मशरूम विषारी आहे की नाही, हे कसं ओळखायचं?

फोटो स्रोत, BBC
- Author, शालिनी कुमारी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
भारतात मशरूम खाण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे, लोकांच्या घरातील आवडींच्या भाज्यांमध्ये मशरूम जागा घेत आहे. पण दुकानातून मशरूम घेण्याऐवजी काही लोक जंगलातून मशरूम आणायला जातात. अशा वेळी अनेक वेळा विषारी मशरूम खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येतात.
अशीच एक ताजी घटना आसाममधून समोर आली आहे. जिथे विषारी मशरूम खाल्ल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (एएमसीएच) चे अध्यक्ष डॉ. प्रशांत दिहिंगिया यांनी सांगितलं की, त्या सर्व पीडितांनी त्यांच्या घरात सामान्य मशरूम समजून जंगली विषारी मशरूम खाल्ले होते ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. दिहिंगिया म्हणाले की, "या सर्वांना हे मशरूम खाल्ल्यानंतर मळमळ, उलट्या आणि पोटदुखी सुरू झाली होती. यानंतर त्यांची तब्येत जास्त बिघडल्यावर त्यांना उपचारासाठी एएमसीएच मध्ये आणण्यात आलं."
डॉ. दिहिंगिया यांनी सांगितलं की, दरवर्षी अशी प्रकरणं घडतात आणि जास्तीत-जास्त प्रकरणं ही चहाच्या बागा असलेल्या परिसरातून समोर येतात.
ते म्हणतात, "अनेकदा लोकांना जंगली मशरूम आणि सामान्य मशरूममधील फरक समजत नाही, म्हणून ते चुकीने विषारी मशरूम खातात. लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे, मात्र सध्या या विषयावर फारसे काम केलं जात नाही."
शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो?
हे विषारी मशरूम खाल्ल्याने होणाऱ्या समस्याबद्दल बोलतांना डॉ. दिहिंगिया म्हणाले, "काही मशरूम असे असतात की, ज्यांचा यकृत आणि किडनीवर परिणाम होतो. काहीवेळा रुग्ण खूप उशिरा रुग्णालयात पोहोचतात आणि औषधे घेऊनही त्यांचे जीव वाचत नाहीत."
त्यांनी सांगितले की, काही प्रकरणांमध्ये मशरूमच्या विषाचा प्रभाव शरीरात लगेच दिसून येत नाही. पण, 4-5 दिवसांनी त्याचा परिणाम हळूहळू दिसून येतो.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या इंडियन फार्मर्स डायजेस्ट या संस्थेच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये मशरूमांच्या सारख्या रंगांमुळे आणि समान दिसण्यामूळे विषारी मशरूम ओळखण्यामध्ये चूक होते.
या मशरूममध्ये आढळणारा सर्वांत घातक पदार्थ म्हणजे एमानिटिन. तो डेथ कॅप आणि डेस्ट्रॉइंग एंजल नामक मशरूममध्ये आढळतो. याव्यतिरिक्त, हे लहान तपकिरी मशरूममध्ये देखील आढळते. एमानिटिन घटक असलेल्या मशरूममुळेच बहुतेक लोकांचे मृत्यू ओढावतात.
विषारी मशरूम ओळखण्यात चूक कशी होते?
आयसीएआर संस्थेच्या मते, विषारी मशरूम ओळखणं कठीण आहे. मशरूमशी संबंधित काही लक्षणं आहेत, ज्यांच्या मदतीने लोक विषारी मशरूम ओळखण्यात यशस्वी होतात. पण संस्थेच्या मते, या गृहितकांच्या आधारे विषारी मशरूम निश्चितपणे शोधणं शक्य होत नाही.
यापैकी एक पद्धत म्हणजे मशरूमच्या रंगावरून मशरूम विषारी आहे की नाही हे शोधणं.

असं मानलं जातं की चमकदार रंगाचे मशरूम हे विषारी असतात. पण, जगातील बहुतेक विषारी मशरूम हे तपकिरी किंवा पांढऱ्या रंगाचे असतात. डेस्ट्रॉइंग एंजल मशरूमचा रंग पूर्णपणे पांढरा असतो. एमानिटिन असलेले मशरूम चमकदार नारिंगी किंवा पांढरे रंगाचे असू शकतात.
लोकं असंही मानतात की, जेव्हा विषारी मशरूम चांदीमध्ये मिसळतात तेव्हा चांदीचा रंग काळा पडतो. पण, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. यासोबतच लोकं हे देखील समजत होते की जर मशरूमची टोपी टोकदार असेल तर ती विषारी आहे, पण जर आपण डेथ कॅप मशरूमबद्दल बघितलं तर त्याचा आकार टोकदार नसून गोलाकार असतो.
मशरूम ओळखतांना ही काळजी घ्या
क्लिनिकल न्यूट्रिशिअनिस्ट डॉ. नुपूर म्हणतात की, काहीवेळा लोक जेवणाची सुरुवात म्हणून मशरूम खातात आणि काही लोक मशरूमचे पदार्थ दारू पितांना खातात, जे आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात.
त्यांनी असंही सांगितलं की, "काही वेळा सामान्य मशरूम खाल्ल्याने देखील अन्न विषबाधा होऊ शकते. मशरूम 7 वर्षांपेक्षा लहान मुलांना देऊ नये कारण त्यांच्या शरीरात मशरूम पचवू शकणारे नसतात."
डॉ. नुपूर सांगतात की, तुम्ही बाजारातून मशरूम विकत घेत असताना ते कडक असलं पाहिजेत. त्यात कोणत्याही प्रकारचा ओलावा नको. तसेच, मशरूम प्लास्टिकमध्ये ठेवू नये कारण ते मशरूमसाठी हानिकारक असू शकतं.
त्या असंही सांगतात की, जर तुम्ही ताजे मशरूम तोडून आणले असेल तर ते 48 तासांच्या आत खायला हवे.
त्या म्हणाल्या, "मशरूमचं उत्पादन नेहमी नियंत्रित वातावरणात घेतले जातं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मशरूमला जंगलात तोडून खाऊ शकत नाही कारण ते धोकादायक असू शकतात."
मशरूम इतके खास का आहेत?
मशरूम म्हणजे काय? डॉ. नुपूर यांनी सांगितले की, हा एक बुरशीचा प्रकार आहे जो हवेतून पसरणारे जीवाणू तयार करतो. मशरूम प्रामुख्याने माती किंवा लाकडावर वाढतात.
मशरूम अनेक वर्षांपासून खाल्ले जात आहेत. आजकाल ते जास्त प्रचलित आहे कारण ते आरोग्यासाठी चांगले मानले जातात. मशरूमध्ये कोलेस्टेरॉल आणि फॅट नसतात. याशिवाय पोटॅशियम, व्हिटॅमिन डी, फायबर, सेलेनियम यांसारखे पोषक घटकही मशरूममध्ये असतात.
त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. काही जाती अशा आहेत की त्या डीएनएचे नुकसान रोखतात आणि कर्करोगाशी लढणारी भिंत तयार करतात.
अल्झायमरसारख्या आजारांशी लढण्यासाठी मशरूम देखील उपयुक्त ठरू शकतात असे काही जाणकार सांगतात.
मशरूमच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. पण यापैकी फक्त 25 प्रजाती आपण खाऊ शकतो. भारतात मशरूमचे उत्पादन सुमारे 1970 च्या शतकापासून सुरू झाले.
2012 च्या कृषी वर्षाच्या पुस्तिकेनुसार, जवळपास 1000 वर्षांपूर्वी, चीनमधील लोकांनी मशरूमचं उत्पादन सुरू केलं होतं. पण, जे लोक त्याचा व्यापार करतात ते युरोपमधील होते. त्यांनी सोळाव्या आणि सतराव्या शतकात बटन मशरूम उत्पादनास सुरुवात केली होती.
मशरूमची लागवड कशी केली जाते?
सरकारी आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये भारतात 201,088 टन मशरूमची लागवड झाली होती. सर्वाधिक लागवड हरियाणात (20050 टन) झाली आहे. या यादीत हरियाणानंतर ओडिशा आणि महाराष्ट्राचंही नाव आहे.
जागतिक आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर, आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या 2018 च्या आकडेवारीनुसार चीनचा क्रमांक वरचा आहे. त्यानंतर अमेरिका आणि नेदरलँड्सचा क्रमांक लागतो.
बटन मशरूम आणि ऑयस्टर मशरूम भारतात अधिक लोकप्रिय आहेत. पॅडी स्ट्रॉ मशरूम आणि मिल्की मशरूमसुध्दा भारतात मिळतात. जर आपण बटन मशरूमबद्दल बोललो तर, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानुसार, हिवाळ्याच्या हंगामात हे मशरूम पारंपरिकपणे उत्तर-पश्चिम प्रदेश किंवा भारतातील पर्वतांमध्ये घेतले जातात. यास 6 ते 9 महिने लागतात. पण आता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ते कोणत्याही हंगामात आणि कुठेही पिकवता येते.
ऑयस्टर मशरूम एका वर्षात 6 ते 8 महिने मध्यम तापमानात म्हणजे 20 ते 30 अंश सेल्सिअस मध्ये वाढतात. उन्हाळ्यातही त्याची लागवड करता येते. कच्चा माल आणि आवश्यक सुविधा सहज उपलब्ध असलेल्या ग्रामीण भागात या मशरूमची लागवड अतिशय सोपी आणि किफायतशीर आहे.
मशरूम लागवडीसाठी कंपोस्ट खत तयार करावे लागते. ही खते खास पद्धतीने बनवली जातात, त्यात गव्हाचा भुसा आणि कोंबडीच्या खतासह इतर गोष्टींचाही वापर केला जातो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








