अँटिबायोटिक्सनं भारतासह 'या' देशांची चिंता का वाढवलीय? जीवघेण्या 'सुपरबग्ज'चं संकट काय आहे?

फोटो स्रोत, Corbis via Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एका बाजूला, प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) अतिरेकी वापर होतो आहे. इतका की आता ते प्रभावी ठरताना दिसत नाहीयेत.
यामुळे, प्रतिकार वाढतो आहे आणि जीवघेण्या 'सुपरबग्ज'चा (एक प्रकारचा बॅक्टेरिया) उदय होतो आहे.
तर दुसऱ्या बाजूला, लोकांना ही जीवनरक्षक औषधं मिळत नसल्यामुळे ते मृत्युमुखी पडत आहेत.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, हा एक गंभीर विरोधाभास आहे.
नॉन-प्रॉफिट संस्था ग्लोबल अँटिबायोटिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्टनरशिपने (जीएआरडीपी) केलेल्या एका नव्या अभ्यासात, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांसह आठ प्रमुख कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील सुमारे 15 लाख कार्बापेनेम-प्रतिरोधक ग्राम-निगेटिव्ह (सीआरजीएन) संसर्गाच्या केसेसचा अभ्यास केला.
हे सीआरजीएन जीवाणू (बॅक्टेरिया) शेवटच्या टप्प्याचे प्रतिजैविकही निष्फळ करणारे सुपरबग्ज आहेत. तरीही अभ्यास केलेल्या देशांमध्ये फक्त 6.9 टक्के रुग्णांना योग्य उपचार मिळाले. सुपरबग्ज हा जीवाणूंचा एक प्रकार आहे, जो प्रतिजैविक औषधांना प्रतिरोधक बनतो.
आयसीयूमध्ये वेगानं पसरतात बॅक्टेरिया
द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीजेस या जर्नलमधील अभ्यासानुसार, सीआरजीएन संसर्ग आणि त्यावरील उपचारांच्या बाबतीत भारताचा वाटा सर्वाधिक होता.
अभ्यासात समाविष्ट केलेल्या अँटिबायोटिक्सच्या संपूर्ण मात्रा खरेदी करण्याच्या बाबतीत भारताने 80 टक्के वाटा उचलला, पण तरीही अंदाजित रुग्णांपैकी केवळ 7.8 टक्के रुग्णांवरच योग्य उपचार करता आले. (अँटिबायोटिक्सचा 'पूर्ण डोस कोर्स' म्हणजे एखाद्या संसर्गावर (इन्फेक्शन) पूर्णपणे उपचार करण्यासाठी रुग्णाने ठराविक कालावधीत घेतले पाहिजेत असे सर्व डोस).

फोटो स्रोत, Getty Images
पाणी, अन्न, वातावरण आणि मानवी आतड्यांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या ग्राम-नकारात्मक (ग्राम निगेटिव्ह) बॅक्टेरियामुळे लघवीच्या मार्गातील संसर्ग (यूटीआय), न्यूमोनिया आणि अन्न विषबाधेसारखे आजार होतात.
हे जीवाणू नवजात बाळांसाठी आणि वृद्धांसाठी गंभीर धोकादायक ठरू शकतात. विशेषतः रुग्णालयातील कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांसाठी हे अधिक घातक ठरतात, कारण हे आयसीयूमध्ये वेगाने पसरतात आणि त्यांच्यावर उपचार करणं अत्यंत कठीण, कधी-कधी अशक्य ठरतं.
कार्बापेनेम-प्रतिरोधक ग्राम-नकारात्मक बॅक्टेरियांवर उपचार करणं दुप्पट अवघड असतं. कारण हे जीवाणू अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली अशा काही प्रतिजैविकांनाही प्रतिसाद देत नाहीत.
अँटिबायोटिक्सचा अतिरेकी वापर
"या इन्फेक्शनचा त्रास सर्व वयोगटांतील लोकांना दररोजचा अनुभव आहे," असं चेन्नईतील अपोलो रुग्णालयातील संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अब्दुल गफूर सांगतात. "आम्हाला अनेकदा असे रुग्ण दिसतात की, ज्यांच्यावर कोणतंही अँटिबायोटिक काम करत नाही आणि ते मृत्युमुखी पडतात."
ते पुढं म्हणतात, 'हा एक क्रूर विरोधाभास आहे. एकीकडे जग अँटिबायोटिक्सच्या अतिवापराला आळा घालण्याचा प्रयत्न करतंय तर दुसरीकडे गरीब देशांमध्ये केवळ योग्य औषध न मिळाल्यामुळे लोक बरं होऊ शकेल अशाही संसर्गजन्य आजारांना बळी पडत आहेत.'

फोटो स्रोत, Getty Images
"वर्षानुवर्षे असं सांगितलं जात होतं की, अँटिबायोटिक्सचा अतिरेकी वापर होतो आहे, पण सत्य हे आहे की कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील अनेक लोकांना, ज्यांना फारच औषध प्रतिरोधक संसर्ग आहे, त्यांना आवश्यक अँटीबायोटिक्स उपलब्ध होत नाहीत," असं जीएआरडीपीच्या ग्लोबल अॅक्सेस डायरेक्टर आणि या अभ्यासाच्या लेखिका डॉ. जेनिफर कोहन यांनी म्हटलं आहे.
या अभ्यासात कार्बापेनेम-प्रतिरोधक बॅक्टेरियावर प्रभावी असलेल्या आठ इंट्राव्हेनस औषधांचा अभ्यास करण्यात आला. ज्यात कोलिस्टिनसारखी जुन्या अँटिबायोटिक्सपासून ते सेफ्टाझिडीम-अविबॅक्टॅमसारख्या नव्या औषधांचा समावेश होता. उपलब्ध असलेल्या काही औषधांपैकी टायगेसायक्लिन सर्वाधिक वापरलं गेलं.
खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर
संशोधक या उपचारातील फरकासाठी कमकुवत आरोग्य प्रणाली आणि प्रभावी अँटिबायोटिक्सच्या मर्यादित उपलब्धतेला जबाबदार ठरवतात.
उदाहरणार्थ, आठ देशांमध्ये मिळून फक्त 1,03,647 पूर्ण टायगेसायक्लिन उपचार कोर्स खरेदी करण्यात आले. पण सुमारे 15 लाख रुग्णांना त्याची गरज होती, असं अभ्यासात आढळून आलं. हे औषध-प्रतिरोधक संसर्गांवरील जागतिक प्रतिसादातील मोठ्या कमतरतेकडे लक्ष वेधतं.
भारतामध्ये औषध-प्रतिरोधक संसर्ग असलेल्या रुग्णांना योग्य अँटिबायोटिक्स मिळण्यापासून कोणते घटक अडथळा निर्माण करतात?
डॉक्टर अनेक अडथळ्यांकडे लक्ष वेधतात. योग्य आरोग्य सुविधेपर्यंत पोहोचणं, अचूक निदान चाचण्या मिळवणं आणि प्रभावी औषधांपर्यंत पोहोचणं. किंमत हा एक मोठा अडथळा आहे. कारण ही अँटिबायोटिक्स खूप महाग आहेत आणि गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"ज्यांना हे अँटिबायोटिक्स परवडू शकतात, ते त्यांचा अतिवापर करतात; आणि ज्यांना परवडत नाही, त्यांना हे औषध मिळतच नाही," असं डॉ. गफूर सांगतात.
"आपल्याकडे अशी एक प्रणाली हवी आहे, जी गरिबांना औषधं उपलब्ध करून देईल आणि श्रीमंतांकडून होणारा गैरवापर थांबवेल."
उपलब्धता सुधारण्यासाठी ही औषधं अधिक परवडणारी म्हणजेच स्वस्त करावी लागतील. गैरवापर टाळण्यासाठी कडक नियमावली आवश्यक आहे.
"आदर्श परिस्थितीत, प्रत्येक अँटिबायोटिक प्रिस्क्रिप्शनसाठी रुग्णालयात संसर्गतज्ज्ञ किंवा मायक्रोबायोलॉजिस्टकडून दुसरी मान्यता आवश्यक असावी," असं डॉ. गफूर म्हणतात.
"काही रुग्णालयं हे करत असली तरी बहुतांश करत नाहीत. योग्य देखरेखीसह नियामक हे सुनिश्चित करू शकतात की, ही एक मानक किंवा प्रमाणित पद्धत बनेल."
नवीन अँटिबायोटिक्ससाठी भारत मोठी बाजारपेठ
संशोधकांच्या मते, प्रवेशाची अडचण दूर करण्यासाठी आणि अति वापर थांबवण्यासाठी अधिक स्मार्ट धोरण आणि कडक उपाययोजना आवश्यक आहे.
पण, केवळ प्रवेश सुधारून ही समस्या सुटणार नाही. नव्या अँटीबायोटिक्सचा पुरवठा आता कमी होत चालला आहे. अँटिबायोटिक संशोधन आणि विकासात घट, त्याचबरोबर विद्यमान औषधांची मर्यादित उपलब्धता ही एक जागतिक समस्या बनली आहे.
भारतावर अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) चं जगातील सर्वात मोठं ओझं आहे. पण त्याच वेळी ते या समस्येशी लढण्याची गुरुकिल्लीही ठरू शकतं, भारतात आणि जगभरातही, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
"भारत नवीन प्रतिजैविकांसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि नवीन प्रतिजैविकांच्या विकास व उपलब्धतेसाठी प्रभावीपणे प्रयत्न करू शकतो," असं डॉ. कोहन म्हणतात.
मजबूत औषधनिर्माण आधारामुळे (फार्मास्युटिकल बेस) भारत ही एएमआर नव कल्पनांचे एक केंद्र म्हणून उदयास येत आहे, आशादायक नवीन प्रतिजैविकांपासून ते प्रगत निदान तंत्रज्ञानापर्यंत
योग्य वापर आणि गरजवंतापर्यंत पोहोचण्याची गरज
डॉ. कोहन म्हणतात की, भारत स्थानिक डेटा तयार करून आपल्या प्रतिजैविक प्रतिसादाला मजबूत करू शकतो, ज्यामुळे गरजा अधिक चांगल्या प्रकारे मोजता येतील आणि उपचार प्रक्रियेतील कमतरता ओळखता येईल.
यामुळे योग्य औषधांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक केंद्रित हस्तक्षेप करता येईल.
आधुनिक मॉडेल्स आधीच दिसू लागले आहेत. यासाठी केरळचं उदाहरण देता येईल. तिथं "हब-आणि-स्पोक" पद्धत वापरून खालच्या स्तरातील सुविधांना गंभीर संसर्गाचं व्यवस्थापन करण्यात मदत करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
रुग्णालयं किंवा राज्यांमध्ये एकत्रित खरेदीमुळे नवीन औषधांच्या किमती कमी होऊ शकतात, हे कॅन्सर औषध कार्यक्रमांमधून दिसून येतं, असं संशोधक सांगतात.
योग्य अँटिबायोटिक्सशिवाय आधुनिक औषधशास्त्र उलगडू लागतं. डॉक्टरांना सुरक्षित शस्त्रक्रिया करण्याची, कर्करोग रुग्णांतील गुंतागुंतीवर उपचार करण्याची आणि दैनंदिन संसर्गाचं व्यवस्थापन करण्याची क्षमता गमावण्याचा धोका आहे.
"एक संसर्गजन्यरोग तज्ज्ञ म्हणून, मला योग्य वापर हा प्रवेशाचा एक भाग वाटतो, पण फक्त एक भागच," असं डॉ. गफूर म्हणतात.
"जेव्हा नवीन अँटिबायोटिक्स मिळतात, तेव्हा त्यांना एका बाजूनं जपणं महत्त्वाचं आहे आणि योग्य रुग्णांसाठी ते जतन करणं."
हे स्पष्ट आहे की, आव्हान फक्त अँटिबायोटिक्सचा शहाणपणाने किंवा हुशारीने वापर करणं नाही. तर ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं देखील आहे
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











