पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईडवरून अमेरिकेत काय वाद सुरू आहे? याबाबतचं सत्य काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॅकी वेकफिल्ड
- Role, बीबीसी ग्लोबल डिसइन्फॉर्मेशन युनिट
दातांच्या आरोग्यासाठी अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचा वापर केला जातो. मात्र, आता अमेरिकेत सार्वजनिक पाणीपुरवठ्यातून फ्लोराईडचा वापर बंद करण्याचा मुद्दा मांडला जातो आहे.
अमेरिकेच्या आरोग्य सचिवांनीच केलेल्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे हा विषय आता ऐरणीवर आला आहे.
विविध पातळ्यांवर याबाबत चर्चा होते आहे, चुकीची माहितीदेखील पसरवली जाते आहे. यासंदर्भातील निर्णय अमेरिकन नागरिकांच्या दातांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणार आहे. या विषयाबद्दल जाणून घेऊया.
पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईड्सवर बंदी घालणारं युटाह हे अमेरिकेतील पहिलं राज्य ठरलं आहे. यासंदर्भात मुलांच्या आणि प्रौढांच्या दातांवर होणाऱ्या गंभीर परिणामाबद्दल डेंटिस्टनी (दंतवैज्ञ) दिलेल्या इशाराकडे युटाह राज्यानं दुर्लक्ष केलं आहे.
युटाहनं फ्लोराईड्सवर घातलेली बंदी ही फक्त त्या राज्यापुरतीच नसून यामुळे रिपब्लिकन पक्षाचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये असंच करण्याची लाट येईल अशी भीती अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटते आहे.
काही प्रदेशांमध्ये, खडक, माती यामधून फ्लोराईड नैसर्गिकरित्या पाण्यात शिरतं. जगभरातील 20 हून अधिक देशांमध्ये कित्येक दशकांपासून पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक पुरवठ्यात फ्लोराईडचा समावेश केला जातो आहे.
ज्या प्रदेशात लोक मोठ्या प्रमाणात साखरेचं सेवन करतात, मात्र जिथे डेंटिस्टचा तुटवडा आहे, अशा भागात पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचा समावेश करणं हे प्रभावी आरोग्य धोरण आहे.
कारण त्यामुळे दात किडणं आणि दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यासारख्या दातांच्या समस्या रोखण्यास मदत होते, असं सिद्ध झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पिण्याच्या पाण्यात शिफारस केलेल्या प्रमाणात फ्लोराईड मिसळल्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो किंवा त्याची हानी होते असं दाखवणारा कोणताही उच्च दर्जाचा वैज्ञानिक पुरावा नाही.
मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच नियुक्ती केलेले आरोग्य सचिव रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर, यांच्यासारख्या उजव्या विचासरणीच्या राजकारण्यांमुळे फ्लोराईड आरोग्याला अपायकारक असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर, लसींसह आरोग्यासंदर्भातील त्यांच्या वादग्रस्त मतांसाठी ओळखले जातात. पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड मिसळण्याविरोधात त्यांनी बराच काळ मोहीम चालवली आहे.
7 एप्रिलला केनेडी म्हणाले होते की, सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी)ला देशभरात पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड मिसळण्याची शिफारस करणं, थांबवण्यास सांगण्याची त्यांची योजना आहे.
"युटाहचे अधिकारी अमेरिकेला पुन्हा निरोगी बनवण्यात आघाडीवर आहेत", असं म्हणत त्यांनी युटाहच्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं.
जर फ्लोराईडबद्दल अविश्वास आणखी वाढला तर या प्रकारच्या पावलांचा जगभरात परिणाम होईल, अशी जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ज्ञांना चिंता वाटते आहे.
डेंटिस्ट फ्लोराईडच्या वापराची शिफारस का करतात?
डॉ. ब्रेंट लार्सन युटाह डेंटिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. 2003 मध्ये युटाह राज्यानं पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड मिसळण्यास सुरूवात करण्यापूर्वी डॉ. ब्रेट दंतचिकित्सा करत होते म्हणजे डेंटिस्ट म्हणून काम करत होते.
"माझ्याकडे मुलं यायची आणि त्यांचे चार, सहा, आठ दात किडलेले असत, त्यात पोकळ्या असत. मात्र पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड मिसळण्यास सुरूवात केल्यास दातांच्या समस्या दूर झाल्या," असं डॉ. ब्रेंट सांगतात.
युटाह राज्यात दात किडणं रोखण्यासाठी आणि दातांच्या पोकळ्या भरून काढण्यासाठी 100 डॉलर्स ते 1000 डॉलर्सपर्यंतचा खर्च येऊ शकतो. अनेक कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नाही, असं ते पुढे म्हणतात.

फोटो स्रोत, John Fairhall/BBC
2015 मध्ये न्यूयॉर्कमधील बफेलोमधील अधिकाऱ्यांनी लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता शहराच्या पाणीपुरवठ्यात फ्लोराईड टाकणं थांबवलं.
त्यामुळे शहरातील दातांच्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या की, पालकांनी शहरातील प्रशासनावर खटला दाखल केला. त्यानंतर 2024 मध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड टाकण्यास पुन्हा सुरूवात झाली.
युकेतील 2017 ते 2020 दरम्यानच्या डेटावरून असं दिसतं की जिथे पाणी पुरवठ्यात फ्लोराईड टाकण्याची योजना सुरू होती, तिथे 20 टक्के सर्वात वंचित समुदायांमध्ये दात किडण्याची समस्या 25 टक्के कमी होती.
फ्लोराईडबद्दलच्या चुकीच्या माहितीचा गुंतागुंतीचा इतिहास
फ्लोराईडचा वापर पाण्यात सुरू झाला तेव्हापासूनच त्याच्याबद्दल चुकीची माहिती किंवा गैरसमज आहेत.
1945 मध्ये अमेरिकेतील मिशिगन राज्यातील ग्रँड रॅपिड्स हे पाणी पुरवठ्यात फ्लोराईडचा वापर करणारं पहिलं शहर बनलं.
अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेकडून करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, त्यानंतर फक्त 11 वर्षांत ग्रँड रॅपिस्टस शहरातील मुलांमधील दात किडण्याच्या, दातात पोकळी निर्माण होण्याच्या समस्या 60 टक्क्यांनी घटल्या.
ग्रँड रॅपिस्टसमधील दातांच्या समस्येच्या बाबतीत झालेल्या या सुधारणामुळे शेजारच्या विस्कॉन्सिन राज्यातील दंत आरोग्य कार्यालयानं राज्यामध्ये फ्लोराईड असलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली.
मात्र, 1949 मध्ये, स्टिव्हन्स पॉईंट्स शहरात एका मोहिमेमुळे फ्लोराईडचा वापर बंद करण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
फ्लोराईडला विरोध करणाऱ्या गटांचं म्हणणं होतं की, फ्लोराईड हे एक विष आणि पर्यावरण प्रदूषित करणारा घटक आहे. देशभरातील मुक्त व्यवस्थेचे समर्थक, पर्यावरणवादी आणि लसीकरण विरोधी गटांनी देखील फ्लोराईडला विरोध करणाऱ्यांना साथ दिली.
या सर्वांनी हस्तक्षेप करण्यात वैयक्तिक निवडीचा अभाव आणि सरकारी वैज्ञानिकांचे हेतू यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फ्लोराईडला कट कारस्थानांच्या सिद्धांतांच्या केंद्रस्थानी आणलं.
हे विषय बराच काळ रेंगाळत राहिले. तेव्हापासून सार्वजनिक आरोग्यात हस्तक्षेप करण्याच्या विरोधात असणाऱ्या गटांसाठी फ्लोराईडला विरोध करणं हा एक ट्रेडमार्क झाला आहे.
या वर्षीच्या फ्लोराईडवरील बंदीमागे काय आहे?
आरोग्य सचिव रॉबर्ट एफ केनेडी हे आरोग्य आणि विज्ञान संबंधित चुकीच्या माहितीचा वादग्रस्त प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यात लसींचा संबंध ऑटिझमशी जोडणं आणि एड्सचा संबंध एचआयव्हीऐवजी टॉक्सिन्स आणि अंमली पदार्थांच्या वापराशी असल्याची खोटी माहिती देण्याचाही समावेश आहे.
केनेडी यांचे एक्स या सोशल मीडियावर 55 लाख फॉलोअर्स आहेत.
त्यांनी नोव्हेंबर महिन्यात एक्सवर पोस्ट केली होती की, फ्लोराईड हा एक औद्योगिक कचरा असून त्याचा संबंध संधिवात, हाडांचे फ्रॅक्चर, हाडांचा कर्करोग, बुद्ध्यांक कमी होणं, न्युरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आणि थायरॉईड सारख्या आजारांशी आहे.
त्यासाठी ते डझनभर अभ्यासांच्या विश्लेषणाचा संदर्भ देत होते.
प्राध्यापक आयव्हर चेस्टनट हे कार्डिफ विद्यापीठात दातांच्या सार्वजनिक आरोग्याचे सल्लागार आहेत. त्यांनी मात्र केनेडी यांनी केलेलं विश्लेषण कमी दर्जाचं असल्याचं म्हटलं.
प्राध्यापक चेस्टनट यांनी नमूद केलं की ज्या अभ्यासांचं विश्लेषण करण्यात आलं आहे, ते अभ्यास नैसर्गिकरित्या फ्लोराईडची उच्च पातळी असणाऱ्या भागात करण्यात आले होते.
त्या भागातील फ्लोराईडची पातळी सार्वजनिक पाणी पुरवठ्यामध्ये शिफारस करण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा खूपच अधिक होती.

फोटो स्रोत, Getty Images
स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये फ्लोराईडचं पाण्यातील प्रमाण अमेरिकेतील पातळीइतकंच आहे. तिथे करण्यात आलेल्या इतर अभ्यासांमध्ये, फ्लोराईडचा कोणताही संबंध बुद्ध्यांक कमी होण्याशी दिसून आला नाही.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीसह इतर पुनरावलोकनांमध्ये एकमत आहे की पाण्यातील फ्लोराईड आणि कर्करोग यांचा एकमेकांशी संबंध असल्याचा कोणताही भक्कम पुरावा नाही.
विशेषकरून, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी)नं म्हटलं आहे की, त्यांच्या तज्ज्ञांना सार्वजनिक पाणी पुरवठ्यातील फ्लोराईडचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दाखवणारे "कोणतेही विश्वासार्ह वैज्ञानिक पुरावे सापडलेले नाहीत."
आरोग्यासंदर्भात वैयक्तिक निवड असावी की, सार्वजनिक आरोग्याचं धोरण?
युटाहमधील लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे की, ते आरोग्यासंदर्भातील निर्णयांमध्ये वैयक्तिक निवडीचा आग्रह धरत आहेत.
पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड आधीच मिसळण्याऐवजी ते औषधांच्या दुकानांमध्ये (फार्मसी) फ्लोराईडच्या गोळ्या विकण्याचा सल्ला देत आहेत.
प्राध्यापक चेस्टनट यांना मात्र, ज्या मुलांना फ्लोराईडची आवश्यकता आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल की नाही याबाबत शंका आहे.
"फ्लोराईडच्या गोळ्या कोण विकत घेणार आहे? जे पालक समाजातील आर्थिकदृष्ट्या सर्वात वरच्या वर्गातील आहेत तेच या गोळ्या विकत घेतील," असं प्राध्यापक चेस्टनट म्हणतात.
युटाह डेंटिस्ट असोसिएशनचे डॉ. लार्सनदेखील याच्याशी सहमत आहेत. ते म्हणतात की, फ्लोराईडच्या गोळ्या विकत घेण्यासाठी दरवर्षी 300 डॉलर ते 400 डॉलरचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या गोळ्या विकत घेता येणार नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प यांच्या काळात वैयक्तिक निवडीभोवतीचा वादविवाद अमेरिकन मतदारांसाठीच्या अजेंड्यात सर्वात वरच्या स्थानी आला आहे.
केनेडी यांनी यापूर्वी म्हटलं आहे की, या वर्षाच्या सुरुवातीला टेक्सासमध्ये गोवरचा उद्रेक झाला होता. त्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता. 2015 नंतर अमेरिकेत पहिल्यांदाच गोवरमुळे मृत्यू झाला होता.
गोवरच्या या उद्रेकाला तोंड देतानादेखील गोवरची लस घ्यायची की नाही हा "वैयक्तिक निवडीचा" भाग असला पाहिजे.
प्राध्यापक लॉरेन्स गॉस्टिन जागतिक आरोग्य संघटनेच्या, राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य कायद्यावरील सहयोग केंद्राचे संचालक आहेत. ते म्हणतात की "सार्वजनिक आरोग्याचा उद्देश संपूर्ण लोकसंख्येचं रक्षण करणं हा आहे."
"हा काही वैयक्तिक आरोग्यविषयक निर्णय नाही. तर ते व्यापक लोकसंख्येचं आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी आखण्यात आलेलं धोरण आहे."

फोटो स्रोत, Getty Images
आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेसारख्या अनेक खंडांमध्ये फ्लोराईडबद्दलची चुकीची माहिती एक्स या सोशल मीडियावरून वाढते आहे.
ब्रांका ऑलिव्हेरा या डेंटिस्ट आहेत आणि रिओ डी जानेरो स्टेट युनिव्हर्सिटीत सार्वजनिक आरोग्याच्या प्राध्यापक आहेत.
त्या म्हणतात की "या प्रदेशातील फ्लोराईडच्या वापराचा प्रभावीपणा निर्विवाद असला", तरी त्या सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असणाऱ्या ब्राझिलियन डेंटिस्टना, केनेडी यांच्या फ्लोराईडविरोधी दाव्यांना समर्थन देण्यासाठी कॉमेंट्स शेअर करताना पाहत आहेत.
प्राध्यापक गॉस्टिन जागतिक आरोग्य संघटनेत आहेत. त्यांना वाटतं की युटाह राज्यानं फ्लोराईडवर घातलेल्या बंदीमुळे "लोकांना गोंधळात टाकणारा संदेश जाईल" आणि "त्याचे परिणाम जगाच्या अनेक भागात होऊ शकतात."
"ही धोकादायक बाब आहे, कारण सार्वजनिक आरोग्यासाठी विश्वास आवश्यक आहे," असं ते पुढे म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











