कोरोना लस : तुमच्या मनातील महत्त्वाच्या 6 प्रश्नांची उत्तरं

आजपासून (16 जानेवारी) कोरना लसीकरण मोहिमेला भारतात सुरुवात होणार आहे.

भारतीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील लसीकरणासंदर्भात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. हे प्रश्न तुमच्याही मनात असतील.

वेळी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, कोरोनाची लस टोचून घेणं हे ऐच्छिक असेल. म्हणजेच, सरकार कुणावरही दबाव आणणार नाही. लस टोचून घ्यायची की नाही, हे प्रत्येक व्यक्ती ठरवू शकतो.इतर देशांमध्ये विकसित केलेल्या लशीइतकीच भारतात विकसित केलली लस परिणामकारक असेल, असा दावाही आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (17 डिसेंबर) कोरोना लशीबाबतच्या प्रश्न-उत्तरांची यादी जाहीर केली. यातील काही महत्त्वाचे प्रश्न, जे तुमच्याही मनात असू शकतात :

1) लशीचा परिणाम किती दिवसात होतो?

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्वसामान्यपणे कोरोनाची अँटीबॉडीज विकसित होण्यासाठी शरीरात लशीचे दोन डोस टोचून घेणे आवश्यक आहेत.

2) कोरोनाची लस सुरक्षित असेल?

कोरोनावरील लस सुरक्षित असावी, हे लक्षात घेऊन भारत सरकारने ड्रग कंट्रोलर संस्थेला आदेश दिलेत की, लशीला तेव्हाच परवानगी द्यावी, जेव्हा तिने परिणाम आणि सुरक्षेचे मापदंड पार केलेले असतील.

भारतातील लस सुरक्षित असेल, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.

3) लस सर्वांना एकदाच दिली जाईल?

लस सर्वांना एकदाच उपलब्ध होईल की नाही, हे लस किती प्रमाणात उपलब्ध आहे, यावर आधारित आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, वयोवृद्ध, इतर आजारांनी त्रस्त असलेले नागरिक यांना लशीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

4) लस टोचून घेतल्यानंतर काय खबरदारी घेतली पाहिजे?

आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार, लस टोचून घेतल्यानंतर आरोग्य केंद्रावरच अर्धा तास आराम करावा.

"लस टोचल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झाल्यास तातडीने जवळच्या आरोग्य अधिकारी, डॉक्टर एएनएम किंवा आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा," असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.

5) लस आल्यानंतर मास्क वापरण्याची गरज आहे का?

कोरोनावरील लस आल्यानंतरही मास्क वापरत राहिलं पाहिजे. तसंच, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन केलं पाहिजे. हातही स्वच्छ धुतले पाहिजेतच. कोरोनाबाबत आपण आतापर्यंत घेत असलेल्या सर्व खबरदाऱ्या घेत राहिले पाहिजे.

6) कुठल्या लशीची सध्या चर्चा आहे?

भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्रिटनची फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राजेनेका यांच्या सहकार्याने बनललेल्या कोव्हिशिल्ड लस आणि भारत बायोटेक व ICMR ने बनवलेल्या कोवॅक्सिन लस यांची सध्या चर्चा आहे.

या दोन्ही लशींसाठी संबंधित कंपन्यांनी भारत सरकारकडे तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)