बीबीसी इम्पॅक्ट: बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची बिवलवाडीला भेट, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उचलली पावले

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Aditya Thackery/Twitter

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

26 एप्रिल रोजी बीबीसी मराठीने बिवलवाडीच्या पाणीप्रश्नावर बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहापूर तालुक्यातील बिवलवाडीला भेट दिली आणि पाणी टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटले आहे, "शहापूर तालुक्यातील कसारा ग्रामपंचायत हद्दीतील बिवलवाडी या आदिवासी पाड्यामधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तेथे सोलर पंप बसवून पाणी योजना सुरू करण्याच्या कामाची पाहणी केली."

मूळ बातमी या ठिकाणी तुम्हाला वाचता येईल.

गरोदर असलं तरी पाणी आणावचं लागतं

"देवाधर्माचं कितीही केलं तरी पाण्याशिवाय शेवटी आहेच काय मॅडम? देवाधर्माच्या राजकारणापेक्षा पाणीच जास्त महत्त्वाचं आहे. पाणी नसेल तर माणसं जगतील का?"

19 वर्षांच्या अर्चना अंभीर बोलत होत्या. त्यांच्या या प्रश्नानंतर माझ्या मनात आलं, पाण्याचं महत्त्व यापेक्षा आणखी सोप्या भाषेत तरी कसं सांगता येईल?

मुंबईसह राज्यभरात सध्या राजकारण तापलंय. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा हे मुद्दे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांसाठीही महत्त्वाचे बनले आहेत. परंतु, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराच्या हाकेच्या अंतरावरील शहापूरमध्ये मात्र जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे.

अर्चना अंभीर शहापूरमधील बिवळवाडी गावात राहतात. या गावासह एकूण 169 गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. विशेष म्हणजे शहापूर तालुक्यातील तीन धरणांमधूनच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा होतो. पण धरणांच्या जवळ असलेली ही गावं मात्र तहानलेलीच आहेत.

शहापूरकरांचा पाण्यासाठीचा हा संघर्ष पाहण्यासाठी आम्ही मुंबईपासून अवघ्या दीड-दोन तास अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहचलो. त्यावरील हा आमचा विशेष रिपोर्ट.

'यांच्या भाषणांची आम्हाला लाज वाटते'

शहापूरच्या सीमेजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला एक विहीर आहे. आम्ही तिथे पोहचलो तेव्हा सकाळचे अकरा-साडेअकरा वाजले होते. विहिरीला महिलांनी घेरलं होतं. पाणी भरण्यासाठी महिलांची लबगब सुरू होती.

शहापूर

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, पाणी भरण्यापासून चिमुकल्यांचीही सुटका नाही.

गाडीतून प्रवास करत असतानाही कडक ऊन स्पष्ट जाणवत होतं. गाडीतून खाली उतरताच उन्हाच्या झळा बसल्या. त्यामुळे विहिरीवर उभं राहून पाणी भरणाऱ्या महिलांच्या संघर्षाची दाहकता जाणवत होती.

या विहिराला 'अहिल्याबाई होळकर' यांचं नाव देण्यात आलंय. विहीरीला कळसही आहे. विहिरीत कोणी पडू नये आणि विहिरीतलं पाणी थंड राहावं म्हणून हा कळस असल्याचं ग्रामस्थ सांगतात.

महिलांचं पाणी भरून झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधला. पाणीटंचाई हा त्यांच्या एवढ्या जिव्हाळ्याचा विषय की अनेक महिला एकाच वेळी भरभरून बोलू लागल्या.

गावात राहणाऱ्या सरिता पोडशे म्हणाल्या, "मत द्या, मत द्या, म्हणतात पण पाणी कुठे देतात. पाण्याचा खूप त्रास आहे. डोकं जड होतं, हात पाय दुखतात. सरकार दरवेळी म्हणतं पाणी देऊ, पण पाईपलाईन कुठेय? रस्ते झाले पण अजूनही पाणी नाही मिळालं."

शहापूर पाणी टंचाई

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, शहापूर तालुक्यातील बिवळवाडी गावातील डोंगराच्या पायथ्याशी असलेली विहीर

साधारण 450 जणांची लोकवस्ती असलेलं डोंगरावर वसलेलं बिवळवाडी हे गाव. गावात पाण्याची टाकी आहे, पण पाणी नाही. प्रत्येक घराच्या अंगणात नळ आहे, पण ते पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तहानलेल्या बिवळवाडीत कधीतरी टँकरने पाणी येतं असं ग्रामस्थ सांगतात. तेही डोंगरांच्या पायथ्याकडील विहिरीत ओतलं जातं. आणि ते पाणी आणण्यासाठी या महिलांना दररोज एक किमी उंच डोंगर चढ-उतर करून पायपीट करावी लागते.

व्हीडिओ कॅप्शन, शहापूर पाणी टंचाई: 'पाणी नाही म्हणून या गावात लग्न ठरवायला अडथळे येतायत'

"गावात पाण्याचा एकही स्त्रोत नाही. आमचं गाव या डोंगरावर आहे. दररोज तीन ते चार वेळा डोंगर उतरून या विहिरीवर पाणी भरण्यासाठी यावं लागतं. आता तर विहिरीतलं पाणीही आटलंय. आमच्या बाजूला मुंबई आहे. आमच्या धरणांचं पाणी मुंबईला जातं पण आम्हाला कळशीभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं," अशी कैफियत सगळ्याच महिलांनी मांडली.

सध्या सुरू असलेल्या जाती-धर्माच्या राजकारणाकडे सर्वांचं लक्ष आहे असं विचारल्यावर ग्रामस्थ संगीता ठाकरे म्हणाल्या, "धर्मावरून भांडण्यात काय अर्थ आहे? आम्हाला इथे पाणी नाही. तुमचे जे काही वाद असतील, ते बाजूला ठेवा आणि आम्हाला आधी पाणी द्या."

पाणी प्रश्न

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

बिवळवाडी गावातील बबन ठाकरे रेल्वेत नोकरीला होते. या भागात राहणाऱ्या आदिवासी ठाकरे समाजात असे नोकरी करणारे दुर्मिळच. आता ते निवृत्त झाले आहेत आणि त्यांचाही वेळ पाण्याचं नियोजन करण्यातच जातो.

बबन ठाकरे सांगतात, "आमच्याकडील गावं डोंगरावर असतात किंवा काही थोड्या उंचीवर. धरणं मात्र खाली आहेत. रस्त्यापासूनही खाली आहे. मग पाणी वर कसं आणायचं असा प्रशासनासमोर प्रश्न आहे असं ते आम्हाला सांगतात. आता केंद्राकडे, राज्याकडे पैसा नाही का? एवढे मोठे मोठे प्रकल्प होतात, भूयारी मेट्रो होते मग आम्हाला आमच्याच घराशेजारी असलेल्या धरणातलं पाणी मिळू नये."

"धर्मावरून राजकारण केल्यानं माणूस घडतो का? की कर्तव्य बजावल्यानं घडतो. आम्हाला यांच्या भांडणांची लाज वाटते आणि यांच्या भाषणांचीही लाज वाटते. आमच्याकडे परिस्थिती काय आणि यांचं काय चाललंय? पाणी ही सर्वात मुलभूत गरज आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही,"

'गरोदर असले तरी पाण्यासाठी डोंगर चढावाच लागतो'

याच ठिकाणी आम्हाला रविना ठाकरे आणि दुर्गा ठाकरे भेटल्या. पाण्याचे दोन हंडे डोक्यावर होते पण माझी नजर स्वाभाविकपणे त्यांच्या पोटाकडे गेली. गरोदर आहात का? असं विचारल्यावर म्हणाल्या, आठवा महिना सुरू आहे.

मग पाणी भरायला तुम्ही का येता? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "काय करू शकतो? घरातले लोक कामाच्या शोधात बाहेर जातात. ठेकेदाराकडे काम करायला जातात. घरात लहान मुलं आणि आम्हीच असतो. गावात पाणीच नाही. मग येणं भाग आहे," असं दुर्गा ठाकरे म्हणाल्या.

पाणी प्रश्न

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

फोटो कॅप्शन, दुर्गा ठाकरे गरोदर आहेत. पण पाण्याची तहान कोणाला चुकली आहे?

यांच्यासोबत आम्हीही डोंगर चढून बिवळवाडी गावात प्रवेश केला. 8 महिन्याच्या गरोदर महिलांना पाण्याने भरलेले हंडे घेऊन डोंगर चढताना पाहिलं आणि मनात विचारांचं काहूर माजलं.

वजन उचलून डोंगरावर चढताना आई आणि बाळाला काही झालं तर? याची यांना भीती वाटत नसेल का? जवळपास 10-15 किलोमीटरपर्यंत हॉस्पिटल नाही.

पाणी प्रश्न

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

रविना ठाकरे म्हणाल्या, "डॉक्टरांनी सांगितलंय जड उचलायचं नाही. चढायचं नाही. पण आम्ही हतबल आहोत. काय करायचं? पाण्याशिवाय कसं करणार? हात, पाय, कंबर, डोकं सगळं दुखतं, पण कुणाला सांगणार?"

पाणी नाही मग शिकणार कसं?

या भागातल्या जवळपास सर्वच गावांमध्ये चौथी किंवा पाचवीपर्यंतच शाळा आहेत. काही मोजक्या ठिकाणी दहावीपर्यंत आश्रमशाळा आहेत. त्यामुळे शिकण्यासाठी या लहान मुला,मुलींनाही घर सोडून आश्रमशाळेत जावं लागतं.

पाणी भरण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे घरात जेवढे लोक आहेत तेवढे सगळे पाणी भरायला जातात. यातून चिमुकल्यांचीही सुटका नाही. पण प्रामुख्याने मुलींनाच हे ओझं पेलावं लागतं.

विहिरीतून पाणी भरून डोंगर चढत असतानाच माझी भेट मनीषाशी झाली. ती शाळेच्या गणवेशात होती. तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेले दोन हंडे होते. ती तिसरीत शिकते.

शहापूर पाणी टंचाई

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, पाणी भरण्यासाठी बिवळवाडी गावातल्या महिलांना 1 किमी उंच डोंगर चढावा लागतो.

तिच्या घरी गेल्यावर सुरुवातीला ती काहीच बोलायला तयार नव्हती. हंडे उचलल्याने तिचं डोकं दुखत होतं, ती थकली आहे असं तिच्या आजीने सांगितलं.

एवढ्या लहान मुलीला पाणी भरण्यासाठी का पाठवता? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "आज घरात कोणीच नाही. तिचे आई-वडील बाहेर गेलेत. ती आश्रमशाळेत शिकते. आता शाळेला सुटी असल्यानं ती घरी आहे."

मुला-मुलींना शिकवत नाही का तुम्ही? असं विचारल्यावर काही ग्रामस्थ म्हटले, गावात चौथी,पाचवीपर्यंतच शाळा. पुढच्या शिक्षणासाठी घर, गाव सोडून आश्रमशाळेत जावं लागतं.

पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या सुनीता ठाकरे म्हणाल्या, "एवढं शिकूनही नोकरीसाठी कुठे जायचं? इथे पाणी भरण्यातच आमचा दिवस जातो. घरातली कामं असतात. मला हिंदी विषयात एमए करण्याची इच्छा आहे. पण दिवसातून अनेकदा पाण्यासाठी जावं लागतं. त्यात 3-4 तासांचा वेळ जातो. स्वयंपाक, मुलं, धुणी, भांडी एवढ्या गोष्टी असतात."

'माझा मुलगा पाणी भरण्यासाठी गेला आणि परतलाच नाही'

बिवळवाडीनंतर जवळच्या दांड गावात आम्ही पोहचलो. रखरखत्या उन्हात गावात माणसं भेटणार नाहीत असं वाटलं पण इकडेही विहीरीजवळ काही महिला भेटल्या.

शहापूर पाणी टंचाई

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, शहापूर तालुक्यातील वैतरणा धरणाचं पाणी

विहिरीतलं पाणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आटलं. आता टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पण टँकर कधी येईल काही सांगता येत नाही असं सखूबाई आगिवले यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, "पाण्यासाठी खूप त्रास आहे आम्हाला. माझा एकुलता एक मुलगा डोहात पाणी भरायला गेला आणि परत आलाच नाही. डोहात बुडून तो वारला," असं म्हटल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. कापडाने डोळे पुसत पुसत त्या सांगत होत्या, "पाण्याची खूप अडचण आहे. आम्हाला पाणी हवंय."

त्यांचा मुलगा 35-36 वर्षांचा होता. त्यांना चार मुलं आहेत. सखुबाई आगिवले यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो. पत्र्याचं छत असलेलं छोटं घर. मुलांचा मृत्यू झाला तेव्हा राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. तेव्हा उदरनीर्वाह म्हणून दळण्यासाठीची एक मशीन दिली. पण ती नंतर चाललीच नाही असं त्या म्हणाल्या.

धरणं आहेत मग पाणी पुरवठा का नाही?

शहापूर तालुक्यातील वैतरणा, भातसा आणि तानसा या धरणांमधून मुंबईला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होतो.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहापूरमधून मुंबईला दररोज अंदाजे 3 हजार 800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. असं असलं तरी शहापूरमधील 169 गावातील 58 हजार ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहापूर पाणी टंचाई

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC

फोटो कॅप्शन, अंगणात नळ बसवले आहेत पण पाण्याचा स्त्रोत नसल्याने पाणीच नाही.

शहापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दौलत दरोडा सांगतात, "पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी 273 कोटी रुपयांच्या भावली धरणाची योजना मंजूर झाली आहे. पण 2014 पासून त्याचं काम अजूनही सुरूच आहे. या धरणाचा पाणी साठा चिंतेची बाब आहे."

"केंद्र आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेत असते. या योजनेसाठीही 50% केंद्राचा आणि 50% राज्याचा निधी आहे. ही योजना लागू केल्याने या गावांच्या पाणीपुरवठ्याच्या इतर सर्व योजनांचे प्रस्ताव नामंजूर केले आहेत,"

"तानसा, भातसा, वैतरणा या धरणांच्या पाण्यासाठीही काही गावांनी प्रस्ताव दिले पण भावली हे इगतपुरीतलं धरण आहे. तिकडच्या धरणाची योजना मंजूर झाल्याने बाकी प्रस्ताव नामंजूर होतात," असंही दौलत दरोडा यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं.

या गावांमध्ये दररोज टँकरने पाणी पुरवठा होतो असा दावा पंचायत समितीने केला आहे. या ग्रामस्थांना दररोज 12 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि तेवढा पुरवठा केला जातो असंही समितीने स्पष्ट केलं.

प्रशासनाच्या कागदांवर हे आकडे दिसत असले तरी इथल्या जमिनीवरच वास्तव खूप काही वेगळंच आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)