भारत आणि पाकिस्तानच्या कमांडरनी गोळीबार सुरू असतानाच एकमेकांना पत्र लिहिलं तेव्हा

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1971च्या युद्धात जेव्हा बख्शीगंजवर भारताना कब्जा मिळवला, तेव्हा या क्षेत्राचे कमांडर मेजर जनरल गुरबख्श सिंग यांनी तिथं जाण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र जेव्हा त्या भागावर भारतीय लष्कर पूर्णपणे नियंत्रण मिळवेल, तेव्हाच तिथं जा, असं ब्रिगेडियर हरवेद सिंग क्लेर यांनी म्हटलं. पण, गिल यांनी ऐकलं नाही आणि दोन्ही अधिकारी जोंगावर (भारतीय सैन्यात पूर्वी वापरेललं वाहन) बसून निघाले.

क्लेर जोंगा चालवत होते आणि गिल त्यांच्या शेजारी बसले होते. ते काही अंतरावर आले असतानाच जोंगाचं एक टायर एका भुसुरूंगावरून पुढे सरकलं. एक मोठ्ठा स्फोट झाला आणि दोन्ही अधिकारी रस्त्यावर येऊन पडले.

कालांतराने भारतीय लष्करातून मेजर जनरल या पदावरून निवृत्त झालेल हरदेव सिंग क्लेर लिहितात, "मी उठलो आणि माझ्या शरीराला हलवायचा प्रयत्न केला. त्यानंतर मी चालू शकतो हे माझ्या लक्षात आलं. जनरल गिल हे जोंगाच्या दुसऱ्या बाजूला पडले होते. त्यांच्या पायांना मोठी जखम झाली होती. त्यांना ठीक करणं हे आमच्या आवाक्याबाहेरचं होतं, हे माझ्या लक्षात आलं."

"मी त्यांना मागून येत असलेल्या एका वाहनात बसवलं आणि मेडिकल सेंटरमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून गुवाहाटीच्या लष्करी दवाखान्यात आणण्यात आलं. मेजर जनरल गंधर्व नागरा हे 2 इन्फंट्री डिव्हीजनची कमान सांभाळत होते, त्यांना गिल यांच्या जागी 101 कम्युनिकेशनची जबाबादारी सोपवण्यात आली. त्यानंतर मग आम्ही जमालपूर ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली."

डोक्याला गोळी लागून भारतीय जवानाचा मृत्यू

जमालपूरच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराच्या 31 बलूच रेजिमेंटला सोपवण्यात आली होती. जमालपूर हे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील एक महत्त्वाचं संचार केंद्र होतं.

एक एमएलआयनं पाकिस्तानी लष्कराच्या मागे जमालपूर ढाका रोडवर एक रोड ब्लॉक तयार केला होता, तर 13 जवानांनी जमालपूर मैमनसिंग रस्ता मध्येच फोडला होता.

ब्रिगेडियर क्लेर यांनी 8 डिसेंबर 1971ला आपल्या हेलिकॉप्टरमधून 13 जवानांनी जो रोड ब्लॉक केला होता, तिथं लँड केलं.

चारही बाजूंनी गोळीबार सुरू होता. तिथं उपस्थित भारतीय जवानांनी लाईट फ्लेयर्स सोडून लँड न करण्याची सूचना केली होती. पण, क्लेर यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

खाली उतरल्यानंतर एक जवान त्यांना तिथं सुरू असलेल्या गोळीबाराविषयी माहिती देत असतानाच एक गोळी क्लेर यांच्या बगलेतून गेली आणि ती सरळ त्या जवानाच्या डोक्याला लागली.

गोळी त्याच्या हेल्मेटमधून आरपार गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यावरून भारतीय जवानांना किती खराब गुणवत्तेचे हेल्मेट दिले गेले होते, हे दिसून येतं.

ब्रिगेडियर क्लेर यांच्यावर जमालपूरवर हल्ला करण्याचा दबाव

माजी कमान कमांडर जनरल जगजित सिंग अरोरा यांनी ब्रिगेडियर क्लेर यांच्याशी रेडियोवरून संपर्क करत म्हटलं की, त्याच रात्री जमालपूर हल्ला करा, यासाठी भारताला कितीही सैनिकांची बळी द्यावा लागला तरी हरकत नाही.

क्लेर यांनी उत्तर दिलं की, "मी शत्रूच्या मागे राहून परिस्थितीचा अंदाज घेत आहे. मी तेव्हाच हल्ला करेल, जेव्हा मी पूर्णपणे तयार असेल."

मेजर जनरल (रिटायर्ड) हरदेव सिंग क्लेर लिहितात, "जनरल अरोडा हे स्वत: माझ्याकडे येऊन परिस्थितीचा अंदाज घेऊ पाहत होते, पण इतकं समोर येणं जोखीमीचं आहे, असं मी त्यांना सांगितलं. मी या स्थितीत नाहीये की त्यांना तिथं सुरक्षितरित्या लँड करण्याची हमी देऊ शकेल.

"पण, मी त्यांना आश्वस्त केलं की, तुरा इथं झालेल्या वॉर गेम्समध्ये ज्या कार्यक्रमावर सहमती झाली होती, मी त्याचं पालन करेल. त्यांनी माझं म्हणणं ऐकलं, पण ते प्रचंड दबावात असल्याचं मला जाणवलं."

जमालपूर गॅरिसनच्या कमांडरला क्लेर यांचं पत्र

दुसऱ्या दिवशी 9 डिसेंबरला कर्नल बुलबुल बरार यांच्याशी चर्चा केल्यानंतर क्लेर यांनी ठरवलं की, जमालपूरचे पाकिस्तानी गॅरिसन कमांडर यांना शस्त्रं खाली टाकण्याचा पर्याय दिला जावा. कर्नल बुलबुल बरार यांनी जनरल क्लेर यांच्या रायटिंग पॅडवर पाकिस्तानच्या कमांडरला संबोधित करताना चार पानी पत्र लिहिलं. क्लेर यांनी त्यावर सही केली. पत्रात लिहिलं होतं...

कमांडर

जमालपूर गॅरिसन

"मला तुम्हाला सूचित करण्यास सांगितलं आहे की, तुमच्या गॅरिसनला चारही बाजूंनी घेरण्यात आलं आहे आणि इथून सुखरूप सुटण्यासाठी तुमच्याकडे कोणताही मार्ग नाहीये. तोफांसोबत एका ब्रिगेडनं तुम्हाला घेरलं आणि उद्या सकाळपर्यंत दुसरी ब्रिगेड इथं पोहोचेल.

"तुम्ही आतापर्यंत आमच्या वायुदलाचा खूप कमी पाहुणचार घेतला आहे. पण, तुम्ही जर शस्त्रं खाली ठेवत असाल तर एक जवान म्हणून मी तुमची सुरक्षा आणि चांगल्या वर्तनाचं आश्वासन देतो. मी हे समजू शकतो की तुम्ही तुमच्या अहंकारासाठी तुमच्या जवानांचा जीव धोक्यात घालण्याचा मूर्खपणा करणार नाहीत.

"मी संध्याकाळी साडेसहा पर्यंत तुमच्या उत्तराची वाट पाहीन, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही तर तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी आम्हाला मिग विमानाची 40 उड्डाणं देण्यात आली आहे. मी आशा करतो की, हे पत्र तुमच्याकडे घेऊन आलेल्या जवानासोबत तुम्ही आदरपूर्वक वर्तन कराल आणि त्याला कोणतंही नुकसान पोहोचवणार नाहीत."

सही

ब्रिगेडियर एच एस क्लेर

पाकिस्तानी कमांडरचं साहसी उत्तर

मुक्तवाहिनीचे संदेशवाहक जोहल हक मुन्शी यांच्यामार्फत हा मेसेज पाकिस्तानच्या कमांडरपर्यंत पोहोचवण्यात आला. एका सायकलवर पांढरा झेंडा लावून ते पाकिस्तानच्या प्रदेशात गेले.

लेफ्टनंट कर्नल पुंटामबेकर लिहितात, "पाकिस्तानच्या जवानांनी संदेशवाहकाला पडकत त्याला मारहाण केली. तो बेशुद्ध होणारच होता तितक्यात एक पाकिस्तानी अधिकारी तिथं आला आणि त्याला बचावलं. जेव्हा या जवानाच्या शरिराची तपासणी केली, तेव्हा ब्रिगेडियर क्लेर यांचं पत्र मिळालं.

"तो अधिकारी जोहल हक मुन्शी यांना गॅरिसन कमांडर लेफ्टनंट कमांडर सुल्तान अहमद यांच्याकडे घेऊन गेले. रात्री 8 वाजता सुल्तान अहमद यांनी त्याच संदेशवाहकाच्या मार्फत क्लेर यांना एक मेसेज पाठवला."

प्रिय ब्रिगेडियर

"पत्रासाठी धन्यवाद. इथं जमालपूरमध्ये आम्ही लढाई सुरू व्हायची वाट पाहत आहोत, जी अद्याप सुरू झालेली नाहीये. त्यामुळे मग गप्पा करण्यापेक्षा लढाई सुरू करा. आम्हाला पराभूत करण्यासाठी 40 उड्डाणं पुरेशी नाहीयेत.

"तुम्ही तुमच्या सरकारकडे अधिकच्या उड्डाणांची मागणी करा. संदेशवाहकासोबत उचित वर्तन करण्याविषयीची तुमची टिप्पणी बिनकामाची आहे. पाकिस्तानी लष्कराच्या पाहुणचाराला तुम्ही किती कमी समजता, ते यातून दिसून येतं. तुमच्या संदेशवाहकाला आमचा चहा आवडला असेल, याची मला खात्री आहे.

"आशा करतो की, पुढच्या वेळेस जेव्हा तुमच्याशी भेट होईल तेव्हा तुम्हाला हातात स्टेन गन घेऊन पाहिल ना की पेन घेऊन. लिखाणाच्या बाबतीत तुम्ही प्रभुत्व मिळवलेलं दिसतंय."

आपला शुभचिंतक

लेफ्टनंट कर्नल सुल्तान अहमद

जमालपूर फोर्सेज

200 पाकिस्तानी जवान जमालपूरमधून बचावण्यास असफल

चारही बाजूंनी घेरलेलं असतानाही लिहिलेल्या या पत्राकडे निर्भीड म्हणून असं पाहिलं गेलं. या पत्रात 7.62 रायफलची एक गोळी पाठवली होती.

लेफ्टनंट कर्नल रिफत नदीम अहमद लाहौरमधून प्रकाशित वर्तमानपत्र फ्रायडे टाईम्सच्या 16 ऑक्टोबर 2021च्या अंकातील लेखात लिहितात, "हे पत्र लिहिल्यानंतर लगेच 31 बलूचच्या कमांडिंग अधिकाऱ्याला जमालपूर सोडून माधुपूरकडे आगेकूच करण्याच्या सूचना मिळाल्या. या प्रयत्नात बरेच पाकिस्तानी जवान मारले गेले. याशिवाय 200 जवान, 93 ब्रिगेड आणि 33 पंजाबपर्यंत जाण्यास यशस्वी झाले. तिथून ते ढाकाहून 30 किलोमीटर अंतरावरील कलियाकैरकडे निघाले.

"13 डिसेंबरला त्यांना आदेश देण्यात आला की, ते ढांकाच्या बाहेर तुंगाई नदीवर जाऊन मोर्चा सांभाळतील. तोपर्यंत भारतीय सैन्य चारही बाजूंनी ढाकापर्यंत येत होतं. जेव्हा पाकिस्तानी सैन्याला शस्त्रं खाली ठेवण्याचा आदेश देण्यात आला, तेव्हाही ते थांबले नाहीत, ते भारतीय सैन्याचा सामना करत राहिले."

ब्रिगेडियर हरदेव सिंग क्लेर यांनी 11 डिसेंबरच्या सकाळी 2 वाजता जमालपूरवर हल्ला करण्याचा आदेश दिला. दिवसभर पाकिस्तानच्या तळांवर हवाई हल्ले सुरू होते.

सूर्यास्तापूर्वी भारतीय लष्करानं तिथं दोन नापाम बॉम्ब टाकले. त्याच दिवशी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लष्करानं 1 एमएलआयच्या कब्ज्यातील प्रदेशावर फायरिंग सुरू केली.

भारतीय बाजू कमकुवत व्हावी यासाठी पाकिस्तानी 120 एमएम मोर्टर गोळ्यांचा वापर करत होते. यावरून मग या रात्री पाकिस्तानी जवान पळून जाण्याचा प्रयत्न करतील, असा अंदाज क्लेर यांना आला.

पाकिस्तानी लष्कराचा गैरसमज

मेजर जनरल (रिटायर्ड) क्लेर लिहितात, "जमालपूर भागात सूर्यास्त झाला तेव्हा लढाईच्या मैदानात शांतता होती. मी पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या माझ्या आधीच्या आदेशाला रद्द केलं आणि कमांडिंग अधिकाऱ्यांना संरक्षणात्मक लढाईसाठी तयार राहण्यासाठी सांगितलं. मी अंदाज लावला की, पाकिस्तानी लढत लढत मागे हटण्याचा प्रयत्न करतील आणि कर्नल बुलबुल बरार याचा सर्वाधिक सामना करावा लागेल.

"त्यानंतर मी जनरल नागरा यांच्याशी संपर्क केला आणि सकाळपर्यंत तुम्हाला जमालपूर देऊन टाकेल, असं सांगितलं. तुम्ही 7 वाजेपर्यंत तिथं लँड करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जवानांसाठी चांगला नाश्ताही तयार करा, असंही मी त्यांना सांगितलं."

कर्नल सुल्तान अहमद यांचा सामना करण्याची संपूर्ण योजना तयार केल्यानंतर क्लेर झोपण्यासाठी निघून गेले. पण, 10 डिसेंबरच्या मध्यरात्रीच पाकिस्तानी जवानांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरू केला. पण, 1 एमएलआय जवानांनी फायरिंग अनुशासनाचं पालन करत त्या फायरिंगला उत्तर दिलं नाही.

यामुळे मग भारतीय जवान मागे हटले आहेत, असा पाकिस्नानी सैन्याचा गैरसमज झाला. कर्नल सुल्तान अहमद यांनी मग त्यांच्या जवानांना तीनच्या लाईनमध्ये जमालपूरहून जाणाऱ्या रस्त्यावर मार्च करायला सुरुवात केली.

पाकिस्तानचं सैन्य फसलं

क्लेर लिहितात, "रात्री फायरिंगचा आवाज ऐकून माझे डोळे उघडले. मी आमचे इंटेलिजेन्स ऑफिसर बलबीर सिंग आणि अनुवादक ताहिर यांच्यासोबत काही अंतरावर एका एमएमजी बंकरजवळ पोझिशन घेतली. एक वाजता आम्ही पाहिलं की पाकिस्तानच्या जवानांचा एक जत्था आमच्यासमोरून जात आहे. आम्ही श्वास रोखून चूपचाप बसून राहिलो.

"पाकिस्तानच्या संपूर्ण बटालियनला किलिंग झोनमध्ये येऊ दिलं. त्यानंतर मी एमएमजी गनरच्या खांद्याला स्पर्श करत त्याला फायरिंग करण्याचा इशारा दिला."

"आमची फायरिंग सुरू होताच पाकिस्तानच्या जवानांनीही फायरिंग सुरू केली. माझ्यासमोर 10 ते 15 पाकिस्तानी जवान धारातीर्थी पडले. तेव्हा कुठे आपण फसलो आहोत, याची कर्नल सुल्तान अहमद यांना जाणीव झाली.

"त्यांनी पुन्हा एकदा आपल्या जवानांना एकत्र करत सुरक्षितपणे बाहेर निघण्याचा रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. पाकिस्तानच्या सैन्याच्या अगदीच जवळ राहून फ्रेंडली फायरमध्येही आमचा एकही जवान ठार झाला नाही."

234 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू

सकाळ झाली तेव्हा भारतीय जवानांनी पाहिलं की त्यांच्या बंकरपासून काही अंतरावर अनेक पाकिस्तानी जवानांचे मृतदेह पडलेले होते. त्याच रस्त्यावर 500 मीटर अंतरावर कर्नल सुल्तान अहमद यांची जीप उभी होती.

त्यानंतर ब्रिगेडियर क्लेर कर्नल बुलबुल बरार यांच्यासोबत 31 बलूच रेजिमेंटच्या मुख्यालयात गेले. तिथं मेजर फज्ले अकबर आणि लेफ्टनंट झैदी हे 8 ज्युनियर अधिकाऱ्यांबरोबर शस्त्र खाली ठेवण्यासाठी सज्ज होते.

जेव्हा लढाई क्षेत्राची तपासणी केली गेली तेव्हा पाकिस्तानच्या 234 जवानांचा मृतदेह आढळला. एकूण 376 पाकिस्तानी जवान जखमी झाले, त्यांचा भारतीय डॉक्टरांनी उपचार केले.

याशिवाय 61 अन्य पाकिस्तानी जवानांना युद्धकैदी बनवण्यात आलं. या लढाईत भारताच्या 10 जवानांचा मृत्यू झाला आणि 8 जवान जखमी झाले.

क्लेर यांच्या जाकिटावर 3 गोळ्या

दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जनरल नागरा यांनी जमालपूरमध्ये लँड केलं. त्यांनी खाली उतरताच क्लेर यांना मीठी मारत म्हटलं, "हॅरी, तुम्हीच हे काम करू शकत होतात." ते त्यांच्यासोबत चार विदेशी प्रतिनिधींनाही घेऊन आले होते.

मेजर जनरल (रिटायर्ड) क्लेर लिहितात, "त्यापैकी एकानं माझ्या पॅरा जॅकेटमध्ये गोळ्यांमुळे पडलेल्या छिद्रांकडे माझं लक्ष वेधून दिलं. मला इतक्या जवळून मृत्यूचा सामना करावा लागला, हे मला माहितीही नव्हतं. तीन गोळ्या माझ्या जॅकेटमधून गेल्या होत्या, त्यामुळे त्याला 6 भोकं पडले होते.

"जेव्हा 31 बलूचच्या सगळ्या जवानांची हजेरी घेण्यात आली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की, कर्नल सुल्तान अहमद आपल्या 200 जवानांसोबत तिथून बचावले होते. जेव्हा आम्ही जमालपूर शहरात आलो, तेव्हा तिथं आमचं स्वागत करण्यात आलं.

"त्या भागाचे मुक्तीवाहिनीचे प्रमुख कॅप्टन झैनुल आब्दिन यांनी आमचं नागरी स्वागत केलं. तिथं बांगलादेशचा झेंडा लावण्यात आला आणि रवींद्रनाथ टगौर लिखित 'आमार शोनार बाँगला' हे गीत गायलं गेलं. जे नंतर बांगलादेशचं राष्ट्रीय गीत बनलं."

वीरचक्र

लढाईनंतर ब्रिगेडियर मेजर जनरल हरदेव सिंग क्लेर आणि लेफ्टनंट कर्नल सुल्तान अहमद यांना भारत आणि पाकिस्तानचा अनुक्रमे दुसरा सर्वांत मोठा पुरस्कार महावीर चक्र आणि सितार ए जुर्रत देण्यात आला.

जेव्हा ही लढाई संपली तेव्हा लेफ्टनंट कर्नल केशव पुणतांबेकर यांनी युद्धकैदी कॅम्पमधील 31 बलूच रेजिमेंटच्या मुनीर अहमद बट्टशी संपर्क केला.

त्यांनी ब्रिगेडियर क्लेरद्वारा जमालपूरच्या कमांडरला लिहिलेल्या पत्राची मूळ प्रत मिळवली. त्याचा फोटो काढल्यानंतर त्याला यूनिट रेकॉर्डमध्ये ठेवण्यासाठी परत दिलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)