नाक, जननेंद्रिय, त्वचा या ठिकाणी तयार होते बुरशी; काय होतो याचा आरोग्यावर परिणाम?

प्रतीकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक
    • Author, कॅटरिना झिमर
    • Role, बीबीसी न्यूज

आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या बुरशी असतात. काही आपल्या पचनासाठी उपयोगी असतात तर काही निष्प्रभ आणि काही धोकादायकही.

पण अलीकडील संशोधन सुचवतं की, ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचून आपल्या वर्तनात, स्मरणशक्तीवर, मानसिक आरोग्यावरही परिणाम करत असावी. हे ऐकताना विचित्र वाटतं. परंतु, शास्त्रज्ञ आता याचा गांभीर्यानं अभ्यास करताना दिसत आहेत.

आपल्या शरीरात असलेल्या बुरशीचा आपल्या आरोग्यावर जितका परिणाम होतो, तितका आपण आजपर्यंत कधी विचारही केला नसेल.

आपल्या शरीरावर आणि शरीराच्या आत लाखो सूक्ष्म जीव जिवंत असतात. त्यात अनेक प्रकारच्या बुरशींचाही समावेश असतो.

आपली त्वचा ही वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीचं जणू एक जाळंच आहे. नाकाच्या आणि योनीच्या आतील भागांतही बुरशी असते. एवढंच नाही तर आपल्या पोटात म्हणजेच आतड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरियांसोबत बुरशीही तिथेच राहते.

आपल्याला काही बुरशी जन्माच्या वेळी आईकडून मिळते, पण त्यानंतरही नवनव्या बुरशी सतत आपल्या शरीरात येत असतात.

आपण जेव्हा बिअर पितो किंवा ब्रेड खातो, तेव्हा यीस्ट म्हणजेच बुरशी शरीरात जाते. श्वास घेताना हवेत असलेले बुरशीचे कणही (स्पोर्स) आपण नकळत आत घेतो.

आपलं रोगप्रतिकारक तंत्र काही बुरशींना लगेच नष्ट करतं, पण काही बुरशी थोडा वेळ शरीरात राहतात, तर काही बुरशी आपल्या शरीरात आयुष्यभर टिकतात.

'निरोगी शरीरासाठीही बुरशी तितकीच महत्त्वाची'

शरीरातील बुरशी आपल्या मेंदू, विचार आणि वर्तनावरही परिणाम करत असेल का? याचा अभ्यास आता वैज्ञानिक करत आहेत.

बुरशीमुळे मेंदूचे आजार होऊ शकतात, हे माहीत आहेच. पण आता वैज्ञानिकांना थोडे वादग्रस्त असे संकेत मिळत आहेत की, बुरशी माणसाच्या मेंदू किंवा विचारांवरही परिणाम करत असावी.

बुरशीचा मेंदूवर परिणाम होतो? नव्या संशोधनात शास्त्रज्ञ काय सांगतात?

फोटो स्रोत, Emmanuel Lafont

या कल्पनेनं 'एचबीओ'च्या 'द लास्ट ऑफ अस' मालिकेत दाखवलेल्या झॉम्बी बनवणाऱ्या बुरशीची आठवण होऊ शकते. पण शास्त्रज्ञ मान्य करतात की, बुरशी आपल्या शरीरावर पूर्णपणे ताबा घेईल, ही कल्पना अशक्य आहे.

तरीसुद्धा, शरीरातील काही बुरशी मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या आजारांना कारणीभूत ठरते का, किंवा पोटातील बुरशी आपल्या वागणुकीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते का, याचा ते गंभीरपणे अभ्यास करत आहेत.

अशा बुरशींचा आपल्या शरीराशी काय संबंध आहे हे समजण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी, नवीन मार्ग शोधण्यासाठी अधिक संशोधन करणं गरजेचं आहे.

Photo Caption- आपण प्रत्येक श्वासात बुरशीचे कण आत घेतो. (Credit: )
बुरशीमुळे अल्झायमर आणि स्किझोफ्रेनिया वाढतोय का? तज्ज्ञ काय सांगतात?

फोटो स्रोत, Emmanuel Lafont

फोटो कॅप्शन, आपण प्रत्येक श्वासात बुरशीचे कण आत घेतो.

साधारणपणे माणसाचं शरीर बुरशीपासून स्वतःचं चांगलं संरक्षण करतं (आपलं उष्ण शरीर तापमान बुरशीला वाढण्यापासून रोखतं). आणि जी काही बुरशी शरीरात टिकते, ती कधी कधी उपयोगीही ठरते.

ती रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते किंवा जखमा बऱ्या होण्यास मदत करू शकते, असं अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मॅथ्यू ओल्म सांगतात.

ते म्हणतात, "निरोगी शरीरासाठी बुरशी हा एक महत्त्वाचा भाग आहे."

पण बऱ्याच बुरशी प्रकारांमुळे आजारही होऊ शकतात. उदाहरणार्थ- अ‍ॅथलीट्स फूटपासून ते थ्रशपर्यंत.

'लोकांची रोगप्रतिकारक शक्ती झाली कमी'

ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातील फंगल इम्युनॉलॉजिस्ट रेबेका ड्रमंड म्हणतात की, हे तेव्हाच घडतं, जेव्हा आपल्याला वातावरणातून काही घातक बुरशी लागते किंवा आपल्या शरीरात आधीपासून असलेली बुरशी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढू लागते.

फुफ्फुस, आतडे आणि मेंदूभोवती असलेल्या रक्त-मेंदू संरक्षक भिंतीमुळे, तसेच शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशींमुळे बुरशीला मेंदूपर्यंत पोहोचणं फारच दुर्मिळ असतं. परंतु, तरीही काही वेळा बुरशी मेंदूपर्यंत पोहोचते आणि संसर्ग करते.

प्रातिनिधिक

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अशा प्रकारच्या मेंदूतील बुरशी संसर्गाच्या घटनांमध्ये गेल्या काही दशकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

ड्रमंड सांगतात की, सध्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असल्यामुळे अशा बुरशी संसर्गाच्या घटना वाढत आहेत.

यामागे एक कारण म्हणजे एचआयव्हीसारख्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करणाऱ्या विषाणूचा जगभर वाढलेला प्रभाव. विशेषतः आफ्रिकेतील काही भागांमध्ये.

त्याचबरोबर कॅन्सरवरील उपचार किंवा अवयव प्रत्यारोपणानंतर दिल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या औषधांचाही यात मोठा वाटा आहे. ड्रमंड म्हणतात, "आपण जितक्या जास्त अशा औषधांचा वापर करू, तितक्या जास्त बुरशी संसर्गाची प्रकरणं दिसतील."

ड्रमंड सांगतात की, मेंदूला संसर्ग करणारी बुरशी अनेक वेळा फुफ्फुसांमधून सुरुवात करते. उदाहरणार्थ अ‍ॅस्परगिलस किंवा क्रिप्टोकोकस ही बुरशी. हे हवेत असलेले कण (स्पोर्स) असतात, जे आपण श्वासात घेतो. हे शरीरात रुजून वाढतात आणि वेळेवर लक्ष न दिल्यास ते पसरू शकतात.

कधीकधी आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या असणारी कँडिडा अल्बिकान्स ही बुरशी नियंत्रणाबाहेर जाते. आणि जर ती मेंदूपर्यंत पोचली, तर ती शाखा तयार करते आणि मेंदूच्या पेशींना मारणारे विष निर्माण करते, असं डॉ. ड्रमंड सांगतात.

क्रिप्टोकोकस बुरशी काही वेळा गाठीसारखी वाढते, जी ट्यूमरसारखी दिसते. "यामुळे अर्थातच शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकतं," असंही त्या स्पष्ट करतात.

'बुरशीवरील औषधांची संख्या फारच कमी'

मेंदूतील बुरशीजन्य संसर्ग अनेकदा जीवघेणा ठरतो, आणि अ‍ॅस्परगिलस या बुरशीमुळे मृत्यूदर 90 टक्क्यांपेक्षा जास्त असतो. त्याच्यावर उपचार करणं कठीण असतं, असं ड्रमंड सांगतात.

कारण बुरशीवर उपयोगी पडणाऱ्या औषधांची संख्या फार कमी आहे, आणि मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तातील संरक्षण भिंतीमुळे सगळी औषधं तिथवर पोहोचत नाहीत. शिवाय काही बुरशी या औषधांचा प्रतिकारही विकसित करतात.

मेंदूतील बुरशी संसर्गातून वाचलेले अनेक लोक कायमस्वरूपी मेंदूच्या आजारांनी त्रस्त होतात.

ड्रमंड सांगतात की, एड्सग्रस्त रुग्ण जे क्रिप्टोकोकस या बुरशीमुळे होणाऱ्या क्रिप्टोकॉकल मेनिन्जायटिस मधून वाचतात, त्यांची दृष्टी कमकुवत होणं, स्मरणशक्ती कमी होणं आणि चक्कर येणं अशा त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं.

 शास्त्रज्ञ मेंदूत घुसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे अल्झायमर सारखा होतो का, याचा शोध घेत आहेत.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont

फोटो कॅप्शन, शास्त्रज्ञ मेंदूत घुसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे अल्झायमर सारखा होतो का, याचा शोध घेत आहेत.

शास्त्रज्ञांना बुरशीमुळे होणाऱ्या मेंदूच्या संसर्गांचा धोका होऊ शकते हे अनेक वर्षांपासून माहिती आहे.

परंतु, अलीकडच्या काळात काही संशोधकांना असं वाटतं की, बुरशी मेंदूपर्यंत पूर्वी वाटत होतं त्यापेक्षा जास्त वेळा पोहोचत असावी आणि कदाचित ती अल्झायमर सारख्या आजारांमध्ये होणाऱ्या मेंदूच्या पेशी नष्ट होण्यामागे कारणीभूत असू शकते.

यूकेतील युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग मधील आण्विक जीवशास्त्रज्ञ रिचर्ड लॅथ यांच्या मते, ही कल्पना खरी ठरू शकेल असं सांगणारे काही रोचक पुरावे आहेत.

अल्झायमरचं निदान झालेल्या काही रुग्णांच्या मेंदूमध्ये बुरशी किंवा इतर जंतूंमुळे संसर्ग झाल्याचं नंतर योगायोगानं आढळून आलं. जेव्हा अशा रुग्णांना संसर्गावर उपचार करणाऱ्या गोळ्या दिल्या गेल्या, तेव्हा काही जणांची विसरभोळेपणाची (डिमेंशिया) लक्षणं कमी झाली, असं लॅथ सांगतात. "विशेष म्हणजे त्यांच्यापैकी काहीजण तर पुन्हा कामावरही गेले."

लॅथ यांचा विश्वास आहे की, बुरशीसारखे जंतू अनेकदा रक्तातून मेंदूपर्यंत पोहोचतात, परंतु मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमुळे ते मारले जातात किंवा रोखले जातात.

बुरशीमुळे मानसिक आजार होतात का?

मात्र, वयानुसार जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमजोर होते, तेव्हा हे जंतू मेंदूमध्ये साचू लागतात आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींना मारणारी सूज सुरू होऊ शकते. "जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हाच नुकसान दिसायला लागतं," असं ते सांगतात.

शास्त्रज्ञ अल्झायमरचा मेंदूतील काही विशिष्ट प्रथिनांच्या साठ्याशी जुना संबंध जोडतात. पण आता काही संशोधक म्हणतात की, हे प्रथिने आजाराचं कारण नसून त्याचे फक्त लक्षण असू शकतात.

लॅथ यांचं मत आहे की, हे प्रथिने मेंदूतील जंतूंच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी शरीर तयार करतं, कारण काही संशोधनांनुसार या प्रथिनांमध्ये संसर्गाशी लढण्याची क्षमता किंवा गुणधर्म असतात.

मेंदूत घुसणारे सूक्ष्मजंतू अल्झायमरला कारणीभूत ठरू शकतात, याचे आणखी पुरावे उंदरांवर केलेल्या प्रयोगांतून मिळाले आहेत. या प्रयोगांत, संशोधकांनी पाहिलं की, उंदरांचं रोगप्रतिकारक तंत्र कमजोर झाल्यावर कॅँडिडा अल्बिकन्स ही बुरशी त्यांच्या मेंदूमध्ये पोहोचली.

अजून एका अभ्यासात (ज्यावर अजून वैज्ञानिक परीक्षेसाठी मंजूर झालेला नाही), लॅथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृत व्यक्तींच्या, काही अल्झायमर रुग्णांच्या तर काही निरोगी व्यक्तींच्या मेंदूच्या तुकड्यांचा अभ्यास केला.

त्यात दोन्ही गटांमध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी आढळून आली. पण अल्झायमर असलेल्या रुग्णांच्या मेंदूत हे सूक्ष्मजंतू जास्त प्रमाणात होते.

जर सूक्ष्मजंतू खरोखरच अल्झायमरला कारणीभूत ठरत असतील, तर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून, जसं की सामान्य प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या लसींच्या मदतीने हा आजार टाळता किंवा कमी करता येऊ शकतो.

पण ही कल्पना अजून नवी आहे, असं लॅथ सांगतात. "हे नवीन विचार आहेत."

ही कल्पना वादग्रस्तही आहे. ओल्म आणि इतर काही शास्त्रज्ञ म्हणतात की, मेंदूमध्ये सूक्ष्मजंतूंचे अंश सापडले ते प्रयोगात चुकून गेले असावेत, कारण असे अंश हवेत सर्वत्र असतात.

पण लॅथ यांना असं वाटत नाही. ते म्हणतात, जर ते फक्त हवेमुळे गेले असते, तर मेंदूच्या फक्त बाहेरच्या भागावरच दिसले असते. पण हे अंश मेंदूच्या आतही सापडले, त्यामुळे हे खरंच मेंदूपर्यंत पोहोचले असावेत.

तरीही ओल्म म्हणतात की, अल्झायमरच्या रुग्णांच्या मेंदूमध्ये जास्त सूक्ष्मजंतू सापडल्याचा अर्थ असा नाही की हेच सूक्ष्मजंतू आजाराचे कारण आहेत.

कदाचित त्या लोकांच्या मेंदूचं संरक्षण करणारी भिंत (ब्लड ब्रेन बॅरियर) कमकुवत झाली असावी किंवा दुसरं काही कारण असावं, त्यामुळे सूक्ष्मजंतू मेंदूत गेले असतील आणि नंतर त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीने त्यांना मारून टाकलं असेल.

बॅक्टेरिया माशांच्या मेंदूत शिरलेले दिसून आले आहेत, यामुळे सूक्ष्मजंतू इतर प्राण्यांच्या मेंदूतही जाऊ शकतात, ही शक्यता अजून मजबूत होते.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont

फोटो कॅप्शन, बॅक्टेरिया माशांच्या मेंदूत शिरलेले दिसून आले आहेत, यामुळे सूक्ष्मजंतू इतर प्राण्यांच्या मेंदूतही जाऊ शकतात, ही शक्यता अजून मजबूत होते.

परंतु, सूक्ष्मजंतू माशांसारख्या प्राण्यांच्या मेंदूत घुसू शकतात, हे दाखवणारे नवे पुरावे आता उपलब्ध आहेत. यावरून हे सस्तन प्राण्यांमध्ये आणि कदाचित माणसांमध्येही घडत असावं, अशी शक्यता वाटते, असं ओल्म सांगतात.

2024 मधील एका अभ्यासात, शास्त्रज्ञांनी हिरव्या चमकदार रंगाने (फ्लुरोसंट) चिन्हांकित केलेले बॅक्टेरिया सॅल्मन आणि ट्राउट माशांच्या टाकीत सोडले. "एक आठवड्यानंतर हे बॅक्टेरिया माशांच्या मेंदूकडे जाऊन तिथे हिरवा प्रकाश निर्माण करताना दिसले," ओल्म सांगतात.

विशेष म्हणजे, "(हे बॅक्टेरिया) त्या माशांच्या मेंदूत त्यांच्या आयुष्यात काही फारसा त्रास न देता राहताना दिसतात."

वय वाढल्यावर मेंदूचं संरक्षण कमी झाल्यामुळे इतर सूक्ष्मजंतू मेंदूत प्रवेश करत असावेत, ही शक्यता आता अधिक खरी वाटते. "आता या कल्पनेभोवती पुरेसा 'धूर' दिसतोय… त्यामुळे हे खरंच घडतंय का, हे शोधण्यासाठी पैसे खर्च करणं योग्य ठरेल," असं ओल्म सांगतात.

विशेष म्हणजे, मेंदूवर परिणाम करण्यासाठी बुरशीला थेट मेंदूत शिरण्याची गरजही नसू शकते.

उंदरांवर झाले प्रयोग

2022 मध्ये अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, उंदरांच्या पोटात कँडिडा अल्बिकन्स नावाची बुरशी टाकल्यावर त्यांच्या पोटाची भिंत (आतडे) मजबूत झाली.

ही भिंत बॅक्टेरियांच्या इन्फेक्शनमुळे किंवा अँटीबायोटिकमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचली. अभ्यासक इलियन इलियेव म्हणतात, की ही बुरशी पोटाबाहेर जाऊन इतर अवयवांना इन्फेक्शन करू नये म्हणून शरीर आपोआप आतडं मजबूत करतं. ही शरीराची एक सुरक्षेची भिंत किंवा पद्धत असते.

पण खरा धक्का तेव्हा बसला, जेव्हा संशोधकांनी उंदरांच्या वर्तनाकडे लक्ष दिलं. ज्या उंदरांच्या पोटात बुरशी वाढली होती, ते उंदीर इतर उंदरांकडे जास्त जात होते, जास्त वास घेण्याचा प्रयत्न करत होते आणि जास्त संवाद साधत होते. म्हणजेच बुरशीमुळे त्यांच्या वागण्यात काही तरी बदल झाला होता.

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, उंदरांच्या रोगप्रतिकारक पेशींद्वारे काही खास रेणू (मॉलिक्यूल्स) रक्तात जातात आणि मग ते मेंदूमधल्या वर्तन नियंत्रित करणाऱ्या पेशींवर परिणाम करतात. इलियेव म्हणतात, "हे आमच्यासाठी खूपच आश्चर्यचकित करणारं होतं."

उंदरांमध्ये पोटातल्या बुरशीचा मेंदूवर परिणाम का होतो, हे अजूनही एक कोडंच आहे. ही एक योगायोगाने घडलेली गोष्ट आहे का, म्हणजे बुरशीमुळे होणारे रोगप्रतिकारक सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचतात हे फक्त अपघातानं घडतंय का? की मग बुरशी मुद्दाम असं करत असेल का? म्हणजे स्वतःला टिकवण्यासाठी?

इलियेव असा विचार करतात की, माणसांसारख्या सस्तन प्राण्यांच्या शरीराला कदाचित बुरशीच्या परिणामांमुळे वर्तन बदलणं फायद्याचं वाटत असेल.

Photo Caption- ज्यांच्या पोटात जास्त बुरशी होती, असे उंदीर इतर उंदरांबरोबर जास्त मिसळणारे होते.

फोटो स्रोत, Emannuel Lafont

फोटो कॅप्शन, ज्यांच्या पोटात जास्त बुरशी होती, असे उंदीर इतर उंदरांबरोबर जास्त मिसळणारे होते.

सध्या तरी मानवांमध्ये पोटातल्या बुरशीचं मेंदूसोबत थेट संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. पण अशी शक्यता आहे आणि तिचा अभ्यास व्हायला हवा, असं ओल्म म्हणतात.

अलीकडच्या वर्षांत संशोधकांनी असं दाखवलं आहे की, पोटात असणाऱ्या काही जिवाणूंमधून शरीरात काही सिग्नल जातात जे थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. यात इम्यून सिस्टिम, मेंदूतील नसा आणि नैराश्य, चिंता किंवा शांतपणाशी संबंधित रसायनं यांचा समावेश आहे.

ओल्म म्हणतात, "बुरशीही हेच करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही."

स्किझोफ्रेनियाला बुरशी कारणीभूत आहे का?

काही शास्त्रज्ञ आता हेही तपासत आहेत की, मानसिक आजारांमध्ये बुरशींचा काही संबंध आहे का? काही संशोधनांत असं आढळलं आहे की, ज्यांना डिप्रेशन किंवा बायपोलर डिसऑर्डर आहे, त्यांच्या पोटातल्या बुरशींची रचना इतर लोकांपेक्षा वेगळी असते, त्यात फरक आहे.

जॉन हाफकिन्स विद्यापीठाच्या न्युरोसायंटिस्ट एमिली सेव्हरन्स यांच्या 2016 मधील एका अभ्यासानुसार, स्किझोफ्रेनिया असलेल्या महिलांमध्ये ज्या महिलांच्या शरीरात कॅँडिडा अल्बिकन्स या बुरशीचा संपर्क आढळून आला, त्या महिलांनी स्मरणशक्ती आणि विचारशक्तीच्या चाचण्यांमध्ये कमी गुण मिळवले.

सेव्हरन्स यांच्या मते, तणाव किंवा अँटिबायोटिक्समुळे ही कॅँडिडा बुरशी पोटात जास्त वाढते, आणि त्यामुळे पोटातील सूक्ष्मजंतूंचं संतुलन बिघडतं. त्यातून काही असे रासायनिक घटक तयार होतात, जे संवेदनशील लोकांमध्ये स्किझोफ्रेनियासारखा मानसिक आजार होण्याची शक्यता वाढवू शकतात.

जर हे खरं ठरलं, तर डॉक्टर कॅन्डिडा कमी करणारे प्रोबायोटिक्स देऊन स्किझोफ्रेनियाची लक्षणं नियंत्रणात आणू शकतील आणि कॅँडिडा कमी करणं हे स्वतःच्या आरोग्यासाठी चांगलंच ठरेल, असं त्या सांगतात.

पण याचा संबंध आढळतो म्हणूनच स्किझोफ्रेनिया या आजाराला बुरशी कारणीभूत आहे, असं ठामपणे म्हणता येणार नाही. कदाचित स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांमध्ये कँडिडा बुरशी जास्त असण्याची शक्यता फक्त जास्त असू शकते.

बुरशी महत्त्वाची पण नेमकी किती?

"आपल्याला आत्तापर्यंत काही संबंधच सापडले आहेत," सेव्हरन्स म्हणतात. "हा विषय खूपच रोचक आहे, पण अजून अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे."

आपल्या शरीरातल्या कोणत्या बुरशींचा मेंदूवर खरोखर प्रभाव पडतो, हे शास्त्रज्ञ अजूनही शोधायचा प्रयत्न करत आहेत.

ड्रमंड म्हणतात, "बुरशी महत्त्वाची आहे, हे नक्की. पण ती नेमकी कशी आणि किती महत्त्वाची आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही."

एक गोष्ट मात्र आता स्पष्ट होत चालली आहे की, आतापर्यंत सगळं लक्ष बॅक्टेरियांकडे होतं. पण आता आपल्या शरीरात शांतपणे राहणाऱ्या बुरशींकडेही गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)