ग्राऊंड रिपोर्ट : पाहा व्हीडिओ - 'पाण्यासाठी काल त्यांचा जीव गेला, उद्या आमचा जाईल'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'नेते आश्वासनं देतात, पण पाणी कुणीच देत नाही'
    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'पाण्यासाठी काल त्यांचा जीव गेला, उद्या आमचा जाईल', हे उद्गार आहेत राजधानी दिल्लीतल्या शहीद सुखदेव नगरातल्या जया यांचे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वस्तीत टँकरमधून पाणी भरण्याच्या मुद्द्यावरून एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्यात आली.

दिल्लीच्या वजीरपूर झोपडपट्टीतल्या शहीद सुखदेव नगरात आता पूर्वीसारखीच शांतता नांदते आहे. शनिवारच्या टळटळीत दुपारीआधीही तिथे अशीच शांतता होती.

पिंपं, छोटीमोठी पातेली, प्लॅस्टिकच्या अनेकविध बाटल्या सगळ्या गोष्टी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपातून दूषित पिवळं पाणी येतं आहे. खाण्यापिण्याची भांडी अजूनही घासलेली नाहीत. याठिकाणी पाण्याची निकड तीव्र आहे. मात्र तरीही इथल्या लोकांना आता 'सरकारी पाणी' नकोय.

शनिवारच्या दुपारी टँकरमधून पाणी भरायला प्रचंड झुंबड उडाली होती. या झुंबडीत पाण्यासाठी झालेल्या मारहाणीत साठ वर्षीय लाल बहादूर यांचा खून झाला. या हत्येनंतर इथल्या लोकांनी सरकारी पाण्याची धास्ती घेतली आहे.

कशी झाली लाल बहादूर यांची हत्या?

17 मार्च, शनिवारी शहीद सुखदेव नगरातल्या लाल बहादूर यांच्या घरातली मंडळी कामावर जाण्याच्या तयारीत होती. मात्र पाण्याच्या टँकरचा आवाज ऐकताच लाल बहादूर यांच्या दोन मुलींनी हातात बादल्या घेऊन टँकरच्या दिशेने धाव घेतली.

दिल्ली, पाणीप्रश्न

फोटो स्रोत, Rahul Kumar

फोटो कॅप्शन, मयत लाल बहादूर

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या झोपडपट्टीतली माणसं पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. कारण पाइपलाइनद्वारे येणारं पाणी दूषित आणि पिवळ्या रंगाचं असतं. खाण्यापिण्यासाठी या पाण्याचा वापर करता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत चार दिवसांनी येणारा टँकर इथल्या लोकांसाठी जीवनदायी आहे. टँकरची चाहूल लागताच इथले लोक आपल्या कुटुंबीयांच्या नावाचा पुकारा सुरू करतात.

शनिवारी असंच काहीसं चित्र होतं. रिक्षा चालवणारे, फळविक्रेते आणि भंगारविक्री करणारी मंडळी कामं आटोपून घरी आराम करत होती. भंगार खरेदी-विक्रीचं काम करणारे लाल बहादूर घरी पहुडले होते. त्यांची दोन मुलं राहुल आणि रोहित पाणी भरण्याच्या शर्यतीत दंग होते.

डोळ्यांसमोर मारहाण आणि मृत्यू

नेमकं त्याच वेळी लालबहादूर यांचा 19 वर्षांचा मुलगा राहुल आणि त्याच टँकरच्या झुंबडीत पाण्यासाठी धडपडणारा 25 वर्षांचा सुनील यांच्यात पाणी भरण्यावरून वादावादी सुरू झाली.

रोहितने नक्की काय घडलं हे बीबीसीला सविस्तपणे सांगितलं. तो म्हणाला, 'आम्ही सगळेच पाणी भरण्याची धडपड करत होतो. मात्र त्या लोकांनी पाण्याचा पाइप काढून घेतला. त्यानंतर शिवीगाळ सुरू झाली. त्यांनी मुस्काटातही लगावली'. त्यावेळी आजूबाजूची अनेक माणसं हजर होती. त्यांनी पुढचं सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडताना पाहिलं.

दिल्ली, पाणीप्रश्न
फोटो कॅप्शन, दिल्लीतल्या या वस्तीत पाण्याची समस्या अत्यंत भीषण आहे.

लाल बहादूर यांचे शेजारी आणि नातेवाईक रंजीता यांनी जे घडलं त्याचं वर्णन बीबीसीला सांगितलं. त्या सांगतात, "लाल बहादूर मला मोठ्या दिरासारखे होते. शनिवारी दुपारी ते आराम करत असताना त्यांची मुलगी धावत घरी आली. घाबरलेल्या मुलीने बाबांना जागं केलं आणि भावाला (राहुलला) लोक मारत असल्याचं सांगितलं. ते ऐकताच 60 वर्षांचे लाल बहादूर ताबडतोब उठले आणि टँकरच्या दिशेने धावले."

लाल बहादूर टँकरच्या इथे पोहोचले तेव्हा तरुण मुलांमध्ये पाण्यावरून जोरदार वादावादी सुरू होती. वातावरण तणावपूर्ण होतं. हे भांडण थांबवण्याचा लाल बहादूर यांनी प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गटाने लाल बहादूर यांना जबर मारहाण करत त्यांची हत्या केली.

या हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चार लोकांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्यावर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

दिल्ली, पाणीप्रश्न
फोटो कॅप्शन, पाण्याचा एकेक थेंब या वस्तीतल्या नागरिकांसाठी मोलाचा आहे.

पाण्याने घेतला जीव

लाल बहादूर यांचे शेजारी इशरार्थी देवी यांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं. त्या सांगतात, "पाण्यासाठी, ते मिळवण्याच्या प्रयत्नात हकनाक जीव गेला. पाण्यावरून इथे अनेकदा वादावादी झाली आहे. मात्र या हाणामारीत जीवच गेला."

"आता टँकर येवो अथवा जाओ. टँकरच्या पाण्यासाठी जीव जाणार असेल तर कोणाला पाणी मिळणार? टँकरवाल्यांनो, तुमचं पाणी तुमच्याकडेच ठेवा. आम्ही खरेदी करून पाणी पिऊ. आमच्यापैकी एकाचा जीव गेला", असं इथरार्थी उद्वेगाने सांगतात.

शहीद सुखदेव नगरात पाइपलाइनद्वारे पाणी पुरवलं जातं. मात्र या पाण्याची अवस्था इतकी खराब असते की प्रसाधनगृहातही हे पाणी वापरता येत नाही असं स्थानिक मंडळी सांगतात.

विषारी पाणी पिऊन कसं जगणार?

शहीद सुखदेव नगरात रेल्वेलाईननजीक राहणाऱ्या सुनीता व्यथा मांडतात. त्या सांगतात, "जेव्हा पाईपलाइनद्वारे पाण्याचा पुरवठा होतो त्यातून नाल्याचं दूषित पाणी येतं. विषारी पाणी येतं. ते पाणी पिऊन कसं जगणार? पाण्यासाठीच्या संघर्षातून माणूस गेला. त्यांच्या मुलामुलींची काय अवस्था होईल? केजरीवालांनी इथे येऊन पाहावं..."

दिल्ली, पाणीप्रश्न
फोटो कॅप्शन, लाल बहादूर यांच्या पत्नी इशरार्थी देवी

कोणत्याही नेत्याने पाहिलंही नाही

पाण्याच्या टंचाईने ग्रस्त इथल्या नागरिकांनी एकत्र येऊन या प्रश्नावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी प्रत्येकी हजार रुपये जमा करत बोअरवेल खणली आहे. मात्र या बोअरवेलचा फायदा त्यासाठी पैसे दिलेल्या लोकांनाच मिळतो.

सीतादेवींनी या वस्तीतल्या पाण्याच्या समस्येविषयी सांगितलं. त्या सांगतात, "पाण्याच्या समस्येने आमचं जगणं हैराण केलं आहे. टँकरने पाणी मिळत नाही. पुरुष माणसं टँकरसाठीच्या पाण्याकरता रांगेत उभी असतात. त्यांच्या एकमेकांत माऱ्यामाऱ्या होतात. आम्ही घाबरून बाजूला उभ्या असतो. ज्याच्याकडे शारीरिक ताकद आहे ते हडेलहप्पी करून टँकरचं पाणी मिळवतात. कोणत्याही नेत्याने आमचं काहीही ऐकलं नाही. मग आम्ही प्रत्येकाने हजार रुपये एकत्र केले आणि त्यातूनच बोअरवेल खणली. यापेक्षा आणखी आम्ही काय करू शकतो?"

दिल्ली, पाणीप्रश्न
फोटो कॅप्शन, पाण्याच्या टंचाईवर या नगरातल्या लोकांनी स्वत:च उपाय शोधला आहे.

आज त्यांचा जीव गेला, उद्या आमचा जाऊ शकतो.

पाण्यासाठीच्या भांडणातून लाल बहादूर यांची हत्या झाल्यानंतर राज्य सरकारप्रती प्रचंड रोष आहे. याच परिसरात राहणाऱ्या जया यांनी इथल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्या म्हणाल्या, "वीजपुरवठा देऊ, पाणी देऊ अशी आश्वासनं देत नेते आमच्याकडून मतं मागतात. हे पुरवू, ते देऊ असं पोकळ सांगतात.

मात्र आम्हाला प्रत्यक्षात हाती काहीच लागत नाही. आमच्या माणसांचा जीव जातो. किड्यामुंग्याप्रमाणे लोकांचा जीव जातो आहे. काल लाल बहादूर यांचा जीव गेला. उद्या आमचा जाऊ शकतो. एकेक करून आम्ही सगळेच मरून जाऊ."

पाण्याच्या समस्येवर विरोधकांची भूमिका

दिल्लीच्या वजीरपूर औद्योगिक क्षेत्राजवळ वसलेली झोपडपट्टी शहीद सुखदेव नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. आपले प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी इथल्या नागरिकांनी जवळच्या फ्लायओव्हरवर रास्तारोकोही केला होता.

स्थानिक मंडळींच्या म्हणण्यानुसार पन्नास हजार लोकांमागे एक टँकर येतो. यापैकी केवळ पाच टक्के लोकांना प्रत्यक्षात पाणी मिळतं. पाइपलाइनद्वारे पाणी येतं मात्र ते पिणं दूर राहिलं, भांडी घासण्यासाठीही कामी येऊ शकत नाही.

"दिल्ली सरकारने याप्रश्नाची दखल घेतली असून, आप पक्षाच्या आमदाराने या परिसराचा नुकताच दौराही केला', असं आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं.

दिल्ली, पाणीप्रश्न

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

सौरभ पुढे सांगतात, गेल्या दोन महिन्यांपासून हरयाणातून पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे. हरयाणातून जे पाणी येतं आहे त्यात अमोनियाचं प्रमाण जास्त आहे. या कारणामुळे या पाण्याचं शुद्धीकरण होऊ शकत नाही. तीस ते चाळीस टक्के परिसरात पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे. याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दिल्लीत पाण्यासाठीच्या मारामारीतून अशा स्वरुपाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अमोनियाचं प्रमाण कमी असलेलं पाणी पुरवावं यासाठी हरयाणा सरकारशी चर्चा केली आहे.

"इथले रहिवासी दिवसाला शंभर किंवा दीडशे रुपये कमावतात. त्यांना शंभर रुपये पाण्यावरच खर्च करावे लागले तर ते कसे जगणार? मुख्यमंत्री केजरीवाल स्वतः दिल्ली जल बोर्डाचे चेअरमन आहेत. एरव्ही ते कोणत्याही घटनेच्या वेळी नुकसानभरपाई देण्याच्या बाबतीत पुढे असतात. लाल बहादूर यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी यासाठी आम्ही मागणी करत आहोत. केजरीवाल यांनी स्वत: इथे येऊन माफी मागावी", असं या मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्र नागपाल यांनी सांगितलं.

दरम्यान या नुकसानभरपाईविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही असं आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)