गीताः सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातून भारतात परत आणलेली गीता सध्या काय करते?

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"एक नदी, त्याच्या किनाऱ्यावर असलेलं देवीचं एक मोठं मंदीर आणि कठडे असणारा पूल..." लहानपणच्या या आठवणींचा आधार घेत गीता 20 वर्षांपूर्वी दुरावलेल्या कुटुंबाचा अजूनही शोध घेतेय.

2000 सालच्या आसपास मूक-बधीर गीता चुकून समझोता एक्सप्रेसमध्ये चढली आणि थेट पाकिस्तानात पोहोचली होती.

2015 मध्ये माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला मायदेशी आणलं. पण पाच वर्षं उलटूनही गीता आई-वडिलांच्या शोधात आहे.

पण भारतातल्या कोणत्या शहरातून वा गावातून निघून ती पाकिस्तानात पोहोचली, हेदेखील अद्याप कळू शकलेलं नाही.

गीता सध्या काय करते?

कोणीतरी येऊन आपल्याला आपल्या कुटुंबाविषयी माहिती मिळाल्याचं सांगेल या आशेवर गीता गेली 5 वर्षं आहे.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री या नात्याने तसंच वैयक्तिक पातळीवरही गीताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ट्विटरवरही याबाबत लिहिलं होतं.

सुषमा स्वराज यांच्यासह अनेक दिग्गजांनी गीताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश मिळालं नाही.

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनाने गीता अत्यंत दुःखी झाली होती. कोव्हिड संकटात एकटी पडल्यानंतर गीताच्या संयमाचा बांध सुटला. त्यामुळे आपल्या भौगोलिक स्मरणशक्तीच्या भरवश्यावरच तिने आपल्या कुटुंबीयांचा शोध घ्यायला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून ती स्वतःच कुटुंबीयांच्या शोधासाठी बाहेर पडली आहे.

इंदूरचे रहिवासी ज्ञानेंद्र आणि मोनिका पुरोहित या शोधात गीताची मदत करत आहेत.

ज्ञानेंद्र आणि त्यांचे सहकारी गीताच्या लहानपणीच्या आठवणींच्या आधारे महाराष्ट्रापासून ते छत्तीसगढ, तेलंगण पर्यंतचे रस्ते पालथे घालत तिच्या गावाचा शोध घेतायत.

ज्ञानेंद्र यांनी त्यांच्या या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली. गीता नदी किनाऱ्यावर पोहोचते तेव्हा काय घडतं, याबाबतही त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "गीता एखाद्या नदी किनाऱ्यावर पोहोचल्यावर अत्यंत आनंदी होते. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक येते. तिच्या मनात एक नवी उमेद जागी होते. याच नदीच्या किनाऱ्यावर आपलं घर आहे, असं तिला वाटू लागतं."

गीताची आई वाफेच्या इंजिनबद्दल तिला सांगायची, असं ती इशाऱ्यांनी सांगते.

आम्ही जेव्हा लातूर रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो तेव्हा गीता प्रचंड खूश झाली. इथं विजेवर नव्हे तर डिझेलवर चालणारं इंजिन असल्याचं ज्ञानेंद्र यांनी सांगितलं.

गीताच्या लहानपणीच्या आठवणीत इलेक्ट्रिक इंजिन नव्हते, त्यामुळेच तिला इथंच आपलं घर असावं असं वाटू लागतं.

विस्मरणात चाललेल्या आठवणी आणि बदलता भारत

ज्ञानेंद्र यांच्या आदर्श सेवा सोसायटी संस्थेने बराच काळ गीताचे हावभाव, खाण्यापिण्याची पद्धत आणि तिच्या लहानपणच्या आठवणींचा अभ्यास केला आहे.

गीताने सांगितलेल्या आठवणी लक्षात घेता ती महाराष्ट्राशी लागून असलेल्या सीमाभागातली असेल, असा निष्कर्ष ज्ञानेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलाय.

पण आता इतक्या वर्षांनंतर गीताच्या आठवणी पुसट होत चालल्याचं त्यांना जाणवत आहे.

हातवाऱ्यांची भाषा (साईन लँग्वेज) समजणारे ज्ञानेंद्र याबाबत सांगतात, "नदी पाहिली की गीताच्या आठवणी ताज्या होतात. अशीच नदी माझ्या गावात आहे. गावाजवळच रेल्वे स्थानक आहे. एक पूल आहे, पुलावर रेलिंग आहे. जवळच दोन मजली दवाखाना आहे. तिथं प्रचंड गर्दी असते, असं ती सांगते."

गीताच्या शेतात ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्यांचं पीक घेतलं जायचं. रस्त्याने जाता जाता एखाद्या ठिकाणी असा प्रकारची शेती दिसली तर ती लगेच गाडी थांबवण्यास सांगते. तिची आई शेतात काम करत असेल, असंच तिला वाटतं.

ज्ञानेंद्र सांगतात, "गीताच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आहेत. रेल्वे स्थानक, नदी यांच्यासारख्या गोष्टी तिला आठवतात. पण गेल्या 20 वर्षांत भारत किती बदलला, आपल्याला माहीत आहे. आपण लहानपणी गेलेल्या एका ठिकाणी आता गेलो तरी ती जागा आता ओळखता येत नाही. त्यामुळेच तिचं गाव शोधण्यास अडचणी येतायत."

मानसिक तणाव

मोनिका यांच्या मते, घरातून बेपत्ता झाल्याचं दुःख, त्यांना पुन्हा शोध घेण्यात अपयश या गोष्टींनी गीता मानसिकरित्या दुःखी आहे.

त्या सांगतात, "गीताने आता आपलं नवं आयुष्य सुरू करावं, लग्न करावं, या गोष्टी सांगताच ती त्याला नकार देते. मी अजून लहान आहे. आईचा शोध घ्यायचा आहे, असं ती म्हणते. लग्न केलं तर तिचे कुटुंबीय नाराज होतील, असं तिला वाटतं. गीताला ती अद्याप 16-17 वर्षांची असल्याचंच वाटतं पण तिचं वय 26 च्या आसपास आहे. गीता खूप गोड मुलगी आहे. पण कधी कधी ती घाबरते. लहान लहान गोष्टींबाबत रडू लागते."

गीताचा घरच्यांचा शोध अजूनही सुरूच आहे. गाडीत मागच्या सीटवर बसून आपलं घर, गाव, रेल्वे स्टेशन आणि नदी यांच्या आठवणी जुळवण्याचा प्रयत्न ती सतत करते. एखाद्या शेतात आई दिसेल, या आशेने ती अजूनही फिरतच आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)