'किलर फंगस' काय आहे? बुरशीच्या जीवघेण्या संसर्गापासून बचाव कसा करायचा?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
हवामान बदल हे शब्द ऐकले की, तुमच्या नजरेसमोर कोणतं दृश्य येतं? बहुतेकांना वाढती उष्णता, वादळं, वितळत्या हिमनद्या, जंगलातले वणवे आणि या सगळ्यानं शेतीचं होणारं नुकसान अशा गोष्टी आठवतील.
पण हवामान बदलाचा आणखी एक परिणाम आहे, ज्याची फार कमी चर्चा होते. तो म्हणजे वाढत्या तापमानामुळे फंगल आजार म्हणजे बुरशीमुळे पसरणारे आजार वाढू लागले आहेत.
विशेष म्हणजे थंड प्रदेशात जिथे बुरशी आधी फार आढळत नसे, तिथेही आता याचा प्रादुर्भाव वाढला आहे.
मॅन्चेस्टर विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार आधी केवळ उष्णकटीबंधीय देशांत आढळणाऱ्या किलर फंगसचा प्रादुर्भाव आता युरोपातही वाढू शकतो.
अशा फंगसमुळे अॅस्परगिलोसिस हा फुप्फुसांचा आजार होतो. दरवर्षी जगात अॅस्परगिलोसिसमुळे जवळपास 18 लाख जणांचा मृत्यू होतो.
आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतून आता उत्तरेकडील देशांमध्ये हा आजार पसरत चालला आहे, असा अंदाज आहे.
सेंटर फॉर इन्फेक्शस डिसीज अँड रिसर्च पॉलिसी या अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठाशी निगडीत संशोधन केंद्राच्या अभ्यासानुसार भारतातही दर वर्षी अडीच लाख जणांना अॅस्परगिलोसिस होतो आहे, ज्यात टीबी सारख्या आजाराच्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे.
अलीकडेच 'लास्ट ऑफ अस' नावाच्या टीव्ही शोमध्ये या आजाराचा उल्लेख झाला होता. त्यात एक फंगल आजार लोकांच्या मेंदूला नुकसान पोहोचवतो आणि त्यांना झाँबी बनवतो.
यात अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी फंगल आजार चिंतेची बाब नक्कीच बनले आहेत. मग किलर फंगसपासून म्हणजे जीवघेण्या बुरशीपासून आपला बचाव कसा करायचा?
आपल्या आसपासची फंगस
अडिलिया वारिस युकेमधल्या एक्सेटर विद्यापीठात लहान मुलांमधील संसर्गजन्य आजारांविषयीच्या प्राध्यापक आहेत.
त्या सांगतात की बुरशी किंवा फंगल पॅथोजेन्स आपल्या आसपास सगळीकडे असतात. मातीत बुरशी असते तशीच ती हवेत कित्येक मैलांपर्यंत दूर पसरू शकते.
फंगल आजाराची व्याख्या कशी करता येईल, हे आम्ही त्यांना विचारलं.
अडिलिया सांगतात, "फंगल आजार फंगल पॅथोजेन्समुळे होतात. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरस म्हणजे विषाणूंमुळे होणार्या आजारांसारखेच हे आजार आहेत.
"अॅथलीट्स फूट सारख्या फंगल आजारात थोडाफार प्रमाणात त्रास होतो. पण काही फंगल आजारात मेंदूलाही संस्रग होतो आणि ते जीवावर बेतू शकतं. फंगसमुळे त्वचेचा आजार होऊ शकतो.
"आसपासच्या वातावरणातील बुरशी नखांवर विशेषतः पायाच्या अंगठ्याच्या नखात पसरू शकते. म्हणजेच फंगल टो नेल तसंच अॅथलीट्स फूट सारखे आजार होऊ शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
अॅथलीट्स फूट या आजारात पायांना खाज सुटणे, पायाची त्वचा लाल होणे, कोरडी पडणे, बोटांमध्ये भेगा किंवा फोड येणे अशी लक्षणं दिसतात.
आपल्या पायाच्या तळव्यांना भेगा पडल्या असतील तर त्यात फंगस सहजपणे घर करून राहते. पण त्यामुळे थोडाफार त्रास होऊ शकतो, पण आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम सहसा होत नाही.
पण बुरशी आपल्या फुप्फुसांपर्यंत पोहोचली, तर मात्र जीवघेणी ठरू शकते.
अडिलिया वारिस सांगतात की हवेत पसरलेले बुरशीचे कण श्वासावाटे आपल्या फुप्फुसात जातात आणि तिथे वाढू लागतात.
"तंदुरुस्त लोकांना फंगल आजाराचा गंभीर त्रास होत नाही. पण काही रुग्णांच्या कमजोर रोगप्रतिकार क्षमतेचा फायदा बुरशीला उठवता येतो. अशा वेळी फंगसमुळे मोठं नुकसान होऊ शकतं."
त्यामुळेच कोव्हिडच्या साथीच्या काळात म्युकर मायकोसिससारख्या बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला होता.
पण बुरशीचा एक गट असा आहे, जो त्वचेवर वाढत नाही किंवा फुप्फुसांत घुसत नाही. तर आधीपासूनच ही बुरशी शरिरात असते.
ही बुरशी म्हणजे एक प्रकारचं यीस्ट असतं, जसं की कँडिडी अल्बिकान्स.

फोटो स्रोत, Getty Images
अडिलिया माहिती देतात, "बहुतांश निरोगी लोकांच्या पोटात यीस्ट असतं, ज्यामुळे पचनात मदत होते. पण अनेकदा हे यीस्ट पोटातून निघून रक्तात मिसळू लागतं आणि संसर्ग पसरतो.
"सामान्यतः शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली असते, तेव्हा असं होतं. किंवा एखाद्या ऑपरेशन किंवा जखम झाल्यानं अवयवांचं नुकसान होतं, तेव्हा बुरशी संसर्ग होऊ शकतो.
"कँडिडाचा संसर्ग रक्तात झाला तर बॅक्टेरियल आजारासारखी स्थिती निर्माण होते. रुग्णांना सेप्टीसीमिया होतो आणि त्यांना आयसीयूमध्ये ठेवून उपचार करावे लागतात."
म्हणजे आपल्या आसपास आणि शरीरातही अनेक प्रकारची बुरशी असते. मग काहीवेळा त्यामुळे एवढा त्रास का होतो?
बुरशीचं 'परफेक्ट स्टॉर्म'
रीटा ओलोडेली नायजेरियाच्या लागोस विद्यापीठात क्लीनिकल बायोलॉजीच्या प्राध्यापक आहेत. त्या सांगतात की फंगल आजारांचं वाढतं संक्रमण सर्वांसाठीच एक चिंताजनक गोष्ट आहे.
"सर्वांनीच याचं गांभीर्य समजून घ्यायला हवं. कोव्हिडच्या काळातला अनुभव विसरता येणार नाही.
"फंगल आजारांचा संसर्ग पूर्वीच्या तुलनेत खूप वाठला आहे. पृथ्वीचं वाढतं तापमान हेही याचं एक कारण आहे. फंगल पॅथोजेन्स उष्णतेत अगदी सहजपणे वाढतात. त्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे."

जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाविषयी आपण चर्चा करूच, पण त्याआधी आणखी एका कारणावर विचार करणं गरजेचं आहे.
वैद्यकीय शास्त्राचा आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला, तसं आपलं आयुर्मान वाढलं आहे. माणूस आता जास्त वर्ष जगू शकतोय.
पण त्यामुळेच आपण अशा आजारांना सहज बळी पडू लागलो आहोत का?
रीटा ओलोडेली हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे, ते सांगतात.
"वैद्यकीय तंत्रज्ञान अगदी प्रगत झालं आहे आणि अनेक औषधंही उपलब्ध आहेत, ज्यामुळे आता गंभीररित्या आजारी रुग्ण किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्तीही जास्त काळ जगू शकतात.
"अशा लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन सहज पसरू शकतं. रुग्णांमध्ये अवयव प्रत्यारोपण केले जाते, पण शस्त्रक्रियेनंतर त्यांची रोग प्रतिकार शक्ती घटते.
"कँसरच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती केमो थेरपीमुळे घटलेली असते. अशा रुग्णांना सहजपणे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं."

पण मग ग्लोबल साऊथ म्हणजे आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील गरीब आणि विकसनशील देशांमध्ये पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत परिस्थिती कशी आहे?
तिथे या फंगल आजारांचं निदान करण्याच्या आणि त्यावर उपचाराच्या सुविधा कमी आहेत का?
रीटा ओलाडेली सांगतात की दोन्हीमधला फरक खूप मोठा आहे.
"ग्लोबल साउथमध्ये फंगल आजारांचं निदान आणि उपचारासाठी अँटी फंगल औषधं, या दोन्हीची टंचाई आहे. सब सहारन आफ्रिकेत खरंतर एड्सच्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
"पण फंगल आजारांवर तेवढ्या सुविधा नाहीत. त्यामुळे ग्लोबल साऊथमध्ये फंगल आजारांच प्रादुर्भाव वाढतो आहे."
"उष्णकटीबंधीय प्रदेशात आणि जिथे एचआयव्ही एड्सच्या रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा देशांत फंगल इन्फेक्शनचं प्रमाण जास्त आहे.
"कारण एड्समुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि फंगसला शरिरात पसरणं सोपं जातं."
जागतिक तापमानवाढीमुळे आता उष्णकटीबंधीय प्रदेशातच नाही, तर उत्तरेकडील देशांतही उष्णता वाढते आहे आणि त्यासोबतच फंगल इन्फेक्शनचा धोकाही वाढू लागला आहे.
वाढतं तापमान
आर्टूरो कासाडेवाल अमेरिकेतील जॉन ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये मोलेक्युलर बायॉलॉजी आणि इन्यमूनॉलॉजीचे प्राध्यापक आहेत.
आर्टुरो सांगतात की जसजसं पृथ्वीचं तापमान वाढेल, तसा फंगल आजारांचा संसर्ग अशा जागीही पसरत जाईल जिथे आधी हे आजार नसायचे.
"सगळे सजीव आपल्या आसपासच्या वातावरणाशी जुळवून घेणं शिकतात. पृथ्वीवरचं तापमान जसं वाढतं आहे, त्यामुळे अनेक आजार पसरू शकतात.
"अनेक जीव असे आहेत जे तापमान सामान्य असताना झाडं आणि मातीत वाढत असतात.
"ज्यांच्याविषयी आजवर वैद्यकीय शास्त्राला अजिबात माहितीही नाही,अशा फंगल आजारांचा प्रादुर्भावही वाढत्या तापमानासोबत वाढू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
हवामान बदल हा एक मोठा विषय आहे. नेमकं कोणत्या प्रकारचं तापमान फंगस वाढण्यासाठी जास्त अनुकूल आहे, हेही पाहावं लागेल.
त्यातून हे समजून घेता येईल की भविष्यात जगाच्या कोणत्या भागात फंगसचा प्रादुर्भाव वाढणार आहे.
"बुरशी वाढण्यासाठी आर्द्रता म्हणजे दमट हवा गरजेची असते. पावसानंतर जंगलात ओल्या कचऱ्यावर जशी अळंबी म्हणजे मश्रूम उगवते ना, तसंच फंगसही भरपूर पाणी असतं तेव्हा वाढते," असं आर्टुरो सांगतात, "जिथे दमटपणा जास्त, तिथे फंगस वाढण्याचा वेग जास्त.
"पृथ्वीचं तापमान वाढत जाईल, तसं काही ठिकाणी वाळवंट पसरत जाईल तर काही ठिकाणी अतीवृष्टी होऊ लागेल. दोन्ही मुळे फंगसच्या वाढीवर परिणाम होईल.
"उदाहरणार्थ, अमेरिकेच्या नैऋत्य भागातील वाळवंटात कुकसिडियोडिस इमिटस नावाच्या एका फंगसमुळे होणाऱ्या आजाराचा प्रसार होतोय.
"वाळवंट वाढत जातंय, तसं या फंगसच्या उपप्रजातीही तयार होत आहेत. थोडक्यात दमट हवा आणि हवामान बदलाचा फंगसचा प्रसार होण्यावर परिणाम होतो आहे."

फोटो स्रोत, Getty Images
आर्टूरो कासाडेवाल आणि त्यांच्या टीमनं संशोधनातून एक मॉडेल तयार केलं आहे.
त्यातून हे लक्षात येतं की उष्ण प्रदेशांत वाढणाऱ्या फंगसनं थंड प्रदेशातील फंगसपेक्षा वाढत्या तापमानाशी जास्त चांगल्या पद्धतीनं जुळवून घ्यायला सुरुवात केली आङे.
म्हणजे ऋतूनुसार, हवामानानुसार फंगस स्वतःमध्ये बदल करू शकतात आणि हे जगभरात घडू शकतं.
तर बाहेरच्या, हवेच्या तापमानासोबतच शरिराचं तापमानही बदलतंय. आता मानवी शरीर पूर्वीपेक्षा थंड होऊ लागलं आहे.
आधी आपलं शरीर इतकं गरम व्हायचं की फंगस त्यात वाढणं कठीण जायचं. पण गेल्या काही दशकांत मानवी शरिराचं तापमान घटलं आहे.
आर्टुरो माहिती देतात, "आपल्या शरिराचं तापमान सामान्यतः 37 अंश असायचं. त्या तापमानात फंगस वाढणं कठीण होतं.
"त्यामुळे ज्यांना फंगल आजार व्हायचे, त्यांनाही प्रामुख्यानं नखाखाली संसर्ग व्हायचा, कारण तिथे तापमान तुलनेनं कमी असतं."

शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेत मानवी शरीराचं सामान्य तापमान आता एक अंशानं कमी झालं आहे, असं आर्टुरो नमूद करतात.
त्यामुळेही माणसांना आता फंगल आजारांचा त्रास जास्त होऊ लागला आहे. आधी लोकांना टीबी आणि इतर संसर्गजन्य रोग व्हायचे, ज्यामुळे शरीरात सूज यायची आणि शरीराचं तापमान वाढायाचं
आता आधुनिक औषधांच्या मदतीनं या आजारांना आळा घातला गेला, तसं शरीराचं तापमानही कमी झालं आहे. त्यामुळे फंगल आजार पसरणं सोपं जाऊ लागलं आहे.
पण पृथ्वीचं तापमान वाढू लागल्यावर आता आपण स्वतःचं फंगल आजारांपासून रक्षण कसं करायचं?
बुरशीचा प्रतिकार
फंगल आजारांवर उपचारासाठी प्रामुख्यानं वापरल्या जाणाऱ्या औषधांना एझल (azole) म्हणून ओळखलं जातं. औषधांसोबतच शेतीमध्येही त्यांचा वापर केला जातो.
पण या रसायनांचा वापर आता एवढा वाढला आहे की फंगसनं त्यावर मात करून स्वतःचं रक्षण कसं करायचं हे शिकून घेतलं आहे.
मायकल ब्रॉमली त्याविषयी अधिक माहिती देतात. ते युकेच्या मॅन्चेस्टर विद्यापीठात फंगल आजारांचे प्राध्यापक आहेत.
"सामान्यतः हॉस्पिटलमध्ये फंगल आजारांवर उपचारासाठी एझल प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो.
"पण आम्हाला असं दिसून आलं आहे की फंगसवर आता ही औषधं पूर्वीसारखी प्रभावी ठरत नाहीत. कारण या औषधाचा सामना करण्याची त्यांची क्षमता वेगानं वाढते आहे.
"पर्यावरणात मोठ्या प्रमाणात फंगीसाईड किंवा बुरशीनिरोधक औषधांचं बेसुमार प्रमाण वाढल्यानं असं झालंय. पिकांचं बुरशीपासून रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही औषधं फवारली जातात."

फोटो स्रोत, Getty Images
शेतीत बुरशीविरोधी औषधांचा बेसुमार वापर होऊ लागला, तसं या औषधांचा सामना कसा करायचा हे बुरशीनं शिकून घेतलं आहे.
अस्परगिलस फंगस या बुरशीमुळे खाद्य पदार्थ खराब होतात आणि सडू लागतात.
मायकल ब्रॉमली सांगतात, "युरोपात दरवर्षी शेतात तब्बल दहा हजार टन फंगीसाईडची फवारणी केली जाते. आस्परगिलस ही बुरशी मातीत आणि अन्नपदार्थांवर वाढते.
"मोठ्या प्रमाणागत फंगीसाईडच्य वापरामुळे या जीवानं फंगीसाईड्ससोबत लढण्याची क्षमता विकसित केली आहे. त्यामुळे रुग्णालयात फंगल आजारांवर एझल्सचा वापर केला जातो, तेव्हा त्या औषधांचा आस्परगिलसवर मात्र खास परिणाम होताना दिसत नाही."
मग आता यावर उपाय काय आहे? मायकल ब्रॉमली सांगतात की काही लोक शेतात फंगीसाईड्सच्या वापरावर निर्बंध लादण्याची मागणी करतायत.
पण तसं केलं तर मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होईल आणि अन्नाचं उत्पादन घटेल.

ब्रॉमली स्वतः या औषधांना पर्याय शोधण्याच्या कामात उतरले आहेत. ते दावा करतात की त्यांनी बनवलेली रासायनं फंगसच्या डीएनएवरच परिणाम करतात. त्यामुळे फंगसच्या पेशी वाढूच शकत नाहीत.
फोस्मानोजेपिक्स हे रसायन फंगसला रोखू शकते. इतर अँटी फंगल औषधांपेक्षा हे थोडं वेगळं आहे.
मायकल सांगतात, "याचे अँकर्स फंगसच्या पेशीतील प्रोटिन्सवर स्वार होतात. औषधाचा असर सुरू होतो तेव्हा प्रोटिन जिथे जायचं तिथे पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे फंगसच्या पेशी मग जीवंत राहू शकत नाहीत."
हे औषध येत्या काही वर्षांत उपलब्ध होईल, असं संशोधक सांगतात.
अस्पगिलोसिस हा एक खतरनाक आजार आहे, ज्यामुळे दरवर्षी हजारो लोक मरतायत. माती आणि हवेत असलेला हा फंगस लोकांच्या फुप्फुसात जातो.
पण नव्या औषधांचा वापर करून या बुरशीला वातावरणात पसरण्यापासून रोखलं, तर ते फायद्याचं ठरेल.
आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात. आपण जीवघेण्या बुरशीचा प्रसार रोखू शकतो का?
काही फंगल आजार सामान्य असतात. पण काही जीवघेणे ठरतात. फंगल आजारांचं निदान कठीण असतं, कारण त्याची लक्षणं इतर अनेक आजारांसारखी दिसतात.
योग्य उपकरणं नसतील तर निदान करणंही कठीण जातं. फंगस फक्त आपल्या शरीरातच नाही तर हवेत, वातावरणातही आहे.
वाढत्या लोकसंख्येसोबत अन्नाची मागणी वाढते आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पिकांचं रक्षण करणं गरजेचं आहे. त्यामुळे फंगीसाईड वापरणं आवश्यक बनलं आहे.
पण फंगल आजारांवर त्याचा दुष्परिणाम होतो आहे. दरम्यान या आजारावर उपाय म्हणून नवी औषधं तयार केली जात आहे.
म्हणजे बुरशीला आळा घालणं निश्चितच शक्य आहे. पण आपण हे लवकर साधू शकू का, हा प्रश्नच आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











