खालिदा झिया यांचे पती झियाउर रहमान सत्तेत कसे आले होते? बांगलादेशात तुरुंगात हत्याकांड का झालं होतं?

    • Author, मीर साबिर
    • Role, बीबीसी बांगला

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत देशाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या अनेक कुटुंबीयांची हत्या करण्यात आली आणि देशात अराजकता निर्माण झाली.

त्यानंतर तीन महिन्यांनी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशात एकदा नाही, तर दोनदा सत्तापालट झाला. ही त्याच रक्तरंजित संघर्षाची कहाणी आहे.

सत्तापालटाची सुरुवात

15 ऑगस्ट 1975 रोजी शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्याकांडानंतर लगेचच खांडकर मुश्ताक अहमद यांनी त्या हत्येशी संबंधित प्रमुख लोकांसह सत्ता ताब्यात घेतली. पण मुश्ताक प्रमुख असले, तरी हत्याकांडात सहभागी असलेले लष्करी अधिकारी त्यांच्यापेक्षा जास्त ताकदवान होते.

त्यावेळी झियाउर रहमान यांना लष्करप्रमुख बनवण्यात आलं होतं, पण बंगभवन या राष्ट्रपतींच्या निवासस्थानातून सैन्यातले काही मेजरच बहुतांश कारभारावर नियंत्रण ठेवून होते.

अवघ्या तीन महिन्यांत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालट झाला. त्यामागे अनेक कारणं होती. पण तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, 15 ऑगस्टच्या हत्याकांडानंतर निर्माण झालेल्या अराजकतेचाच हा परिणाम होता.

लष्करातील अनेकांना कनिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी केलेले शक्तीप्रदर्शन स्वीकारणे शक्य नव्हते. याशिवाय आणखीन एक संघर्ष होता जो बांगलादेशच्या मुक्ती संग्रामावेळी सुरू झाला होता.

लष्करातील अंतर्गत कलह

बांगलादेश मुक्तिसंग्रामात लष्कराचे तीन अधिकारी खूप लोकप्रिय झाले होते. हे तीन लष्करी अधिकारी होते, झियाउर रहमान, खालिद मुशर्रफ आणि के एम शफीउल्लाह.

ढाक्यात त्यावेळी मेजर स्तरावर काम करणारे निवृत्त ब्रिगेडियर सखावत हुसेन सांगतात की, युद्धानंतर या तीन अधिकाऱ्यांनी लष्करात तीन प्रभाव क्षेत्रं निर्माण केली होती.

"हा संघर्ष आधीपासूनच होता. पण 15 ऑगस्टनंतर, तो चव्हाट्यावर आला. जनरल शफीउल्लाह जवळपास बाहेरच फेकले गेले आणि जनरल झिया अंतर्गत वर्तुळात आले. त्यानंतर जनरल झिया आणि ब्रिगेडियर खालिद यांच्यातली चढाओढ वाढली."

15 ऑगस्टच्या हत्याकांडानंतर सुमारे दहा दिवसांनी मेजर जनरल के एम शफीउल्लाह यांना लष्करप्रमुख पदावरून हटवण्यात आलं. बीबीसीशी बोलताना शफीउल्लाह म्हणाले होते की त्यानंतर ते कोणत्याही गोष्टीत सहभागी नव्हते आणि त्यांना लष्करप्रमुखांच्या निवासस्थानी नजरकैदेतच ठेवण्यात आलं होतं.

त्यावर्षी नोव्हेंबरमधल्या घटना या खालिद मुशर्रफ आणि झियाउर रहमान यांच्यातील परस्पर संघर्षाचा परिणाम असल्याचं शफीउल्लाह यांचं मत आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, "आपलं भविष्य अंधारात असल्याचं लक्षात आल्यावर खालिद मुशर्रफ यांना झियाउर रहमान यांना हटवायचं होतं. त्यानुसार त्यांना हटवून नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि स्वत: चीफ ऑफ स्टाफ बनले. पण शेवटी ते या पदावर राहिले नाहीत. आणि त्याचमुळे 7 तारखेला झियाउर रहमान यांनी ताहिरला सोबत घेऊन खालिद मुशर्रफ यांना हटवलं."

शफीउल्लाह तिथे उपस्थित नव्हते पण सैन्यात वाढत असलेला तणाव त्यांना दिसत होता. खालिद मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली सत्तापालटाची पार्श्वभूमी तिथूनच तयार करण्यात आली.

सत्तापालट आणि 3 नोव्हेंबरचे तुरुंगातील हत्याकांड

3 नोव्हेंबरच्या दिवशी सुरुवातीलाच दोन घटना घडल्या ज्यामुळे बांगलादेशचा इतिहास बदलला. यातील एक होतं सत्तापालट आणि दुसरं म्हणजे ढाक्याच्या तुरुंगातील हत्याकांड.

मध्यरात्रीनंतर खालिद मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तापालट झाला आणि तत्कालीन लष्करप्रमुख झियाउर रहमान यांना कैद करण्यात आले.

ढाका कॅन्टोन्मेंटमधून पायदळाची एक तुकडी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला म्हणजे बंगभवनला वेढा घालण्यासाठी आली आणि सैन्याच्या दुसर्‍या तुकडीने रेडिओ स्टेशन ताब्यात घेतले.

ब्रिगेडियर सखावत हुसेन सांगतात की, बंगभवनच्या आजूबाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लष्करी जवान जमा झाले, की त्यामुळे मेजर दलीम आणि मेजर नूर यांच्यासह आत उपस्थित असलेल्या कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याला प्रत्युत्तरादाखल कारवाई करता आली नाही. त्यादरम्यान लष्कराची लढाऊ विमानंही आकाशात घिरट्या घालत होती.

ते सांगतात, "जेव्हा बंगभवनावरून दोन- तीन विमानं उडू लागली तेव्हा त्यांना कळून चुकलं की आता आपल्याकडे वेळ नाहीये आणि आपण आत्मसमर्पण केलं पाहिजे."

त्या दिवशी सकाळपासूनच समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मेजर दलीम आणि मेजर नूर यांनी अनेक वेळा कॅन्टोन्मेंटमध्ये जाऊन खालिद मुशर्रफ यांची भेट घेतली. दिवसभराच्या अनेक फेऱ्यांनंतर संध्याकाळी या लोकांनी देश सोडून जावं असं ठरलं.

त्याच रात्री बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांना थायलंडला जाण्याची परवानगी देण्यात आली.

दुसरीकडे मध्यवर्ती कारागृहात त्याच रात्री एक हत्याकांड घडलं. काही लष्करी अधिकाऱ्यांनी चार राजनेत्यांची हत्या केली. त्यात 1971 च्या निर्वासित सरकारचे कार्यकारी अध्यक्ष सय्यद नजरुल इस्लाम, पंतप्रधान ताजुद्दीन अहमद, तत्कालीन सरकारचे अर्थमंत्री एम मन्सूर अली आणि गृहमंत्री एएचएम कमरुझमा यांची हत्या केली.

ढाका मध्यवर्ती कारागृहाचे तत्कालीन जेलर अमिनूर रहमान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, रात्री 1 ते 1.30 च्या दरम्यान काही लष्करी अधिकारी पिकअप व्हॅनमधून तुरुंगाच्या गेटवर पोहोचले. तत्कालीन आयजी (तुरुंग) देखील तिथे पोहोचले. काही वेळाने त्यांच्या कार्यालयातील फोन वाजला.

रहमान सांगतात, "मी फोन उचलताच दुसऱ्या बाजूने सांगण्यात आलं की, राष्ट्रपती आयजी साहेबांशी बोलू इच्छितात. संभाषण संपताच आयजी म्हणाले की, राष्ट्रपतींनी फोन केला होता आणि लष्करी अधिकारी जसं सांगतील तसं तुम्ही करा.”

त्यानंतर आयजींनी अमिनूर रहमान यांच्या हातात एक कागद दिला ज्यावर चार लोकांची नावं लिहिलेली होती. त्या सर्वांना एका ठिकाणी गोळा करायला सांगितलं.

रहमान सांगतात की, "सय्यद नजरुल इस्लाम आणि ताजुद्दीन एका खोलीत होते आणि बाकीचे दोघे दुसऱ्या खोलीत होते. मी विचार केला काही बातचीत होणार असेल तर ओळख करून द्यावी. मन्सूर अली सर्वात उजवीकडे होते, त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी म... उच्चारताच गोळी झाडण्यात आली. गोळी मारताच ते लोक उघड्या गेटमधून पळून गेले."

सखावत हुसेन सांगतात की, या तुरुंगातील हत्याकांडाची बातमी लगेच पसरली नाही. याबाबतची माहिती 4 नोव्हेंबरला सकाळी लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली.

जसद जन वाहिनी सक्रिय झाली

3 नोव्हेंबरनंतर काही दिवसांत जातीय समाजतांत्रिक दल किंवा जसद जन वाहिनी सक्रिय झाली. कर्नल ताहिर यांच्या नेतृत्वाखालील या जनआंदोलनाने पुढच्या सत्तापालटात महत्त्वाची भूमिका बजावली.

कर्नल ताहीर यांचा भाऊ आणि जन वाहिनीचे तत्कालीन ढाका महानगर प्रमुख प्राध्यापक अन्वर हुसैन सांगतात की, "कर्नल ताहिर यांना खालिद मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाची माहिती झियाउर रहमान यांच्याकडून मिळाली होती. झियाउर रहमान यांनी 3 नोव्हेंबरच्या सकाळी कर्नल ताहीर यांना फोन केला. त्यांनी ताहिर यांना सांगितलं की मला कैद केलं असून माझ्या जीवाला धोका आहे."

हुसेन सांगतात की, झियाउर रहमान यांचं टेलिफोन कनेक्शन तोडण्यात आलं होतं. पण एक समांतर लाईन चालू असल्यामुळे त्यांना फोन करणं शक्य झालं.

कर्नल ताहिर यांनी 1972 मध्ये लष्करी पदाचा राजीनामा दिला आणि पुढे ते थेट जसदच्या माध्यमातून राजकारणात उतरले. या काळात लष्करी संघटना आणि लष्करी जवानांसह जन वाहिनीची उभारणी केली गेली. पण त्यावेळी हे प्रकरण सार्वजनिक नव्हतं.

प्राध्यापक अन्वर हुसेन सांगतात की, 3 नोव्हेंबरला कर्नल ताहिर नारायणगंजहून ढाक्याला पोहोचले. त्यानंतर लष्करी संघटनेच्या सदस्यांसह लष्कराचे कर्मचारी त्यांना भेटायला येऊ लागले. खालिद मुशर्रफ यांनी सत्ता स्वत:च्या हातात घेतली असली तरी त्यांना पटकन सरकार स्थापन करता आलं नाही. दरम्यान तुरुंगात हत्याकांड देखील घडलं होतं. एकंदरीत देश बरेच दिवस सरकारविना होता.

ते सांगतात, "या काळात जसद, जन वाहिनी आणि ताहिर यांनी लष्करी जवानांशी चर्चा सुरू ठेवली. 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी जन वाहिनी अधिक सक्रिय आणि संघटित होऊ लागली. कर्नल ताहिर यांच्या नेतृत्वाखाली सत्तापालटाची योजना सुरू झाली."

सखावत हुसेन सांगतात की, 6 तारखेला संध्याकाळी कॅन्टोन्मेंटमध्ये जन वाहिनीच्या नावाने पत्रकं वाटण्यात आली. त्यामुळे काहीतरी नक्कीच घडणार असल्याची जाणीव निर्माण झाली.

ब्रिगेडियर सखावत यांनीही त्या पत्रकाची प्रत पाहिली होती. त्यात खालिद मुशर्रफ, शफायत जमील आणि कर्नल हुदा हे भारतीय हेर असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान न्यायमूर्ती अबू सादात मोहम्मद सईम यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. पण प्रत्यक्षात प्रशासन आणि लष्करात काय सुरू आहे याची स्पष्ट माहिती नव्हती.

ते म्हणतात, "कुठलं ही व्यवस्थापन नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत होता. या गोंधळाच्या परिस्थितीत सहा तारखेला लष्कराच्या जवानांना देखील पत्रकं वाटण्यात आली. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमध्ये जन वाहिनी नामक एक ताकद तयार होत असल्याचं समजलं."

जनवाहिनीने बंडाचा मूळ आराखडा 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी तयार केला.

प्राध्यापक हुसेन सांगतात, "एका मोठ्या हॉलमध्ये लष्कराचे सुमारे 60-70 लोक होते. तिथे जन वाहिनीचे स्थानिक नेतृत्व कर्नल ताहिर आणि दुसऱ्या क्रमांकाचे नेते हसनुल हक इनू होते. मी स्वतः ही त्या हॉल मध्ये उपस्थित होतो. तिथे जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं."

ते सांगतात की, जसदने 9 नोव्हेंबरला पूर्ण तयारीनिशी सत्तापालट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कॅन्टोन्मेंटमधील परिस्थिती अधिक तापू लागल्यावर त्याच रात्री बंड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सात नोव्हेंबरच्या रात्रीचा सत्तापालट

7 नोव्हेंबरच्या रात्रीच बंडाला सुरूवात झाली.

के एम शफीउल्लाह सांगतात, "सैनिकांनी 'सिपाही-सिपाही भाई-भाई, जेसीओ छोड कर दूसरा रँक नहीं' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. सैनिकांमध्ये निराशा निर्माण झाली होती. त्यांना वाटलं की, अधिकार्‍यांनी उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा वापर केला आहे. आणि त्यांची काळजी कोणालाच नाही. त्याच रात्री झियाउर रहमान यांची सुटका करण्यात आली."

7 तारखेच्या रात्री कॅन्टोन्मेंटमधून गोळीबाराचे आवाज येऊ लागले. बंडखोरांनी अनेक लष्करी अधिकाऱ्यांना मारलं. झियाउर रहमान यांना सोडवणं जन वाहिनीला शक्य झालं नाही. फोर बंगाल आणि टू फील्ड रेजिमेंटनी त्यांची सुटका केली.

सखावत हुसेन सांगतात की, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी कर्नल ताहिर यांना जन वाहिनीचे सदस्य आणि काही लष्करी जवानांसह लष्करी निवासस्थानी पाहिलं होतं.

झियाउर रहमान यांच्याशी त्यांचा जोरदार वाद झाला. हुसेन सांगतात की, "ताहिर यांचं म्हणणं होतं की, झियाउर यांनी जन वाहिनीच्या तेरा कलमी मागण्या मान्य केल्याचं रेडिओवर जाहीर करावं. पण झियाउर यांनी तसं न करता आपलं रेकॉर्डेड भाषण रेडिओ स्टेशनवर आधीच पाठवून दिलं. याच ठिकाणी ताहिर आणि झियाउर यांच्यात फूट पडली."

ब्रिगेडियर सखावत हुसेन सांगतात की, "7 नोव्हेंबरच्या सत्तापालटाच्या वेळी अनेक सामान्य लोक शस्त्र घेऊन सैनिकांसोबत लढताना दिसले."

प्राध्यापक हुसेन सांगतात की, "जन वाहिनी आपल्या नागरी सदस्यांना या सत्तापालटात सहभागी करू शकली नाही. जसद ज्या उद्दिष्टासाठी या बंडात सामील झाली होती, त्या उद्देशाच्या अपयशाचे हे देखील एक कारण आहे."

लष्कराचे जवान झियाउर रहमान यांना कॅन्टोन्मेंटमधून एलिफंट रोडवर आणतील, असं ठरलं होतं. जसदचे नेते कर्नल ताहिर तिथल्याच एका घरात राहत होते. पण त्यांना हे काम करणं शक्य झालं नाही.

प्राध्यापक हुसेन सांगतात, "जन वाहिनीशी संबंधित असलेल्या लष्करी सैनिकांनीच झियाउर रहमान यांना सोडवून आणलं. झियाउर रहमान यांनी सांगितलं होतं की, कर्नल ताहिर हे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडेच त्यांना नेण्यात यावं. थोडक्यात इथे थोडी फसवणूक झाली होती आणि ते लोक निर्देशांचं योग्य बालन करू शकले नाहीत "

दुसरीकडे, 7 नोव्हेंबरच्या सकाळी कर्नल के एन हुडा यांच्यासह रंगपूरहून ढाक्यात आलेल्या आलेल्या 10 ईस्ट बंगाल रेजिमेंटमध्ये खालिद मुशर्रफ, कर्नल के एन हुडा आणि लेफ्टनंट कर्नल ए टी एम हैदर यांना ठार करण्यात आलं.

खालिद मोहम्मद यांची हत्या कोणाच्या सांगण्यावरून आणि का करण्यात आली, याबाबत कोणताही ठोस तपास झाला नाही. शिवाय कोणता खटलाही दाखल करण्यात आला नाही.

झियाउर रहमान सत्तेच्या केंद्रस्थानी

अन्वर हुसेन सांगतात की, "झियाउर रहमान यांच्या रेडिओवरील भाषणानंतर सत्तापालटातील जन वाहिनीची भूमिका दडपली गेली आणि सामान्य लोकांमध्ये अशी धारणा बनली की हे सत्तापालट पूर्णपणे झियाउर रहमान यांनी केलं आहे."

7 नोव्हेंबर नंतर झियाउर रहमान सत्तेच्या केंद्रस्थानी आले. काही दिवसांनंतर म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी कर्नल ताहिर यांना अटक करण्यात आली आणि 21 जुलै 1976 रोजी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली.

इतक्या वर्षानंतर 2013 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात कर्नल ताहिर यांच्यावरील खटला बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं.

झियाउर रहमान यांनी 1981 पर्यंत उपमुख्य लष्करी कायदा प्रशासक आणि नंतर राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली. मे 1981 मध्ये झालेल्या अयशस्वी बंडादरम्यान त्यांची हत्या झाली.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)