अँटिबायोटिक औषधांचा परिणाम घटल्याने तब्बल 30 लाख चिमुकल्यांचा मृत्यू, नव्या अहवालातून माहिती उघड

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉमिनिक ह्यूज
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लहान मुलांच्या शरीरामध्ये अँटिबायोटिक औषधांचा प्रभाव कमी करणारी प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे जगभरातील तब्बल 30 लाख लहान मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
लहान मुलांच्या आरोग्यावर संशोधन करणाऱ्या दोन प्रमुख तज्ज्ञांनी 2022 मध्ये केलेल्या एका अभ्यासानंतर हा निष्कर्ष लावला जातो आहे.
अँटिबायोटिक औषधांचा परिणाम कमी झाल्याचा सर्वाधिक फटका आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमधल्या लहान मुलांना बसला आहे.
या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) म्हणतात. रुग्णाच्या शरीरात संसर्ग निर्माण करणाऱ्या रोगजंतूंची ताकद वाढून जेव्हा हे रोगजंतू अँटिबायोटिक औषधांना दाद देणं बंद करतात, तेव्हा अशा परिस्थितीला एएमआर असं म्हणतात.
जगासमोर हे एक नवीन आरोग्य संकट निर्माण झाल्याचं मानलं जात आहे. या अभ्यासातून एएमआर लहान मुलांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम करतो हे समोर आलेलं आहे.
या अभ्यासासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड बँकेचे वेगवेगळे आकडे वापरण्यात आले. हे संशोधन करणाऱ्या व्यक्तींचं असं म्हणणं आहे की, 2022मध्ये किमान तीस लाख लहान मुलांचा मृत्यू त्यांच्या शरीरात औषधांचा परिणाम कमी करणारी प्रतिजैविके निर्माण झाल्याने झाला आहे.
या संशोधनानुसार फक्त तीन वर्षांमध्ये लहान मुलांमधील एएमआरशी संबंधित संसर्ग हे दहा पटींनी वाढले आहेत, असं तज्ज्ञांना वाटतं. कोरोनाच्या महासाथीनंतर ही परिस्थिती अधिकच गंभीर होऊ शकते.
अँटिबायोटिक औषधांचा वाढता उपयोग
त्वचेच्या संसर्गापासून ते न्यूमोनियापर्यंत अनेक प्रकारच्या जिवाणू संसर्गांवर उपचार करण्यासाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो.
कधीकधी ते संसर्गाच्या उपचाराऐवजी त्या संसर्गाचा फैलाव थांबवण्यासाठी देखील वापरले जातात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीवर कर्करोगासाठी शस्त्रक्रिया होत असेल किंवा केमोथेरपी उपचार सुरू असतील तर कॅन्सरच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी अँटिबायोटिक्स वापरले जातात.
मात्र , सर्दी, फ्लू किंवा कोविड सारख्या आजारांवर आणि विषाणूजन्य संसर्गांवर अँटीबायोटिक्सचा कोणताही परिणाम होत नाही.
हे आजार निर्माण करणाऱ्या काही जीवाणूंनी आता काही औषधांना प्रतिकार विकसित केला आहे. अँटीबायोटिक्सचा अयोग्य वापरामुळे असं घडल्याचं सांगितलं जातंय.
आता नवीन किंवा अपडेटेड अँटिबायोटिक्सची निर्मिती ही एक अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे ती मंदावली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या अहवालाच्या प्रमुख लेखिका, ऑस्ट्रेलियाच्या मर्डोक चिल्ड्रन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉ. यानहोंग जेसिका हू आणि क्लिंटन हेल्थ अॅक्सेस इनिशिएटिव्हच्या प्राध्यापक हर्ब हार्वेल यांनी अँटिबायोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सांगितलं आहे.
2019 ते 2021 दरम्यान, आग्नेय आशियामध्ये 'वॉच अँटीबायोटिक्स' (प्रतिरोधक निर्माण होण्याचा जास्त धोका असलेली औषधं)चा वापर आग्नेय आशियामध्ये 160 टक्क्यांनी तर आफ्रिकेत 126 टक्क्यांनी वाढला आहे.
याच काळात, आग्नेय आशियामध्ये 'रिझर्व्ह अँटीबायोटिक्स'चा वापर 45% आणि आफ्रिकेत 125 टक्क्यांनी वाढला. या प्रकारच्या अँटीबायोटिक्सचा वापर गंभीर प्रतिरोधक संसर्गांसाठी केला जातो.
अँटिबायोटिक औषधांना पर्याय कमी होत चालले आहेत
संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, जर शरीरातील बॅक्टरीयामध्ये या अँटिबायोटिक औषधांबरोबर लढण्याची प्रतिकारशक्ती तयार झाली तर अशा प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी पुरेसे पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार नाहीत.
प्राध्यापक हार्वेल या महिन्याच्या अखेरीस व्हिएन्ना येथे होणाऱ्या युरोपियन सोसायटी ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेसच्या काँग्रेसमध्ये त्यांचे निष्कर्ष सादर करतील.
या कार्यक्रमापूर्वी बोलताना प्राध्यापक हार्वेल म्हणाल्या, "एएमआर ही एक जागतिक समस्या आहे. ती सर्वांना प्रभावित करते. एएमआरचा मुलांवर कसा परिणाम होतो यावर खरोखर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हे संशोधन केलं आहे."
"आमचा अंदाज आहे की अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्समुळे जगभरात तीस लाख मुलांचा मृत्यू झाला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
AMR वर काही उपाय आहे का?
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एएमआरचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की, हा जगासमोर असलेल्या सर्वात गंभीर आरोग्य संकटांपैकी एक आहे. परंतु प्राध्यापक हार्वेल म्हणतात की यावर कोणताही एक उपाय आहे असं म्हणता येणार नाही.
त्या म्हणाल्या, "ही एक बहुआयामी समस्या आहे जी औषधाच्या सर्व पैलूंना आणि खरोखरच मानवी जीवनाला व्यापून टाकते. आपल्या आजूबाजूला अनेक अँटिबायोटिक्स असतात. हे अँटिबायोटिक्स आपल्या जेवणार आणि वातावरणात मिसळून जातात त्यामुळे त्यावर उपाय शोधणं हे सोपं काम नाही."
प्राध्यापक हार्वेल यांनी सांगितलं, "असे संसर्ग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कुठलाही संसर्ग पूर्णपणे टाळणे. यासाठी उच्च पातळीवरील लसीकरणासह स्वच्छ पाणी आणि स्वच्छता आवश्यक आहे."
"अँटीबायोटिक्सचा वापर वाढेल कारण अधिक लोकांना त्यांची आवश्यकता आहे परंतु आपल्याला त्यांचा योग्य वापर आणि योग्य औषधे वापरली जात आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे."

फोटो स्रोत, Getty Images
किंग्ज कॉलेज लंडनमधील सूक्ष्मजीवशास्त्राच्या व्याख्यात्या डॉ. लिंडसे एडवर्ड्स म्हणाल्या की, नवीन अभ्यासात मागील आकडेवारीच्या तुलनेत लक्षणीय आणि चिंताजनक वाढ दिसून येते.
त्या पुढे म्हणाल्या, "हे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक इशारा आहेत. यावर निर्णायक कारवाई न केल्यास, मागच्या काही दशकांमध्ये लहान मुलांच्या आरोग्याबाबत आपण केलेल्या प्रगतीला बाधा पोहोचू शकते. जगातील विकसनशील आणि अप्रगत देशांमध्ये यामुळं मोठं नुकसान होऊ शकतं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











