You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यातल्या आजी 75 वर्षांनी पाकिस्तानातल्या घरी पोहोचल्या तेव्हा....
- Author, शुमैला जाफरी
- Role, बीबीसी न्यूज, रावळपिंडी
18 जुलै 2022...पुण्यातल्या 90 वर्षीय रीना वर्मा रावळपिंडीमध्ये पोहोचल्या, जिथे जाण्याची ओढ त्यांना गेल्या 75 वर्षांपासून होती.
आपल्या वडिलांनी आयुष्यभराची पुंजी गुंतवून बांधलेल्या घराला भेट दिल्यानंतर त्यांना जणू तीर्थयात्राच घडल्यासारखं वाटलं. या घरी जाणं हे त्यांचं आयुष्यभराचं स्वप्न होतं.
त्यांचं झालेलं स्वागतही भावूक करणारं होतं. त्यांच्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. लोकांनी या 90 वर्षांच्या पाहुणीसोबत ढोल वाजवून नाच केला. या सगळ्या प्रेमानं रीना एकदम भारावून गेल्या.
1947 साली झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या काही आठवडे आधीच रीना यांच्या कुटुंबियांनी रावळपिंडीतलं आपलं 'प्रेम निवास' हे घर सोडलं आणि ते भारतात आले.
2021 साली एका पाकिस्तानी माध्यामाला दिलेल्या मुलाखतीनंतर भारत-पाकिस्तानमधील ऑनलाइन कम्युनिटीत रीना वर्मा एकदम प्रसिद्ध झाल्या. 'इंडिया-पाकिस्तान हेरिटेज क्लब' नावाच्या फेसबुक ग्रुपमधील सदस्यांनी रीना यांच्या रावळपिंडीमधील पिढीजात घराचा शोध घ्यायला सुरूवात केली.
एका महिला पत्रकाराला अखेरीस ते सापडलं. पण त्यानंतरही इच्छा असूनही रीना पाकिस्तानला जाऊ शकल्या नाहीत. कारण कोव्हिडचे निर्बंध होते.
यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसाला अर्ज केला. पण कोणतंही कारण न देता तो नाकारला गेला.
"मला प्रचंड धक्का बसला. जगाचा निरोप घेण्यापूर्वी फक्त एकदा आपलं पिढीजात घर पाहण्याची इच्छा असलेल्या 90 वर्षांच्या म्हाताऱ्या बाईचा अर्ज नाकारला जाईल असं मला वाटलंही नव्हतं. पण तसं झालं," रीना सांगतात.
रीना सांगतात की त्यांना मधेच अडकल्यासारखं वाटत होतं. पाकिस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी राजकीय उलथापालथ सुरू होती आणि आता अर्ज करण्याबाबत काय करायचं हेच रीना यांना समजत नव्हतं. पण तरीही त्या पुन्हा अर्ज करण्याच्या विचारात होत्या. मात्र त्याआधीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी त्यांच्याबद्दलची बातमी वाचली. त्यांनी पाकिस्तानच्या भारतातील दूतावासाला रीना यांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.
"पाकिस्तानच्या दूतावासाकडून फोन आल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. त्यांनी मला व्हिसा घेऊन जायला सांगितलं. हे सगळं अवघ्या काही दिवसांत घडलं."
एक प्रक्रिया पार पडली, पण रीना यांच्यासमोर अजून एक अडचण होती. पाकिस्तानातलं हवामान उष्ण होतं. नुकताच आपला मुलगा गमावलेल्या रीना या एकट्याने प्रवास करणार होत्या. त्यामुळे त्यांना काही महिने थांबण्याचा सल्ला देण्यात आला.
रीना सांगतात की, हे वाट पाहणं खूप त्रासदायक होतं. पण त्यांना आजारी पडण्याचा धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी संयम ठेवला आणि शेवटी 16 जुलैला त्या पाकिस्तानात पोहोचल्या.
आठवणींची पानं
20 जुलैला रीना शेवटी त्यांच्या वडिलोपार्जित घरी पोहोचल्या. त्या या प्रसंगासाठी खास तयार झाल्या होत्या. त्यांनी फिकट पिवळ्या रंगाचा सलवार-कमीझ घातला होता. त्यावर गडद हिरव्या रंगाची ओढणी घेतली होती. त्यांनी नेल पॉलिश लावलं होतं. कानात सुंदर झुमके घातले होते. त्या अतिशय सुंदर दिसत होत्या.
लिंबू सरबत पिता पिता त्यांनी मला या भेटीबद्दल त्यांच्या मनात असलेल्या संमिश्र भावनांबद्दल सांगितलं, "मला हा क्षण माझ्या कुटुंबीयांसोबत घालवायचा होता. पण आता त्यांच्यापैकी कोणीच नाहीये. मला आज खूप एकटं वाटतंय."
रीना सांगतात की, त्यांनी 1947 सालच्या उन्हाळ्यात रावळपिंडी सोडलं. आपण कधी परत येणार नाही, असा विचारही मी आणि माझ्या बहिणीने केला नव्हता.
"माझ्या एका बहिणीचं लग्न झालं होतं. तिचं सासर अमृतसरमध्ये होतं. एप्रिल 1947 मध्ये माझ्या बहिणीच्या पतींनी आमच्या वडिलांना आम्हाला त्यांच्यासोबत पाठवायला सांगितलं. कारण त्यांना माहित होतं की, आता परिस्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता आहे. आम्ही आमच्या उन्हाळ्यांच्या सुट्या सहसा मुरीत घालवायचो. पण त्या वर्षीच्या उन्हाळ्यात आम्हाला मुरीऐवजी भारतातल्या शिमल्यात पाठवण्यात आलं."
मुरी हे रावळपिंडीपासून 55 मैल अंतरावर असलेलं एक थंड हवेचं ठिकाण आहे.
"सुरुवातीला माझ्या पालकांनी तिथं यायला विरोध केला. पण काही आठवड्यांनंतर तेसुद्धा आमच्यासोबत आले. माझी आई सोडून आम्ही सर्वांनीच फाळणीचं सत्य स्वीकारलं होतं. ती नेहमी म्हणायची की, याने असा काय फरक पडणार आहे. आधी आपण ब्रिटीश राजवटीत राहत होतो, आता मुस्लिम राजवट असेल इतकंच. यामुळे आम्हाला आमचं घर सोडायला का भाग पाडलं जातंय?"
रीना यांनी सांगितलं की, त्यांच्या आईने निर्वासित म्हणून मिळालेलं घर कधीच स्वीकारलं नाही. का ? जर त्यांनी ते निर्वासित घर स्वीकारलं तर ते रावळपिंडीतल्या त्यांच्या मालमत्तेवर कधीही दावा करू शकले नसते.
घरवापसी
ज्या क्षणी रीना यांनी त्यांच्या वडिलोपार्जित घर असलेल्या रस्त्यावर पाय ठेवला, तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना आलिंगन दिलं, त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. काहीजण त्यांच्यासोबत ढोलच्या तालावर नाचले. त्या आनंदात दिसत होत्या. पुढे त्यांना त्यांच्या घरात नेण्यात आलं. पण तिथं मीडियाला परवानगी नव्हती.
त्यांच्या घराचा दर्शनी भाग ऑलिव्ह रंगात रंगवण्यात आला होता. घराचा लूक थोडा मॉर्डन झाला होता. पण त्याची रचना जुनीच होती. दरम्यान, त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोक रस्त्यावर जमा झाले होते.
तिथल्या वातावरणात एकप्रकारचा दमटपणा होता, रस्त्यावर गर्दी जमली होती. त्यांच्या शेजारी बेभान झालेल्या पत्रकारांचा घोळका जमला होता. पण रीना मात्र पूर्णपणे निर्विकार दिसत होत्या. त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, घर अजूनही बरचसं तसंच आहे. घराच्या फरशा, छत आणि शेकोटी अगदी तसंच. हे बघून त्यांना एकेकाळी तिथं व्यतीत केलेल्या सुंदर क्षणांची आणि गमावलेल्या प्रियजनांची आठवण झाली.
रीना काही तास घरातच होत्या. त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांची एक छबी टिपण्यासाठी डझनभर कॅमेरे त्यांच्या प्रतीक्षेत होते.
तिथल्या वातावरणात एकप्रकारचा दमटपणा होता, रस्त्यावर गर्दी जमली होती. त्यांच्या शेजारी बेभान झालेल्या पत्रकारांचा घोळका जमला होता. पण रीना मात्र पूर्णपणे निर्विकार दिसत होत्या. त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, घर अजूनही बरचसं तसंच आहे. घराच्या फरशा, छत आणि शेकोटी अगदी तसंच. हे बघून त्यांना एकेकाळी तिथं व्यतीत केलेल्या सुंदर क्षणांची आणि गमावलेल्या प्रियजनांची आठवण झाली.
त्या सांगत होत्या की, त्यांना आजही वाईट वाटतंय. पण आयुष्यभर त्यांनी ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण जगता आला त्याबद्दल त्या कृतज्ञ आहेत.
दोन्ही देशांच्या सरकारांना काय संदेश द्याल असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी राजकारणावर बोलायला नकार दिला. पण त्या म्हणाल्या की, माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते सीमेपलीकडे असणाऱ्या कुटुंबांच्या वाट्याला येऊ नये.
त्यांनी फाळणीच्या आठवणी सांगणाऱ्या बॉलिवूडच्या एका जुन्या गाण्याने आपल्या बोलण्याचा शेवट केला. पण त्या आजही आशावादी आहेत असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
भारत आणि पाकिस्तानमधील अनेकांना आजही असं वाटतं की, जिथं द्वेषाचं राजकारण चालायचं तिथं या कथेने आशावाद निर्माण केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)