूवर्म असतो.
उपचाराचा एकमेव मार्ग म्हणजे जखमेतील सर्व अळ्या काढून ती पूर्णपणे स्वच्छ करणं. वेळेत उपचार केल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल.

अमेरिकेच्या कृषी विभागानुसार, 1933 मध्ये या अळ्यांमुळे संक्रमित प्राण्यांमधून स्क्रूवर्म देशाच्या नैऋत्येकडून आग्नेय भागापर्यंत पसरला होता.
1934 पर्यंत मिसिसिपी, अलाबामा, नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, जॉर्जिया आणि फ्लोरिडामध्ये याची प्रकरणं आढळून आली.
1960 च्या दशकात अमेरिकेतून स्क्रूवर्म पूर्णपणे नष्ट करण्यात आला. संशोधकांनी मोठ्या प्रमाणात नर स्क्रूवर्म माशांची नसबंदी केली.
या नर माशा आणि जंगली मादी माशांपासून फक्त इन्फर्टाइल अंडी तयार झाली, जी विकसित होऊ शकत नव्हती. यामुळे स्क्रूवर्मचं उन्मूलन शक्य झालं.

फोटो स्रोत, AFP
स्क्रूवर्मचा अलीकडचा प्रकोप 2023 मध्ये पनामा येथे सुरू झाला. याच वर्षी जुलै महिन्यात मेक्सिकोनं अमेरिकेच्या सीमेपासून सुमारे 595 किलोमीटर दक्षिणेकडे याचं नवीन प्रकरण नोंदवलं.
त्यानंतर अमेरिकेच्या कृषी विभागाने दक्षिणेकडील बंदरातून जनावरांच्या आयातीवर बंदी घातली.
कृषी विभागाच्या अंदाजानुसार, अमेरिका दरवर्षी मेक्सिकोमधून 10 लाखांहून जास्त जनावरांची आयात करतो. त्यामुळे स्क्रूवर्मच्या प्रादुर्भावामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो आणि गुरांच्या उद्योगाशी संबंधित 100 अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक व्यवहार धोक्यात येऊ शकतात.
सध्या यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका 'खूपच कमी' आहे, असंही अधिकारी सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











