You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अल्बर्ट एक्का : 1971ला पाकिस्तान विरोधात गंगासागरचं युद्ध जिंकणारे एक्का कोण होते?
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
2-3 डिसेंबर, 1971 च्या रात्री दोन वाजता 14 गार्डच्या अल्फा आणि ब्राव्हो कंपन्यांनी पूर्व पाकिस्तानात गंगासागरमध्ये पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या परिसरात मार्च करायला सुरुवात केली.
हे ठिकाणी अखौरा रेल्वे स्टेशनपासून चार किलोमीटर अंतरावर आणि ब्राह्मणबरिया, भैरब बाजार आणि कमालपूरच्या मधोमध होतं.
हा दलदल असलेला भाग होता आणि त्यात चालणाऱ्या सैनिकांचे पाय गुडघ्यापर्यंत फसत होते. त्यामुळं त्यांना रेल्वे ट्रॅकच्या बाजूनं एका रांगेत चालण्याचे निर्देश देण्यात आले होते.
हा रेल्वेमार्ग जमिनीपासून 8-10 फूट उंचीवर तयार करण्यात आला होता. अल्फा कंपनी रेल्वे ट्रॅकच्या उजव्या बाजुला आणि ब्राव्हो कंपनी डाव्या बाजुने चालत होती. लान्स नायक गुलाब सिंह आणि अल्बर्ट एक्का यांना सर्वात पुढं चालण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पाकिस्तानी सैनिक दिसताच त्यांच्यावर हल्ला करण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले होते.
या भागाचं संरक्षण करण्याची जबाबदारी पाकिस्तानच्या 12 फ्रंटियर फोर्सच्या तीन तुकड्यांकडे होती.
"पाकिस्तानचे सैनिक रेल्वे ट्रॅकच्या जवळ बिनधास्त फिरत असल्याचं पाहून, त्याठिकाणी भुसुरुंग नसल्याचं 14 गार्ड्सच्या जवानांना गस्त घालताना लक्षात आलं. त्यामुळं भारतीय सैनिकांना रेल्वे ट्रॅकच्या जवळून चालण्याच्या सूचना करण्यात आल्या," असं मेजर जनरल इयान कारडोजो यांनी त्यांच्या 'परमवीर अवर हिरोज इन बॅटल' या पुस्तकात लिहिलं आहे.
40 फुटांच्या अंतरावर असताना पाकिस्तानींना हल्ल्याची माहिती मिळाली
बी कंपनीचे कमांडर मेजर ओ पी कोहली ट्रॅकच्या डाव्या बाजुनं थोडं खालून चालत होते. "सर्व काही ठीक चाललं होतं. पण तेवढ्यात एका सैनिकाचा पाय रेल्वे ट्रॅकवर पाकिस्ताननं लावलेल्या ट्रिप प्लेयर वायरवर पडला. त्यामुळं अचानक हवेत आतषबाजी झाली आणि सगळीकडं दिवस असल्यासारखा उजेड पसरला," असं कोहली यांनी सांगितलं.
एक्का ज्याठिकाणी उभे होते, तिथपासून जवळपास 40 फूट अंतरावर पाकिस्तानचं बंकर होतं. त्याठिकाणी एक जवान तैनात होता. उजेड आणि आवाजामुळं पाकिस्तानी सैनिकानं ओरडून विचारलं-'कोण आहे तिथे?'
त्यावर एक्का यांनी त्याच आवेशात उत्तर दिलं 'तुझा बाप'. असं ओरडताच ते पुढे सरसावले आणि त्या पाकिस्तानी सैनिकाच्या पोटात संगीन (रायफलचा चाकूसारखा भाग) खुपसला.
हात आणि मानेला गोळी लागली
पहिल्या बंकरमध्ये एका लाइट मशीन गन आणि एक रिकॉयलेस गनसह चार पाकिस्तानी सैनिक तैनात होते. एक्का यांच्या हाताला गोळी लागली, पण त्या बंकरवर भारतीय सैनिकांनी ताबा घेतला. त्यानंतर एकच हाहाकार उडाला.
पाकिस्तानी सैनिकांनी उजेड केला आणि त्यांनी भारताच्या दोन्ही तुकड्यांवर हल्ला करायला सुरुवात केली. त्याठिकाणी 120 सैनिकांच्या दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या.
ए कंपनी पुढे गेली आणि बी कंपनी तलावाकडे वळून एका पाठोपाठ पाकिस्तानचे बंकर नष्ट करू लागली. हाताला गोळी लागलेली असतानाही, एक्का वाघाप्रमाणे हल्ला करत होते. ते मेजर कोहलीबरोबर जात असतानाच एक गोळी त्यांच्या मानेला लागून गेली.
"गोळी लागताच एक्का जमिनीवर कोसळले. पण ते लगेचच उठले आणि माझ्याबरोबर चालू लागले. तोपर्यंत आमचे सैनिक रेल्वे सिग्नल बिल्डिंगपर्यंत पोहोचले होते.
तिथून पाकिस्तान सैनिक एमएमजीद्वारे सतत आमच्यावर फायरिंग करत होते. त्यावेळी सर्वात गरजेचं होतं, ती मशीनगन शांत करणं. याठिकाणी एक्का यांनी शौर्याची परिसीमा दाखवली," असं कर्नल कोहली यांनी आठवणी सांगताना म्हटलं.
एक्का झोपून सरकत-सरकत बिल्डिंगपर्यंत पोहोचले
दृश्य क्रमांक दोन. जमिनीवर एक व्यक्ती हालचाल न करता पडून आहे. त्याच्या पायाला वाळलेला चिखल लागलेला आहे आणि डाव्या पायावर एक मुंगी असल्याचं त्यांना जाणवतं, ते जराही हलले नाही. कारण मुंगीपासून त्यांना धोका नव्हता.
त्यांचा हात मानेवर जातो आणि त्यांना हाताला काहीतरी चिकट असं लागतं. तो घाम असू शकत नाही, असं त्यांना वाटतं. रात्रीच्या अंधारात लान्स नायक अल्बर्ट एक्का यांना दिसत नसलं तरी वासावरून त्यांना मानेवर लागलेलं त्यांचंच रक्त असल्याचं त्यांच्या लक्षात येतं.
रक्ताने माखलेला हात पँटला पुसून ते पुन्हा गनवरची पकड मजबूत करतात. थोड्याच वेळात पहाट होणार असते. ते गुडघ्यावर बसतात आणि सापासारखे पुढे सरकत निघतात.
हातात त्यांची 7.62 रायफल आहे. त्यांच्या हाताला लागलेल्या गोळीमुळं प्रचंड वेदना होत आहेत. मानेलाही एक गोळी स्पर्शून गेल्याने जखम झाली आहे. पण तरीही ते पुढं सरकत राहिले. मानेतून निघणाऱ्या रक्तानं त्यांची कॉलरही माखली.
रक्तचा स्त्राव जेवढा अधिक होईल, तेवढी रायफलवरची पकड सैल होत जाईल, याचा एक्का यांना अंदाज होता. हे सगळं विसरून ते त्यांची सर्व शक्ती कोपरांमध्ये एकवटून अंधारात पुढे सरकत दोन मजली रेल्वे सिग्नल इमारतीकडे पुढे सरकतात. तिथून पाकिस्तानी सैनिकांचा प्रचंड गोळीबार त्यांच्या दिशेनं सुरू होता.
पाकिस्तानी बंकरमध्ये फेकलं हँड ग्रेनेड
पाकिस्तानच्या मशीनगनसमोर एक्का यांच्या सहकाऱ्यांच्या रायफलचा टिकाव लागणं कठिण होत चाललं होतं. त्यामुळं मोहीम यशस्वी करण्यासाठी या मशीनगन बंद होणं गरजेचं होतं.
तेवढ्यात रायफल पाठीवर लटकावत एक्का यांचा हात त्यांच्या बेल्टला लटकलेल्या हँड ग्रेनेडवर गेला. दातांनी पिन काढत एक्का ते हँड ग्रेनेड एका छिद्रातून इमारतीमध्ये फेकतात.
आत बसलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना काही समजण्याआधीच एक स्फोट झाला. स्फोटामुळं इमारतीचे काही तुकडे एक्का यांनाही लागले. पण स्फोटामुळं पाकिस्तानी सैनिक भिंतीला एवढा जोरात आदळला की, त्याचे चिथडे उडाले. दुसऱ्या सैनिकाला मात्र इजा झाली नाही.
पाकिस्तानी सैनिकावर हल्ला
"एक्का जुन्या, गंजलेल्या शिडीच्या मदतीने त्या इमारतीत लंगडतच दाखल झाले. हँड ग्रेनेड फेकला होता, त्याठिकाणी ते पोहोचले," असं लष्करी इतिहासकार रचना बिष्ट रावत यांनी त्यांच्या 'द ब्रेव्ह परमवीर चक्र स्टोरीज' मध्ये लिहिलं आहे.
त्यांनी खांद्यावरची रायफल काढली आणि त्याच्या समोरील संगीनद्वारे पाकिस्तानी सैनिकावर हल्ला केला. त्यांना त्यांच्या गुरूनं संगीन वापरण्यासाठी शिकवलेला 'खुपसा काढा, खुपसा काढा' हा धडा चांगलाच लक्षात होता.
"पाकिस्तानी सैनिक कोसळला, तेव्हा त्याच्या मशीन गनमधून धूर निघत होता. मृत पाकिस्तानी सैनिकाच्या रक्ताचे शिंतोडे एक्का यांच्या चेहऱ्यावर उडाले, त्यांनी हाताच्या बाहीनं ते पुसले. त्यांच्या डोळ्यात यश मिळाल्याचं समाधान स्पष्टपणे झळकत होतं."
पायऱ्यांवरून कोसळले एक्का
अल्बर्ट एक्का यांच्या या कारनाम्यानं लढाई भारताच्या बाजुनं झुकली. ब्राव्हो कंपनीचे कमांडर मेजर ओ. पी. कोहली 10 फूट अंतरावरून एक्का यांच्या शौर्याचं ते दृश्य पाहत होते. त्याच्या डोळ्यासमोरच एक्का ग्रेनेड फेकून त्या शिडीवर चढले होते.
"हे संपूर्ण दृश्य पाहून माझी छाती अभिमानाने भरून आली. मी खाली इमारतीबाहेर एक्का यांना भेटण्यासाठी वाट पाहत होतो. एक सडपातळ व्यक्ती पायऱ्यांवरून खाली येत असल्याचं मला दिसलं देखील.
श्वास रोखून मी त्यांना उतरताना पाहत होतो. त्याचवेळी अचानक एक्का यांचं शरीर सैल पडलं आणि ते पायऱ्यांवरून खाली कोसळले," असं कोहली सांगतात.
कमी बोलणारे विनम्र व्यक्ती
लान्स नायक अल्बर्ट एक्का या जगात नव्हते. मात्र त्यांनी मोहीम फत्ते केली होती. थोड्या वेळापूर्वी भारताच्या सैनिकांवर गोळीबार करणाऱ्या एमएमजी मशीनगन ब्राव्हो कंपनी काढत होती, पण त्यावेळी लान्स नायक अल्बर्ट एक्का त्या बंकरकडे जाणाऱ्या पायऱ्यांजवळ मृत पडलेले होते.
कर्नल ओ पी कोहली कोटापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंबळ नदीच्या किनाऱ्यावर अबरेरा कॅम्पमध्ये तैनात होते. त्यावेळी त्यांच्यासमोर एका सडपातळ सावळ्या रंगाच्या मुलाला म्हणजे अल्बर्ट एक्का यांना मार्च करत आणण्यात आलं होतं.
एक्का यांनी बॅटल फिजिकल एफिशियंसी टेस्ट पास केली होती. पण तरीही ते कमांडरशी नजरही मिळवत नव्हते.
"एक्का बिहार रेजिमेंटमधून माझ्याकडे आले होते. खरं सांगायचं तर माझ्यावर त्यांचा जराही प्रभाव पडला नव्हता. ते अत्यंत कमी बोलणारे विनम्र व्यक्ती होते. पण ते आदिवासी होते. त्यामुळं ते शारीरिकदृष्ट्या फिट असतील हे मला माहिती होतं. आम्हाला त्याची गरजही होती," असं कोहली यांनी सांगितलं.
सैल कपडे परिधान करण्याची सवय
एक्का यांची पलटन मे 1968 मध्ये मिझोरममध्ये तैनात करण्यात आली होती. ते सोबतच्या जवानांबरोबर अत्यंत चांगलं वर्तन करायचे. त्यामुळं त्यांचा आदरही केला जात होता. त्यांच्यामध्ये प्रचंड संकोच होता आणि सहकारी सैनिक आणि अधिकाऱ्यांत ते फारसे मिसळत नव्हते.
"अल्बर्ट यांना ते कसे दिसत आहेत किंवा गणवेश याची कधीच काळजी नसायची. ते कोणत्याही आकाराचा गणवेश परिधान करायचे. त्यामुळं त्यांच्या सडपातळ शरिरावर कपडे टांगले असल्यासारखे दिसायचे. स्मार्ट टर्न आऊटवर माझा जोर असायचा. त्यामुळं मी कधी-कधी त्यांच्यावर नाराज व्हायचो," असं कर्नल ओ पी कोहली सांगतात.
"मी नेहमी त्यांना कमरेवर सैल बांधलेला बेल्ट काढून परत घालायला सांगत रागवायचो. अनेकदा ते गस्त घालण्यासाठी जायचे तेव्हा नाल्यांमधून खेकडी पकडून आणायचे आणि आगीत भाजून मीठ, मिरची लावून खायचे. त्यांचा नेम खूप चांगला होता, तसंच ते हॉकीही चांगली खेळायचे."
परमवीर चक्रने सन्मान
गंगासागरच्या लढाईत एक्का यांच्यासह 11 भारतीय सैनिकांनी प्राणांचं बलिदान दिलं. त्याशिवाय एक अधिकारी तीन ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि 55 सैनिक गंभीर जखमीही झाले. पाकिस्तानचे 25 सैनिक मारले गेले आणि 6 सैनिकांना युद्धबंदी बनवण्यात आलं.
अल्बर्ट एक्का यांना त्यांच्या या शौर्यासाठी भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं. प्रथमच बिहार (आताचे झारखंड) आणि ब्रिगेड ऑफ गार्ड्सच्या एखाद्या सैनिकाला या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. सोबतच पूर्व सेक्टरमध्ये मिळालेलं हे एकमेव परमवीर चक्रही होतं. त्यामुळं त्याचं वेगळं महत्त्वं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)