दावोस 'बुद्रुक' इतकं महत्त्वपूर्ण का बनलं?

फोटो स्रोत, Getty Images
स्वित्झर्लंडला हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंदी चित्रपटामध्ये स्वित्झर्लंडची एक रोमॅंटिक प्रतिमा आपण पाहिली आहे. पण या छोट्याशा देशात असलेल्या एका छोट्याशा शहरात जगातील मोठे मोठे आर्थिक निर्णय घेतले जातात. या शहराचं नाव दावोस.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दावोस दौऱ्यावर जाणार म्हटल्यावर हे शहर चर्चेत आलं. या ठिकाणी 23 ते 26 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होणार आहे.
1997नंतर पहिल्यांदाच एखादा भारतीय पंतप्रधान या ठिकाणी जात आहेत. आपण दावोसला का जात आहोत या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान मोदींनी असं दिलं, "सर्वांना माहीत आहे की दावोस हे जगाच्या अर्थविषयक प्रश्नांची चर्चा करण्याचं सर्वांत मोठं व्यासपीठ बनलं आहे."
का प्राप्त झालं आहे या शहराला इतकं महत्त्व? असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. पूर्ण जगाचं अर्थकारण प्रभावित करण्याची क्षमता या शहरात आहे. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंतचे दिग्गज नेते या ठिकाणी येत आहेत.
दावोसविषयी थोडक्यात
प्राटिगाऊ जिल्ह्यात वासर नदीच्या काठावर, स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बूला या रांगांमध्ये हे शहर वसलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
समुद्रसपाटीपासून 5120 फूट उंचीवर हे शहर आहे. युरोपमधलं सर्वांत उंच शहर दावोसलाच समजलं जातं.
दावोस खुर्द आणि बुद्रुक!
जसं आपल्याकडं काही गावांचे खुर्द आणि बुद्रुक असे दोन भाग असतात तसे दावोसचेही दोन भाग आहेत. एका भागाचं नाव दावोस डॉर्फ आणि दुसऱ्या भागाचं नाव दावोस प्लाट्झ आहे.
जगातील मोठे नेते आणि उद्योजक दरवर्षी या ठिकाणी एकत्र येतात आणि चर्चा करतात. या बैठकीला सर्वसामान्यांच्या भाषेत 'दावोस' म्हटलं जातं.
या व्यतिरिक्त स्वित्झर्लंडमधला सर्वांत मोठं स्की रिसॉर्ट दावोसमध्येच आहे. दरवर्षी या ठिकाणी आईस हॉकी टुर्नामेंटचं आयोजन होतं. 'एचसी दावोस' स्थानिक हॉकी टीम दरवर्षी स्पेंगलर कपचं आयोजन करते.

फोटो स्रोत, Getty Images
या कारणामुळं दावोस त्यांच्या देशात प्रसिद्ध होतं पण वर्ल्ड इकोनॉमिक फोरममुळं सर्व जगप्रसिद्ध झालं आहे.
फोरमच्या वेबसाइटनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात या ठिकाणी जगभरातील अर्थतज्ज्ञ, सरकारचे प्रतिनिधी आणि उद्योजकांची बैठक होते. जागतिक स्तरावरील आर्थिक प्रश्नांची चर्चा इथं होते.
इतिहास
प्रोफेसर क्लॉज श्वॉब यांच्या पुढाकारानं एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली आणि दरवर्षी एक बैठक घेतली जाऊ लागली. या बैठकीला युरोपीयन मॅनेजमेंट फोरमची बैठक असं म्हटलं जात असे.
सुरुवातीच्या काळात या बैठकीत, अमेरिकन कंपन्यांच्या स्पर्धेत युरोपीय कंपन्यांना कसा निभाव लागेल याबाबत चर्चा केली जायची, असं फोरमच्या वेबसाइटवर म्हटलं आहे.
नंतर त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला जगभरातून दाद मिळू लागली. या चर्चेचं स्वरुप अधिक व्यापक बनलं आणि त्याचं रुपांतर वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये झालं.
या ठिकाणी झालेल्या महत्त्वपूर्ण घटना
- 1973मध्ये झालेल्या ब्रिटन वूड्स फिक्स्ड एक्सचेंज रेट पद्धतीचं ऱ्हास आणि इस्राइल युद्धाची चर्चा फोरममध्ये झाली.
- 1974पासून या बैठकीत राजकीय नेते सहभाग घेऊ लागले. त्यानंतर जगभरातील 1000 प्रमुख कंपन्यांना सदस्यता त्यांना देण्याची पद्धत सुरू करण्यात आली.
- युरोपियन मॅनेजमेंट फोरम ही पहिली स्वयंसेवी संस्था होती ज्यांनी चीनच्या इकोनॉमिक डेव्हलपमेंट मिशनसोबत भागीदारी करण्यासाठी सुरुवात केली होती.
- 1979मध्ये फोरमनं ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह रिपोर्ट प्रसिद्ध केली. त्याबरोबरच जागतिक स्तरावर या फोरमची चर्चा झाली.
- 1987मध्ये युरोपियन मॅनेजमेंट फोरमचं नाव बदलून वर्ल्ड इकोनॉमिक फोरम असं ठेवण्यात आलं.
- 1988मध्ये दावोस घोषणापत्रावर ग्रीस आणि तुर्कस्थानच्या सह्या आहेत. हे दोन्ही देश त्यावेळी युद्धाच्या उंबरठ्यावर होते.
- त्यानंतर उत्तर आणि दक्षिण कोरियाची पहिली मंत्री स्तरावरील बैठक याच ठिकाणी झाली.
- या व्यतिरिक्त दावोस आणखी महत्त्वपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे. त्या ठिकाणी पूर्व जर्मनीचे पंतप्रधान हांस मोडरो आणि जर्मन चान्सलर हेलमुत कोहल यांनी जर्मनीच्या एकत्रीकरणावर चर्चा केली.
- 1992मध्ये दक्षिण अफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डे क्लर्क आणि नेल्सन मंडेला यांची चर्चा झाली होती. दक्षिण अफ्रिकेबाहेर झालेली या नेत्यांची ही पहिली बैठक होती आणि देशाच्या राजकारणातील हा महत्त्वाचा टप्पा मानला गेला.
- 2015 साली फोरमला आंतरराष्ट्रीय संस्थेचा दर्जा मिळाला.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








