You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताच्या तुरुंगातून निसटण्यासाठी पाकिस्तानी कैद्यांनी सुरीने खोदलं होतं भुयार...
- Author, फ़रहत जावेद
- Role, इस्लामाबाद, बीबीसी उर्दू
पूर्व पाकिस्तानातील युद्धकैदी सैनिकांना घेऊन जाणारी ट्रेन भारतातील एका स्टेशनवर थांबली आणि भारतीय लष्कराचे एक अधिकारी डब्यात आले.
'कोणाला चलन बदलायचं असेल, तर सांगा,' असं त्या अधिकाऱ्याने खड्या आवाजात विचारलं.
इतक्यात डब्यात उपस्थित असणारे पाकिस्तानी लष्कराचे अनेक अधिकारी स्वतःचे खिसे चाचपायला लागले. खिशात मिळालेल्या पैशांना त्यांनी भारतीय चलनात बदलून घेतलं.
या वेळी ही ट्रेन पूर्व पाकिस्तानला लागून असणाऱ्या भारतीय सीमेवरील बांगन या गावावरून उत्तर प्रदेशच्या दिशेने जात होती. या ट्रेनमध्ये पाकिस्तानी लष्कराचे मेजर तारिक परवेझसुद्धा होते.
मेजर तारिक परवेझ यांनी पैसे घेऊन त्यांच्या शर्टच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लपवले. त्यांचे सहकारी अधिकारी खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करत होते, परंतु परवेझ यांच्या डोक्यात वेगळीच योजना शिजत होती.
ही घटना डिसेंबर 1971मधली आहे. काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतासमोर शरणागतीच्या करारावर सही केली होती. त्यानंतर बांग्लादेशची निर्मिती झाली.
या पराभवानंतर हजारो पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी झाले. त्यातील काही सुदैवी सैनिकांचा अपवाद सोडता इतर सैनिकांनी भारतातील विविध छावण्यांमध्ये अनेक वर्षं घालवली.
पराभवानंतर सैनिकांना फतेहगडला पाठवण्यात आलं
भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना युद्धकैदी करून विविध छावण्यांमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
बांग्लादेशात दंगली होऊन पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले होण्याचा धोका होता. तसंच इतक्या मोठ्या संख्येने युद्धकैद्यांना तिथे ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे या सैनिकांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेजर तारिक परवेझ आणि त्यांचे चुलत भाऊ मेजर नादिर परवेझ यांच्यासह शेकडो अधिकारी व सैनिकी ट्रेनमध्ये बसले होते. विविध प्रदेशांमधून प्रवास करत ही ट्रेन अखेरीस उत्तर प्रदेशातील फतेहगढ छावणीत पोचली.
युद्धकैद्यांसाठीच्या या छावणीत त्यांना पुढली सव्वादोन वर्षं घालवायची होती.
शरणागतीच्या बातम्या छावण्यांकडून आघाडीवरील सैनिकांपर्यंत पोचत होत्या, तेव्हाच कैदेतून पळून जाण्याची योजना तयार करायला सुरुवात झाली होती. अनेक सैनिकांनी पळून जाण्याचे प्रयत्नही केले, पण ते अयशस्वी ठरले.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रत्येक कैद्याला शत्रूच्या कैदेत जाण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे आणि असं करताना पुन्हा पकडलं गेल्यास त्याला पुन्हा शिक्षा देता येत नाही, हे इथे लक्षात घ्यायला हवं.
मेजर तारिक परवेझ आणि त्यांचे सहकारी वाट पाहत होते की, एखाद्या भारतीय सैनिकाचं लक्ष विचलित होईल आणि त्या क्षणी आपल्याला ट्रेनमधून पळ काडता येईल, पण कोणत्याही भारतीय सैनिकाची नजर डळमळली नाही.
मेजर तारिक परवेझ आणि त्यांच्या सोबतच्या कैद्यांना फतेहगढ छावणीतील कॅम्प क्रमांक 45मध्ये ठेवण्यात आलं. या कंपनीत अधिकाऱ्यांसाठी दोन लांब बराकी होत्या आणि एका बराकीला सहा भागांमध्ये विभागण्यात आलं होतं.
एक भाग कनिष्ठ अधिकाऱ्यांना राहायला देण्यात आला, तर दुसरा भाग करमणुकीसाठी होता, तिसऱ्या भागात जेवणाची खोली होती, तर चौथा भाग ऑर्डलींसाठी होता.
एका भागात स्वयंपाकघर आणि सामनाची खोली होती. दुसरी बराक दोन भागांमध्ये विभागण्यात आली. एक भाग आठ फूट लांबीचा होता, त्यात लाकडाच्या पाच मोऱ्या होत्या, तर दुसऱ्या भागात 43 अधिकाऱ्यांना राहायचं होतं. या तात्पुरत्या मोऱ्यांसोबतच खोल खड्डे असणारं शौचालयसुद्धा तयार करण्यात आलं होतं. मेजर तारिक परवेझ यांना याच बराकीत कैदेत ठेवण्यात आलं होतं. याच मोऱ्यांमधून त्यांनी पळण्याची योजना सुरू केली.
पळण्याची योजना कशी तयार झाली?
यानंतर मेजर तारिक परवेझ पाकिस्तानी लष्करात लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोचले. त्यांनी बांग्लादेशनिर्मितीच्या 50व्या वर्धनापनदिनानिमित्त पाकिस्तानी युद्धकैद्यांच्यासोबत घडलेले प्रसंग आणि कॅम्प क्रमांक 45मधून पळून जाण्याचा अनुभव यासंबंधी बीबीसीशी संवाद साधला.
तारिक परवेझ यांनी सांगितल्यानुसार, पळण्याच्या तयारीतल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला स्वतःचे कपड्यांचे एक-एक जोड लपवले. मग चलन लपवलं. कैदेदरम्यान फोटो काढले जातील त्यासाठी या अधिकाऱ्यांनी दाढी वाढवली होती. पळाल्यानंतर काही काळाने आपला चेहरा वेगळा दिसावा, हा त्यामागील उद्देश होता.
त्यांना मिळणाऱ्या सरकारी कपड्यांवर POW (प्रिझनर ऑफ वॉर) असा शिक्का मारलेला होता, त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचे कपडे लपवून ठेवले होते.
इतक्या कडक सुरक्षाव्यवस्थेतून पळून जाणं सोपं नव्हतं. कोणालाही पळून जाता येऊ नये या दृष्टीने भारतीय लष्कराने तुरुंगांची काटेकोर सुरक्षाव्यवस्था ठेवली होती. छावणीत काटेरी तारेचे पाच रेषांचे कुंपण होते, त्यात 50 यार्डांवर टेहळणीचे मनोरे होते, प्रत्येक मनोऱ्यावर सर्चलाइट लावलेला होता आणि दर 20 यार्डांनंतर एक ट्यूबलाइट होती.
कैदेत आल्यानंतर काही दिवसांनी मेजर तारिक परवेझ व मेजर नादिर परवेझ या दोन चुलत भावांनी इतर काही अधिकाऱ्यांना स्वतःच्या योजनेत सहभागी करून घेतलं आणि पळून जाण्यासाठीची योजना तयार झाली.
आणखी काही मार्ग नसल्यामुळे एक बोगदा खणण्याचा निर्णय घेण्यात आला. बोगदा खणण्यासाठी मोऱ्यांच्या ओळीतली शेवटची मोरी निवडण्यात आली. ही मोरी कॅम्पच्या तटबंदीच्या सर्वांत जवळ होती. इथे एका कोपऱ्यात बल्बचा प्रकाश पडत नव्हता.
इथेच बोगदा खणायची सुरुवात होणार होती. अडचण दूर व्हावी अशा रितीने बोगदा खणला जायला हवा होता.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तारिक परवेझ सांगतात की, कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या सळ्यांच्या एका हूकचा वापर करून बोगदा खणायचा, असं ठरवण्यात आलं.
पण मोरीतली लादी टणक होती, त्यामुळे ती फोडताना आवाज झाला असता. भारतीय सैनिक चोवीस तास पहारा देत होते. शेवटी यातून मार्ग काढण्यात आला.
फतेहगढ चावणी हे राजपूत रेजिमेन्टचं प्रशिक्षण केंद्र होतं. या छावणीजवळ फायरिंग रेंज होती जिथे भारतीय सैनिक रायफल चालवण्याचं प्रशिक्षण घेत असत. त्यांच्या सरावाच्या वेळा टिपून घेण्यात आल्या.
तारिक परवेझ सांगतात, "बोगदा खणण्यासाठी हूक हे पहिलं अवजार वापरण्यात आलं. ते बाहेर गोळी झाडायचे तेव्हा मी सळीने इथे ठोकायचो. तिकडे गोळ्या सुटायच्या आणि इथे ठक ठक ठक करून आम्ही लादी फोडली."
हळूहळू बोगद्यासाठीचा खड्डा खणून झाला. पण हे लपवणं अवघड होतं. पुन्हा एकदा कैदेतील अधिकाऱ्यांची गोपनीय 'बैठक' झाली.
सुदैवाने पाकिस्तानी इंजिनीअर्स कोअर दलाचे अधिकारी मेजर रिझवान त्याच कॅम्पमध्ये होते. त्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. खणलेला खड्डा लपवता येईल, पण तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तिथली लादी तुटलेय असंच वाटेल, अशा पद्धतीचं एक झाकण त्यांना तयार करायला सांगण्यात आलं. मेजर रिझवान यांच्या मदतीने लोखंडी खाटेच्या तारा काढून मॅनहोलचं झाकण तयार करण्यात आलं.
मग स्वयंपाकघरातून एक मोठी सुरी आणण्यात आली आणि सुरीने बोगदा खणायचं काम सुरू झालं. छावणीच्या जवळच नदी असल्यामुळे तिथली माती थोडी मऊ होती.
"स्वयंपाकासाठीच्या सुरीने आम्ही अख्खा बोगदा खणला," असं तारिक परवेझ अभिमानाने सांगतात.
खोदकामातून बाहेर आलेल्या मातीचं काय करायचं, हे आता ठरवावं लागणार होतं. ही माती तांब्यांमध्ये भरून शौचालयात खाली खड्ड्यांमध्ये फेकायला सुरुवात केल्याचं परवेझ सांगतात.
बोगदा खणण्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे गट करण्यात आले. काहींवर बोगदा खणण्याची जबाबदारी देण्यात आली, काहींना त्याची सुरक्षितता करायची होती व गस्त घालणाऱ्या भारतीय
सैनिकांवर लक्ष ठेवायचं होतं आणि तिसऱ्या गटाकडे माती दुसरीकडे घेऊन जाण्याची जबाबदी होती.
"संडासच्या खड्ड्याची खोली हळूहळू कमी होतेय आणि मातीची पातळी वर जाते आहे, याकडे भारतीय सैनिकांनी कधी लक्ष दिलं नाही," असं तारिक परवेझ हसत सांगतात.
जानेवारी 1972 मध्ये बोगदा खणण्याचं काम सुरू झालं आणि पुढील सात महिने सुरू राहिलं.
फतेहगढमधून फरार
तारिक परवेज यांच्या सोबत फरार झालेले पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी कॅप्टन नूर अहमद यांनी 'हिकायत' या नियतकालिकाचे संपादक इनायतुल्लाह यांच्या लेखनसहाय्याने 'फतेहगढ से फरार तक' हे पुस्तक लिहिलं.
आपल्या छावणीची सुरक्षाव्यवस्था इतकी कडक आहे की इथून कोणीही पळून जाऊ शकत नाही, अशा बढाया भारतीय सैनिक मारत असत, असं ते लिहितात. काही पाकिस्तानी सैनिक त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत असत, तर इतर काही सैनिक या गप्पा सुरू असताना थोड्याच पावलांवर अनेक फूट खोल बोगदा खणण्याच्या कामात गुंतलेले असत.
भारतीय सैनिक तपासणीसाठी यायचे तेव्हा सर्व कैदी धावत जाऊन मोऱ्यांमध्ये कपडे बदलायचे. पण बोगदा खणला जात होता, त्या मोरीतला कैदी बाहेर यायचा नाही, तो सतत आंघोळ करत राहायचा, असं तारिक परवेझ सांगतात.
कॅप्टन नूर कायम खानी यांनी लिहिल्यानुसार, हा बोगदा 16 सप्टेंबर1972पर्यंत छावणीच्या हद्दीबाहेर जाऊन पोचला. त्यानंतर 17 सप्टेंबरला भारतीय सैनिकांनी कैद्यांची मोजणी केल्यावर तुरुंगातून फरार होण्याची योजना मेजर नादिर परवेझ, तारिक परवेझ व कॅप्टन नूर यांच्यासह पाच अधिकाऱ्यांनी आखली.
17 सप्टेंबरच्या रात्री मेजर नादिर परवेझ, त्यांचे चुलत भाऊ मेजर तारिक परवेझ व कॅप्टन नूर कायम खानी निघाले, तर काही तासांनी कॅप्टन जफर हसन गुल व लेफ्टनंट यासिन बोगद्यातून बाहेर पडले. या सनिकांनी पाकिस्तानातील गणवेश घातला आणि ते बोगद्यातून बाहेर आले. गोळी लागली तर आपण स्वतःच्या सैनिकी गणवेशात मरावं, हे यामागचं कारण होतं.
तारिक परवेझ सांगतात, "जे अधिकारी गट करून बाहेर पडू इच्छितात त्यांनी आपापल्या योजना कराव्यात आणि दुसऱ्या गटाला यासंबंधी सांगू नये, असं त्यांनी आपापसात ठरवलं होतं. जेणेकरून पकडलं गेल्यावर, छळ झाला तरी एकमेकांविषयी काही सांगितलं जाऊ नये."
पाच अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणी या वेळी बाहेर पडलं नाही, कारण त्यांच्याकडे भारतीय चलन नव्हतं, आणि पीओडब्ल्यूचा शिक्का नसलेले कपडेही इतरांकडे नव्हते.
"शिवाय, फरार होण्याचा निर्णय अवघड होता. पाकिस्तानी युद्धकैदी कधी ना कधी आपल्या मायभूमीत परत जातील हे सर्वांना माहीत होतं. पण पळून जाताना पकडण्यात आलं तर त्यांना गोळी मारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाच अधिकाऱ्यांसह बाकी कोणी जोखीम घेतली नाही."
फरार झालेल्या सैनिकांमधील पहिल्या तिघांनी (मेजर तारिक, मेजर नादिर व कॅप्टन नूर अहमद कायम खानी) यंनी बाहेर येऊन कपडे बदलले आणि दाढी काढून टाकली. त्यामुळे काही दिवसांनी भारतीय वर्तमानपत्रांमध्ये छापून येणाऱ्या छायाचित्रांपेक्षा ते थोडे वेगळे दिसू लागले.
या सैनिकांच्या फरार होण्याची बातमी भारतीय वर्तमानपत्रांमध्ये छापून आली तेव्हा पाकिस्तानी सैनिकी नेतृत्वाने भारताशी लागून असणाऱ्या सीमेवर आदेश दिला की, भारताच्या बाजूने कोणी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना लक्ष्य करू नये.
सीमेवरील भागात भूमिगत बॉम्बची शक्यता असल्याने तिथे जायचं नाही असं या फरार अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं. समुद्रमार्गे नेपळामधील पाकिस्तानी दूतावासापर्यंत पोचायचं आणि तिथून मग मायभूमीत परतायची तजवीज करायची, असं त्यांनी ठरवलं होतं.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तारिक परवेझ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे केवळ 10 रुपये उरले तेव्हा आता आणखी काही करता येणार नाही, असं वाटून त्यांनी 'पाकिजा' हा चित्रपट पाहिला.
"चित्रपट पाहिला आणि बाहेर येऊन ताजं ज्यूस प्यायलो. त्यानंतर पैसे संपलेत त्यावर काय करायचं याचा विचार आम्ही करायला लागलो. काही स्थानिक मुस्लीम कुटुंबांना संपर्क साधावा असं आम्ही ठरवलं आणि काही लोकांना भेटलोसुद्धा, पण त्यांपैकी कोणी मदतीसाठी तयार झालं नाही."
अखेरीस, त्या तिघांनी जमात-ए-इस्लामी-हिंदच्या एका सदस्याला संपर्क साधला. त्याने या तिघांना लखनौपर्यंत जाण्यासाठी तिकीट काढून दिलं आणि लखनौमधील काही लोकांना यांची मदत करण्यासंदर्भात पत्र लिहिलं.
'फतेहगढमधून फरार झालेले तिघे तुम्हीच आहात'
लखनौला पोचल्यावर एका कुटुंबाशी त्यांची भेट झाली. या तिघांनी सांगितलेली कहाणी ऐकल्यावर त्या कुटुंबातील लोक म्हणाले, "तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही काही दिवसांपूर्वी फतेहगढच्या तुरुंगातून फरार झालेले कैदी आहात."
तारिक परवेझ सांगतात त्यानुसार, या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्तीने त्यांची मदत केली आणि 30 सप्टेंबरला सीमा पार करून ते नेपाळला गेले.
ते तिथून 70 मैल पायी चालून नेपाळमधील भेरवा इथे पोचले. तिथल्या एका मशिदीमध्ये ते थांबले.तिथून त्यांनी विमानाचं तिकीट काढलं आणि नादिर परवेझ काठमांडूला रवाना झाले. तिथे पाकिस्तानी दूतावासात जाऊन त्यांनी इतर दोन अधिकाऱ्यांचीही तिकिटं पाठवली.
बीबीसीशी बोलताना तारिक परवेझ म्हणाले, "मी काठमांडू विमानतळावर उतरून पाकिस्तानी दूतावासाकडे जात होतो, तो क्षण कधीही विसरू शकणार नाही. दूतावासावर आमच्या देशाचा झेंडा फडकताना मला दुरून दिसला, तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले होते."
ते तिघे पीआयएच्या विमानाने 11 ऑक्टोबरला कराचीला पोचले, तिथे त्यांची सुरक्षाविषयक तपासणी झाली आणि त्यानंतर त्यांना आपापल्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.
तारिक परवेझ सांगतात, "मी विमानातून उतरलो, तेव्हा पहिल्यांदा स्वतःच्या मायभूमीत आल्याबद्दल ईश्वराचे आभार मानले. घरच्या लोकांनी आम्हाला ओळखलंही नाही इतकी आमची अवस्था खराब झाली होती. तो क्षण खूप भावूक करणारा होता. माझी आई वारंवार मला जवळ घेऊन गळाभेट घेत होती."
सुदैवी न ठरलेले कैदी
हे पाच अधिकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले, पण हजारो पाकिस्तानी सैनिकांपैकी व अधिकाऱ्यांपैकी कोणी इतकं सुदैवी ठरलं नाही. अनेक युद्धकैद्यांनी पळण्याचा प्रयत्न करूनही ते अपयशी ठरले.
मेजर (निवृत्त) साबिर हुसैन व मेजर (निवृत्त) नईम अहमद हे भारतीय छावण्यांमध्ये अनेक अडचणींना सामोरं गेलेल्या युद्धकैद्यांपैकी होते.
मेजर साबिर हुसैन 'आझाद काश्मीर रेजिमेंट'मधील होते. युद्ध सुरू झालं तेव्हा ते शंक्यारीमध्ये त्यांच्या दलासोबत होते, तिथे त्यांना तत्काळ कराचीला जाऊन ढाक्याला रवाना होण्यास सांगण्यात आलं.
'मी 1965च्या युद्धातही लढलो होतो, पण ते एक संघटितरित्या झालेलं, योजना आखून केलेलं युद्ध होतं, त्यानुसार दलं तैनात केली गेली. पण 1971च्या युद्धात तसं नव्हतं.'
मेजर सानिब सांगतात की, पूर्व पाकिस्तानात पोचल्यावर त्यांना रस्तेही माहीत नव्हते आणि त्यांना स्वतःच्या सहकाऱ्यांवरही विश्वास ठेवता येत नव्हता.
"आमच्याच सैन्यातील बंगाली सैनिक बंड करत होते. संधी मिळेल तिथे ते नुकसान करत होते. कोणी हत्या करत होतं तर कोणी चुकीचे रस्ते दाखवत होतं. चारही बाजूंनी आम्ही शत्रूंनी वेढलेले होतो. पूर्व पाकिस्तानातील लोक आमचे शत्रू होते, तिथले अधिकारी आमचे शत्रू होते, तिथे शिपाईसुद्धा आमचे शत्रू होते. वाट दाखवायला आम्हाला जे गाइड मिळायचे, त्यांच्यावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण तेही बंगालीच होते. बिहारमधल्या काही लोकांनी मात्र आमचं सहकार्य केलं आणि त्यांनी आमच्याशी निष्ठा कायम ठेवली."
'भारतीय अधिकाऱ्यांकडून मिळणारा ओरडा अपमानकारक वाटायचा'
पाकिस्तानचे जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाजी यांनी पूर्व पाकिस्तानात भारतीय लष्कराचे जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्या समोर शरणागतीच्या करारावर सही केली, तेव्हा आपण हरलो आहोत यावर आधी आपला विश्वासच बसला नाही, असं मेजर साबिर सांगतात. त्यानंतर ते युद्धकैदी झाले.
"आम्ही जहाजातून कलकत्त्याहून बिहारला आलो. कुठे जायचं आहे आणि आमचं काय होणार आहे, याचा कोणालाही पत्ता नव्हता. तिथे आम्हाला चार-पाच दिवसांचं शिळं अन्न मिळत असे. ते कुठे शिजवलं जायचं काय माहीत. आम्ही समुद्राच्या पाण्याने पोळी धुवायचो आणि मग सुकवून खायचो."
मेजर साबिर यांच्या म्हणण्यानुसार, "भारतीय सैनिक थोडे ठीक होते, पण बंगाली सैनिकांची वागणूक विशेषकरून वाईट होती. तोवर प्रचारतंत्र इतकं वापरून झालं होतं की ते पकिस्तानी सैनिकांना शत्रू मानू लागले होते. कालपर्यंत आम्ही ज्यांच्याशी समोरासमोर बोलायचो, त्यांच्या समोर आज आम्ही मान झुकवून बोलतो आहोत, याचं दुःख व्हायचं. आम्हाला अनेक तास उभं करून ठेवलं जात असे. कडाक्याच्या थंडीतही आम्ही एक-दोन तास उभे असायचो. शारीरिक काही शिक्षा दिली जात नसे, पण कधी कानशिलात लगावली जायची. सैन्यात ही शिक्षा सर्वसामान्य मानली जाते, पण आपल्याच लोकांसोबतचं हे युद्ध खूप मोठं होतं. सर्वसाधारणतः आपल्या एखाद्या अधिकाऱ्याने ओरडा दिला तर खूप दुःख होतं, भारतीय सैनिक ओरडला तर अपमान वाटायचा."
तुरुंगात असताना सहा महिन्यांपर्यंत आपल्याला कुटुंबाशी काहीच संपर्क साधता आला नाही, असं ते सांगतात. मेजर साबिर पूर्व पाकिस्तानात गेले तेव्हा त्यांची मुलगी नऊ महिन्यांची होती.
आपल्या मुलीचा निरोप घेण्याचा प्रसंग सांगताना 50 वर्षांनंतरही मेजर साबिल हुसैन यांचे डोळे पाणावले, यावरून त्यांच्यासाठी तो क्षण किती भावूक असेल याची कल्पना येते.
"मी तो क्षण कधीही विसरू शकलो नाही. मागच्या वेळी जाताना मी तिला जवळ घेतलं होतं. कैदेत असताना माझ्या डोक्यात तोच क्षण रेंगाळत असायचा."
कैदेतील दिवसांची आठवण सांगताना मेजर साबिर हुसैन सिगरेट पिणं सोडून दिल्यासंदर्भातला एक रोचक किस्सा सांगतात.
"सिगरेटवरून बरीच भांडणं व्हायची. सगळेच अधिकारी सिगरेटचे शौकिन होते. त्यांना एक वेळ रोटी नाही मिळाली तरी चालेल, पण सिगरेटशिवाय जगणं त्यांच्यासाठी मुश्कील होतं. माझ्या ऑर्डलीने माझ्यासाठी बऱ्याच सिगरेटी ठेवल्या होत्या. पण सिगरेटींवरून इतकी भांडणं होत असल्याचं बघून सिगरेटमधील माझा रस संपून गेला. मी माझ्याकडचा सिगरेटचा सगळा साठा
सैनिकांमध्ये वाटला आणि न भांडता सिगरेट प्या असं सांगितलं. पण मी स्वतः त्या दिवसानंतर सिगरेट पिणं सोडून दिलं."
आजारी कैद्यांना छावणीतून बाहेर न्यायला सुरुवात झाली तेव्हा आपल्याला बहुधा परत मायदेशात जायला मिळेल याचा अंदाज मेजर साबिर हुसैन यांना आला.
"एप्रिल 1974मध्ये आम्हाला ट्रकमधून बिहारवरून रांचीला नेण्यात आलं. तिथून विमानाने त्यांना पाकिस्तानात नेण्यात आलं."
ते सांगतात, "पाकिस्तानात पोचल्यानंतरची दृश्यं खूप भावूक करणारी होती. त्यांची नजर केवळ त्यांच्या मुलीचा शोध घेत होती."
"माझा कैदेचा कालावधी संपला तेव्हा माझी मुलगी जवळपास तीन वर्षांची झाली होती. मी परत आलो तेव्हा ती एकदम माझ्या मांडीत येऊन बसली. परत आल्यावर मुलीला भेटल्याचा आनंद सर्वाधिक होता."
पण या कैदेने त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या करिअरवरही बराच प्रभाव टाकला. परत आलेल्या सैनिकांना त्यांच्या दलात पुन्हा मिसळायला वेळ लागला.
मेजर साबिर हुसैन सांगतात त्यानुसार, ते परत आल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांमध्ये आणि आपल्यात बराच दुरावा असल्याचं त्यांना जाणवू लागलं.
"आम्हाला पुन्हा सर्वसामान्य स्थितीत रुळायला बराच वेळ लागला. आम्ही शत्रूची कैद भोगून आलं होतं, त्यामुळे स्वतःला कमी लेखत होतो. इथेही कोणी ना कोणी टोमणे मारायचं. पण हळू-हळू त्यांना काही गोष्टींची सवय झाली."
'1971चं युद्ध आमच्यासाठी कधीच संपलं नाही'
सुदैवाने मेजर साबिर हुसैन यांच्यासारखे हजारो सैनिक सर्वसामान्य परिस्थितीमध्ये परत आले, पण अनेकांना अजून कसोटीच्या प्रसंगांना सामोरं जायचं होतं. अनेक सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी हे युद्ध अनेक दशकं सुरू राहिलं- मेजर नईम अहमद हे अशांपैकी एक होते.
मेजर नईम अहमद यांची मुलगी सानिया अहमद यांनी बीबीसीशी बोलताना त्यांचे व त्यांच्या वडिलांचे अनुभव सांगितले. आपल्यासाठी आणि आपल्या भावांसाठी 1971चं युद्ध कधीच संपलं नाही, असं त्या सांगतात.
नईम अहमद हे त्यांच्या आईवडिलांचं एकुलतं अपत्य होते. युद्धाला जाणाऱ्या तुकडीत जायचं नाही, या अटीवर त्यांना सैन्यात दाखल व्हायची परवानगी मिळाली.
पूर्व पाकिस्तानला पोचल्यावर मेजर नईम अहमद यांना सैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रं व स्फोटकं पोचवण्याचं काम देण्यात आलं होतं, असं सानिया सांगतात.
आपल्या वडिलांना अटक झालं तेव्हाची आठवण सांगताना सानिया म्हणतात की, पाकिस्तानने शरणागती पत्करल्याची बातमी त्यांना कळली, तेव्हा त्यांना सर्व शस्त्रास्त्रं नि स्फोटकं नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून ही शस्त्रं शत्रूच्या हाती पडू नयेत.
सानिया अहमद सांगतात त्यानुसार, मेजर नईम अहमद व त्यांचे सहकारी यांना त्यांच्या आघाडीपासून 50 किलोमीटरांवरील शस्त्रास्त्रं नष्ट करण्याच्या ठिकाणापर्यंत जायचं होतं, पण त्यांचा रस्ता चुकला आणि ते एका घनदाट जंगलात जाऊन पोचले.
"ही जागा योग्य नसल्याचं त्यांना जाणवलं, पण तोवर बराच उशीर झाला होता. भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला."
हल्ला करणारे भारतीय सैनिक एलिट पथकातील होते, त्यांना युद्धासाठीच प्रशिक्षित करण्यात आलं होतं आणि पाकिस्तानी सैन्याचे तिथले जवान लढाऊ पथकांमधील नव्हते, असं सानिया अहमद सांगतात.
"पाकिस्तानी सैनिक तीन तास लढत राहिले. त्यांनी इतका शूरपणे लढा दिला की, भारतीय दलांची धुरा सांभाळणारे मेजर जयस्वालही नंतर म्हणाले की, हे पाकिस्तानी अधिकारी लष्कराच्या पथकांसारखे लढत होते."
या लढाई दरम्यान सानिया यांचे वडील मेजर नईम एका मोर्टार गोळ्याने जखमी झाले आणि त्यांचा एक डोळा निकामी झाला.
सानिया अहमद सांगतात की, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील स्फोटकाच्या व्रणांमुळे त्यांना ओळखणं अवघड झालं होतं. अनेक महिने ते बेपत्ता व्यक्तींच्या यादीतच राहिले आणि पाकिस्तानात शोकाकुल लोक नईम यांच्या आईवडिलांची भेट घेऊ लागले.
पण अखेरीस त्यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार होत होते तिथल्या त्यांच्या मित्राला त्यांची ओळख पटली. तब्येत सुधारल्यावर नईम यांना रांचीतील तुरुंगात पाठवण्यात आलं, असं सानिया सांगतात.
"माझे वडील त्या तुरुंगात पोचले तेव्हा त्यांच्याकडे कपडे नव्हते. मग त्यांनी सुईदोरा घेऊन स्वतःच कपडे शिवले, याचा त्यांनाही खूप अभिमान वाटला. तुरुंगात असताना त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना व पुरुषांना कुरआन वाचायला शिकवलं, याचाही त्यांना अभिमान वाटत होता."
'वडिलांना झटके येत असत'
आपले वडील मेजर नईम अहमद 1974 साली भारतातून परतले आणि ते एक सुदृढ सर्वसाधारण मनुष्यासारखं जीवन जगायला सज्ज झाले, असं सानिया अहमद सांगतात.
"तिथून आल्यावर त्यांनी लग्न केलं, त्यांना मुलं झाली. अब्बू आमच्यावर खूप प्रेम करायचे, आमचे खूप लाड करायचे, कधी लाडाने पैसेही द्यायचे. ते खूप चांगले गायक होते आणि मला त्यांनी नात (पैगंबर मोहम्मद यांच्या प्रशंसाठीचा शेर) कशी वाचायची तेही शिकवलं होतं. मी गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले आणि ते कित्येक तास माझा अभ्यास घ्यायचे. पण 1984मध्ये त्यांची मानसिक स्थिती बिघडू लागली."
सानिया अहमद यांच्या म्हणण्यानुसार, सरत्या काळानुसार त्यांच्या वडिलांची स्मृती दुबळी होत गेली, तसंच त्यांना झटकेही येऊ लागले.
ते वास्तवात नसलेल्या गोष्टी बोलू लागले, त्यांना त्या खऱ्या वाटत असत. त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना व जवळच्या मित्रांनासुद्धा हे लक्षात आलं आणि सहा महिन्यांनी त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावं लागलं.
या दरम्यान त्यांना 'स्मृतिभ्रंश, निराशा आणि भ्रम' असे मनोविकार झाल्याचं स्पष्ट झालं. आपल्या वडिलांशी संबंधि एक विशेष घटना सानिया यांना आजही लख्खपणे आठवते.
"अब्बू आमच्या सोबत कायम खूश असायचे. त्यंना गाडी चालवायला आवडायचं, पण त्यांच्या शिरा धड काम करत नव्हत्या, त्यामुळे त्यांना ड्राइव्ह करता येत नव्हतं. हे त्यांना खूपच यातनादायक वाटायचं. एकदा, 7 सप्टेंबरला, ते आम्हाला एक एअर शो दाखवायला घेऊन गेले. ते गाडी चालवत होते आणि एकदा त्यांनी मागे वळून पाहिलं. ते आम्हाला काहीतरी सांगू पाहत होते, पण त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. मी नि माझा भाऊ खूपच लहान होतो,पण आम्ही त्यांना धीर दिला, काही हरकत नाही असं सांगितलं. तुम्ही बरे व्हा, असं समजावलं. अब्बू बहुधा कधीच बोलू शकणार नाहीत, याची जाणीव मला तेव्हा झाली."
दोन दशकांनी डोक्यात मोर्टारचे छर्रे मिळाले
हळूहळू मेजर नईम यांची बोलण्याची व चालण्याची क्षमता कमी व्हायला लागली. सन 1989मध्ये सैन्याने त्यांना एका वर्षासाठी गणवेश परिधान करायला बंदी घातली. मेजर नईम यांच्यासाठी ही कारवाई सहन करणं खूप अवघड होतं.
सानिया अहमद सांगतात की, त्यांच्या वडिलांना आधी गंभीर तणावाला सामोरं जावं लागलं होतं, पण गणवेश न घालायची कारवाई याहून त्रासदायक ठरली. आता सैन्यातून निवृत्ती घ्यायचा निर्णय त्यांनी घेतला.
"त्यांनी गणवेश शेवटचा परिधान केला, त्या दिवशी ते खास तयार झाले होते आणि हा क्षण आठवणीत जपून ठेवण्यासाठी त्यांनी मुलांसोबत फोटोही काढून घेतला."
निवृत्तीनंतर मेजर नईम यांनी सैन्याच्या एका कल्याणकारी संस्थेत काम करायला सुरुवात केली, पण काही काळाने त्यांना अपस्माराचा झटका आला. त्यानंतर त्यांना सीएमएचला घेऊन जाण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करायचा सल्ला दिला.
"अब्बूंचं सीटी स्कॅन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर चकित झाले. 1971च्या युद्धात त्यांना ज्या मोर्टार शेलमुळे जखम झाली होती, त्या मोर्टारचे शेकडो तुकडे त्यांच्या शरीरात होते आणि 22-23 वर्षांनी ते पहिल्यांदाच दिसले. त्यांच्या सगळ्या आजारपणांचं कारण हेच असल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं."
हे कळल्यावर रुग्णालयाच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि अनेक आठवडे नईम अहमद कोमाच्या अवस्थेत असायचे. ईश्वराची प्रार्थना करत राहा, एवढंच डॉक्टर त्यांच्या घरच्यांना सांगत होते.
"पण अब्बू कायम आजाराशी लढून घरी परत येत. मग 2000 साली त्यांना एक झटका आला, तेव्हा ते 10 आठवडे सीएमएचमध्ये भरती झाले होते. त्या वेळी ते परत कोमात गेले. तिथल्या एका न्यूरोसर्जनने त्यांच्या आजारपणाचं रेकॉर्ड पाहिलं, तेव्हा त्यांना सेरिब्रल एट्रोफी असल्याचं निदान झालं. म्हणजे त्यांच्या डोक्यात छर्रे अडकल्यामुळे त्यांचा मेंदू अनेक वर्षांपासून आकुंचन पावत होता. हे निदान पहिल्यांदाच झालं होतं."
आपल्या वडिलांच्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसांची आठवण सांगताना सानिया यांचे डोळे पाणावतात.
एकदा सूर्यास्ताच्या वेळी त्या वडिलांच्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा पाणावल्या डोळ्यांनी त्यांनी वडिलांची तब्येत बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.
त्या म्हणतात, "वडिलांची तब्येत सुधारावी यासाठी मी कायम प्रार्थना करायचे. त्यांची वृत्ती लढवय्याची होती. त्या आधी मी कधी प्रार्थना करायचे नाही. त्या वेळी मी तसं का केलं कळत नाही."
काही वेळाने सानिया पुन्हा त्यांच्या वडिलांच्या खोलीत गेल्या, तेव्हा त्यांनी वडिलांशी बोलायला सुरुवात केली, पण ते कोमात असल्यामुळे त्यांना काही कळत नव्हतं.
"मी त्यांचा हात हातात घेतला, तर त्यांनी हात हलवून माझाही हात धरला. अब्बू इतका काळ कोमात होते, तरी ते थोडे उठले, त्यांनी डोकं वर केलं, खांदे वर केले आणि थोडं खोकले. मग त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि त्यांचा श्वासोच्छवास थांबला."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)