सॅम माणेकशा : 1971च्या बांगलादेश युद्धाचे हिरो आत्ता का ट्रेंड होताहेत?

1971च्या बांगलादेश युद्धाचे हिरो, जनरल सॅम माणेकशा बुधवारी 1 डिसेंबर रोजी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागले. तेही त्यांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी. कारण? त्यांच्यावर बनवण्यात येणाऱ्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर.

माणेकशा कदाचित भारताच्या इतिहासातले सगळ्यांत चांगले आर्मी जनरल असतील.

1971 साली पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात ते लष्करप्रमुख होते. याच युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली.

फिल्ड मार्शल या पदावर पदोन्नती मिळणारे ते पहिले लष्करी अधिकारी होते.

त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात विकी कौशल जनरल माणेकशांची भूमिका करणार आहे.

सोशल मीडियावर एवढी चर्चा होण्याचं कारण म्हणजे विकी कौशल आणि माणेकशा यांच्या दिसण्यात असलेलं कमालीचं साम्य.

चित्रपटकर्त्या मेघना गुलजार यांनी 2019मध्ये पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं की हा चित्रपट माणेकशांच्या आयुष्यावर बेतलेला असेल पण हा त्यांचा चरित्रपट असेलच असं नाही. "मी त्यांच्याकडे एक माणूस म्हणून पाहाणार आहे," त्या म्हणाल्या.

विकी कौशल यांनी देखील ट्वीट करून म्हटलं, "माणेकशांची भूमिका करणं हा मी माझा सन्मान समजेन. मला याचा अभिमान आहे."

कोण होते जनरल माणेकशा?

जनरल माणेकशांचा जन्म एका पारशी परिवारात झाला होता. त्यांनी ब्रिटिशांच्या सैन्यात काम करायला सुरुवात केली. त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही भाग घेतला होता.

40 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर त्यांचा 2008 साली मृत्यू झाला. त्यांनी पाच युद्धांमध्ये भाग घेतला होता आणि सॅम बहादूर हे त्यांचं टोपण नाव होतं.

1971 च्या भारत-पाक युद्धात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचं खूप कौतूक झालं होतं.

त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

"सॅम माणेकशांचं नाव इतिहासात देशाला लाभलेल्या सर्वोत्तम सैनिकांपैकी एक म्हणून कोरलं जाईल," अशी प्रतिक्रिया चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)