मराठवाड्यातील शेतकऱ्याचे जीवन मराठी साहित्यात जिवंतपणे आणणारे लेखक - रा. रं. बोराडे

- Author, इंद्रजित भालेराव
- Role, बीबीसी मराठीसाठी
मराठीतील कथाकार आणि ज्येष्ठ कादंबरीकार रा. रं. बोराडे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीत महत्त्वाचे लेखक म्हणून प्राचार्य रा. रं. बोराडे हे सुपरिचित होते. नाटक, कथा, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले होते. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेला हा लेख.
(बीबीसी प्रतिनिधी प्रियंका जगताप यांना दिलेल्या मुलाखतीवर आधारित.)
मराठवाड्याच्या भूमीतून निजामी राजवट संपल्यानंतर उदयाला आलेले ते सर्वांत महत्त्वाचे लेखक होते.
त्यांच्या आधी निजामी राजवटीत बी. रघुनाथ हे एक मोठे लेखक इकडे होऊन गेले होते. त्यांच्या नंतर तितक्याच ताकदीनं लिहिणारा दुसरा लेखक म्हणून रा. रं. बोराडे यांच्याकडे पाहिलं जायचं.
योगायोगानं त्यांनी त्यांच्या लिखाणाची सुरूवात बी रघुनाथ यांच्या जन्मभूमीतूनच केली.
रा. रं. बोराडे तसे मूळचे लातूर जिल्ह्यातले. त्यांच्या कारकिर्दीतील पहिली नोकरी त्यांना परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात लागली आणि बोराडे यांचा या शहराशी ऋणानुबंध जुळला.
नोकरी लागल्यानंतर बी. रघुनाथांच्या भूमीत राहत असतानाच त्यांनी जे सुरूवातीच्या काळात लिखाण केलं, तेच त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं लिखाण होतं.
त्यांची सर्वांत गाजलेली 'पाचोळा' नावाची कादंबरी त्यांनी परभणीतच लिहिली होती.
'पेरणी, मळणी' या त्यांच्या कथासंग्रहातील ज्या कथा आहेत त्या त्यांनी परभणीतच लिहिल्या आहेत.


रा. रं. बोराडे मराठवाड्यावर आणि मराठी साहित्यसृष्टीवर कसा प्रभाव पडला?
रा. रं. बोराडे यांच्या साहित्यातलं गाव हे पारंपारिक मराठवाड्यातलं सरंजामी जीवन जगणारं गावही होतं आणि त्या गावात काळानुसार हळूहळू होत जाणारे जे बदल होते तेही त्यांनी तितक्याच हळुवारपणे टिपले होते.
या सगळ्या लिखाणातून मराठवाड्यातील शेतकऱ्याचं जीवन इतक्या जिवंतपणे पहिल्यांदांच मराठी वाङमयातमध्ये दाखल झालं होतं.
त्यांच्या आधी बी. रघुनाथांनी आडगावचे चौधरी यांसारख्या फक्त एक-दोन कथाच लिहिल्या होत्या.
मात्र रा. रं. बोराडे यांचं समग्र लेखनच या शेतकरी जीवनावर बेतलेलं होतं. बरं त्यांनी केवळ शेतकरी जीवनच लिहिलं नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात नव्यानं येणारे जे बदल होते ते सुद्धा त्यांनी 'पाचोळा' सारख्या कादंबरीमधून चित्रित केले.
नवीन शिलाई मशीन आल्यावर खेड्यातल्या शिलाई करणाऱ्या टेलरला काय अडचणी आल्या, त्याचं वर्णन करणारी 'पाचोळा' सारखी कादंबरी त्यांनी लिहिली.
त्या कादंबरीमध्ये त्यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील नातेसंबंधांचं चित्रण ही खूप सुंदरपणे केलं होतं.
त्यांच्या लिखाणामध्ये संवाद असत. त्या संवादांमुळे चित्रपट सृष्टीतल्या आणि नाट्य सृष्टीतल्या अनेक लोकांना असं वाटलं की ते उत्तम पटकथा आणि नाटकं लिहू शकतील.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात त्यांच्या लिखाणात खुसखुशीत विनोद देखील येत असत. मला वाटतं की त्या विनोदांमुळे देखील चित्रपट आणि नाट्यसृष्टीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं असावं.
त्यामुळेच त्यांच्या कलाकृतींवर नाटकं आणि चित्रपट देखील झाले. आमदार सौभाग्यवती या कादंबरीवर त्यांनी लिहिलेलं जे नाटक आहे.
ते ज्योती चांदेकर सारख्या मोठ्या अभिनेत्रीनं खूप ताकदीनं केलं. जे नंतर व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी देखील झालं.
त्यांच्या लेखनाच्या प्रभावातून चित्रपट आणि नाट्य सृष्टीतल्या लोकांना हे समजलं की हा माणूस आपल्या कामाचा आहे. याचे संवाद उत्तम आहेत म्हणजे हा नाटकं लिहू शकतो.
सुरूवातीच्या काळात त्यांनी 'पिकलं पान, हिरवं रान' सारखं विनोदी स्वरूपातलं नाटक लिहिलं.
नंतर त्यांनी आमदार सौभाग्यवती सारखं राजकीय नाटक सुद्धा त्यांनी ताकदीनं लिहिलं.
त्यांच्या लिखाणातली ग्रामीण स्त्री
त्यांच्या लिखाणात स्त्री जीवनाचं फार सुक्ष्म चित्रण आलेलं आहे. जसं की आमदार सौभाग्यवती सारखं ग्रामीण स्त्रीचं राजकारणातलं स्थान स्पष्ट दाखवणाऱ्या विषयावरचं नाटक त्यांनी लिहिलं होतं.
त्यात त्यांनी ग्रामीण महिलांना राजकारणात खरंच संधी दिली जाते का? दिली तर किती दिली जाते? कशी दिली जाते? राजकारणात स्वतःचं सामर्थ्य दाखवायला सुरूवात केल्यानंतर तिला कसं आडवलं जातं हे सगळं अतिशय बारकाव्यांनी लिहिलं होतं.
अतिशय संवेदनशील पद्धतीनं त्यांनी मराठवाड्यातील स्त्रीचं पारंपारिक जगणं त्यांच्या लिखाणातून मांडलेलं आहे. पण त्याच स्त्रीचं सामर्थ्य नव्या पद्धतीनं त्यांनी नाटकांमधून घेतलं.

फोटो स्रोत, Saket Publication
स्त्रियांच्या जीवनातले आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातले जे बारकावे असतात त्यांचं अतिशय सूक्ष्म चित्रण त्यांच्या कथांमधे आलेलं आहे.
ग्रामीण स्त्रीच्या लैंगिक भावनांचं चित्रण सुद्धा त्यांनी अतिशय सुचकतेनं, प्रतिमा प्रतीकांमधून त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं केलं आहे.
जसं की एखाद्या तरुण स्त्रीला वयस्कर नवरा मिळाल्यानंतर तिच्या लैंगिक जीवनाचा जो कोंडमारा होतो तो त्यांनी अतिशय कलात्मक पद्धतीनं त्यांच्या कथांमधून मांडला आहे.
परभणीतच लिखाणाला सुरूवात
लातूर जिल्ह्यातील काटगाव या छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबात 25 डिसेंबर 1940 रोजी रा. रं. बोराडे यांचा जन्म झाला होता.
ते खेडंच त्यांच्या लेखनाचं भावविश्व होतं. त्यांनी पाहिलेला शेतकरी हा तिथला होता. त्यांची भाषा तिथली होती.
'पाचोळा' सारखी कादंबरी त्यांनी लातूरच्या भाषेत त्यांनी लिहिलेली आहे. त्यांनी ती परभणीमध्ये बसून जरी लिहिलेली असली तरी त्यांचं बालपण ज्या गावात गेलं तिथलंच जीवन, तिथलीच भाषा त्यांना आठवणार ना.

फोटो स्रोत, साकेत प्रकाशन
कुठल्याही लेखकाचं संस्कारक्षम जीवन जिथं जातं तेच त्याचं संपूर्ण आयुष्यभराच्या लिखाणाचं भावविश्व असतं.
त्यामुळेच माडगूळकरांसारखे, शंकर पाटलांसारखे लेखक त्यांची खेडी सोडून पुण्यात राहायला आले, मात्र त्यांनी लिखाणातून ग्रामीण जीवनच लिहिलं आहे.
अगदी तसंच बोराडेंच्या लिखाणाला सुरूवात परभणीत झाली पण त्यांचं भावविश्व सगळं लातुरी बोलीतलं, तिथल्या मातीतलं आणि त्यांच्या कथांमधून तेच आपल्याला दिसतं.
ग्रामीण जीवनावर विविधांगी लिखाण
ग्रामीण जीवनातील किस्से, विनोद आणि समस्यांवर त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 1972 च्या दुष्काळामध्ये जनावरांना चारापाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं चारापाणी ही कादंबरी त्यांनी लिहिली.
त्यात त्यांनी शेतकरी आपली बैलं घेऊन कसे तहसील समोर उभं राहतात आणि बैलांचा मोर्चा कसा आणतात हे असं काहीतरी पहिल्यांदाच कथा कादंबरीमधून समोर आलं होतं. बोराडेंनी ते आणलं होतं.
त्यांच्या एका कादंबरीमध्ये एका मुलाला शिकण्याची इच्छा असते तर त्याच्या घरच्यांना त्याचं लग्न लावून द्यायची इच्छा असते.
तर लग्न या प्रकरणामुळं त्याच्या शिक्षणात निर्माण होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर त्यांनी सावट सारखी उत्कृष्ट कादंबरी लिहिली आहे.

फोटो स्रोत, Saket Publication
त्यावेळी जनावरांसाठी छावण्या वगैरे सारखा प्रकार नव्हता. ते सगळं नंतर आलं. ही कादंबरी आपल्याकडं छावण्या सुरू होण्याच्या आधी आली होती.
बालमनाचं चित्रणही त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांच्या कथांमध्ये लिहिलं आहे. जसं की त्यांच्या 'पाचोळा' कादंबरीमधील एक लहान मुलगी जी सतत वाटी आपटत काहीतरी खायला मागत असते तिच्या स्वभावाचं अप्रतिम वर्णन त्यांनी केलं आहे.
त्यांच्या इतर कथांमधे सुद्धा जी लहान मुलं येतात त्यांचं भावविश्व हे थोडक्यात पण समर्थपणे मांडण्याची ताकद त्यांच्या रा. रं. बोराडेंमध्ये होती.
ते स्वतः उत्तम कथाकथन करत असत. त्यामुळे एकेकाळी शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार यांच्या नंतर मराठीमध्ये कथाकथन करणारा एक तगडा लेखक म्हणून देखील त्यांचं नाव पुढे आलेलं होतं.
आजच्या तरुणाईनं त्यांच्या लिखाणातून काय घ्यावं?
आजच्या तरुणाईने त्यांचं लिखाण वाचलं पाहिजे. त्यातून अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कादंबऱ्यांमधून जी जीवन जगणारी माणसं त्यांनी दाखवली आहेत, ती त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवताना जी काही धडपड करतात आणि आपले प्रश्न स्वतःच कसे सोडवून घेतात हे तरुणाईनं त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून घेतलं पाहिजे.
ग्रामीण जीवनातला संघर्ष आणि त्या संघर्षातून पुढे येणारी माणसं आपल्या खूप काही शिकवत असतात.
तरुणांनी कृषी जीवन आणि त्यातही मराठवाड्यातील कृषी जीवन समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
कारण आपले पूर्वज कसे जगत होते, त्यांच्या आणि आपल्या जगण्यात काय तफावत निर्माण झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी रा. रं. बोराडेंचं लिखाण मदत करतं.

फोटो स्रोत, Getty Images
आजकालची मुलं छोट्या छोट्या प्रश्नांसाठी आक्रस्ताळेपणा करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. मात्र बोराडेंच्या साहित्यातली माणसं ही किती मोठा संघर्ष करूनही तग धरून राहत होती, जगत होती.
आज दिसतं की तरुणांमध्ये संघर्ष करण्याची वृत्तीच कमी झालेली आहे मात्र रा. रं. बोराडेंची सगळी पात्र ही संघर्ष करतच जगतात.
म्हणूनच बोराडेंच्या कथा कादंबऱ्यांमधल्या पात्रांकडून आपण कोणत्याही संघर्षमय परिस्थितीत टिकून राहण्याचं बळ घ्यावं.
(लेखक हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. या लेखात त्यांनी व्यक्त केलेली मतं वैयक्तिक आहेत. )
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











