You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेनं सातवं आरमार पाठवलं, तरी इंदिरा गांधी डगमगल्या नव्हत्या, वाचा 1971 च्या युद्धाची गोष्ट
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
1971 मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध लढलं गेलं, ज्यातून बांगलादेश हा नवा देश जगाच्या नकाशावर आला.
पण या युद्धातील विशेष गोष्ट अशी होती की, पूर्व पाकिस्तानची राजधानी ढाका ताब्यात घेण्याचं कोणतंही उद्दिष्ट भारतीय सैन्याने ठेवलं नव्हतं.
पूर्व पाकिस्तानातील जास्तीत जास्त भूभाग काबीज करून त्या भागात बांगलादेश सरकार स्थापन करायचं आणि भारतात जो निर्वासितांचा लोंढा येऊ लागला होता, त्या एक कोटी निर्वासितांना या भूभागावर वसवायचं असं भारताचं नियोजन होतं.
मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक मेजर जनरल के के सिंह यांनी या युध्दाची योजना तयार केली होती. त्यांच्या या योजनेत तीन महत्वाचे उद्देश होते. यासंबंधीची माहिती श्रीनाथ राघवन लिखित '1971 : ए ग्लोबल हिस्ट्री ऑफ द क्रिएशन ऑफ बांग्लादेश' या पुस्तकात सापडते.
श्रीनाथ राघवन त्यांच्या पुस्तकात लिहितात, "पूर्व पाकिस्तानातील दोन प्रमुख बंदरं चितगाव आणि खुलना काबीज करणं हा या योजनेचा पहिला उद्देश होता. जेणेकरून पाकिस्तानी सैन्याला तिथं उतरता येणार नाही."
"त्यानंतर अशी ठिकाणं काबीज करायचं ठरलं जिथून पाकिस्तानी सैन्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही. तिसरा उद्देश होता, पूर्व पाकिस्तानला छोट्या छोट्या हिश्श्यात विभागणं, जेणेकरून भारतीय सैन्याला ते ताब्यात घेणं शक्य होईल.
ढाक्यावर ताबा मिळवण्याचा विचार सुरू होता पण ही जरा जास्तच महत्त्वाकांक्षी योजना होईल या उद्देशाने तो विचार बारगळला."
या संपूर्ण ऑपरेशनसाठी भारतीय लष्कराला मोजून तीन आठवडे लागतील, असा अंदाज लावण्यात आला होता. 1965 च्या युद्धात आंतरराष्ट्रीय दबाव आला होता.
तेव्हाच्या अनुभवावरून भारताला असं वाटत होतं की, हे युद्धही फार काळ टिकणार नाही. जुलै 1971 मध्ये सॅम मानेकशॉ यांनी ईस्टर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांना आपली योजना सांगितली.
अरोरा यांना ही योजना पटली होती मात्र 'चीफ ऑफ स्टाफ जनरल' जेकब यांना ही योजना काही पटली नव्हती.
जेकब आणि मानेकशॉ यांच्यात असलेले मतभेद
जेकब यांना वाटत होतं की, ढाक्यावर हल्ला करून ते ताब्यात घेणं भारतीय सैन्याचं मुख्य उद्दिष्ट असायला हवं होतं.
जेकब त्यांच्या 'सरेंडर अॅट ढाका' या पुस्तकात लिहितात, "युद्धाच्या आधी काही महिने मी पाकिस्तानी ठिकाणांना मागे टाकून थेट ढाक्याकडे कूच करण्याची योजना आखली होती. पण जेव्हा मानेकशॉ आणि के के सिंग ईस्टर्न कमांडच्या मुख्यालयात आले तेव्हा आमच्यात या गोष्टीवरून मतभेद झाले.
जेव्हा के के सिंग यांनी त्यांची योजना मांडली तेव्हा मी त्यांना सांगितलं की, ढाका हे पूर्व पाकिस्तानचं 'जियो-पॉलिटिकल हार्ट' आहे. जोपर्यंत आपण ढाका ताब्यात घेत नाही तोपर्यंत पूर्व पाकिस्तान ताब्यात घेण्याचा विचारच करता येणार नाही."
जेकब यांच्या म्हणण्यानुसार, मानेकशॉ हस्तक्षेप करत म्हणाले, "आपण जर चितगाव आणि खुलना ताब्यात घेतलं तर ढाका मानसिकरित्याच नेस्तनाबूत होईल असं तुम्हाला वाटत नाही का? मी म्हटलं मला ते मान्य नाही."
मी त्यांना पुन्हा सांगितलं की, "ढाका ताब्यात घेणं आपलं मुख्य उद्दिष्ट असायला पाहिजे.
यावर मानेकशॉ म्हणाले की, ढाका आमच्या प्राधान्याक्रमात नाही. इथं हल्ला करण्यासाठी मी अतिरिक्त सैन्य देणार नाही. यावर जनरल अरोरा यांनी यावर आपली संमती दर्शवली."
यावर एअर चीफ मार्शल पी सी लाल त्यांच्या 'माय इयर्स विथ आयएएफ' या आत्मचरित्रात लिहितात, "पाकिस्तानी सैन्याला हरवून ढाका काबीज करता येईल असं आम्ही गृहित धरलं नव्हतं.
भारतीय लष्कराने 7 डिसेंबरलाच जेसोरवर ताबा मिळवला होता. पण पाकिस्तानी सैन्याने ढाक्यात आत्मसमर्पण केलं आणि मग खुलना ताब्यात आलं."
भारताने युद्धाचा निर्णय घेतला
आज 1971 च्या युद्धाला 50 वर्ष उलटली, पण भारताने या युद्धात जी मुत्सद्देगिरी दाखवली, मुक्ती वाहिनीच्या सैन्याला जे प्रशिक्षण दिलं त्याचं श्रेय पाश्चिमात्य लेखकांनी भारताला कधी दिलंच नाही.
उलट राजकीय पक्षांमध्ये या युद्धावरून मतभेद असूनही 'संपूर्ण देश एक झाला' असल्याच्या गोष्टीवर पाश्चिमात्य लेखकांच एकमत आहे.
अर्जुन सुब्रमण्यम त्यांच्या 'इंडियाज वॉर्स 1947-1971' या पुस्तकात लिहितात, "इंदिरा गांधींना सुरुवातीच्या टप्प्यात असं वाटलं होतं की, भारत मुक्ती वाहिनीला ज्या प्रकारची मदत करतोय प्रशिक्षण देतंय त्याबळावर मुक्ती वाहिनी एकटी पाकिस्तानला हरवू शकेल.
पण यात पाकिस्तानी सैन्य आणखीन निर्दयीपणे वागून निर्वासितांचा लोंढा भारताच्या दिशेने येईल याचा अंदाज त्यांनी बांधला नव्हता.
नोव्हेंबर येता येता तर भारतात 1 कोटींच्यावर निर्वासित आले होते. पाकिस्तानचे हे अत्याचार थांबावे म्हणून जगाने काहीच प्रयत्न केले नाहीत. शेवटी पूर्व सीमेवर पाकिस्तानशी युद्ध करणे हा एकमेव पर्याय भारताकडे उरला होता."
या युद्धात पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली आणि बांगलादेश हा नवा देश जगाच्या नकाशावर आला.
भारताने आम्हाला चांगली वागणूक दिली असं बऱ्याच पाकिस्तानी युद्धकैद्यांनी सांगितलं होतं. पाकिस्तानी सैनिकांना जिनिव्हा करारानुसार वागणूक देण्याचे आदेश लष्कराच्या मुख्यालयाने दिले होते.
लेफ्टनंट जनरल थॉमस मॅथ्यू सांगतात, "आग्र्यात त्यांच्या पॅरा युनिटला त्यांच्या बरॅक्स रिकाम्या करून टेंट मध्ये राहावं लागलं कारण पाकिस्तानी युद्धकैद्यांना तिथं ठेवता येईल. त्याचबरोबर पाकिस्तानी युद्धकैद्यांसोबत संवाद कमी रहावा असा आदेश असताना देखील मी निरीक्षणासाठी बाहेर पडलो.
माझ्या एका हातात छडी घेऊन मी माझ्या दोन सैनिकांसह कॅम्पमध्ये घुसलो. मला बघून बरेच पाकिस्तानी सैनिक पलंगाच्या बाजूला सावधान अवस्थेत उभे राहिले. पण पाकिस्तानी स्पेशल फोर्सचे काही सैनिक मला बघूनही बसलेच होते."
जनरल मॅथ्यूने त्यांना तुम्ही असं का वागलात म्हणून विचारलं. यावर एक सैनिक हिंमत करून म्हणाला की, "माझी मुलं माझी पत्नी पाकिस्तानात कोणत्या अवस्थेत आहेत हे मला माहित असताना देखील मी तुम्हाला बघून सावधान का उभं राहावं?"
हे ऐकून मी त्या पाकिस्तानी सैनिकाला आश्वासन दिलं की, मी त्याच्या कुटुंबाची माहिती त्याला देईन. मी त्या सैनिकाचा तपशील दिल्लीतील मिलिटरी ऑपरेशन्सच्या महासंचालकांना पाठवला.
काही दिवसांत मला त्याचं कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती मिळाली, मी त्याला ही बातमी सांगताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं."
निक्सन आणि इंदिरा गांधी यांच्यात तणाव
जसं जसं संकट वाढू लागलं तसं अमेरिकेने हस्तक्षेप करायला सुरुवात केली. पण इंदिरा गांधी ऐकून घेणाऱ्यातल्या नव्हत्या.
त्यांच्या या धोरणामुळे अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन आणि त्यांचे सल्लागार किसिंजर त्रासले होते. अमेरिकेनं आपलं सातवं आरमार पाठवल्यावरही इंदिरा गांधींवर काहीच परिणाम झाला नाही. यामुळे अमेरिका खूप अस्वस्थ झाली.
इंदिरा गांधींची व्यावहारिक राजकारणावर असलेली पकड आणि सोबतच पूर्व पाकिस्तानी लोकांच्या दुःखाबद्दल असलेली सहानुभूती या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. आणि शेवटी हे युद्ध न्यायसंगत युद्ध ठरलं.
1971 च्या या युद्धात जे यश मिळालं त्याचं श्रेय युद्ध-योजनेला दिलं जातं. पण ही युद्ध योजना लेफ्टनंट जनरल सगत सिंग, कॅप्टन स्वराज प्रकाश, ग्रुप कॅप्टन वोलेन आणि ग्रुप कॅप्टन चंदन सिंग यांच्या योगदानाशिवाय अपूर्ण होती.
अर्जुन सुब्रमण्यम लिहितात, "सगत सिंगने अखौरा, भैरब बाजार आणि सिल्हेट काबीज केलं, चंदन सिंगने एमआय हेलिकॉप्टरने सैन्य, शस्त्र आणि तोफार मेघना नदीच्या पलीकडे पोहोचवल्या, ग्रुप कॅप्टन वोलेनने त्यांच्या पायलटला तेजगाव एअरबेसवर हल्ला करायला सांगितलं.
तसेच स्वराज प्रकाश आणि मेजर जनरल उबान यांनी भारतीय सैन्याची जवळपास अर्धी डिव्हिजन चितगाव सेक्टरमध्ये तैनात केली. यासगळ्याचा परिणाम, 16 डिसेंबरपर्यंत ढाका ताब्यात आलं होतं."
मुक्ती वाहिनीने दिलेली गुप्त माहिती कामी आली
भारत जिंकण्याचं दुसरं महत्वाचं कारण होतं, मुक्ती वाहिनीचं सहकार्य.
लेफ्टनंट जनरल शमशेर सिंग मेहता सांगतात, "भारताच्या सैन्यापर्यंत गुप्त माहिती पोहोचवणं हे मुक्ती वाहिनीचं मोठं योगदान होतं. जर कोणतीही गुप्त माहिती न मिळवता आम्ही बांगलादेशात गेलो असतो तर पश्चिमेकडे जसे अडथळे आम्हाला आले तसेच इथं आले असते.
युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुक्तीवाहिनीने दिलेल्या माहितीमुळे आम्हाला समजायचं की, शत्रू कुठं लपून बसलाय. जरी ती माहिती बरोबर नसली तरी आम्हाला शत्रूच्या पुढच्या रणनितीचा अंदाज यायचा."
1971 च्या संपूर्ण युद्धात पाकिस्तानचा रोख प्रतिक्रियांच्या दिशेने होता. जनरल पिंटो यांना जेव्हा विचारलं की, 57 व्या डिव्हिजन विरुद्ध पाकिस्तानने त्यांची 6 आर्मर्ड डिव्हिजन युद्धात उतरवली नाही याचं तुम्हाला आश्चर्य नाही का वाटत?
यावर पिंटो म्हणाले की, जर त्यांनी असं केलं असतं तर कदाचित मी इथं तुमच्यासमोर बोलत बसलो नसतो.
या युद्धातली आणखीन एक खास गोष्ट म्हणजे, या ऑपरेशनच्या आधी सहा महिने, भारतीय सैन्याने त्यांचं सर्व प्रशिक्षण आणि मूलभूत गरजांचा अंदाज घेतला होता.
तर दुसरीकडे पाकिस्तानने युद्धाची जी तयारी केली होती ती म्हणावी तितकी समाधानकारक नव्हती. कारण पूर्व पाकिस्तानमधील असंतोष चिरडण्यासाठी त्यांनी आपली सर्व ताकद वापरली होती.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचं मनोबल तोडलं
भारतीय हवाई दलाला जो वेळ मिळाला होता त्यात त्यांनी नवीन हवाई अड्डे तयार केले आणि आपली हवाई सुरक्षा आणखीन मजबूत केली.
तेच 1965 च्या युद्धात ठीकठाक कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलात शिथिलता आली होती. एअर मार्शल नूर खान यांनी प्रयत्न करून सुद्धा पाकिस्तानच्या हवाई दलाला नवी उंची गाठता आली नव्हती.
एअर चीफ मार्शल पीसी लाल त्यांच्या 'माय इयर्स विथ द आयएएफ' या आत्मचरित्रात लिहितात, "भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलाचं सामर्थ्य बघता पश्चिमी आघाडीवर दोघेही समान पातळीवर होते.
पण या युद्धात भारतीय हवाई दलाने जवळपस 7500 वेळा उड्डाण केलं. तर 1965 च्या 23 दिवसांच्या युद्धात 4000 उड्डाणे झाली."
भारताच्या हवाई दलाने हाजीपीरमधल्या पाकिस्तानी आर्टलिरी ब्रिगेडवर आणि चंगामंगा जंगलातील पाकिस्तानी शस्त्रसाठ्यांवर हल्ला चढवला.
त्यानंतर भारतीय हवाई दलाने कराची बंदराजवळील कियामारी रिफायनरी, सिंधमधील सुई गॅस प्लांट, मंगला धरण आणि अटक रिफायनरीवर बॉम्ब टाकले. या सगळ्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं मनोबल खच्ची झालं तर भारतीय हवाई दलाचे वर्चस्व वाढलं.
कराचीवर भारतीय नौदलाचा हल्ला
कराचीवर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदलाने ज्यापद्धतीने आपल्या मिसाईल बोट्स वापरल्या त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. हल्ला करताना बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी रशियन भाषेत संवाद साधला जेणेकरून पाकिस्तानी लोकांना त्यांची भाषा समजू नये.
पाकिस्तानी नौदलाला आक्रमक रणनीती आखता आली नाही. त्यांनी भले ही आयएनएस खुकरीला पाण्यात बुडवलं असेल पण आयएनएस विक्रांतला बुडवण्यासाठी जी गाझी नावाची पाणबुडी आली होती तिलाच विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ जलसमाधी मिळाली.
एप्रिल महिन्यात पूर्व पाकिस्तानवर हल्ला करण्याचे आदेश इंदिरा गांधींनी जनरल मानेकशॉ यांना दिले होते. हा आदेश जनरल मानेकशॉ यांनी मान्य केला असता तर पुढं काय झालं असतं यावर आजही चर्चा झडतात.
सैन्यातील काही तज्ज्ञांच्या मते, भारताला याचा फायदा झाला असता. कारण युद्धाला सुरुवात होईपर्यंत पाकिस्तानची तयारी जवळपास शून्य होती.
पण अर्जुन सुब्रमण्यम यांना वाटत की, "जर असं झालं असतं तर भारताचे डोळे आणि कान बनलेल्या मुक्ती वाहिनीची मदत मिळाली नसती. म्हणजे भारताच्या फिल्ड कमांडर्सनी पश्चिम मोर्च्यावर ज्या पद्धतीने माहितीअभावी अंधारात गोळ्या झाडल्या अगदी तशीच परिस्थिती बांग्लादेशात उद्भवली असती."
बांग्लादेश युद्धाचा मानसशास्त्रीय पैलू पाहता, युद्धाच्या पहिल्या आठवड्यातच जनरल नियाझीची लढण्याची इच्छाशक्ती संपून गेली होती. तंगेल पॅराड्रॉप आणि ढाक्याच्या गव्हर्नमेंट हाऊसवर मिग-21 आणि हंटर विमानांनी हल्ले चढवल्यामुळे नियझीचं मनोबल खचलं.
पाकिस्तानी फिल्ड कमांडर्सना वाटू लागलं होतं की, पराभवाला जबाबदार धरण्याआधीच आपण भारतीय सैन्यासमोर शस्त्र टाकू.
लेफ्टनंट जनरल शमशेर सिंग मेहता सांगतात की, "सगत सिंग आणि चंदन सिंग नसते तर ढाका हाती लागलं नसतं. जनरल जेकब ईस्टर्न कमांडच्या मुख्यालयात नसते तर पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली नसती. सगत सिंग सैन्याच्या विषयात जिनियस होते तर जेकब यांना शत्रूच्या पुढची रणनिती काय असेल याचा अचूक अंदाज बांधता येत होता."
1971 च्या युद्धाने वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली. तिन्ही दलाच्या प्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांची प्रतिभा हेरली होती. अशा अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देताना तिन्ही दलप्रमुखांनी मागेपुढे पाहिलं नाही.
मानेकशॉ यांनी लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा, मेजर जनरल जेकब, लेफ्टनंट जनरल सगत सिंग आणि मेजर जनरल इंदर गिल यांना प्रोत्साहन दिलं होतं.
एअर चीफ मार्शल पी सी लाल यांनीही विनायक मलसे, मॅली वोलेन आणि चंदन सिंग यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. अॅडमिरल नंदा यांनी नीलकंता कृष्णन, एसएन कोहली आणि स्वराज प्रकाश अशा सक्षम अधिकाऱ्यांची फौज उभी केली होती.
तरुण अधिकाऱ्यांमध्ये अरुण खेत्रपाल, होशियार सिंग, निर्मलजीत सिंग सेखों, बहादूर करीम नवीना आणि डॉन लाझरस यांनी युद्धात आपली कामगिरी दाखवली होती.
जिथं राजकीय नेतृत्वाची गोष्ट येते तिथं, इंदिरा गांधी आणि जगजीवन राम यांना याआधी युद्धाचा अनुभव नव्हता, ना त्यांना लष्कराशी संबंधित माहिती होती. यामुळेच त्यांनी आपल्या सैन्यप्रमुखांना मुभा दिली होती.
सैन्य प्रमुखांनी इंदिरा गांधींना जे सल्ले दिले त्याच्या आधारे रणनिती तयार करण्यात आली. राजकीय इच्छाशक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या लोकांमध्ये योग्य समन्वय साधल्यामुळे भारताचा या युद्धात विजय झाला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)