ऑस्ट्रेलियात व्हेल माशांचं हे असं का झालं?

ऑस्ट्रेलिया, व्हेल, समुद्री जीवन

फोटो स्रोत, Western Australia Government

फोटो कॅप्शन, पश्चिम ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 75 व्हेल माशांचा मृत्यू झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर दीडशेहून अधिक मासे येऊन अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेकडच्या पर्थ शहरापासून साधारण 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅमेलिनच्या समुद्रकिनाऱ्यावर एका मच्छिमाराला व्हेल माशांची ही फौज आढळली.

त्यापैकी अर्ध्याहून जास्त व्हेल माशांनी जीव गमावला असल्याचं पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रशासनानं स्पष्ट केलं.

किनाऱ्यावर येऊन अडकलेल्या माशांची सुटका करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती संवर्धन अधिकाऱ्यांनी दिली.

'आम्ही या व्हेल माशांना खोल पाण्यात नेऊन सोडू तेव्हा या माशांमध्ये शिल्लक राहिलेली ताकद, वाऱ्यांचा वेग आणि ढगाळ वातावरण यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल', असं कॉन्झर्व्हेशन आणि अट्रॅक्शनमधल्या जैवविविधता विभागाच्या प्रमुख जेरेमी चिक यांनी सांगितलं.

हे प्राणी म्हणजे समूहाने वावरणारे 'शॉर्ट फिन्ड पायलट व्हेल' असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया, व्हेल, समुद्री जीवन

फोटो स्रोत, Western Australia Goverment

फोटो कॅप्शन, व्हेल किनाऱ्यावर का येत आहेत याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

या व्हेल माशांना वाचवण्यासाठी डझनभर कार्यकर्ते किनाऱ्यावर एकत्र आल्याचं वृत्त 'द ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन' दिलं आहे.

दरम्यान, किनाऱ्यावर शार्क मासे येण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. शार्क मासे येण्याच्या भीतीमुळे नागरिकांनी किनाऱ्यापासून दूर राहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

व्हेल मासे किनाऱ्यावर मृत झाल्याने त्यांची शिकार करण्याकरता खोल समुद्रातून शार्क मासे किनाऱ्यापाशी येण्याची शक्यता आहे, असं पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या मच्छिमार विभागानं स्पष्ट केलं आहे.

किनाऱ्यावर दाखल झालेल्या व्हेल माशांचा आकार साधारण 5 मीटर असून उष्णकटिबंधीय प्रदेशात ते आढळतात.

दरम्यान, व्हेल मासे इतक्या मोठ्या संख्येनं किनाऱ्यावर येऊन धडकण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

ऑस्ट्रेलिया, व्हेल, समुद्री जीवन
फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर व्हेल मासे येऊन अडकले आहेत.

व्हेल मासे जखमी असताना, आजारी असताना किंवा वाटचाल करताना दिशेचा अंदाज चुकल्याने ते किनाऱ्यावर येऊन अडकू शकतात. उथळ किनारपट्टीच्या प्रदेशात ही शक्यता जास्त असते.

किनाऱ्यावर अडकलेले अन्य प्राणी सुटकेसाठी काही विशिष्ट संकेत देतात. त्यांची सुटका करण्यासाठी म्हणून आलेले व्हेल मासे त्याप्राण्यांप्रमाणेच अडकू शकतात.

1996 मध्येही अशाप्रकारेच 320 व्हेल मासे पश्चिम किनाऱ्यावर येऊन अडकले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)