1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानी युद्धबंदींनी भारतीय तुरुंगात कसे घालवले दिवस?

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

16 डिसेंबर 1971 ला शस्त्र टाकल्यानंतर चार दिवसांनी जनरल नियाजी आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी मेजर जनरल राव फरमान अली, अॅडमिरल शरीफ, एअर कोमोडोर इनामुल हक आणि ब्रिगेडियर बाकिर सिद्दीकी यांना कोरिबू विमानातून कोलकात्याला नेण्यात आलं.

नियाजी यांना त्यांचे पीआरओ सिद्दीक सालिक यांना ढाक्यात सोडायचं नव्हतं. त्यामुळं त्यांनाही फरमान अली यांचे नकली एडीसी बनवून कोलकात्याला नेण्यात आलं. जनरल सगत सिंग या सर्वांना ढाका विमानतळावर सोडवायला आले. त्यांना फोर्ट विल्यमच्या क्वार्टर्समध्ये ठेवण्यात आलं होतं.

जनरल जॅकब यांनी सरेंडर (शरणागती)ची कागदपत्रं नव्यानं टाईप करून घेतली कारण मूळ दस्तावेजांमध्ये शरणागतीची वेळ चुकीची दाखवण्यात आली होती. नियाजी आणि जनरल अरोरा यांनी त्यावर पुन्हा सह्या केल्या. सुरुवातीला जनरल जॅकब यांनी नियाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी केली.

"आम्हाला एका तीन मजली इमारतीत ठेवण्यात आलं होतं. ती नवीच होती. स्वच्छ जागा होती. आम्ही एका खोलीला स्वयंपाकघर बनवलं. आमच्यासाठी भारतीय आचारी स्वयंपाक करायचे. आमचे अर्दली आम्हाला ते वाढायचे. आम्ही रेडिओ ऐकणं, पुस्तकं वाचणं आणि व्यायाम यात वेळ घालवत होतो," असं जनरल एएके नियाजी यांनी त्यांच्या 'द बिट्रायल ऑफ ईस्ट पाकिस्तान' मध्ये लिहिलं आहे.

"एक दिवस मी माझ्या देखरेखीसाठी असलेले भारतीय अधिकारी कर्नल खारा यांना मेजर जनरल जमशेद कुठं आहेत? असं विचारलं. त्यावर त्यांनी ते सध्या ढाक्यात प्रशासकीय कामांमध्ये आमची मदत करत आहेत, असं सांगितलं. नंतर आम्हाला समजलं की, त्यांना ढाक्यात न ठेवता कोलकात्याच्या एका तुरुंगात एकट्यांना कैदेत ठेवलं होतं."

व्हीआयपी बंदींना जबलपूरला नेले

कोलकात्याहून नियाजी आणि त्यांच्या साथीदारांना जबलपूरच्या शिबिर क्रमांक 100 मध्ये नेण्यात आलं.

भारतीय अधिकारी मेजर जनरल राव फरमान अली यांना कोलकात्यातच ठेवून त्यांची चौकशी करू इच्छित होते. पण नियाजी यांनी त्याला विरोध केला.

खरं म्हणजे भारतीय सैनिकांना फरमान अली यांच्या कार्यालयात त्यांनी हातानं लिहिलेला एक कागद सापडला होता. त्यावर 'ग्रीन लँड विल बी पेंटेड रेड' (हिरवी भूमी लाल रंगानं रंगवली जाईल) असं लिहिलेलं होतं.

"आम्हाला बॅचलर्स ऑफिसर्स क्वार्टरमध्ये ठेवण्यात आलं होतं. प्रत्येक अधिकाऱ्याला झोपण्यासाठी एक खोली आणि त्याला लागून असलेलं बाथरूम देण्यात आलं होतं. एक कॉमन लिव्हींग रूम होती. तिला एक वऱ्हांडा होता. खोल्या भरपूर होत्या त्यामुळं आम्ही एका खोलीत नमाज आणि दुसरी मेससारखी वापरत होतो," असं नियाजी यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे.

"आम्हाला रोज सारखंच जेवण मिळायचं. उकळलेले तांदूळ, चपात्या, भाज्या आणि डाळ. कधी-कधी मांसाहारही दिला जायचा. आमच्या कॅम्पला चारही बाजूनं काटेरी तारांनी घेराव घालण्यात आला होता. एक संत्री अल्सेशियन कुत्र्यासह चोवीस तास आमच्यावर निगराणी ठेवून असायचा. कॅम्पच्या बाहेर आमच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिकांची संपूर्ण बटालियन तैनात होती. एकूणच कॅम्पमधील स्टाफचं वर्तन आमच्याबरोबर ठीक होतं."

युद्धबंदींच्या व्यवस्थेसाठी जनरल शहबेग सिंग यांना केलं तैनात

कॅम्पमध्ये नमाजचं नेतृत्व जनरल अन्सारी करायचे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना जिनिव्हा कनव्हेन्शनच्या नियमानुसार महिन्याला 140 रुपये पगार दिला जात होता. त्यातून ते पुस्तकं, कागद आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करायचे.

बाजारातून त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करून आणून देण्यासाठी एका हवालदाराला तैनात करण्यात आलं होतं.

काही दिवसांनी भारतीय सैनिकांनी शिबिराच्या चारही बाजुंनी एक भिंत तयार करायला सुरुवात केली. जनरल नियाजी यांनी त्याला विरोध केला. तेव्हा बाहेरच्या लोकांना पाहता येऊ नये, म्हणून असं केल्याचं त्यांनी सांगितलं.

"आम्हाला असं सांगण्यात आलं की, पाकिस्तान सरकारनं आम्हाला मारण्यासाठी दोघांना पाठवलं आहे. जनरल पाडा यांनी मला सांगितलं की, त्यांना दिल्लीमध्ये लष्कराच्या मुख्यालयात बोलावलं होतं. भारतीय गुप्तचर खात्यानं कोलकात्यात जमशेद नावाचा एक व्यक्ती पकडला आहे त्याला आणि आणखी एकाला जनरल नियाजी यांना मारण्यासाठी पाठवलं आहे, असं त्यानं सागितल्याचं पाडा यांना तिथं सांगण्यात आलं होतं," असं नियाजी लिहितात.

"काही दिवसांनी जनरल पाडा यांच्याऐवजी जनरल शहबेग सिंग यांना तिथं तैनात करण्यात आलं. त्यांचं वर्तन माझ्याबरोबर मैत्रीपूर्ण होतं. भारतात शिखांबरोबर योग्य वर्तन होत नसल्याचं ते जाहीरपणे बोलायचे. त्यांनी मला खालिस्तानचा नकाशा दाखवला होता. त्यात संपूर्ण पूर्व पंजाबचा समावेश करण्यात आला होता. नंतर 1984 मध्ये भारतीय सैनिकांनी सुवर्ण मंदिरात प्रवेश केला, त्यावेळी जरनैल सिंग भिंडरावाले यांच्याबरोबर लढताना ते मारले गेले होते."

भुसुरुंग खोदून बाहेर जाण्याची योजना

दुसरीकडे कर्नल हकीम अरशद कुरेशी (जे नंतर मेजर जनरल बनले) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 21 डिसेंबरला बसमधून भारतात आणण्यात आलं.

रस्ते आणि रेल्वे मार्गानं एक दिवस आणि एक रात्रीचा प्रवास केल्यानंतर त्यांना रांची येथील युद्धबंदी शिबिर क्रमांक 95 मध्ये नेण्यात आलं. जाताच त्यांनी त्या कॅम्पमधून पळून जाण्याची योजना आखायला सुरुवात केली.

त्याच दरम्यान एका भारतीय कमांडंटनं शिबिरात दौरा केला. शिबिरामध्ये योग्य व्यवस्था नसल्याचं पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

"कमांडंट निघून गेल्यानंतर आम्ही भारतीय जेसीओंना फावडे आणि खुरपे देण्याची मागणी केली. बराकसमोर फुलांची बाग तयार करतो असं सांगितलं. पुढल्या वेळी कमांडंट आले तर त्यांना पाहून आनंद वाटेल असं आम्ही म्हणालो. आम्हाला या दोन्ही गोष्टी देण्यातही आल्या," असं मेजर जनरल हकीम अरशद कुरेशी यांनी त्यांच्या '1971 इंडो-पाक वॉर अ सोल्जर्स नरेटिव्ह' या पुस्तकात लिहिलं आहे.

"आम्ही दिवसा माळीकाम करायचो आणि रात्री त्याच्या मदतीनं भुसुरुंग तयार करायचो. आम्ही आधी खोदलेली माती एका बराकच्या फॉल्स सिलिंगमध्ये टाकायला सुरुवात केली. पण एक दिवस मातीच्या ओझ्यानं ते कोसळलं. त्यामुळं आम्ही बागेमध्ये ती माती टाकू लागतो."

"भुसुरुंग अंतिम टप्प्यात असताना आम्ही शिबिरातून आणि बाहेरून भारतीय चलन जमवण्यास सुरुवात केली. आम्ही भारतीय सैनिकांच्या मदतीनं सोन्याच्या अंगठ्या, घड्याळं आणि इतर मौल्यवान वस्तू विकून भरपूर पैसे जमा केले."

भारतीय सैनिकांना समजलं

ज्या दिवशी पाकिस्तानी सैनिक या भुसुरुंगाद्वारे पळून जाणार होते, त्याचदिवशी सर्व युद्धबंदींना कॅम्पच्या मध्यभागी जमण्यास सांगण्यात आलं. त्यांच्या चारही बाजुंनी वॉच टावर्सवर सशस्त्र गार्डची संख्या वाढवली होती. कर्नल हाऊजे एका बंदीच्या खोलीत गेले आणि त्यांनी एका पलंगाखाली पसरलेली लाकडं हटवायला सांगितली.

त्यानंतर त्यांनी फरशीचं कव्हरींग काढलं तर त्यांना एक खोल सुरुंग दिसलं. त्यानंतर त्यांनी सर्व पाकिस्तानी युद्धबंदींना एकत्र केलं. शिबिरातून पळून जाणयाचा प्रयत्न करणं हे पाकिस्तानी युद्धबंदींचं कर्तव्य आहे. मात्र, त्याचप्रमाणे त्यांना रोखणं हे भारतीय सैनिकांचं कर्तव्य आहे, असं भाषण त्यांनी दिलं. हा प्रयत्न करणाऱ्यांनी गुन्हा मान्य केल्यास इतरांना त्याची शिक्षा मिळणार नाही, असं ते म्हणाले.

भुसुरुंग खोदण्याची शिक्षा

"आमच्यापैकी 29 जणांनी याची जबाबदारी स्वीकारायचं ठरवलं. आमच्यापैकीच कोणीतरी आम्हाला दगा दिला होता. त्यानं भुसुरुंगाच्या जागेबाबत माहिती देण्याबरोबरच ते किती लांबपर्यंत खोदलं आहे हेही सांगितलं होतं. सायंकाळी आम्हाला याची शिक्षा देण्यात आली. आमच्याकडून झोपण्यासाठीच्या खाटा (चारपाई) आणि वैयक्तिक साहित्य परत घेण्यात आलं," असं मेजर जनरल कुरेशी यांनी लिहिलं आहे.

"आम्हाला हॉलमध्ये सर्वांसोबत जेवणास बंदी घालण्यात आली. तसंच जेवणानंतर फिरणं आणि बाहेरून वस्तू मागवण्यावरही बंदी घालण्यात आली. दिवसातून अनेकदा आमची हजेरी घेतली जायची."

एका लेफ्टनंट कर्नलच्या नेतृत्वात या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. काही दिवसांनी या दोषींना शिबिर क्रमांक 95 मधून शिबिर क्रमांक 93 मध्ये शिफ्ट करण्यात आलं. पण त्याठिकाणी त्यांना फार कमी दिवस ठेवण्यात आलं होतं.

काही युद्धबंदींना आगरा इथं नेलं

"20 जून, 1972 ला आम्हाला बेड्या घालून एका ट्रकमध्ये लादून रेल्वे स्थानकावर नेण्यात आंलं. शिबिरातील इतर युद्धबंदी आमची स्थिती पाहत होते," असं याची माहिती देताना मेजर जनरल अरशद कुरेशी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं.

"त्यांनी असा प्रयत्न करू नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात होता. आम्हाला बाहेरून लॉक करता येईल अशा एका रेल्वेच्या डब्यात बसवण्यात आलं होतं. शौचालयात कमोड होतं, पण सुरक्षेच्या कारणास्तव त्याचं दार काढलेलं होतं. हाताबरोबरच आमच्या पायातही बेड्या घातल्या होत्या."

"जेवण करतानाही आमचे हात खोलण्यात आले नव्हते. या बेड्यांसह खाणं हीदेखील वेगळी शिक्षा होती, कारण आम्ही जेवढं खात होतो त्यापेक्षा जास्त कपड्यांवर सांडवत होतो. आम्हाला डब्यात असलेल्या सर्वांसमोरच टॉयलेटचा वापर करावा लागत होता. तिथं टॉयलेट पेपर किंवा पाणी काहीही नव्हतं. अचानक मला वाटलं की मी माझ्या डोळ्यानं जगातील आठवं आश्चर्य ताजमहल पाहत आहे. आम्ही आगरा इथं पोहोचलो होतो. तारीख होती 21 जून, 1972. भारतातील सर्वात मोठा आणि उष्ण दिवस."

पाकिस्तानी कैप्टन डॉक्टरच्या वेशात पळाला

आगरा तुरुंग त्याकाळी भारतातील सर्वाधिक सुरक्षित तुरुंग होतं. याठिकाणी जवळपास 200 पाकिस्तानी युद्धबंदींना ठेवण्यात आलं होतं. भारतीय तुरुंगामध्ये कुरेशी यांचा अनुभव चांगला नव्हता. कारण त्यांना पळून जाण्याचा प्रयत्न करण्याची शिक्षा मिळत होती.

मात्र, दुसरा एक पाकिस्तानी अधिकारी एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. कॅप्टन रियाजुल हक यांनी आजारी असल्याचं नाटक करून त्यांच्या एका युद्धबंदीला रुग्णालयात दाखल केलं होतं. एक दिवस ते डॉक्टरचा पांढरा कोट परिधान करून गळ्यात स्टेथोस्कोप लटकावून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

त्याचप्रमाणे कॅप्टन शुजात अलीदेखील धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पण त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दूसरे एक युद्धबंदी मेजर नसीबुल्लाह यांना गोळी घातली होती.

युद्धबंदींना दाखवला पाकिजा चित्रपट

या घटना सोडल्या तर भारताकडून पाकिस्तानच्या युद्धबंदींना चांगलं वर्तन मिळाल्याची चर्चा जागतिक माध्यमांमध्ये झाली होती.

"भारतातील वरिष्ठ सैनिक आणि बिगरसैनिक मुस्लीम अधिकाऱ्यांना या युद्धबंदींशी चर्चा करण्यासाठी बोलावलं जात होतं. त्यांच्यासाठी मुशायरे आणि चित्रपटाचे शो आयोजित केले जात होते. आम्ही त्यांना पाकिजा आणि साहेब बीबी और गुलाम चित्रपट दाखवले होते. ते त्यांना खूप आवडले होते," असं भारताचे उप लष्करप्रमुख राहिलेले लेफ्टनंट जनरल एसके सिन्हा यांनी त्यांच्या 'चेंजिंग इंडिया स्ट्रेट फ्रॉम द हार्ट' मध्ये लिहिलं आहे.

"रुरकीमध्ये आम्ही पाकिस्तानी आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेट सामनाही आयोजित केला होता. वॉशिंग्टन पोस्टच्या एका प्रतिनिधीनं या शिबिरांचा दौरा केला होता. जगात युद्धबंदींबरोबर कुठंही एवढं चांगलं वर्तन करण्यात आलं नाही, असं त्यांनी लिहिलं होतं. हे भारतीय लष्कराचं मोठं कौतुक होतं."

पाकिस्तानी सैनिकांसाठी बराक, भारतीय सैनिकांसाठी तंबू

"पाकिस्तानी युद्धबंदींबरोबर भारतात अत्यंत चांगलं वर्तन झालं होतं. भारतीय सैनिकांना जे कपडे, राशन दिलं जात होतं तेच त्यांनाही दिलं जात होतं. युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानी युद्धबंदींना बराकमध्ये ठेवण्यात आलं होतं, तर भारतीय सैनिक बाहेर तंबूमध्ये राहायचे," असं जनरल सॅम मानेक शॉ यांचं आत्मचरित्र लिहिणारे जनरल देपिंदर सिंग यांनी लिहिलं आहे.

"पाकिस्तानी युद्धबंदींच्या बराकमध्ये पाणी होतं, कूलर, पंखे होते मात्र आमचे सैनिक तंबूमध्ये प्रतिकूल परिस्थितीत होते. यामागचं कारण आमच्या सैनिकांना समजावण्यात आम्हाला खूप त्रास झाला होता."

प्रत्येक मुस्लीम उत्सवाला सॅम मानेक शॉ यांनी प्रत्येक पाकिस्तानी युद्धबंदीला शुभेच्छा संदेश पाठवला. भारतानं पाकिस्तानी युद्धबंदींना सोडण्याची इतरही कारणं असतील पण एक कारण हेही होतं की, ते पाकिस्तानी युद्धबंदींना खाऊ घालण्याबरोबरच कमी का असेना पण वेतन देत होते. भारतासारख्या गरीब देशाला ते कठीण ठरत होतं, असं जनरल नियाजी यांनीही सांगितलं होतं.

28 महिन्यांनी नियाजींना सोडलं

असाही एक दिवस आला जेव्हा जनरल नियाजी यांना जबलपूरच्या रेल्वे स्थानकावर पाकिस्तानला जाणाऱ्या एका विशेष रेल्वेमध्ये बसवण्यात आलं.

30 एप्रिल 1974 च्या सकाळी रेल्वे वाघा सीमेवर पोहोचली. पाकिस्तानात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना चहा पाजण्यात आला. भारतीय तुरुंगांमध्ये ते 28 महिने राहिले होते.

पाकिस्तानच्या सीमेवर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी होती.

"मी जेव्हा सीमा ओलांडली तेव्हा ब्रिगेडियर अंजुम यांनी मला सॅल्युट केला आणि प्रेससमोर काहीही बोलायचं नाही, असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी एक आयाताकार कार्ड बोर्ड काढला, त्यावर 1 नंबर लिहिला होता. त्यांनी मला फोटो काढण्यासाठी तो माझ्या छातीवर लावायला सांगितला," असं जनरल नियाजी म्हणाले.

"इतर युद्धबंदी जनरलबरोबरही असं केलं जात आहे का, असं मी त्यांना विचारलं तर त्यांनी नकार दिला. मात्र जनरल टिक्का यांच्या आदेशावरून असं केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर मी खूप नाराज झालो. मी रागात काही करण्याआधी माझ्यासमोरून चालते व्हा, असं मी अंजुम यांना म्हटलो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)