'दिमागात चांगलं जातं' इथपासून ते तारा भवाळकरांच्या भाषणाची चर्चा, विद्रोही साहित्य संमेलनातील दोन दिवस

अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनात आदिवासी महिला सहभागी झाल्या.

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनात आदिवासी महिला सहभागी झाल्या.
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"सांगा आमचा गुन्हा काय,

तरुणाईच्या हाताला रोजगार नाय"

19 वं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलं. या साहित्य संमेलनात तरुणांनी सादर केलेल्या रॅपमधील हे एक वाक्य. या वाक्यावर त्यांना टाळ्या मिळाल्या आणि वातावरणात त्यांनी नवा जोश भरला.

नवा यासाठी कारण विद्रोही साहित्य संमेलनातील सगळेच तिन्ही दिवस उत्साहपूर्ण वगैरे नव्हते.

21 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात 'कही खुशी, कही गम' अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली.

21 च्या रात्री 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचं सादरीकरण झालं. त्याला मोठी गर्दी जमली. पण नाटक 7 च्या ऐवजी 9 वाजता सुरू झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

22 फेब्रुवारीच्या सकाळी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार होतं. त्याआधी निघालेली 'सांस्कृतिक विचारयात्रा' संमेलनस्थळी पोहचली तेव्हा तिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आदिवासी समाजातील बांधव पारंपरिक वाद्य वाजवून संमेलनस्थळी दाखल झाले.

संमेलनस्थळी प्रवेशद्वारापासून काहीच अंतरावर बरोबर मधोमध तोफ ठेवलेली होती. तोफेच्या तोंडाला लेखणी होती आणि तोफेवर 'भारतीय संविधान' असं लिहिलेलं होतं.

लाल रेष
लाल रेष

22 फेब्रुवारीच्या सकाळपासून दुपारच्या साडेतीन वाजेपर्यंत संमेलनाचं उद्घाटन आणि त्यात अध्यक्ष, माजी अध्यक्ष, स्वागताध्यक्ष इत्यादींची भाषणं यांचाच कार्यक्रम चालला. साहित्य, संस्कृती, भाषा यांचा प्रवास वक्ते त्यांच्या भाषणांमधून मांडत होते. जमलेली गर्दी हळूहळू कमी होत होती.

22 फेब्रुवारीच्या संध्याकाळी संमेलनस्थळी असलेल्या 'फुले-शाहू-आंबेडकर' सभा मंडपात कमी गर्दी दिसली. तिथं एक ओळखीचा मित्र दिसला, तो म्हणाला की संमेलनात गर्दी नाहीये.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

याच सुमारास 'मी रमाई बोलतेय' या एकपात्री नाटकाचा प्रयोग सुरू होणार होता. हा दहावा प्रयोग असल्याचं निवेदक सांगत होते. सुरुवातीला निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या, नंतर मात्र बरेचसे लोक येऊन प्रयोग पाहताना दिसले.

आपला प्रयोग जवळपास दोन तासांचा असतो, आज मात्र पाऊणएक तासात संपवावा लागल्याचं सादरकर्ती तरुणी उपस्थितांना सांगत होती.

याच सुमारास आमची भेट विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी यांच्याशी झाली. त्या म्हणाल्या, "निम्मे निम्मे लोक झालेत. काही इकडे गेलेत, काही तिकडे गेलेत."

'लोक यायलाच तयार नाहीत'

संमेलनस्थळी उपस्थित एका पुस्तकाच्या स्टॉलवर आम्ही गेलो. तर तिथले विक्रेते म्हणाले, "लोक यायलाच तयार नाही. अंमळनेरला दोन दिवसांत 1 लाख 20 हजार रुपयांचा गल्ला झाला होता. इथं एका दिवसात फक्त 6-7 हजार रुपयांची पुस्तकं विकली गेली. उद्या म्हणजे रविवारी गर्दी झाली नाही तर कार्यक्रम आपटला म्हणायचं."

याआधीचं म्हणजे 18 वे विद्रोही साहित्य संमेलन अंमळनेरला पार पडलं होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही याच ठिकाणी पार पडलं होतं. मी स्वत: ही दोन्ही संमेलनं कव्हर केली होती. त्यावेळी विद्रोही संमेलनाला मिळालेली जागा कमी असली तरी जमलेली गर्दी मोठी होती. यावेळी जागा मोठी असली तरी गर्दी जमल्याचं चित्र नव्हतं.

संमेलनस्थळी अनेक प्रकाशनांनी त्यांचे स्टॉल्स लावलेले होते.

फोटो स्रोत, shrikant banagale

फोटो कॅप्शन, संमेलनस्थळी अनेक प्रकाशनांनी त्यांचे स्टॉल्स लावलेले होते.

पुस्तक विक्रेते पुढे म्हणाले, "दोन्ही संमेलनं एकाच ठिकाणी पाहिजे, त्यानं फायदा होतो. लोक दोन्हीकडे जातात, चौकशी करतात आणि मग खरेदी करतात. ते संमेलन दिल्लीला नको व्हायलं हवं होतं. इतक्या लांब आम्ही पुस्तकं घेऊन नाही जाऊ शकतं."

"पण वर्गणी करून संमेलन भरवणं सोपं काम नाही. इथं जे कुणी लोक बोलतात ते पोटतिडकीने बोलतात. याला काही शासनाचा फंड नसतो," असंही ते पुढे म्हणाले.

त्यांच्या शेजारीच उभा असलेला एक तरुण म्हणाला, "साहित्यात आता कुणाला इंटरेस्ट राहिलेला नाही."

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारकडून 2 कोटींचा निधी मिळतो, यंदा संमेलन दिल्लीत असल्यामुळे 2 कोटी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला होता. विद्रोही साहित्य संमेलन मात्र वर्गणी करून भरवण्यात आल्याचं स्वागताध्यक्षांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.

'दोन्ही संमेलनं एकाच ठिकाणी हवीत'

आमची चर्चा चालू असताना दुसरा एक जण म्हणाला, "सगळीकडे चर्चा सुरू आहे की दोन्ही संमेलन एकाच ठिकाणी असली की मजा येते. वैचारिक कार्यक्रम बरोबर लागतो."

मुख्य मंडपाच्या समोर काही जण चर्चा करत उभे होते. त्यात काही तरुण पत्रकार होते. त्यांच्यात तारा भवाळकर यांच्या भाषणाची चर्चा सुरू होती.

एक जण म्हणाला, "ताराबाईंचं भाषण हे खरं विद्रोही मराठी संमेलनाचं भाषण होतं."

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरवलं गेलं. त्याच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर होत्या. ताराबाईंनी त्यांच्या भाषणात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींविषयी केलेल्या बाबींची सध्या चर्चा सुरू आहे.

दुसरा एक जण म्हणाला, "त्यांनी साहित्य संमेलन दिल्लीत भरवलं तर यांनी (विद्रोहीवाल्यांनी) संमेलनाध्यक्ष म्हणून रवीश कुमारला आणायला पाहिजे होतं, मग मजा आली असती."

रॅप सादर करताना तरुण

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, रॅप सादर करताना तरुण

रात्री 9च्या सुमारास काही तरुण आमचा रॅप ऐकायला चला म्हणून विनंती करू लागले. त्यांच्या रॅपमधून ते शेतमालाचे, बेरोजगारीचे प्रश्न मांडत होते.

"सांगा आमचा गुन्हा काय,तरुणाईच्या हाताला रोजगार नाय," रॅपमधील यासारख्या प्रत्येक वाक्यावर त्यांना श्रोत्यांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता.

मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर हे तरुण रॅपमधून आसूड ओढत होते. एक-एक आठवडा पाणी येत नाही अशी कैफियत मांडत होते.

'रविवारचा लोकांचा कार्यक्रम फिक्स असतो'

23 फेब्रुवारी, रविवारच्या सकाळी 11 वाजता साहित्य संमेलनस्थळी वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा सुरू होती. ग्रामीण तरुण, आदिवासींचे प्रश्न, पाणीप्रश्न, महिला अत्याचार अशा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या गटांत चर्चा सुरू होती.

संमेलनस्थळी नंदूरबारहून बरेचसे जण गाड्या भरभरून आले होते. इथं आमची भेट आर. टी. गावित यांच्याशी झाली.

ते म्हणाले, "नंदूरबारहून 200 ते 250 लोक आले आहेत. संमेलनाला स्थानिकांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. ऊन पण खूप जास्त आहे. मी याआधीच्या प्रत्येक संमेलनाला गेलो आहे. संमेलनात तारा भवाळकरांच्या भाषणाची चर्चा होत आहे. कारण त्यांनी सरकारला चांगलंच सुनावलं आहे."

आर टी गावित

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, आर टी गावित

दुसऱ्या एका मंडपात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे ठेवलेले होते. सुधाकर विसर्ग त्यांना न्याहाळत होते.

ते म्हणाले, "रविवारचा लोकांचा कार्यक्रम फिक्स असतो, मटण आणायचं आणि टीव्ही पाहत बसायचं. त्यातल्या त्यात आज भारत-पाकिस्तान मॅच आहे. मॅच असली की आपल्या लोकांना दुसरं काहीच नको. शिवाय, पोरांच्या दहावी-बारावीच्या परीक्षाही चालू आहेत." 

'चांगलं काहीतरी शिकायला मिळतं'

रविवारी दुपारी पुस्तकांच्या स्टॉल शेजारीच महिलांच्या कपड्यांचा स्टॉल लागलेला होता. दुकानदार म्हणाला, "आमची बोहनीच मुश्किलीनं होत आहे. काल एक-दोन ड्रेस विकले गेले, आज अजून एकही नाही."

इंदुमती वाघमारे त्यांच्या नातीला घेऊन पटापट पावलं टाकत होत्या. रावसाहेब रंगराव बोराडे ज्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्या संमेलनाला याआधी गेल्याचं त्यांनी सांगितलं.

इंदुमती वाघमारे

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, इंदुमती वाघमारे

संमेलनाला कशासाठी यावंसं वाटतं, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "इथं काहीतरी शिकायला मिळेल, काही गोष्टी कळतील, आपल्या दिमाखात काही चांगल्या गोष्टी जातील. यासाठी संमेलनाला यावं वाटतं."

इंदुमती वाघमारे यांच्या नातीला सावित्रीबाईंवरील गाणं सादर करायचं होतं. त्यासाठी नावाची नोंदणी कुठे करायची असं त्या विचारत होत्या.

विद्रोही संमेलनात मोजक्याच कार्यक्रमांना फुल गर्दी दिसली.

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, विद्रोही संमेलनात मोजक्याच कार्यक्रमांना फुल गर्दी दिसली.

दुपारच्या सुमारास आमची भेट संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश चकोर यांच्याशी झाली. लोकांचा प्रतिसाद कमी का दिसतोय, असं विचारल्यावर ते म्हणाले, "इथं सरकारच्या विरोधात भूमिका घेतली जाते, मग कशाला त्या फंदात पडायचं असं लोकांना वाटतं आणि लोक येत नाहीत. दुसरं म्हणजे संमेलन स्थळ शहराच्या एका बाजूला झालं."

विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला साडेतीन हजार लोक आल्याचंही ते म्हणाले.

इतक्यात तिथं काही जण चकोर यांच्यापाशी आले. ते म्हणाले, "लोक यायला पाहिजे. पाहिजे तसे लोक दिसत नाहीत. तुम्ही उर्दू साहित्यिक लोकांना इन्व्हॉल्व करुन घ्यायला पाहिजे होतं. इथं स्थानिक कमी, बाहेरचेच जास्त दिसत आहेत."

विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाआधी निघालेली सांस्कृतिक विचारयात्रा

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाआधी निघालेली सांस्कृतिक विचारयात्रा

संध्याकाळच्या सुमारास नंदूरबारहून आलेले करणसिंग कोकणी भेटले. ते शेती करतात. आतापर्यंत जवळपास 15 विद्रोही मराठी साहित्य संमेलनांना गेल्याचं त्यांनी सांगितलं.

"विद्रोही साहित्य संमेलनात आमचे प्रश्न मांडले जातात. जल,जंगल, जमीन, शेतीवर बोललं जातं. आमच्या मुद्द्यांवरचे ठराव पास होतात, त्यामुळे या संमेलनांना आम्हाला यावं वाटतं," असं ते म्हणाले.

रविवारी रात्री संमेलन आटोपलं की लगेच परत गावाकडे निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)