कोणतं पाणी प्यायचं, उकळलेलं की फिल्टर केलेलं? RO फिल्टरचं पाणी किती चांगलं?

फोटो स्रोत, Getty Images
पुण्यामध्ये गियान बारे सिंड्रोमचा प्रसार पिण्याच्या पाण्याद्वारे झाल्याचं समोर आलंय. घरांपर्यंत नळाद्वारे पुरवलं जाणारं पाणी, उकळवलेलं पाणी, फिल्टरचं RO पाणी यापैकी पिण्यासाठी कोणतं पाणी सुरक्षित आहे? यातल्या कोणत्या पाण्याची शुद्धता जास्त असते? पाण्यातल्या पोषणमूल्यांच्या दृष्टीने कोणतं पाणी पिणं चांगलं?
या लेखातून समजून घेऊयात.
पाणी म्हणजे H2O. हायड्रोजनचे 2 अणु आणि ऑक्सिजनचा 1 अणु मिळून तयार होतो पाण्याचा एक रेणु. असे लाखो रेणु एकत्र येऊन पाण्याचा थेंब तयार होतो.
71% पृथ्वी पाण्याने व्यापली आहे, आणि यापैकी 96.5% समुद्र आहेत. पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी फक्त 1% पाणी पिण्यायोग्य आहे.
तर मानवी शरीरात जवळपास 60-70% पाणीच असतं. शरीरक्रियांमध्ये पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. म्हणूनच आपण कोणतं पाणी पितोय हे देखील महत्त्वाचं ठरतं.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता
पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी आणि ते पिण्यासाठी योग्य आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने जवळपास 60 चाचण्या ठरवल्या आहेत. त्यांना इंडियन स्टँडर्ड्स ड्रिंकिंग वॉटर स्पेसिफिकेशन्स-10500 म्हणतात.
पाण्यातली आम्लता किंवा ॲसॅडिटी म्हणजे पिण्याच्या पाण्याचा pH . हा 6.5 - 8.5 च्या दरम्यान असावा, असं WHO आणि BIS ने म्हटलंय.
पाण्यामध्ये विविध क्षार आणि पोषणमूल्यं असतात. ती नेमकी किती आहेत हे मोजण्यासाठी TDS चाचणी केली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
पाण्याचा TDS - Total Concentration of Dissolved Substances - 500 mg/L पेक्षा जास्त असू नये आणि 100mg पेक्षा कमीही असू नये असं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने म्हटलंय.
जर त्या पाण्याचा टीडीएस 100 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ त्यात शरीराला आवश्यक क्षार नाहीत. पाण्याचा टीडीएस 500 पेक्षा जास्त असेल तर त्या पाण्याला 'Hard water' - कठीण पाणी म्हटलं जातं. हे पाणी पिण्यायोग्य नसतं.
पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती असावं यासाठीही BIS ने प्रमाण ठरवलं आहे.
1 लीटर पाण्यातलं क्षारांचं प्रमाण
- बायकार्बोनेट्स 200mg
- कॅल्शियम 75 mg
- मॅग्नेशियम 30mg
- नायट्रेट 45mg
- आर्सेनिक 0.01mg
- कॉपर 0.05mg
- क्लोराईड्स 250mg
- सल्फेट 200mg
- फ्लोराईड 1mg
- आयर्न 0.3mg
- मर्क्युरी 0.01mg
- झिंक 5mg
पाण्यात जास्त क्षार असण्याचे दुष्परिणाम
पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण वाढलं तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात.
- फ्लोराइड 1 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असेल तर डेंटल फ्लोरोसिस होण्याची शक्यता असते.
- सोडियम जास्त असल्यास ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो.
- शेतांमधल्या खतांमधलं नायट्रेट पिण्याच्या पाण्यातून शरीरात गेलं तर रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, डोळ्यांची बुब्बळं निळी पडू शकतात. याला 'ब्लू बेबी सिंड्रोम' म्हणतात. किडनीचे विकार होऊ शकतात.
- पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण जास्त असेल तर त्वचेवर पांढरे चट्टे पडतात.
- पाण्यात कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर त्याचा हाडांवर परिणाम होऊ शकतो.
- एकूणच TDS कमी असणारं पाणी प्यायल्यास त्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
पाण्याचे प्रकार आणि त्याचे फायदे-तोटे
नळाचं पाणी
तलाव, नदी, विहीरीतून पाईपलाईनद्वारे आपल्या घरापर्यंत येणारं पाणी हे क्लोरिनेशन करून म्हणजे क्लोरिन मिसळून किंवा मग ओझोन प्रक्रिया करून मग पुरवलं जातं. पाण्याची शुद्धता वाढवण्यासाठी या प्रक्रिया केल्या जातात.
मग यात धोके काय? तर या प्रक्रियेमुळे सगळे बॅक्टेरिया आणि व्हायरस म्हणजे विषाणू - जीवाणू मारले जात नाहीत. त्यामुळे त्यातून इन्फेक्शन्स पसरण्याची शक्यता असते.
शिवाय अनेकदा पाईपलाईन ही वेगवेगळ्या अस्वच्छ भागांमधून गेलेली असते, ती फुटली - गळती झाली, तर पाणी contaminate - दूषित होतं. आणि ते धोकादायक असतं.
नदी, विहीर, बोअरवेलचं पाणी
अनेकदा गावांत, शहरात विहीरीचं वा बोअरिंगचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "विहीरीचं वा बोअरिंगचं पाणी जमिनीतून येत असतं.
त्याच गावातून, त्याच बाजूने नाले वा ड्रेनेज लाईन्स वाहत असतात. त्यामुळे तिथले जीवाणू - विषाणू विहीरीच्या पाण्यात अधिक प्रमाणात जाऊ शकतात.
त्यामुळे विहीरीचं पाणी दूषित तर होतंच, पण त्याचबरोबर जमिनीतून येणारे अनेक प्रकारचे क्षार, रसायनं ही सुद्धा त्यामध्ये मिसळतात. त्यामुळे अनेक प्रकारचे त्रास वा विकार होऊ शकतात. पोटाचेही आजार होऊ शकतात.
"त्यामुळे विहीरीचं पाणी वापरणाऱ्या व्यक्तींनी ते उकळूनच वापरावं. ते परस्पर वापरू नये."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
गाळून उकळवलेलं पाणी
पाणी गाळल्याने यातला कचरा जातो पण त्यातले विषाणू - रसायनं गाळली जाऊ शकत नाहीत. हे पाणी उकळलं, म्हणजे 100 डिग्रीच्या Boiling Point पर्यंत नेलं तर त्यातले बहुसंख्य बॅक्टेरिया नष्ट होतात.
पण काही व्हायरस नष्ट होत नाहीत. अमिबासारखे एकपेशीय जीव नष्ट होत नाहीत. ते उकळलेल्या पाण्यातही टिकून राहतात. यातूनच उलट्या, जुलाब, पोटाचे विकार होऊ शकतात.
RO - UV - Activated Carbon फिल्टरचं पाणी
जाहिरातींमधून हे शब्द सतत ऐकू येतात.
RO म्हणजे Reverse Osmosis. या प्रक्रियेत पाण्यातले बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, टॉक्सिन्स नष्ट होतात. पण त्याचबरोबर पाण्यातले क्षारांसारखे पोषक घटकही काढून टाकले जातात.
Activated Carbon ही प्रक्रिया पाण्यातली Organic Chemicals काढण्यासाठी वापरली जाते. पाण्याचा रंग, चव यावर परिणाम करणारे प्रदूषक, रासायनिक खतांचे अंश, धोकादायक रसायनं हा अॅक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर गाळतो. पण याद्वारे पाण्यातले धोकादायक मायक्रोबॅक्टिरेया मारले जात नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
UV प्रक्रियेमध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशनद्वारे मायक्रोबॅक्टेरिया मारले जातात पण पाण्यातली रासायनिक प्रदूषकं काढली जात नाहीत.
या प्रत्येक प्रक्रियेमध्ये काही ना काही मर्यादा असल्याने अनेक फिल्टर्स RO - Activated Carbon आणि मग UV अशा तीनही प्रक्रिया करणारे असतात.
हे पाणी शुद्ध असतं, पण यात काहीच पोषणमूल्यं नसतात. शिवाय अशा प्रकारच्या फिल्टर्समधून फेकून देण्यात येणाऱ्या पिण्याजोग्या नसलेल्या पाण्याचं प्रमाणही अधिक असतं. आणि तुम्ही वापरत असलेल्या फिल्टर्सची वेळोवेळी स्वच्छता Maintenance होणं महत्त्वाचं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल बोलताना डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "अनेक घरांमध्ये RO चं पाणी वापरलं जातं. किंवा अनेक ठिकाणी कमर्शियल पद्धतीने विकलं जाणारं RO चं पाणी मोठ्या बाटल्यांमध्ये भरून वापरलं जातं.
RO फिल्टरमध्ये पाणी जास्तीतजास्त शुद्ध येतं. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. पण यामधूनही काही विषाणू येऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RO मुळे पाण्यामधले शरीराला अत्यावश्यक असे वेगवेगळ्या प्रकारचे क्षार, खनिजं पाण्यातून नष्ट होतात.
त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक क्षार कमी पडल्याने हातापायाला वाम येणं, चालण्यातली शक्ती कमी होणं, बधीरपणा वाटणं, चक्कर येणं असे धोके उद्भवू शकतात."
बाटलीबंद पाणी
RO आणि इतर फिल्टरेशन प्रक्रिया केलेलं पाणी बाटलीत भरून विकलं जातं. अनेकदा या पाण्यामध्ये 'added minerals' म्हणजे अधिकचे क्षार असल्याचंही या पाण्यावर लिहीलेलं असतं. यामुळे बाटलीबंद पाण्याची चव ब्रँडनुसार वेगवेगळी असते.
पण असं पाणी विकत घेताना त्यावर कुठे प्रक्रिया करण्यात आलीय, कधी करण्यात आलीय, क्षारांचं प्रमाण किती आहे, पाण्याच्या बाटलीचं प्लास्टिक कसं आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि बाटलीबंद पाण्याला Expiry Date असते, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
डिस्टील्ड वॉटर
यामध्ये पाणी उकळवलं जातं आणि त्याची वाफ गोळा करून ती थिजल्यावर त्याचं पुन्हा पाणी होतं. हे असतं Distilled Water. हे सर्वात शुद्ध पाणी असतं.
पण या पाण्यात कोणत्याही प्रकारची जीवनसत्त्वं आणि क्षार नसतात. त्यामुळे या पाण्याला पोषणमूल्य नाही. हे पाणी अनेकदा प्रयोगशाळा, उद्योगांमध्ये वापरलं जातं.
कुठलं पाणी प्यावं?
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "आता जलप्रदूषण इतकं वाढलेलं आहे की कुठल्याच पद्धतीने त्यातले जीवाणू, विषाणू आणि रसायनं नष्ट होत नाहीत.
त्यामुळे आपल्या आरोग्याला आवश्यक आहे ते म्हणजे कमीत कमी त्रास होईल यासाठी पाणी उकळून - गाळून प्यावं, हाच महत्त्वाचा पर्याय आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर चांगल्या प्रकारचा फिल्टर निश्चित वापरता येईल."
काही साध्या गोष्टी लक्षात ठेवून, आपण पितोय ते पाणी अशुद्ध आहे का, याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.
- पाण्याची चव कशी आहे? त्याला नेहमीपेक्षा वेगळी वा मेटालिक चव लागतेय का?
- पाण्याचा रंग कसा आहे? किती पारदर्शक आहे?
- नळावर वा कपड्यावर पाण्याचे रंगीत डाग येतायत का?
- त्याला सडक्या अंड्यासारखा वा विशिष्ट वास येतोय का?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











