ही बुरशी माणसाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवते, त्याचं शरीर पोखरायला सुरूवात करते आणि...

बुरशी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, इनसाइड हेल्थ प्रेझेंटर, बीबीसी रेडिओ 4

आज तुम्हाला अशा एका बुरशीची ओळख करून द्यायची आहे, जिच्या संपर्कात आल्याने माणूस झोम्बी

बनू शकतो...त्याचा स्वतःच्या मेंदूवरचा ताबा सुटू शकतो.

सुरुवातीच्या टप्प्यात हे जीवाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. तिथे त्यांची वाढ होते आणि ते माणसाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवतात. यामुळे त्या व्यक्तीचा स्वतःवरील ताबा सुटतो.

ही एक परपोषी प्रकारातील बुरशी असते. ती आपल्या शरीरात जाऊन शरीर पोखरायला सुरुवात करते. ती शरीरातील प्रत्येक पोषक घटक शोषून शरीराची विल्हेवाट लावायला सुरुवात करते.

एखाद्या भयपटातील सीनलाही भारी पडेल अशा पद्धतीने सर्व गोष्टी उलगडत असतात.

वर सांगितलेली माहिती तुम्हाला एखादया गोष्टीसारखी वाटेल. पण या बुरशीचं जग खूप मोठं आहे. ते एखादया वनस्पती किंवा प्राण्यांपेक्षा अगदी वेगळं आहे.

या बुरशीचं साम्राज्य मशरूमपासून भयानक अशा परपोषी जीवांपर्यंत पसरलंय.

बुरशी

फोटो स्रोत, HBO/WARNER MEDIA/LIANE HENTSCHER

या बुरशीच्या कॉर्डीसेप्स आणि ओफिओकॉर्डायसेप्स या प्रजाती वास्तविक आयुष्यातही अस्तित्वात आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सर डेव्हिड अ‍ॅटनबरो यांनी बीबीसीच्या प्लॅनेट अर्थ सिरीज मधील एका व्हिडिओत कॉर्डीसेप्स बुरशीच्या प्रजातीबद्दल माहिती दिली आहे. ही बुरशी एका मुंगीच्या शरीरात प्रवेश करून तिच्या शरीरावर कशाप्रकारे ताबा मिळवते याविषयी या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय.

झोम्बी बनलेल्या या मुंग्यांवर आधारित 'द लास्ट ऑफ अस' नावाचा एक व्हिडिओ गेम बनवण्यात आलाय. आता याच कथेवर आधारित एक टीव्ही सिरीज बनविण्यात आली अहे.

या टीव्ही सीरिज मध्ये कॉर्डीसेप्स बुरशीच्या संक्रमणाविषयी माहिती देण्यात आलीय. ही बुरशी मुंग्यांना आणि इतर कीटकांना संक्रमित करून माणसाच्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करते.

एकापासून दुसऱ्याला लागण होत होत ही बुरशी संपूर्ण मानवी समाजाला संक्रमित करते.आणि मानवी समाजाचा अंत होतो.

पण कॉर्डीसेप्स नावाच्या बुरशीमुळे किंवा अशा इतर कोणत्याही बुरशीमुळे मानवी समाजात एखादा साथीचा रोग येऊ शकतो का?

लंडनमधील ट्रॉपिकल डिसीज हॉस्पिटलमध्ये फंगल स्पेशालिस्ट म्हणून काम करणारे डॉ. नील स्टोन सांगतात की, "मला वाटतं आपण बुरशीजन्य संसर्गाकडे म्हणजेच फंगल इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करतोय."

"आपण आजवर या फंगल इन्फेक्शनला कमी लेखलंय. या इन्फेक्शन्सचा सामना करण्यासाठी आपण आजही तयार आहोत असं नाही." जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर 2022 मध्ये प्राणघातक बुरशीची पहिली यादी प्रसिद्ध केली होती.

यात अनेक नावं होती, मात्र झोंबी बनविणारी कॉर्डीसेप्स त्या यादीत नव्हती. ही सगळ्यांसाठीच दिलासादायक गोष्ट आहे.

कॉर्डीसेप्सचं त्या यादीत नाव का नाहीये?

डॉ. चरिसा बेकर, युट्रेच युनिव्हर्सिटीमध्ये मायक्रोबायोलिजिस्ट म्हणून काम करतात, त्यांनी कॉर्डीसेप्स बुरशी मुंग्यांवर कशाप्रकारे ताबा मिळवते याचा अभ्यास केलाय.

पण माणसांमध्ये अशी कोणती गोष्ट घडताना त्यांनी पाहिलेलं नाहीये.

त्या सांगतात की, आपल्या शरीराचं तापमान इतकं जास्त असतं की या उष्णतेमध्ये बहुतेक बुरशीचे प्रकार तग धरू शकत नाहीत. आणि कॉर्डिसेप्स बुरशीच्या बाबतीत सुद्धा तेच आहे.

त्या पुढे सांगतात की, "आपल्या आणि मुंग्यांच्या नर्व्हस सिस्टीममध्ये फरक आहे. मुंग्यांची आणि कीटकांची नर्व्हस सिस्टीम (मज्जासंस्था) फार गुंतागुंतीची नसते. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर नियंत्रण मिळवणं तुलनेने सोपं असतं. शिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील आपल्या तुलनेत वेगळी असते."

या परजीवी कॉर्डीसेप्सच्या अशा कित्येक प्रजाती आहेत ज्यांनी लाखो वर्षांपूर्वीच कीटकांना संक्रमित करण्याची क्षमता विकसित केलीय. आणि या बुरशीपासून संक्रमित झालेल्या कीटकांमुळे मानवांमध्ये संसर्ग पसरण्यासाठी या बुरशीमध्ये खूप मोठी उत्क्रांती व्हायला हवी, असं चरिसा बेकर सांगतात. यावर डॉ. स्टोन सांगतात की, बुरशीजन्य प्रजातींमुळे निर्माण होणारा संसर्ग फार पूर्वीपासूनच नाकारला गेलाय. लोकांना एकतर ते शक्य वाटत नाही किंवा ते त्यांच्यासाठी इतकं महत्वाचं नसतं.

बुरशी

फोटो स्रोत, Getty Images

बुरशीच्या लाखो प्रजातींपैकी काही मोजक्याच प्रजाती मानवांमध्ये रोगास कारणीभूत ठरतात. यातल्या काही प्रजातींमुळे अॅथलीट फूट किंवा नखांना संसर्ग होतो. त्या म्हणाव्या तितक्या धोकादायक नसतात. पण काही अत्यंत जीवघेण्या असतात.

बुरशीजन्य संसर्गामुळे दरवर्षी जगात 17 लाख लोकांचा मृत्यू होतो. मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा हे प्रमाण तिप्पट आहे.

यामध्ये कॅन्डिडा ऑरिस आणि मायक्रोमायसाइटिस नावाच्या बुरशीचा समावेश आहे. ही बुरशी आपल्या शरीरात वेगाने पसरते ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होतात.

डॉ नील स्टोन यांनी मला लंडनमधील हेल्थ सर्व्हिस लॅबमध्ये बोलावलं. तिथे त्यांनी मला काही ब्रिटिश रुग्णांचे नमुने दाखवले. या ठिकाणी या नमुन्यांचं विश्लेषण करण्यात आलं होतं. त्यांना बुरशीमुळे संसर्ग झालाय की नाही, त्यांच्यावर उपचार काय असू शकतात, बुरशीमुळे होणार्‍या काही प्रमुख धोक्यांचीही आम्ही चर्चा केली.

यातली पहिली बुरशी होती कॅन्डिडा ऑरिस. ही यीस्ट प्रकारातली बुरशी आहे. तुम्ही जवळ जाऊन वास घेतल्यास तुम्हाला दारूच्या भट्टीतून येणारा उग्र वास येईल.

या बुरशीचं मानवी शरीरात संक्रमण झाल्यास, ती सर्वप्रथम रक्तात प्रवेश करते आणि नंतर मज्जासंस्था आणि इतर अवयवांवर आक्रमण करते. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार, कॅन्डिडा ऑरिसची लागण झालेल्या अर्ध्याहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

15 वर्षांपूर्वी या बुरशीचं अस्तित्व आढळून आलं होतं आणि आता ती जगभर पसरल्याचं डॉ. स्टोन सांगतात.

2009 मध्ये टोकियो मेट्रोपॉलिटन जेरियाट्रिक हॉस्पिटलमधील एका रुग्णाच्या कानात ही बुरशी आढळून आली होती.

डॉ नील स्टोन

फोटो स्रोत, JAMES GALLAGHER

फोटो कॅप्शन, डॉ नील स्टोन

कॅन्डिडा ऑरिसवर अँटी-फंगल औषधांचा परिणाम होत नाही. बुरशीच्या काही प्रजाती सर्व प्रकारच्या औषधांना प्रतिरोधक असतात. यामुळेच याला 'सुपरबग' म्हटलं जातं.

या प्रकारच्या बुरशीचा प्रसार रुग्णालयांच्या संक्रमित जमिनींपासून होतो. ब्लड प्रेशर मॉनिटर्समध्ये घातलेल्या नळ्यांना ही बुरशी चिकटते. ती साफ करणं खूप कठीण असतं.

त्यामुळे वॉर्ड बंद ठेवणे हा मुख्य उपाय आहे. ब्रिटनमध्येही असंच घडलं होतं.

आम्हाला या बुरशीची काळजी नाहीये, पण जर का ती एकदा पसरली तर मात्र संपूर्ण वैद्यकीय प्रणाली बंद पडू शकते असं डॉ. स्टोन सांगतात.

आणखी एक घातक आणि धोकादायक बुरशी म्हणजे क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स. ही बुरशी लोकांच्या मज्जासंस्थेत प्रवेश करते. यामुळे मेंदूला ज्वर चढतो.

'मी यापेक्षा भयानक काही पाहिलं नव्हतं'

सिड आणि एली त्यांच्या हनीमूनसाठी कोस्टा रिकाला गेले होते. हनिमूनहून परतल्यानंतर काही दिवसांनी एली आजारी पडली.

सुरुवातीला तिचं डोकं दुखू लागलं, नंतर मळमळू लागलं. खूप जास्त उन्हात फिरल्यामुळे असं झालं असावं असं तिला वाटलं. पण नंतर तिला झटके येऊ लागले शेवटी तिला दवाखान्यात दाखल करावं लागलं.

सिड सांगतो की, "मी यापेक्षा भयानक काही पाहिलं नव्हतं"

स्कॅनिंगमध्ये तिच्या मेंदूला सूज असल्याचं दिसलं. हा क्रिप्टोकोकस फंगस असल्याची ओळख पटली. सुदैवाने, एलीने उपचारांना प्रतिसाद दिला. 12 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर ती कोमातून बाहेर आली.

सिड आणि एली

फोटो स्रोत, SID AND ELLIE

फोटो कॅप्शन, सिड आणि एली

एली सांगते, "मला फक्त माझं ओरडणं आठवतं."

या काळात तिला अनेक भ्रमांनी गाठलं होतं. यात तिला तीन मुलं आहेत, तिचा पती जुगारात सर्व पैसे हरलाय असे भ्रम तिला व्हायचे.

शेवटी तिने तिच्या पतीला त्यांचं नातं संपल्याचं सांगितलं.

आता एलीची प्रकृती ठीक आहे.

म्युकोरमायसिटीस या बुरशीला ब्लॅक फंगस असंही म्हणतात. यामुळे म्युकोरमायकोसिस नावाचा रोग होतो.

ही बुरशी लवकर पसरते. पेट्री डिशमध्ये ठेवली असता ती 24 तासांच्या आत इतकी वाढते की, पेट्री डिशचं झाकण आपोआप उघडतं. म्हणून तिला 'लिड लिफ्टर' असंही म्हणतात.

एचएसएलमधील क्लिनिकल सायंटिस्ट डॉ. रेबेका गॉर्टन सांगतात की, "तुमच्याकडे फळाचा तुकडा असेल तर दुसऱ्या दिवशी तो फक्त लगदा असेल कारण त्यात म्यूकोर-फंगस (म्युकोरमायसेट्स) असू शकतं.

त्या सांगतात की, असा संसर्ग मानवांमध्ये क्वचितच आढळतो. पण जर संसर्ग झालाचं तर मात्र तो एक अतिशय धोकादायक संसर्ग ठरतो. ब्लँक फंगस ही एक संधीसाधू बुरशी आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण आहे अशांमध्ये याचा चटकन संसर्ग होतो. ही बुरशी तुमच्या चेहरा, डोळे आणि मेंदूवर हल्ला करते.

ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो किंवा लोकांच्या शरीराला गंभीर नुकसान होऊ शकतं.

कोरोना साथरोगाच्या काळात भारतात ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला होता. याचा संसर्ग होऊन 4,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता.

कोरोनाच्या काळात घेतलेल्या स्टेरॉईड्समुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि या बुरशीचा संसर्ग होतो असं मानलं गेलं.

बुरशी

फोटो स्रोत, JAMES GALLAGHER

बुरशीचे संक्रमण जीवाणू किंवा विषाणूपेक्षा वेगळं असतं. जेव्हा जेव्हा आपण बुरशीजन्य संसर्गामुळे आजारी पडतो तेव्हा हा संसर्ग वातावरणातून झालेला असतो. खोकला किंवा शिंकल्यामुळे हा संसर्ग होत नाही.

आपण सतत बुरशीच्या संपर्कात असतो, पण संसर्ग व्हायला आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमजोर असावी लागते.

डॉ. स्टोन सांगतात की, बुरशीजन्य साथीचा प्रसार कोव्हिड साथरोगापेक्षा वेगळा असू शकतो. आणि यातून कोणत्याही लोकांना संसर्ग होऊ शकतो.

डॉ. स्टोन यांना असंही वाटतं की, अशा संसर्गाचा धोका वाढतोय कारण हवामानात होणारे बदल, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि उपचारांच्या बाबतीत होणारे दुर्लक्ष यामुळे वातावरणात बुरशीचा प्रसार वाढलाय.

बुरशी आपल्याला झोम्बी नाही बनवणार पण अधिक गंभीर समस्या निर्माण होतील हे मात्र नक्की.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)