You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-पाकिस्तान फाळणी का आणि कशी झाली होती?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज राजवटीतून भारत मुक्त झाला. मात्र, इंग्रजांनी ज्या भारतावर राज्य केलं, त्याचे दोन तुकडे झाले, म्हणजेच भारताची फाळणी झाली.
एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान.
या पाकिस्तानचे पुढे आणखी दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशची निर्मिती झाली.
भारत-पाकिस्तान फाळणीमुळे मोठा हिंसाचार उफाळला. दोन्ही देशांचे मिळून जवळपास दीड कोटी लोक विस्थापित झाले. जवळपास 10 लाख लोकांना जीव गमवावा लागला आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व आहे.
फाळणी का झाली?
1946 साली ब्रिटनने भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची घोषणा केली.
भारताचा कारभार चालवणे त्यांना परवडणार नव्हतं आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर निघून जायचं होतं.
शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947 ही तारीख निश्चित केली.
त्यावेळी भारतात जवळपास 25% मुस्लीम होते. बाकीचे बहुतेक हिंदू होते.
शिवाय शीख, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक धर्माचेही काही लोक होते.
आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज रिसर्च काउंसीलच्या प्रा. नवतेज पुरेवाल सांगतात, "ब्रिटिशांनी भारतातील लोकांची विभागणी करण्यासाठीचा मार्ग म्हणून धर्माचा वापर केला."
त्या पुढे सांगतात, "उदाहरणार्थ त्यांनी स्थानिक निवडणुकांसाठी हिंदू आणि मुस्लीम मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार केल्या.
हिंदू आणि मुस्लीम राजकारण्यांसाठी राखीव जागा होत्या. राजकारणात धर्म एक फॅक्टर (घटक) बनला."
युके येथील चॅथम हाऊस फॉरेन पॉलिसी इन्स्टिट्युटचे डॉ. गॅरेथ प्राइस म्हणतात, "जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हं दिसू लागली तेव्हा भारतातील अनेक मुस्लिमांना बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात राहण्याची काळजी वाटू लागली."
ते पुढे सांगतात, "त्यांना वाटलं ते हतबल होतील आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी करणाऱ्या राजकीय नेत्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली."
मात्र, आम्हाला सर्व धर्मांना सामावून घेणारा अखंड भारत हवा आहे, असं महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं.
मात्र, ऑल इंडिया मुस्लीम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांनी स्वातंत्र्याचा भाग म्हणून फाळणीची मागणी केली.
डॉ. प्राईस सांगतात, "अखंड भारत कसा असेल, त्याचा कारभार कसा चालेल, याविषयीचा करार करण्यासाठी बराच काळ लागला असता.
अशावेळी फाळणी हा जलद आणि सोपा पर्याय दिसत होता."
फाळणी किती वेदनादायी ठरली?
ब्रिटीश अधिकारी सर सिरील रॅडक्लीफ यांनी 1947 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात नवीन सीमारेषा आखली.
त्यांनी भारतीय उपखंडाची अगदी ढोबळमानाने हिंदू बहुसंख्य असलेला मध्य आणि दक्षिण भाग आणि मुस्लीम बहुसंख्य असलेला वायव्य आणि ईशान्य भाग अशी विभागणी केली.
मात्र, हिंदू आणि मुस्लीम हे संपूर्ण देशात विखुरलेले होते.
परिणामी फाळणीनंतर जवळपास दीड कोटी लोकांनी नव्याने तयार करण्यात आलेला सीमा ओलांडत शेकडो मैलांचा प्रवास करून स्थलांतर केलं.
फाळणीदरम्यान उफाळलेल्या धार्मिक हिंसाचारात अनेकांना त्यांच्या राहत्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्यात आलं.
याचं पहिलं उदाहरण म्हणजे 1946 सालचं 'कलकत्ता हत्याकांड'. कोलकत्यात उसळलेल्या जातीय दंगलीत जवळपास 2000 लोक मारले गेले.
लंडन विद्यापीठाच्या SOAS संस्थेत दक्षिण आशिया इतिहासाच्या प्राध्यापिका डॉ. एलियानोर न्यूबिगीन सांगतात, "मुस्लीम लीगने सामान्य नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देऊन नागरी सेना तयार केली. तेच उजव्या विचारसरणीच्या हिंदू गटांनीही केलं. हे दहशतवादी गट आपापल्या भागात अधिकाधिक नियंत्रण असावं, यासाठी इतर धर्मीय लोकांना गावातून हुसकावून लावत."
फाळणी दरम्यान उफाळलेला हिंसाचार आणि निर्वासित शिबिरांमध्ये दोन लाख ते दहा लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मातील हजारो स्त्रीयांवर बलात्कार करण्यात आला, त्यांचं अपहरण करण्यात आलं किंवा त्यांना अपमानित करण्यात आलं.
फाळणीचे परिणाम काय झाले?
फाळणी झाल्यापासून काश्मीर कोणाचं, यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू आहे.
काश्मीरवरून दोन्ही देशात दोन युद्धंही झाली. (1965 आणि 1978) 1999 सालीसुद्धा काश्मीरवरूनच कारगिलमध्येही युद्ध झालं.
काश्मीरवर दोघेही आपला दावा सांगतात आणि सध्या काश्मीरचा एक भाग भारताच्या तर दुसरा भाग पाकिस्तानच्या नियंत्रणात आहे.
1971 सालीही भारताने पाकिस्तानशी युद्ध केलं. मात्र, त्यावेळी पूर्व पाकिस्तानात (सध्या बांगलादेश) उठाव सुरू होता.
पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं होऊन स्वतंत्र देश स्थापन करायचा होता.
या युद्धात भारताने पूर्व पाकिस्तानला पाठिंबा देत हस्तक्षेप केला होता.
पाकिस्तानात सध्या 2 टक्क्यांहून कमी हिंदू आहेत.
डॉ. प्राईस म्हणतात, "पाकिस्तान अधिकाधिक इस्लामिक बनत गेला. काही अंशी याचं कारण म्हणजे तिथली बरीच लोकसंख्या आता मुस्लीम आहे आणि दुसरं म्हणजे आता तिथे खूप कमी हिंदू उरले आहेत."
ते पुढे सांगतात, "आणि भारतही आता अधिकाधिक हिंदू राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली येत आहे."
डॉ. न्यूबिगीन सांगतात, "फाळणीचा वारसा त्रासदायक आहे. फाळणीने दोन्ही देशांमध्ये प्रबळ धार्मिक बहुसंख्य निर्माण केले आहेत. अल्पसंख्याकांची संख्या घटली आहे आणि ते पूर्वीपेक्षा अधिक असुरक्षित बनले आहेत."
फाळणी कदाचित टाळता आली असती, असं प्रा. नवतेज पुरेवाल यांना वाटतं.
त्या म्हणतात, "1947 साली अखंड भारत निर्माण करणं, कदाचित शक्य होतं. राज्यांचा एक असा महासंघ ज्यात मुस्लीम बहुसंख्य राज्यांचाही समावेश असेल."
"मात्र, गांधी आणि नेहरू दोघांनीही केंद्राचं नियंत्रण असलेला एकसंध देश स्थापन करण्याचा आग्रह धरला. पण, अशाप्रकारच्या देशात मुस्लीम अल्पसंख्यांक कसे राहतील, याचा त्यांनी फारसा विचार केला नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)