राजीव गांधी 1971च्या युद्धाच्या वेळी देशातून पळून गेले होते का? - फॅक्ट चेक

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी हिंदी

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात गेले आणि त्यांची सुटका झाली. त्यानंतर एकीकडे अभिनंदन यांनी दाखवलेल्या धैर्यासाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे, तर दुसरीकडे एक वेगळीच माहिती राजीव गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर फिरू लागली आहे.

"जेव्हा 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होतं तेव्हा भारतीय वायुसेनेत असलेले राजीव गांधी कर्तव्य विसरून देश सोडून पळून गेले होते," असा एक मेसेज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर शेअर होतोय.

'जे राहुल गांधी आज भारताने केलेल्या एअर स्ट्राइकच्या पुराव्यांची मागणी करत आहेत, त्यांचेच वडील देशाला जेव्हा गरज होती तेव्हा देश सोडून पळून गेले होते', अशा संदर्भासह हा मेसेज कडव्या विचारसरणीच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत आहे.

खरंच?

बीबीसीनं रिव्हर्स सर्च करून या माहितीची सत्यता पडताळून पाहिली.

आपल्या या दाव्याला आधार म्हणून पोस्टकार्ड न्यूज आणि पीका पोस्ट या वेबसाइटची लिंक शेअर केली जात आहे. या वेबसाइटनं हाच दावा केला होता जो या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

राजीव गांधी देश सोडून पळून गेल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. बीबीसीनं पडताळणी केल्यावर असं कळलं की ही गोष्ट पूर्णतः दिशाभूल करणारी आहे.

या पोस्टमध्ये करण्यात आलेले दावे कसे खोटे आहेत, हे आपण पाहू.

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 झाला होता. ते 40व्या वर्षी पंतप्रधान बनले होते. व्हायरल पोस्टमध्ये 1971च्या युद्धाचा उल्लेख आहे, तेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि राजीव गांधी हे राजकारणापासून दूर होते.

सरकारी वेबसाईटनुसार राजीव गांधी यांना विमान उडवण्याची आवड होती. ही आवड पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची लेखी परीक्षा दिली आणि त्यानंतर त्यांना कमर्शियल पायलटचं लायसन्स मिळालं.

राजीव गांधी हे 1968 इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट बनले. या ठिकाणी त्यांनी 10 वर्षं नोकरी केली. राजीव गांधी यांनी भारतीय वायुसेनेत कधीच नोकरी केली नव्हती. त्यामुळे राजीव गांधी हे फायटर पायलट मुळात नव्हतेच आणि तसला कोणताही दावा पूर्णतः चुकीचा आहे.

सोनिया गांधी यांच्यावर पुस्तक लिहिणारे लेखक रशीद किडवई यांनी बीबीसीला सांगितलं, "1971च्या युद्धाशी त्यांचा काही संबंध नाही. ते एअर इंडियासाठी प्रवासी विमानाचे पायलट होते. त्यांना बोइंग विमान उडवण्याची आवड होती आणि कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत त्यांनी बोईंगच उडवलं."

दुसरा दावा आहे की 1971च्या युद्धावेळी राजीव गांधी दोन्ही मुलांबरोबर देश सोडून पळून गेले. हाही दावा कसा खोटा ठरतो, ते पाहू या.

1971 मध्ये राहुल गांधी हे सहा महिन्यांचे होते तर प्रियंका गांधी यांचा जन्मच 1972मध्ये झाला.

रशीद किडवई सांगतात की राजीव गांधी यांची या युद्धात काहीच भूमिका नव्हती. "पण राहुल गांधींना या युद्धावरून लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्या आजीनेच हे युद्ध जिंकलं तरी देखील राहुल गांधी यांना लक्ष्य केलं जात आहे."

या मेसेजमध्ये राजीव गांधी यांचा पायलटच्या पोशाखातला फोटो आहे. तो मात्र खरा आहे. हा फोटो दिल्ली फ्लाइंग क्लबमध्येही लावण्यात आलेला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)