कोरोना लस : मॉडर्नाच्या लशीला अमेरिकेत मंजुरी

कोव्हिड 19वरच्या मॉडर्ना लशीला अमेरिकन सरकारने मान्यता दिली आहे.

आठवडाभरापूर्वी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) फायझर - बायोएनटेकच्या लशीला मंजुरी दिली होती.

अमेरिकेने मॉडर्नाच्या लशीचे 20 कोटी डोसेस विकत घेतले असून यापैकी 60 लाख डोसेस आता तयार आहेत.

कोरोना व्हायरसचं संक्रमण अमेरिकेतच सर्वाधिक झालेलं असून मॉडर्नाच्या लशीलाही परवानगी मिळाल्याने आता अमेरिकेत कोव्हिड 19वरच्या दोन लशी उपलब्ध आहेत.

अमेरिकेत आतापर्यंत कोव्हिडमुळे 3 लाख 11 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत तर एकूण 1 कोटी 72 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.

लशीबद्दल बोलताना टेनेसी मेहरी मेडिकल कॉलेजचे सीईओ डॉ. जेम्स हिलड्रेथ यांनी म्हटलंय, "जानेवारीमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं आढळल्यानंतर डिसेंबरमध्ये दोन लशी उपलब्ध होणं ही अभूतपूर्व गोष्ट आहे."

मॉडर्नाची लस सुरक्षित असून 94% पर्यंत परिणामकारक असल्याचं FDA ने या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं.

या लशीला परवानगी मिळाल्याची घोषणा होण्याच्या काही तास आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी याविषयीचं ट्वीट केलं होतं.

त्यांनी ट्वीट केलं होतं, "अभिनंदन, मॉडर्ना लस आता उपलब्ध आहे."

मॉडर्ना लशीत फायझरपेक्षा वेगळे काय ?

मॉडर्नाची लस एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी किमान उणे 20 डिग्री सेल्सियस तापमान राखणं गरजेचं आहे. हे नेहमीच्या फ्रीजरचं तापमान आहे.

तर फायझर - बायोएनटेकच्या लशीसाठी उणे 75 अंशांपर्यंतचं तापमान ठेवावं लागतं. यामुळे ही लस एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं कठीण आहे.

फायझरप्रमाणेच मॉडर्नाच्या लशीचेही दोन डोस घ्यावे लागतील. पहिलं इंजेक्शन घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल. फायझरच्या लशीचे दोन डोस हे 21 दिवसांच्या अंतराने देण्यात येतील.

मॉडर्नाच्या लशीचं बहुतांश उत्पादन केंब्रिज आणि मॅसेच्युसेट्समध्ये होतंय. तर फायझर - बायोएनटेकची लस अनेक देशांमध्ये तयार करण्यात येतेय. यामध्ये जर्मनी आणि बेल्जियमचाही समावेश आहे.

अनेक देशांनी आधीपासूनच मॉडर्नाच्या लशीच्या डोसेसची ऑडर्र दिलेली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)