मेनोपॉजनंतर स्त्रियांचं कामजीवन थांबतं का?

फोटो स्रोत, Getty Images
सेक्स करण्याची इच्छा कमी होणं, योनीमार्ग कोरडा पडणं आणि मनःस्थितीत होणारा सततचा बदल. रजोनिवृत्ती (Menopause) आल्यानंतर बहुतेक महिलांना अशी लक्षणं दिसतात.
काहींसाठी, ही लक्षणं रजोनिवृत्तीआधी दहा वर्षांपासूनच सुरू होतात. त्याला पूर्वरजोनिवृत्तीचा काळ असं म्हटलं जातं.
40 वर्षांच्या सुझॅन कॅनडात वॅन्कोयुवरमध्ये राहतात. त्या पूर्वरजोनिवृत्तीच्या काळातून जात आहेत. त्या म्हणतात, "लैंगिक संबंध ठेवताना आता फार वेदना होतात. लैंगिक संबंधाची इच्छा मला अजूनही होते. पण वेदनांमुळे नको वाटतं. मला नेमकं काय होतंय ते मला समजतंच नव्हतं. आणि खरं सांगायचं तर डॉक्टरांकडे जाण्यासाठीही मी खूप वेळ घेतला."
माणसाचं सरासरी आयुर्मान वाढत असताना रजोनिवृत्ती सुरू झाल्यानंतर महिला त्यांच्या आयुष्याचा सुमारे एक तृतीयांश भाग घालवतात.
संप्रेरकांच्या बदलांमुळे एका वयानंतर महिलांमध्ये मासिक पाळी येणं थांबतं. त्याला रजोनिवृत्ती (Menopause) म्हणतात. त्यानंतर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात.
डॉ. अझिझा सेसे इंग्लडमध्ये आरोग्य शिक्षणाचा प्रचार करतात. शरीरातलं एस्ट्रोजेन हे संप्रेरक कमी झाल्याचा थेट संबंध योनीमार्गात कोरडेपणा जाणवून वेदनादायी लैंगिक संबंधाचा अनुभव येण्याशी आहे असं त्या म्हणतात.
मात्र, अनेकदा समाजात महिलांनी लैंगिक संबंधांबद्दल बोलणं टॅबू मानलं जात असल्याने, त्या म्हणतात, "लैंगिक संबंधात वेदना जाणवणं हे सामान्य असतं आणि नात्यामध्ये ती वेदना सहन करण्याची जबाबदारी बाईची असते असं अनेक महिलांना वाटतं."
अशा समजुतींमुळे अनेकदा महिला त्यांच्याकडे येत नाही आणि शांतपणे सहन करत राहतात, असंही डॉय अझिझा पुढे सांगत होत्या.
संप्रेरकं आणि लपलेली लक्षणं
डॉ. सेसे सांगतात की एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन ही दोन्ही संप्रेरकं लैंगिक इच्छेसाठी जबाबदार असतात. ही संप्रेरकं स्त्रियांच्या अंडाशयातून स्रवतात. त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागतं, तेव्हा लैंगिक इच्छेमध्येही बदल जाणवू लागतो.
ही बातमीही वाचा :हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं की वाईट?
जर्मनीत रहाणाऱ्या रोझी 45 वर्षांच्या आहेत. अंडाशयाला कॅन्सर झाल्यानंतर वयाच्या 30 व्या वर्षीच त्यांच्यावर हिस्टरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकण्याची शस्रक्रिया करावी लागली होती.
या शस्त्रक्रियेमुळे फार कमी वयात रजोनिवृत्ती लादली गेली. त्यानंतर त्यांच्या शरीरात अतिशय नाट्यमयरित्या बदल झाल्याचं त्या बीबीसीशी बोलताना सांगत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
"मला लैंगिक सुख अतिशय चांगल्या पद्धतीने अनुभवता यायचं. पण अचानक सगळं बंदच झालं. मला काही शारीरिक उत्तेजना वाटेनाशी झाली."
डॉ. नाझनीन माली या कॅलिफोर्नियात मानोसोपचार तज्ञ आणि लैंगिक समुपदेशक म्हणून काम करतात. रजोनिवृत्तीतून जाणाऱ्या अनेक महिला त्यांच्याकडे बहुतेकवेळा वेदनादायी लैंगिक संबंधाची तक्रार घेऊन येतात असं त्या सांगत होत्या.
"अनेकदा त्यांना अडकल्यासारखं वाटत असतं. त्यांना लैंगिक संबंधांची इच्छा तर असते. पण लिंगप्रवेश नको वाटतो," त्या म्हणतात.
पण योनीमार्गात जाणवणारा कोरडेपणा की कमी झालेली लैंगिक इच्छा यापैकी नेमक्या कशामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर महिलांना लैंगिक संबंध नकोसे वाटतात?
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 49 वर्षांच्या यास यांना सतत होणाऱ्या मुत्रमार्गाच्या संसर्गामुळे लैंगिक संबंध नकोसे वाटू लागले आहेत.
ही बातमीही वाचा : 'मासिक पाळीदरम्यान सेक्स? योग्य की अयोग्य?
"प्रत्येकवेळी लैंगिक संबंधांनंतर मला वेदनादायी संसर्ग होतो. त्यामुळेच लैंगिक संबंधांतला माझा रस पूर्णपणे गेला आहे," त्या बीबीसीला सांगत होत्या.
कित्येक दिवस याचा संबंध रजोनिवृत्तीशी आहे हेही डॉक्टरांना समजलं नव्हतं.
एस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे मुत्रमार्गाचा संसर्ग वारंवार होतो, असं डॉ. सेसे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"एस्ट्रोजेन म्हटलं की लोकांना मासिक पाळी किंवा प्रजनन संस्थेबद्दलचं काहीतरी वाटतं. पण एस्ट्रोजेन हे इतकं महत्त्वाचं संप्रेरक आहे की त्यामुळे केसांपासून ते त्वचेपर्यंत आपलं सगळं शरीर व्यवस्थित काम करतं."
"एस्ट्रोजेन हे योनी आणि मूत्रमार्गाभोवती ओलावा ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य करतं. पण जेव्हा या संप्रेरकाचं प्रमाण घटायला लागतं, तेव्हा या भागांतील त्वचा पातळ, कोरडी आणि नाजूक होते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो."
अनेक समाजात महिलांची लैंगिकता ही प्रजनन क्षमतेशी जोडली जाते. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर त्यांचं लैंगिक आयुष्य संपतं, असं गृहीत धरलं जातं.
डॉ. माली सांगतात की, "समाजात स्त्रीला तिच्या तारुण्यामुळे जास्त महत्त्व दिलं जात असेल तर रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर अनेक स्त्रियांना निराशा येते."
याउलट त्यांच्याकडे येणाऱ्या काही महिला रजोनिवृतीतनंतर लैंगिक सुखाचा अनुभव चांगल्या पद्धतीने घेतात.
उपलब्ध उपचार कोणते?
या सगळ्या रजोनिवृत्तीच्या त्रासांवर उपाय आहेत, असं डॉ. माली सांगतात. अनेक वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय उपचारांमुळे महिलांना चांगलं लैंगिक जीवन आणि सुख मिळवायला मदत करू शकतात.
65 वर्षांच्या हाल्डिता लंडनमध्ये राहतात. रजोनिवृत्तीचा काळ त्यांच्यासाठी इतर स्त्रियांप्रमाणे संकोचाचा किंवा दुःखाचा नव्हता.
त्या बीबीसीशी बोलताना सांगत होत्या, "मी वयाच्या 43 व्या वर्षी नवऱ्यापासून वेगळी झाले. रजोनिवृत्तीपूर्व लक्षणं मला 45-46 व्या वर्षी दिसू लागली. मी आनंदच व्यक्त केला. मला अगदी मोकळं झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर माझं लैंगिक जीवन अतिशय निरोगी आणि रसरशीत झालं."
मनात पुन्हा उत्कटतेची ज्योत पेटवायची असेल तर डॉ. माली महिलांना सगळ्यात पहिल्यांदा सेक्शुअल स्क्रिप्ट पुन्हा तपासायचा सल्ला देतात.
"लैंगिक संबंध कसे असायला हवेत आणि चांगला लैंगिक संबंध कसा असतो, याची एक कल्पना आपल्या डोक्यात असते.

फोटो स्रोत, Getty Images
पण आपलं शरीर बदलतं तेव्हा आपल्याला नव्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात आणि डोक्यातली ही संहिता बदलावी लागते. माझ्यासाठी चांगले लैंगिक संबंध म्हणजे काय हे आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःला विचारायला हवं," त्या म्हणतात.
फोरप्ले आणि लिंगप्रवेश न करता मिळणाऱ्या सुखावर भर देण्याचा सल्ला त्या देतात.
"योनीमार्गातले स्नायू बदलल्यामुळे तिथली संवेदनशीलता कमी झालेली असू शकते. त्यामुळे व्हायब्रेटर्स सारखे सेक्स टॉईस तुम्ही वापरू शकता," त्या सांगतात.
आणि तरीही रजोनिवृत्तीच्या लक्षणांचा तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होत असेल तर तुमच्या डॉक्टरची मदत घेण्याचा सल्ला डॉ. अझिझा सेसे देतात. गरज पडली तर डॉक्टर बदला पण प्रयत्न सोडू नका आणि लाजूही नका, असं त्या सांगतात.
डॉ. सेसे यांच्या म्हणण्याप्रमाणे उपचारात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीला प्राधान्य दिलं जातं. पॅच, जेल किंवा गोळ्या अशा ती वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असते.
संप्रेरकं गोळ्यांमधून थेट रक्तात प्रवेश करणं काही लोकांसाठी चांगलं नसतं. पण त्यांच्यासाठी थेट योनीमार्गाला लावायचे काही पर्याय उपलब्ध असतात.
तसंच, न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या नेडा यांना कॅन्सर असल्याने एचआरटीच्या गोळ्या घ्यायची परवानगी नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
"पण माझं लैंगिक जीवन चांगलं असावं म्हणून मी एचआरटीचा आग्रह धरला तेव्हा योनीमार्गाच्या आतल्या भागावर लावता येईल असं औषध दिलं गेलं. मला आक्रमक प्रकारातला कॅन्सर झाला म्हणून माझ्या लैंगिक जीवनाला प्राधान्य द्यायची गरज नाही, असं डॉक्टरांना वाटत होतं," त्या म्हणतात.
थेट दुकानातून घेऊन येता येतील अशा लुब्रिकंट्स आणि योनिमालिश द्रव्यांसारख्या गोष्टीही उपलब्ध आहेत, असं डॉ. अझिझा सांगतात. पण त्यात काय घटक आहेत ते तपासून घेण्याचा सल्ला त्या देतात.
पेल्विक फ्लोअर स्नायूंचा कमकुवतपणा जाणवत असेल तर त्यासाठी फिजिओथेरपी व्यायाम असतात असंही डॉ. माली सांगतात.
पण रजोनिवृत्ती आली असो वा नसो त्या सर्व महिलांना चांगली जीवनशैली जगण्याचा, नियमित व्यायाम करण्याचा, फळं आणि भाज्या खाण्याचा आणि सिगरेट दारूपासून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्ला देतात.
वजन नियंत्रणात ठेवायलाही त्या सांगतात.
स्वतःची काळजी घेण्याबद्दलची एक गोष्ट डॉ. सेसी आवर्जून सांगतात. "स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. तुमच्या आसपास असणारा तणाव कमी करण्याचा, काढून टाकण्याचा प्रयत्न करा.
आपण सूपरवुमन असल्यासारखं बायका अनेकदा खूप काही एकाचवेळी करायला जातात. मदत मागा आणि तुम्हाला मदत मागणं जड जात असेल तर निदान कुणी स्वतःहून करत असेल तर ती स्वीकारा."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











