'पाणीटंचाईमुळे माझ्या बायकोनं शॉवर घेणं बंद केलं आहे'

केप टाऊन पाणी संकट

फोटो स्रोत, Getty Images

"माझ्या बायकोनं शॉवर घेणं बंद केलं आहे. त्याऐवजी ती दीड लीटर गरम पाण्यात आणखी एक लीटर नळाचं गार पाणी ओतून अंघोळ उरकत आहे," बीबीसीचे केप टाऊनमधले प्रतिनिधी मोहम्मद अली आपल्या घरची परिस्थिती अशी सांगतात.

आपल्याकडे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना बहुतेक सगळ्या शहरांना करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनमध्ये सध्या तशीच परिस्थिती उद्भवली आहे. तिथले लोक पाणीबचतीचे कोणकोणते उपाय करत आहेत याचा बीबीसी प्रतिनिधी मोहम्मद अली यांनी घेतलेला आढावा.

केप टाऊनमधले हजारो लोक 'डे झिरो' टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. कारण इथलं पाणी लवकरच संपणार आहे, म्हणजे 'डे झिरो'चं संकट कोसळणार आहे.

ज्या पाण्यानं अंघोळ करतो, त्याच पाण्याचा आम्ही शौचालयात पुनर्वापर करत आहोत. पूर्वी शौचालयामध्ये सहा लीटर पाणी ओतलं जायचं. आता तिथेही बचत केली जात आहे आणि त्यासंदर्भात घोषणाही तयार झाल्या आहेत केप टाऊनमध्ये.

पाणी वाचवण्यासाठी बहुतेक रहिवासी आपल्या सवयी बदलत आहेत. भर उन्हाळ्यात एक बादली पाण्यात अंघोळ आटोपली जात आहे.

केप टाउन पाणी संकट
फोटो कॅप्शन, शौचालयामध्ये पाण्याचा पुनर्वापर कराताना बीबीसीचे प्रतिनीधी मोहम्मद अली यांची मुलगी तर अली छोट्याशा कंटेनरमधून पाणी पिताना.

केप टाउनमध्ये तीव्र दुष्काळ पडला आहे. डे झिरो पुढे ढकलण्यासाठी महानगरपालिका प्रत्येकाला दरररोज केवळ 50 लिटर पाणी देत आहे. 12 एप्रिलनंतर डे झिरो येण्याची शक्यता आहे. म्हणजे केप टाउनचं पाणी संपणार आहे.

काळजीपूर्वक पाण्याचा वापर नाही केला तर 40 लाख लोकांची वस्ती असलेल्या केप टाउनला डे झिरो लवकर येण्याची शक्यता आहे.

न्यूलँड येथील जगप्रसिद्ध स्टेडियमपासून हाकेच्या अंतरावर दररोज पहाटे शेकडो लोकांच्या रांगा लागल्या दिसत असतात.

गेल्या महिन्यापर्यंत पाण्याची कमतरता वाटत नव्हती. पण आता शहरातील पाण्याचे नळ कोरडे पडण्याची भीती वाढत आहे. त्यामुळे सर्वच रहिवासी पाणी जपून वापरत आहेत.

'पाणी म्हणजे नवं सोनं'

क्रिकेट आणि रग्बी स्टेडियमच्या अगदी मध्यभागी लोकांना पाणी भरण्यासाठी पाच पाण्याचे नळ लावण्यात आले आहेत. जवळच्याच एका सरोवरातून या ठिकाणी पाणी आणलं जातं.

इथे प्रत्येकाला फक्त 25 लीटर पाणी देण्यात येत आहे. तसंच सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. कारण पाणी माफिया इथून एका खेपेला 2000 लिटर पाणी घेऊन दूरच्या गावात विकत असल्याचा आरोप होत आहेत.

कायदा व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून पाणी सोडण्याची वेळ सकाळी 5 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. अगोदर या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध असायचं.

शहराजवळच्या डोंगरदऱ्याकडेही काही लोक पाण्याचे कंटेनर घेऊन जाताना दिसत आहेत. तिथल्या झऱ्यांमधून मिळेल तितकं पाणी घेऊन येत आहेत.

केप टाउन पाणी संकट

फोटो स्रोत, EPA

डोंगर, दऱ्या आणि समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असेलेल्या सुंदर केप टाउनमध्ये सध्या पाण्याला सोन्याइतकं महत्त्व आलं आहे.

मर्यादित पाण्यासाठी रांगांमध्ये ताटकळत राहण्याऐवजी श्रीमंत लोक सुपर मार्केटमधून पाणी विकत घेत आहेत.

महानगरपालिका पाण्याबाबत कडक नियम लागू करत आहे. पाण्याचा अधिक वापर करणाऱ्याच्या घरी ताबडतोब मीटर लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. मीटर लावल्यानं संबंधित घराला 350 लीटरच पाणी मिळणार आहे.

बहुतेक लोक मर्यादित पाण्याचा वापर करत असले तरी दुर्दैवानं पाइप फुटून पाणी वाया जात असल्याच्या घटनाही पुढे येत आहेत.

केप टाउन पाणी संकट

फोटो स्रोत, EPA

पाणी वाचवण्यासाठी वॉशिंग मशीनचा कमीत कमी वापर करणं, पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करणं, घराशेजारच्या बागेत पाणी न सोडणं असे पर्याय अवलंबले जात आहेत.

त्यामुळं घरटी 18,000 लीटर पाण्याचा वापर महिन्याला होत होता, तिथला वापर आता 7,000 लीटरवर आला आहे.

याचा एक फायदा असा की, महिन्याचं पाणी बिल 23 डॉलरहून कमी होऊन ते 2.3 डॉलरवर आलं आहे!

परिस्थिती बदलली नाही तर जेवण्यासाठी पेपर प्लेटचा वापर करावा लागणार आहे आणि वॉशिंग मशीन पूर्ण बंद करावं लागणार आहे.

डे झिरोचं संकट टाळण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. सोशल मीडियावर पाणी वाचवण्यासाठी टिप्स शेअर केल्या जात आहेत. मात्र काही ठिकाणी कार, घरं धुण्यासाठी पाण्याचा बिनधास्त वापर होत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)