पाणी टंचाई: ‘लग्नाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर आधी पाणी येतं’

शहापूर

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, शहपूर तालुक्यातील ढिंगणमाळ गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी दररोज 2 किलोमिटर पायपीट करावी लागते.
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"हे गाव बघितलं असतं तर या गावात लग्न करून आले नसते. लग्नाला सहा वर्षं झाली पण आजही मी नातेवाईकांना बोलवत नाही. कारण लाज वाटते. आमच्याकडे पाण्याचे लय हाल आहेत. पार डोंगऱ्याच्या कपारीला जावं लागतं पाण्याला. पोरं पण संग नेतो. दोन-तीन दिवसांचं धुणं एकत्रच घेऊन जातो. पूर्ण दिवस जातो. या गावात लय हाल व्हतात. पाण्यामुळे पोरांना बायका भेटते नाही. पोरं तशीच आहेत बिनलग्नाचे."

शहापूर तालुक्यातील दांड गावात राहणाऱ्या सरला खोपले बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या.

"आता नवरा केलाय तर संसार करणं आहे. मी माझ्या गावाला गेले तर माझ्या लेकरांना कोणी चांगलं म्हणणार नाही त्यामुळे आयुष्यभर इथे रहाणं भागच आहे," पाण्यासाठीची दररोज होणारी दगदग सांगता सांगता सरला यांना रडू कोसळलं. "पीण्यासाठी,जगण्यासाठी तरी पाणी द्या. तेवढं करायच पाहीजे सरकारने. आम्ही काय कीडे-मुंगी नाही ना इकडेच मरून जायाला." असं त्या रडत रडतच म्हणाल्या.

जागतिक राजकारण आणि परराष्ट्र व्यवहारावर प्रभाव टाकण्याचं सामर्थ्य पाण्यात आहे असं म्हणतात. आगामी काळातलं तेल म्हणूनही पाण्याचं महत्त्व सांगितलं जातं. पाण्यावरून दोन जिल्ह्यातील लोकांमध्ये, दोन राज्यांच्या लोकांचे संबंध किती बिघडू शकतात हे आपण भारतातही अनेकदा पाहतो. पण महाराष्ट्रतल्या काही दुर्गम भागात पाणी टंचाई आता लग्नाच्या आड येऊ लागली आहे.

दिव्या धाकटे

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, दिव्या धाकटे

शहापूर तालुक्यात 169 गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. उन्हाळा सुरू झाला आणि एप्रिल महिन्यात विहिरीचं पाणी आटायला सुरुवात झाली. काही गावात पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात अडसर येतोय तर ज्या गावात पाणी आणि पाईपलाईन नाही त्यागावात लग्न करणार नाही असा निर्धार काही मुलींनी केलाय.

मुंबई लगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातलं हे भीषण वास्तव जाणून घेण्यासाठी आम्ही काही गावांमध्ये गेलो. त्यावरील हा विशेष रिपोर्ट.

'लग्नाचा विचार आला की आधी पाणी डोळ्यासमोर येतं'

शहापूर तालुक्यात मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाट सुरू होण्यापूर्वी महामार्गाच्या मुख्य रस्त्यापासून जवळपास 30 किमी आत असलेल्या ढिंगणमाळ गावात आम्ही पोहचलो. साधारण संध्याकाळचे चार वाजले होते. या गावापर्यंत पोहचण्यासाठी पक्का रस्ताही नाही.

गावाजवळ डोक्यावर दोन-तीन हंडे घेऊन येणाऱ्या काही महिला आम्हाला दिसल्या. गावात प्रवेश केल्यानंतर घराबाहेर काही ग्रामस्थ बसले होते. काही ठिकाणी अंगणात लहान मुलं खेळत होती. तर काही घरांबाहेर कुटुंबीय गप्पा मारत बसले होते.

ग्रामस्थांना पाण्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, गावापासून पुढे 2 किलोमीटर आतमध्ये विहीर आहे. पाण्यासाठी तिथपर्यंत जावं लागतं. विहीरीतही अगदी थोडं पाणी आहे आणि टँकर काही एवढ्या आतमध्ये आमच्या गावात येत नाही.

इथेच आमची भेट झाली दिव्या धाकटे आणि जालना आमले या दोन तरुणींशी.

दिव्या धाकटे, जालना आमले

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, दिव्या धाकटे, जालना आमले

दिव्या गावापासून जवळपास 40 किमी अंतरावर असलेल्या एका महाविद्यालयात बीएच्या पहिल्या वर्षाला ती शिकते. गावात पाचवीपर्यंतच शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी दिव्याला घराबाहेर पडावं लागलं.

गावात पाणी येईल याची वाट पाहण्यापेक्षा पाणी आहे तिथेच जाण्याचा निर्णय घेणं जास्त सोयीचं आहे असं त्या सांगतात.

दिव्या धाकटे सांगतात, "मी माझ्या आजीला, आईला आयुष्यभर पाणी भरताना पाहीलंय. घरातली कामं, स्वयंपाक, मुलांची जबाबदारी हे तर करावं लागतंच पण आमच्याकडच्या बायकांचे पाण्यासाठीही खूप हाल होतात आणि लहानपणापासून आम्ही ते पाहत आलोय. मला मात्र माझं भविष्य तसं नकोय."

"पाणी भरण्यासाठी एका फेरीसाठी अर्धा तास तरी जातो. दिवसभरात अशा चार-पाच तरी फेऱ्या होतात. कधी लग्नाचा विचार मनात आलाच तर आधी पाणी डोळ्यासमोर येतं. त्या गावात पाणी असेल का? किती लांब असेल? पाण्यासाठी कुठे जावं लागेल? गावात पाईपलाईन, नळ असावा हेच विचार मनात येतात," लग्न ठरवताना आमच्याकडे पाणी प्रश्नाची आवर्जून चर्चा होते असंही दिव्या म्हणाल्या.

"आम्हाला शिकायचं आहे, इथून बाहेर पडायचं आहे. पण हे इतकं सोपं नाही. पाणी भरण्यात खूप वेळ जातो. शारीरिक त्रास तर होतोच शिवाय याचा परिणाम अभ्यासावरही होतो. मग यातून आम्ही बाहेर कसं पडणार?" असाही प्रश्न दिव्याने उपस्थित केला.

धाकटे कुटुंबात दिव्या एकुलती एक मुलगी आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा आहे. परंतु शाहापूर तालुक्यातील गावांमध्ये आदिवासी समाजात मुला-मुलींची लवकर लग्न होतात असंही त्या सांगतात. त्यामुळे अठरा वर्षं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लग्न होण्याची टांगती तलवार कायम या मुलींच्या डोक्यावर असते.

'इतर काही तडजोड करू शकेन पण पाणी अडजस्ट होणार नाही'

दिव्यासोबत पाणी भरण्यासाठी आलेल्या जालनाशी आम्ही बोललो. जालनाने नुकतीच बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. निकाल येताच महाविद्यालयात प्रवेश घेणार असं ती म्हणाली.

जालना आमले

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, जालना आमले

जालनाला चार मोठ्या बहिणी आहेत. कदाचित यामुळेच समाजातील स्त्री-पुरूष असमानता आणि लग्न या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर ती परखडपणे बोलते.

"मी जेव्हा लहान होते तेव्हाही पाणी भरायचे. आता मोठी झाली तरीही पाणीच भरतेय. आमच्या गावात मुलांना, माणसांना काही वाटत नाही की पाणी भरायला आम्हाला किती त्रास होतो. महिलांचे किती हाल होतात. आपण पुढाकार घेऊन त्यांच्यासीठी काही करवं असं काही त्यांना वाटतच नाही. कारण पाणी तर बायकांनाच भरावं लागतं," म्हणून हा प्रश्न महिलांचा अधिक आहे असं ती सांगते.

"शेवटी घरापर्यंत पाणी आणण्याची जबाबदारी इथे बायकांवरच आहे त्यामुळे आम्हाला आमच्या भविष्याचा विचार करावाच लागेल," असं म्हणत जालनाने लग्न आणि पाणी टंचाईचा संबंध किती जवळचा आहे या विषयात हात घातला.

ती म्हणाली, "आमच्या गावात येण्यासाठी मुली सहसा तयार होत नाहीत. बाहेरच्या मुली येण्याआधी विचारतात पाणी किती लांब आहे? आमच्या गावात मुलांना मुली द्यायला कोणी तयार होत नाही. लग्न पण मोडतात."

मग लग्न ठरवताना पाणी प्रश्न तुझ्यासाठी किती महत्त्वाचा असेल? या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, "आमच्याकडे लग्नसाठी नोकरी करणारी मुलं येत नाहीत. आजूबाजूच्या गावांमध्येच सहसा लग्न ठरतं. नातेवाईक असलेल्या गावांमध्ये लग्न ठरवण्याची पद्धत आहे. पण मी सगळ्यातआधी पाण्याचाच बघणार. आम्ही इतके वर्षं एवढ्या लांबून पाणी भरलंय. आता आयुष्यभर हेच करायची इच्छा नाही."

"गावात पाणी आहे का? याची माहिती मी माझ्या कुटुंबालाही विचारेन. लग्न ठरवताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्या महत्त्वाच्या आहेतच. पण मी बाकी काही गोष्टींशी तडजोड करण्यासाठी तयार आहे पण माझ्याकडून पाणी टंचाई अॅडजस्ट होणार नाही," असं जालना ठामपणे म्हणाली.

'आमच्या गावात येण्यास मुली तयार होत नाहीत'

पाणी प्रश्न या मुलींसाठी जसा भविष्याचा प्रश्न बनलाय त्याप्रमाणे पाण्यामुळे काही गावांमध्ये मुलांची लग्नही खोळंबतात.

जालना आमले

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, जालना आमले

शहापूर सीमेलगत असलेल्या बिवळवाडी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाडी डोंगर उतरून दररोज चढ-उतर करावी लागते. दिवसभरात गरजेनुसार किमान चार ते पाच फेऱ्या होतात. सकाळी पाणी भरल्यानंतर मग आंघोळ, स्वयंपाक, भांडी, धुणी आणि दुपारंनंतर पुन्हा तेच असा दिनक्रम असतो.

साधारण 50 वर्षांपूर्वी लग्न करून या गावात आलेल्या सुनिता ठाकरे सांगतात, "माझं लग्न झाल्यापासून मी माझ्या अंगणात नळाला पाणी येईल याची वाट पाहतेय. पण आता काही ते शक्य आहे असं वाटत नाही."

"डोंगराच्या पायथ्याशी एक विहीर आहे. पार 1 किमी डोंगर उतरून जावं लागतं. पाण्याचे हंडे घेऊन दररोज डोंगर चढायचा म्हणजे किती त्रास आहे. विहीरतही पाणी नसतं. टँकर येतो तेव्हा पाणी विहीरीत ओतलं जातं. ही परिस्थिती पाहिल्यावर गावात मुली यायला तयार होत नाहीत."

मुलांची लग्न ठरवत असताना तुम्ही चर्चेसाठी जाता का? काय चर्चा होते? लग्न ठरवताना पाण्यावर चर्चा होते का? असे प्रश्न विचारल्यावर सुनिता ठाकरे हसल्या आणि म्हणाल्या, "पाण्याची तर मुख्य चर्चा होते. पाण्यावर लग्न ठरतात आणि मोडतात सुद्धा."

"तुमच्या गावाला पाणी आहे का ही चर्चा दोन्ही बाजूने होते. आम्हाला आधी सांगावं लागतं आमच्या गावात पाण्याची काय परिस्थिती आहे. शहापूर तालुक्यात पाणी नाही हे काही लपवण्यासारखं नाही. आता मुला,मुलींचं शिक्षण झालं आहे. पाईपलाईन आहे का? विहीर किती अंतरावर आहे? मुलाकडे जागा,जमीन आहे का? पोर गल्लीत क्रिकेट खेळतो की कंपनीत जातो हे पण पहावं लागतं ना," अशी सगळी चर्चा होऊनच लग्न ठरतं.

मग नातेवाईकांना सांगून आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो. काही महिने थांबतो अशी लग्न ठरतात.

शहापूर तालुक्यातील ढिंगणमाळ गाव

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, शहापूर तालुक्यातील ढिंगणमाळ गाव

हे सांगत असताना आपल्या गावातल्या सुनांसाठी बोलायला त्या विसरल्या नाहीत. "आमचं तर आयुष्य पाण्याची वाट पाहत गेलं. पण किमान आमच्या सूनांना, नात सूनांना तरी पाणी मिळू दे एवढीच अपेक्षा आहे."

'मुलींना दोष देणं गैर आहे'

अंगणवाडी सेविकांसाठी काम करणाऱ्या शुभा शमीम सांगतात, "काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल घरात शौचालय नसल्यास मुली लग्नासाठी नकार देत होत्या. कारण शेवटी महिलांना भोगावं लागतं. तसंच पाण्याचं आहे. पाण्यासाठी महिलांनाच वणवण करावी लागते, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो."

मुलींनी अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही असंही त्या सांगतात.

"सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यायला हवं. व्यवस्थेने या समस्या सोडवायला हव्या. गावकऱ्यांनीही पुढाकार घेऊन पाणी आडवा, पाणी जीरवा असे उपक्रम राबवायला हवेत."

दिव्या धाकटे

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, दिव्या धाकटे

मराठवाड्यातील सामाजिक कार्यकर्ते जयाजी सूर्यवंशी सांगतात, "सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आणि कोकणातील डोंगरांवरील काही गावात अशीच परिस्थिती दिसते. पाणी टंचाईमुळे लग्न ठरताना अडथळे येतात. पाण्यामुळे लग्न ठरत नाहीत. अशा ठिकाणी लग्नाच्या समस्या गंभीर आहेत."

"पाणी नसलेल्या गावांमध्ये मुलांची लग्न होत नाहीत. खरं तर हा सामाजिक प्रश्न बनलाय. मुलींनी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. पण सरकारने याची दखल घेतली पाहिजे. तुम्हाला 70 वर्षांत साधं पिण्याचं पाणी देता आलं नाही. शौचालय आहे पण पाणी नाही. दररोज 10 किलोमिटरवरून पाणी आणायचं म्हणजे गंमत आहे का? महिलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो."

शहापूर तालुक्यातील पाण्याची सद्य:स्थिती

शहापूर तालुक्यात दरवर्षी सरासरी 2000 ते 2500 मिली मीटर पाऊस पडतो.

शहापूर तालुक्यात भातसा, वैतरणा आणि तानसा ही तीन मोठी धरणं आहेत.

या तिन्ही धरणातून देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमधून पाईपलाईनद्वारे मुंबईला दररोज 3 हजार 800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो.

परंतु या धरणांच्या जवळपास असलेल्या 169 गावांमधील 58 हजार ग्रामस्थांना पिण्यासाठीही पाणी मिळणं जिकिरीचं झालं आहे.

या गावांमध्ये पाण्याचा एकही स्त्रोत नसल्याने उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो असं शहापूर पंचायत समितीने सांगितलं. पण टँकरचं हे पाणी विहीरींमध्ये ओतलं जातं.

अनेक गावांमध्ये विहीर एक किंवा दोन-तीन किलोमिटरवर वर आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावीच लागते.

शहापूरचे आमदार दौलत दरोडा सांगतात, "शहापूरसाठी 273 कोटी रुपयांची भावली धरणाची योजना 2014 मध्ये मंजूर झाली आहे. पण अजून काहीच काम नाही. या धरणाचा पाणी साठाही पुरेसा नाही."

शहापूर तालुक्यात तीन मोठी धरणं असूनही या धरणांचं पाणी का दिलं जात नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "ही निर्णय केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. या धरणांचं पाणी मिळावं ही आमची मागणी आहेच. पण आता भावली धरणाची योजना मंजूर झाल्याने इतर सर्व योजना शासनाकडून नामंजूर ठरवल्या जतात."

शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी दररोज 12 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे असंही पंचायत समितीच्या एका सदस्याने बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं. टँकरने तेवढा पाणी पुरवठा केला जातो असाही समितीचा दावा आहे.

टँकरचं पाणी मंजूर करण्यासाठी निविदा काढल्या जातात.

169 गावांमध्ये पाण्याच्या टँकरचा दर तीन महिन्याचा खर्च 2 कोटी रुपये आहे.

जो तालुका समस्त मुंबईकरांच्या पाण्याची तहान भागवतो त्या तालुक्यातील ग्रामस्थ मात्र डोळ्यासमोर पाणी असूनही तहानलेले आहेत.

पाण्यासाठीची वणवण त्यांच्यासाठी जगण्यासाठीचा संघर्ष बनलीय. याचा फटका महिला, लहान मुलं, गरोदर स्त्रिया यांना तर बसतोस त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.

हे दु:ख कमी होतं की काय म्हणून आता इथल्या मुला-मुलींच्या लग्नासारख्या नाजूक, संवेदनशील आणि वैयक्तिक निर्णयातही पाण्याचा प्रश्न मुख्य भूमिकेत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)