सिरिमाओ भंडारनायके : गृहिणी, राजकारणाशी संबंध नसताना अशा झाल्या जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

'ही पंतप्रधान झाली तर पंतप्रधानांची खुर्ची दर महिन्याला शुद्ध करून घ्यावी लागेल. गुपचूप मुलं सांभाळायची सोडून राजकारण कसली करते ही. हिचं चारित्र्यच खराब आहे.'

अशा एक ना अनेक टिकाटिप्पणी तिच्यावर झाल्या. पुरुषांनी तिची यथेच्छ टिंगल उवली. जाहीर भाषणांमधून तिला सुनावण्यात आलं. पण ती डगमगली नाही पुढे जात राहिली आणि जगातली पहिली महिला पंतप्रधान झाली....

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होत आहेत. आज द्रौपदी मुर्मू यांच्या रुपानं देशाला दुसरी महिला राष्ट्रपती लाभल्या आहेत आणि योगयोगाने आजच्या दिवशीच (21 जुलै) 1960 मध्ये जगात पहिल्या महिला पंतप्रधान सत्तेत आल्या होत्या.

सिरिमाओ भंडारनायके असं त्यांचं नाव आणि ज्या देशाच्या त्या पंतप्रधान झाल्या तो देश होता श्रीलंका...

सध्याच्या घडीला श्रीलंकेत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरता आहे. त्यापार्श्वभूमीवर 1960 मध्ये भंडारनायके यांचं सत्तेत येणं आणि त्यांनी सत्ता राबवणं हे अनन्य साधारण वाटून जाणारं आहे.

जगाच्या पाठीवर तेव्हा...

ब्रिटनचं साम्राज्य लयाला गेलं होतं. ब्रिटन आणि फ्रान्सच्या उरल्यासुरल्या वसाहती स्वतंत्र देश म्हणून जाहीर होत होते. दुसरं महायुद्ध घडून गेलेलं होतं. रशिया आणि अमेरिकेत शीतयुद्ध सुरू होतं. अमेरिका व्हिएतनामच्या युद्धात अडकून पडली होती.

जागतिक राजकारणची समीकरणं आणि सत्तेचा लंबक युरोपातून अमेरिकेकडे सरकलेला होता. शीतयुद्धामुळे जग दोन गटांमध्ये विभागलं जात होतं. या सगळ्या स्थितीवर वर्चस्व आणि पगडा होता तो पुरूष राजकारण्यांचा...

कारण युरोपातल्या स्वित्झर्लंड सारख्या देशातल्या काही भागात तोपर्यंत महिलांना मतदानाचे अधिकार मिळणं बाकी होतं. अशा प्रतिकूल जागतिक स्थितीत सिरिमाओ भंडारनायके यांचा उदय झाला.

नाही म्हणायला त्याकाळी महाराणी एलिजाबेथ द्वितीय त्यावेळच्या एखाद्या देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या महिला होत्या, पण त्यांच्याकडे आलेलं हे पद वंशपंरपरेतून आलेलं आणि नामधारी होतं.

सिरिमाओ भंडारनायके मात्र लोकांमधून मतदानाच्या माध्यमातून सर्वोच्च स्थानी पोहोचल्या होत्या.

दक्षिण आशियामध्ये 1960-70 च्या दशकात ज्या महिला राजकारणी पुढे आल्या आणि देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या त्या सर्व जवळपास एकाच प्रमाणात एकाच परिस्थितीतून पुढे आल्या होत्या.

इंदिरा गांधी, बेनझीर भुत्तो, शेख हसिना, अँग सँग सू ची या सगळ्या जणींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी. वडील किंवा पतीचा राजकीय वारसा त्या राजकारणात पुढे नेत होत्या किंवा आहेत.

सिरिमाओ भंडारनायके यांची स्थितीसुद्धा काही वेगळी नव्हती. पंतप्रधान असेल्या त्यांच्या पतीच्या राजकीय हत्येनंतर त्या श्रीलंकेच्या राजकारणात आल्या होत्या. पण म्हणून त्यांचा राजकारणातला प्रवेश तितका सुकर नव्हता.

भारतापाठोपाठ स्वातंत्र्य मिळालेल्या श्रीलंकेत SWRD भंडारनायके 1956 मध्ये चौथे पंतप्रधान झाले. तेही आघाडीच सरकार स्थापन करून. सत्तेत येताच त्यांनी 'सिंहला प्रथम'चं धोरण आणलं. सिंहला भाषा श्रीलंकेची अधिकृत भाषा जाहीर करण्यात आली. त्यातूनच पुढे श्रीलंकन तामिळींनी आंदोलन सुरू केलं.

डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारांच्या पक्षांच्या पाठिंब्याने सत्तेत आलेल्या SWRD भंडारनायके यांनी बस वाहतूक, विमा कंपन्या, कोलंबो हर्बर कंपन्यांसारख्या कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं. पण त्यांच्या या निर्णयांमुळे सत्तेत सहभागी असलेले पक्ष फारसे खूष नव्हते.

अशातच सोमराना थेरो नावाच्या बौद्ध भिक्कूने 25 सप्टेंबर 1959 मध्ये त्यांची हत्या केली. त्याच्यामागे अनेक राजकीय कारणं सांगितली जातात. अनेकांच्या वेगवेगळ्या थिएरीज आहेत. पण, सोमराना थेरो सरकारच्या धोरणांवर नाराज होते आणि त्यातून त्यांनी SWRD भंडारनायके यांची हत्या केल्याचं मानलं जातं.

तोपर्यंत फक्त गृहिणी असलेल्या आणि 3 मुलांच्या संगोपनात व्यग्र असलेल्या सिरीमाओ भंडारनायके यांचा राजकारणाशी काहीच संबंध आला नव्हता. त्याच्या पतीचीसुद्धा त्यांनी राजकारणात यावं अशी इच्छा नव्हती.

पतीच्या हत्येमुळे भांबावलेल्या सिरीमाओ भंडारनायके यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंका फ्रिडम पार्टीने मात्र त्यांच्या मागे राजकारणात येण्याचा तगादा लावला होता.

"माझ्या आईला राजकारणाचा कुठलाही अनुभव किंवा पार्श्वभूमी नव्हती. ती राजकारणात यायला तयारसुद्धा नव्हती. तिनं राजकारणात यावं म्हणून तिचं मन वळवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती, पक्षाच्या लोकांनी तगादा लावला होता. आम्ही आधी तयार नव्हतो. मात्र नंतर आम्ही दोन्ही बहिणींनी आईशी चर्चा करून निर्णय घेतला," असं सिरिमाओ भंडारनायके यांची मुलगी आणि श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा यांनी एका मुलाखतीत सांगतिलं आहे.

"आई राजकारणात आली तर वडिलांप्रमाणे आईलासुद्धा गामावण्याची भीती आम्हाला वाटत होती. तिचीसुद्धा हत्या होईल अशी भीती आम्हाला होती," असं सिरिमाओ भंडारनायकेंची मोठी मुलगी सुनेत्रा भांडारनायके यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

मुलांना वाटणारी भीती आणि पक्षानं लावलेल्या तगाद्याच्या पार्श्भूमीवर अखेर सिरिमाओ भंडारनायके राजकारणात उतरल्या. पण, त्याचक्षणी त्यांच्याविरोधात विखारी प्रचार सुरू झाला. त्यांना विरोध करणाऱ्या UNP पक्षानं थेट त्यांच्यावर खालच्या स्तरातली टीका सुरू केली.

'ती महिला आहे, तिला पाळी येते, अशी महिला पंतप्रधान झाली तर पंतप्रधानांची खुर्ची दर महिन्याला शुद्ध करावी लागेल. विधवा झालेल्या महिलेनं मुलांच्या सगोपनाकडे लक्ष द्यावं उगाच राजकराणात का उतरावं. ही पंतप्रधानपदासाठी सक्षम नाही,' अशा प्रकारच्या टीका त्यांवर सुरू झाल्या.

पण त्या टीकेमुळे सिरिमाओ भंडारनायके खचल्या नाहीत. त्यांनी देशाचा दौरा करणं सुरूच ठेवलं.

"सामान्य लोकांनी मात्र मला खूप समजून घेतलं. मला पाहिलं की लोक रडायला लागायचे. आश्चर्यकारकरित्या मला पुरुषांचासुद्धा पाठिंबा मिळाला," असं स्वतः भंडारनायके यांनी एका मुलाखतीत त्यावेळची आठवण सांगितली होती.

विरोधकांच्या विखारी टीकेला भाषणातून नाही पण मतपेटीतून सिरिमाओ भंडारनायके यांनी उत्तर दिलं. त्यांच्या पतीच्या हत्येच्या एक वर्षानंतर 1960 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक खासदार निवडून आणत श्रीलंका फ्रिडम पार्टी सर्वांत मोठा पक्ष ठरला. 21 जुलै 1960 दिवशीच सिरीमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या तसंच जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

"लोकांच्या प्रेम आणि सहानुभूतीमुळे मला हे पद मिळालं. मी सफेद साडी घालून प्रचाराला जायचे तेव्हा लोक भावूक व्हायचे," असं भंडारनायकेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

महत्त्वाची बाह म्हणजे सिरीमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक काळ राहिलेल्या पंतप्रधान आहेत. 1960-65, 1970-77 आणि 1994-2000 दरम्यान त्या श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या. पण 1980-86 दरम्यान मात्र त्यांच्यावर राजकारणात येण्याची बंदी घालण्यात आली होती.

पंतप्रधान होताच त्यांच्या पतीनं सुरू केलेलं संस्थाच्या राष्ट्रीयी करणाचं धोरण त्यांनी पुढे आणखी जोमानं राबवलं. शाळा, बँका, विदेशातील व्यापार, वीमा, पेट्रोलिम कंपन्यांचं त्यांनी राष्ट्रीयीकरण केलं.

इंग्रजी ऐवजी सिंहला भाषेला अधिकृत दर्जा देण्याचं काम त्यांच्या पतीने केलं होतं, पण त्याची अमंलबाजवण मात्र भांडारनायके यांनी केली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्बणजे श्रीलंकेच नाव सिलोनवरून श्रीलंका त्यांच्याच कार्यकाळात झालं. परिणामी सिंहलामध्ये 'मातिनी' आणि तामिळमध्ये 'अम्मैयार' म्हणजेच आई अशी विशेषणं त्यांना लाभली.

सिरीमा म्हणजेच सिरिमाओ भंडारनायके त्यांच्या कॅबिनेटमधल्या एकमेव पुरूष आहेत असं अनेकदा त्यांच्याबाबत बोललं गेलं. त्यांची मुलगी चंद्रिका कुमारतुंगा यांनीसुद्धा हे खरं असल्याचं मान्य केलंय.

सिरिमाओ यांच्यानंतर जगात दुसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या त्या इंदिरा गांधी आणि त्यांच्या कॅबिनेटबाबतसुद्धा असंच बोलंल जायचं. अर्थात हा झाला इतिहास...

सिरीमा आणि इंदिरांनंतर जगातल्या अनेक देशांच्या प्रमुखपदी महिला आल्या आहेत. त्यातल्या काहींना कौटुंबिक पार्श्वभूमी होती तर काहीना अजिबात नव्हती. पण, तरीही बहुतांश महिलांनी त्यांची वेगळी छाप जागतिक राजकारणात सोडलीय एवढं मात्र नक्की.

सिरिमाओ भंडारनायके, इंदिरा गांधी, गोल्डा मायर, मार्गारेट थॅचर, बेनझीर भुत्तो, खालिदा झिया, शेख हसीना, अँगेला मर्केल, अँग सँग सू ची, जेसंडा अर्डन... अशा अनेक महिला आहेत ज्यांनी संधी घेतली आणि राज्य गाजवलंय...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)