सेक्समध्ये काय महत्त्वाचे आहे? टायमिंग, फ्रिक्वेन्सी की आणखी काही?- तज्ज्ञ काय सांगतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राफेल अबुचैबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हल्ली तुम्ही काय करता यापेक्षा तुमचा परफॉर्मन्स किंवा तुमची कामगिरी यावर तुमचं मूल्यांकन केलं जातं. हेच तत्त्व वैयक्तिक लैंगिक जीवनातही वापरलं जातं.
लैंगिक समाधान ही एक अत्यंत वैयक्तिक आणि जटील भावना आहे, जी प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवावर आणि त्याच्या नातेसंबंधांवर अवलंबून असते.
अनेक जोडप्यांच्या सेक्स लाईफबाबतच्या कल्पनाही वेगवेगळ्या असतात.
आपल्याला वारंवारता आणि संख्यात्मक निकषांच्या आधारे लैंगिक सुखाचा मापदंड ठरवण्याऐवजी, त्या अनुभवाला आणि भावनिक जोड असणे अधिक महत्त्वाचं आहे.
"लोक बहुतेकवेळा कपल थेरपीसाठी डॉक्टरांकडे जातात. कारण मिलनासंबंधी किंवा सेक्ससंबंधी, नात्यासंबंधी त्या दोघांच्याही इच्छांचा ताळमेळ कधीकधी बसत नसतो," असं डॉ. एमिली नागोस्की सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
सेक्सोलॉजिस्ट आणि नातेसंबंधांवरील दोन यशस्वी पुस्तकाच्या लेखिका डॉ. एमिली नागोस्की यांनी बीबीसी मुंडोशी याबाबत चर्चा केली.
त्यांनी सांगितल्यानुसार, शेकडो जोडप्यांशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्या लैंगिक अनुभवांचं वर्णन ऐकल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण अनेक जोडपी इतर लोक काय म्हणतील यामुळं सेक्स करतात.


लैंगिक संबंध ठेवताना येणाऱ्या अडचणी
अनेकजण तर सेक्स करताना किंवा लैंगिक संबंध ठेवताना त्यांना कशामुळं उत्तेजना मिळते, कशामुळं समाधान होतं किंवा त्याबाबतच्या इतर गोष्टींचा शोध न घेताच आपलं लैंगिक जीवन जगत असतात, असं त्या म्हणाल्या.
"ते लैंगिक संबंधाचे वर्णन कर्तव्याची भावना असल्यासारखं करतात. लैंगिक संबंध नियमांनुसार घडतात त्यांचं पालन केलं पाहिजे असं त्यांना वाटतं.
याप्रसंगी मी एक 'वेडगळ' कल्पना त्यांच्यासमोर मांडते.
जर तुमच्या नातेसंबंधात तुम्हाला सेक्स नको असेल तर तुम्ही 'अकार्यक्षम' ठरत नाही, हे मी त्यांना समजावून सांगते.
"सेक्स खेळकर असावे, आनंददायक असावे आणि ते करताना तुमच्यावर दडपण असू नये.

फोटो स्रोत, Getty Images
नागोस्की यांनी इंडियाना युनिव्हर्सिटीमधून मानवी लैंगिकतेमध्ये पी. एच.डी केली आहे. 'कम अॅज यू आर' आणि 'कम टुगेदर' या त्यांच्या दोन्ही पुस्तकांचा न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट-सेलर यादीत समावेश आहे.
त्या अमेरिकेतील लैंगिकता आणि आनंद या विषयावरील मान्यताप्राप्त तज्ज्ञांपैकी एक आहेत.
'बीबीसी मुंडो'ने (बीबीसी मुंडो ही स्पॅनिश भाषेत काम करते) याविषयी त्यांच्याशी संवाद साधला.
लोक पूर्वीपेक्षा कमी लैंगिक संबंध ठेवत आहेत, अशी चर्चा हल्ली वारंवार होताना दिसते. अनेकांनी तर याचं वर्णन ऐतिहासिक दृष्ट्या कमी प्रमाण असं केलं आहे.
लैंगिक जीवन कसं आहे हे ठरवण्याचा मार्ग
याबाबत 'कम अॅज यू आर' आणि 'कम टुगेदर' या दोन्ही बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका नागोस्की सांगतात, "खरं तर, विविध अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीतून लैंगिक वारंवारता किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत."
"परंतु, मी मांडलेल्या मुख्य कल्पनांपैकी एक म्हणजे, आपण किती वेळा लैंगिक संबंध ठेवतो हे मोजणं हे आपलं लैंगिक जीवन चांगलं चाललं आहे किंवा नाही हे निश्चित करण्याचा योग्य मार्ग नाही."
"कल्पना करा, एक जोडपं वारंवार शारीरिक संबंध ठेवतं, पण दोघांपैकी एक जण जर त्याचा आनंदच घेत नसेल तर तुम्ही अशा परिस्थितीला प्राधान्य द्याल का किंवा असं एक जोडपं जे नियमितपणे शारीरिक संबंध ठेवत नाही पण जेव्हा ते करतात, तेव्हा दोघंही त्याचा खूप आनंद घेतात?"
"दुसरं प्रकरण अधिक योग्य आहे. म्हणूनच आपल्याला लैंगिक सुखाच्या संतुष्टतेचा किंवा समाधानाचा मुख्य निर्देशक किंवा बिंदू म्हणून वारंवारतेचा वापर करू नये."

फोटो स्रोत, Getty Images
"असा समज आहे की यशस्वी लैंगिक जीवनासाठी ठराविक वेळा लैंगिक संबंध किंवा सुखाची अनुभूती (ऑर्गेझम) होणं आवश्यक आहे.
तुम्हाला असं वाटतं का की यामुळं जोडप्यांवर खूप दबाव येतो आणि परिणामी त्यांची सेक्स करण्याची इच्छा कमी होते?" असं विचारलं असता त्या सांगतात,
"होय, लोक अशा गोष्टी मोजण्याचा मार्ग शोधत आहेत, जे वास्तवात व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणजे व्यक्तीनुसार त्याचं प्रमाण वेगळं असू शकतं. सेक्स किती वेळा करतो हे मोजणं हे त्या अनुभवांची गुणवत्ता किंवा आनंद मोजण्यापेक्षा सोपं आहे."
पुढं त्या सांगतात, "याव्यतिरिक्त, तुम्ही किती वेळा सेक्स केला पाहिजे किंवा किती ऑर्गॅझम पूर्ण करणं आवश्यक आहे, याविषयी अनेक सांस्कृतिक समजुती आहेत."
मला एका जोडप्याचं प्रकरण माहीत आहे. त्यांनी आठवड्यातील एका विशिष्ट वारंवारतेनुसार लैंगिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण हीच सरासरी योग्य आहे असं त्यांनी कुठंतरी वाचलं होतं. असं केल्यानं आम्ही प्रयत्न केला नव्हता असं कोणी म्हणूच शकत नाही, असं त्यांना वाटत होतं.
समस्या ही होती की, त्यांनी हे काम वास्तविक इच्छेपेक्षा जबाबदारी म्हणून केलं. त्यांनी याची पुनरावृत्ती केली तरी आनंदात काहीच फरक पडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अखेरीस महिला जोडीदार नाराज झाली आणि त्यांचे नातेसंबंध बिघडले.
यावरुन लक्षात आलं की, हे केवळ प्रमाणाबद्दल नाही तर यात सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी ते किती समाधानकारक आहे, हेही खूप महत्त्वाचं आहे.
चांगले लैंगिक संबंध असलेल्या जोडप्यांची वैशिष्ट्ये
"तुम्ही म्हटलं आहे की, सेक्स हा आनंददायक आणि खेळकर असावा. एखादं काम पूर्ण करायचं आहे म्हणून त्याकडं पाहू नका. यातून अधिक मुक्त आणि खरा आनंद मिळवणारा दृष्टिकोन कसा मिळवाल?" असं विचारलं असता त्या सांगतात,
"मला असं आढळून आलं की, ज्या जोडप्यांमध्ये सदृढ लैंगिक संबंध असतात त्यांच्यात तीन वैशिष्ट्ये समान असतात.
पहिलं म्हणजे ते एकमेकांना मनापासून पसंत करतात. एकमेकांचा आदर करतात आणि एकमेकांच्या सहवासात आनंदी असतात, हे स्पष्ट दिसतं. आवड आणि आदराची भूमिका निभावल्यानं सेक्सची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढते."
"दुसरं म्हणजे ते सेक्सला किंवा लैंगिक संबंधांना प्राधान्य देतात. हे समजून घेतात की यामुळं त्यांच्या नात्यात काही मौल्यवान आणि अनोख्या योगदानाची भर पडते.
"भले त्यांच्यात अॅक्टिविटीचे कमी क्षण येत असले तरी, ते नेहमी पुन्हा एकदा जोडण्याचा किंवा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांनी त्याचं महत्त्व ओळखलेलं असतं." असंही त्या सांगतात.
पुढं त्या सांगतात, "तिसरं, जे मिळवणं मला नेहमीच सर्वात कठीण वाटतं, ते म्हणजे संस्कृती, कुटुंब किंवा धर्मातून सेक्स कसं असलं पाहिजे याविषयीच्या नियमांपासून मुक्त होणं आणि त्यांच्यासाठी खरोखर काय काम करतं हे शोधण्याचं धाडस करणं."
"अनेक वेळा याचा अर्थ अत्यंत मुळाशी जोडलेल्या श्रद्धांवर पुन्हा विचार करणं आणि आपली इच्छा आणि मर्यादांशी संवाद साधण्यास शिकणं असा होतो," असंही त्यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जोडीदारासोबत संवाद साधणं आवश्यक आहे हे माहीत असूनही असं दिसतं की लैंगिकतेबद्दल बोलणं खूप कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं? असं विचारलं असता त्या सांगतात, "आपल्यापैकी बरेच जण या कल्पनेनं मोठे झाले आहेत की आपल्याला यावर बोलायला लागलं, तर याचा अर्थ काहीतरी चुकत आहे.
"पण जेव्हा तुम्ही अशा जोडप्यांचं विश्लेषण करता, जे त्यांच्या सेक्स जीवनाचं वर्णन अप्रतिम म्हणून करतात, तेव्हा तुम्हाला दिसतं की ते या विषयावर पूर्णपणे नैसर्गिकपणे बोलतात."
पुढं त्या सांगतात, "जणू काही ते एकत्रित केल्या जाणाऱ्या एका छंदाबद्दल बोलत आहेत. त्यांनी काय काम केलं आहे, हे लक्षात ठेवायला त्यांना आवडतं. पुढच्या वेळी काय करायचं यावर ते विचार करतात.
"परंतु, दोन अतिशय सामान्य भीती आहेत: एक, आपल्या जोडीदाराला काहीतरी असं सांगणे जे त्याला धक्कादायक वाटेल आणि नंतर तो आपल्याला त्या प्रकारे पाहू शकणार नाही; आणि दुसरं, त्यांच्या भावना दुखावणं."
त्यांच्या दृष्टीनं संवाद खुप महत्वाचा आहे. त्या सांगतात, "जर तुम्ही जे शोधत आहात ते अधिक मोठं असल्यास उलट परिणाम घडू शकेल असा विचार करून भीती वाटणं स्वाभाविक आहे. म्हणूनच मी 'संभाषणाबद्दलचं संभाषण' असं म्हणते."
पुढं त्या सांगतात, "त्यापासून सुरुवात करण्याची शिफारस करते, हे कबूल करणं की तुम्हाला तुमचं लैंगिक जीवन सुधारायचं आहे आणि त्याबद्दल कसं बोलावं हे कोणीही तुम्हाला शिकवलं नसलं तरीही, तुम्हाला ते काळजीपूर्वक आणि आदरानं करायचं आहे."
अशा प्रकारे दोघांनीही एकमेकांशी सहानुभूतीपूर्ण आणि प्रभावी पद्धतीनं संवाद कसा साधावा यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
लैंगिक संबंधांबद्दलच्या संवादाबाबत समस्या
लैंगिक संबंधांबद्दलच्या या संवादाच्या समस्या केवळ विषमलिंगी जोडप्यांसाठीच असतात का किंवा त्या इतर प्रकारच्या जोडप्यांमध्ये देखील दिसतात यावर देखील नागोस्की यांनी भाष्य केलं आहे.
त्या सांगतात, "बऱ्याच प्रमाणात, LGBTQ लोकांना त्यांच्या ओळखीविषयी आधी कोणती संस्कृती त्यांच्यावर लादली गेली असा प्रश्न पडला आहे.
"नियम मोडून त्यांना आधीच्या नियमांना आव्हान देण्याची आणि त्यांच्याशी खरोखर काय जुळतं ते शोधण्याची एक सवय लागलेली आहे."
पुढं त्या सांगतात, "शिवाय, जर ते समान लिंगाचे असतील तर ते कधीकधी पुरुष आणि महिलांचे ज्या पारंपारिक पद्धतीनं पालनपोषण केलं जातं त्या मार्गाशी संबंधित काही संवादात्मक अडथळे टाळता येतात."
त्यांना विषमलिंगी जोडप्यांची काळजी वाटते. कारण त्यांचे लैंगिक संबंध जास्त असतात. परंतु, ते त्या अनुभवाचा आनंद कमी घेतात असं नागोस्की यांना वाटतं.
"ते बऱ्याचदा कठोर नियमांचे पालन करतात. त्यांना काय आवडतं याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत आणि वास्तविक इच्छेपेक्षा बंधन किंवा जबाबदारी किंवा दिनचर्येमुळे सेक्स करतात."
अशा समस्या अनुभवत असलेल्या आणि कुठून सुरुवात करावी हे माहीत नसलेल्या जोडप्यांसाठी तुम्ही पहिलं पाऊल कोणतं उचलावं यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.
"सेक्स थेरपीसाठी जाणं खूप उपयुक्त ठरू शकतं. अनेकदा, फक्त काही सत्रांमध्ये, थेरपिस्ट त्यांना संवाद कौशल्यं शिकवतो, ज्याचा त्यांनी यापूर्वी कधीही सराव केलेला नसतो आणि त्यामुळं खूप फरक पडतो.
"मी लैंगिकतेवरील पुस्तकं वाचण्याचा सल्ला देते. वैयक्तिकरीत्या मला माझ्या पुस्तकांच्या शेवटी मुख्य मुद्द्यांचा संक्षिप्त सारांश समाविष्ट करणं आवडतं."

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढं सांगतात, "कारण कधी कधी फक्त तो सारांश जोडीदाराला दाखवणं संवाद खुला करण्यासाठी पुरेसं असतं.
"मी हे वाचले आणि मला ते मनोरंजक वाटलं, तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं काय मत आहे?"
अशा प्रकारच्या संभाषणामुळं दोघांची भीती कमी होते आणि सेक्स हा टॅबू किंवा निषिद्ध विषय म्हणून पाहणं थांबवता येतं असं नागोस्की यांना वाटतं.
आनंदाबद्दल बोलताना वेदनांवर उपचार करण्यासाठी नॉन-ओपिओइड औषधाच्या मंजुरीचा अलीकडेच उल्लेख करण्यात आला. तज्ज्ञांनी नमूद केलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे वेदनांसारख्या व्यक्तिनिष्ठ गोष्टींचं मोजमाप करणं कठीण आहे. या इतक्या व्यक्तिनिष्ठ संवेदनांबाबत देखील नागोस्की यांनी चर्चा केली आहे.
त्या सांगतात, "वेदना आणि आनंद यावर मेंदूमध्ये प्रक्रिया केली जाते. हे केवळ संप्रेरकांच्या स्तरावर घडत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही सिंहापासून पळून जाताना कागदाने तुमचा हात कापला गेला तर तुमचा मेंदू तुमच्या हातातील वेदनांकडे दुर्लक्ष करू शकतो. कारण तो सिंहाचा धोका अधिक धोकादायक मानतो आणि सुरक्षित होईपर्यंत तो वेदना नाकारु शकतो.आनंदातही असंच घडतं. मेंदू दिलेल्या संदर्भात संवेदनांचा कसा अर्थ लावतो यावर ते अवलंबून असतं."
"त्याचप्रमाणं, जेव्हा एखाद्या महिलेचा जन्म अत्यंत क्लेशकारक झाला असेल आणि शारीरिकरीत्या बरं होऊनही तिचे लैंगिक जीवन पुन्हा सुरू करताना वेदना जाणवत असेल, तर तेव्हा असं होऊ शकतं की तिची मज्जासंस्था अजूनही "अलर्ट मोड" मध्ये आहे, ती उत्तेजनेला एक धोक्याची भावना समजू शकते." असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळं मेंदूला संवेदना सुरक्षितपणे अनुभवण्यासाठी पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी आणि भावनिक कार्याचे महत्त्व आहे, असं त्या सांगतात.
पुढे त्या सांगतात, "मी पुन्हा स्पष्ट करते की सेक्स कधीही वेदनादायी असू नये; वेदना असल्यास, याबाबत तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे."
लैंगिक जीवन कसं सुधारायचं?
ज्यांना त्यांचं सेक्स लाइफ किंवा लैंगिक जीवन सुधारायचं आहे त्यांच्यासाठी काही सल्ले त्यांनी दिले आहेत.
"स्वतःला समजून घ्या आणि काय आवडतं आणि काय नाही ते शोधा. तसेच तुमच्या जोडीदारालाही तेच करायला सांगा.
प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक शरीर वेळेसोबत बदलतं. आधी जे केलं होतं, कदाचित आता ते करता येणार नाही."
पुढं त्या सांगतात, "स्पष्टपणे संवाद करा आणि असं नातं निर्माण करा ज्यात सुरक्षा जाणवेल. जर तुमचा मेंदू एखाद्या धोक्याचा अर्थ लावत असेल तर आनंद मिळवणं कठीण होईल. शेवटी, मदतीची मागणी करण्यास किंवा माहिती मिळवण्यासाठी अजिबात संकोच करू नका."
समाधानकारक सेक्स म्हणजे जेथे दोन्ही जोडीदार सारखेच आनंदी असतात, असं लेखिकेला वाटतं.
वारंवारतेच्या पलीकडे अनुभव हाच खरोखर आनंददायी आणि समृद्ध करणारा असतो हीच महत्त्वाची गोष्ट आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











