'बलुतं'ची चाळिशी : 'जेव्हा दया पवारांनी व्यवस्थेवर दगड भिरकावला...'

फोटो स्रोत, Daya Pawar Pratishtan
- Author, वीरा राठोड
- Role, साहित्यिक, बीबीसी मराठीसाठी
मुळात कवी असलेल्या दया पवार किंवा दगडू मारुती पवार यांनी लिहिलेलं 'बलुतं' हे केवळ आत्मकथनच नाही तर तो एक वैचारिक ग्रंथ आहे.
'पाणी कुठवर आलं गं बाई' ही ओळ म्हणजे निग्रहाने विचारलेलं एक रोखठोक राजकीय विधानच म्हणावं लागेल.
जे विधान एकूणच शासनव्यवस्थेला आणि समाजव्यवस्थेला परखडपणे सवाल विचारते तेव्हा हिंदीतील सुधारणावादी कवी दुष्यंत कुमार यांच्या `यहाँ तक आते आते सूख जाती है कई नदियाँ मुझे मालूम है पानी कहाँ ठहरा हुआ होगा' या राजकीय कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
या दोन्ही राजकीय विधाने करणाऱ्या कवितांची आठवण आज एवढयासाठीच की, ज्या लोकशाही व्यवस्थेने समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सर्वंकष न्यायाची जी हमी प्रजासत्ताक स्वातंत्र्याबरोबर भरली होती, ती स्वप्ने उरापोटाशी बाळगून उपेक्षिलेल्या वंचितांच्या प्रदेशातून काही प्रकाशाचे पूंजके प्रज्वलित झाले.
आणि स्वबरोबरच स्वसमाजाला सूर्योन्मुख होण्याची स्वप्ने दाखवू लागले. त्यांच्या छातीत, ओठात शिवून टाकलेल्या वेदनांचा आक्रोश, दु:ख, व्यथा आणि युगानुयुगे बाळसे धरण्यापूर्वीच भ्रूणासारखी हत्या झालेल्या स्वप्नांची नव्याने आरास मांडू लागले. याला बळ होते वंचितांचा वाली प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसूत्राचे.
अर्थातच सामाजिक समता, आर्थिक समता आणि राजकीय संधीची समानता हे स्वप्न होते लोकशाही समाजरचनेचे. याचाच वाङ्मयीन हूंकार होता दया पवार यांचं 'बलुतं'.
'बलुतं'नं सुरू केलेल्या लढ्याचं काय झालं?
'बलुतं'ला येवून आज चाळीस वर्षे उलटून गेली आहेत. स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्यानंतर आणि डॉ. आंबेडकरोत्तर दलित, पीडित, वंचित समाजघटकातील तरुणांनी समाज उत्थानासाठी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आदी आघाड्यांवर आक्रमक पवित्रा घेवून न्यायाची, हक्क आणि अधिकारांची लढाई आपल्या हाती आलेल्या लेखणीतून उभी करून लढायचे निश्चित केले होते.
या लढ्यातून शेवटच्या माणसाच्या उत्थानाच्या एल्गारला सर्वच दलित, वंचित जाती समूहांनी सर्वच स्तरातून सक्रिय होऊन भरभक्कम बळही पुरविले होते.
या लढ्याचे पुढे काय झालं? आज आपल्या अवती-भवतीचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण किती वेगाने बदललं आहे, याची आपणास सर्वांना कल्पना आहे. आपण काळाचे अनेक पाडाव पार करुन आलो आहोत.
बरंचसं पाणी गेल्या अर्धशतकात पुलाखालून वाहून गेलेले असतांना `बलुतं'ने उभ्या केलेल्या एका सांस्कृतिक लढ्याचं पुढे काय झालं?
दया पवार यांनी चाळीस वर्षांपूर्वी ऐरणीवर आणलेले दलितांचे प्रश्न आज संपले आहेत का?
बलुतं आणि त्यानंतरच्या पिढीतील सर्वच पँथर्स, साथी, भाई, कॉम्रेडसनी विचारलेले किती प्रश्न निकाली निघालेत का?
जातीव्यवस्थेने, वर्गव्यवस्थेने आणि धर्मसत्तेने बळी घेतलेल्या किती अभावग्रस्त माणसांच्या वाट्याला न्यायाचे जगणे आलेय याचे ऑडिट बलुतंच्या चाळीशीनिमित्त आता या लढ्याच्या वारसदारांनी केलेच पाहिजे.

फोटो स्रोत, Daya Pawar pratishtan
'मदर ऑफ ऑल दलित बायोग्राफी' ठरलेल्या बलुतंने समाजव्यवस्थेत हस्तक्षेप करून एका व्यापक सांस्कृतिक आंदोलनाचा पाया घातला. ज्याने एका वैचारिक चळवळीला वाट करून दिली आणि कालचे सारेच मुके बोलायला लागले, व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले.
या दलित आत्मकथनांनी आपली आर्त व्याकूळ कहाणी कथन करत करत विद्रोहाच्या ठिणग्या पाडायला आणि शोषित वर्गातील तरुणांची मस्तकं चेतवायला सुरुवात केली. त्याशिवाय सनातन जुलूमांच्या बेड्या तुटणार नव्हत्या की अज्ञान अंधश्रध्येची जळमटं जळून उजेडाची वाट दिसणारच नव्हती हेही तितकेच खरे आहे.
'हा दगड इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला' हे 'बलुतं'च्या आरंभी येणारं विधान बरंच बोलकं आहे, खूप काही सांगणारं आहे.
माणसासारखी माणसं या व्यवस्थेने दगडासारखी जायबंदी करून टाकली होती. पण दगड इमारतीच्या बांधकामात गणला गेला नाही, हे एकाअर्थी बरेच झाले. अन्यथा हा दगड व्यवस्थेच्या टाळक्यात कसा जाऊन लागला असता..?
तो उगारला गेल्यामुळे पिढ्यानपिढ्या शिवलेली वाचा, चोख्याची ओवी आणि नाम्याची शिवी एकाच सुरात मिसळून नव्या क्रांतीचे गीत गाऊ लागली. खरं तर बाजूला सारलेली ओबडधोबड दगडंच अस्तित्व युद्धाच्या लढाईत शस्त्र म्हणून सज्ज होत असतात, हे अनेकवार सिद्ध झाले आहे.
'बलुतं'नी अनेकांना लिहितं केलं
निर्णायक क्षणी असेच दगड व्यवस्थेच्या अंगावर निर्धास्तपणे उगारले जातात. जो दगड दगडूच्या हातून 'बलुतं'ने भिरकावला, तसाच दगड माझ्या पिढीतल्या नागराज मंजुळेने 'फँड्री'तून उद्याच्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या जब्याच्या हातून भिरकावला. जो व्यवस्थेच्या वर्मावर जाऊन लागला.
हा आहे 'बलुतं'चा आजच्या पिढीशी असलेला वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक बांधिलकीचा अनुबंध.
'बलुतं'पासून प्रेरणा घेऊन गेल्या चाळीस वर्षात तरुणांच्या अनेक पिढ्या तयार होत गेल्या. त्याच पिढ्यांमधले अगणित बिनीचे शिलेदार उभे राहिलेत.
गावगाड्यातल्या दलित वस्त्या, तांडे, पाडे, वाड्या, वस्त्या पालांपर्यंत युगानुयुगे तापत असलेले दगड तडकू लागले. तडकून आपल्या अस्तित्वाला तीक्ष्ण धार लावून परजू लागले. त्याची असंख्य उदाहरणं देता येतील.
तो प्रत्येकजण एक आत्मकथन बनूनच या जगड्व्याळ पसाऱ्यात उभा आहे. खरं तर ही कहाणी दया पवारांनी दगडूला सांगितलेली कहाणी नसून दगडूच्या माध्यमातून समाजाला सांगितलेली कारुण्यमय व्यथा आहे. जी फक्त दगडूचीच न राहता व्यवस्थेने टाकलेल्या अगणित दगडूंची महागाथा ठरून जाते.
असे अनेकार्थाने थोरपण 'बलुतं'ला लाभलेलं आहे. या पथदर्शक कलाकृतीने साहित्याला नवीन जाणीवा, नवा अनुभव, आशय, भाषा, शब्दकळा, लेखनरूप असं बरंच काही दिलं, हे जितकं खरं आहे तितकंच हे देखील खरं की, ज्यांचं जगणं, ज्यांचं भोगणं, ज्यांची संस्कृती, ज्यांची भाषा इ. साहित्यबद्ध झालेली नव्हती त्या प्रदेशातील अनुभवविश्वाला 'बलुतं'ने साहित्याचा रस्ता दाखवला.
आपल्या पद्धतीने, आपल्या भाषेत सर्व काही निर्भीडपणे सांगण्याचं बळ त्यांच्या मागून येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिलं आणि दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनांची जोरकस लाटच भारतीय साहित्यात येऊन धडकली. ही 'बलुतं'ची दृश्य कामगिरी म्हणता येईल.

फोटो स्रोत, daya pawar pratishtan
दलित-वंचितांचा प्रतिनायक ठरलेल्या 'बलुतं'ने काय दिलं?
या समाजघटकांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्थिती-गती काय आहे?
आणि ती का आहे? याची चिंतनमीमांसा आहे, म्हणूनही 'बलुतं'बद्दल बोललं पाहिजे.
सामाजिक पटलावर एका सुशिक्षित, संवेदनशील मनाच्या घुसमटीचे विदारक चित्र आणि सामाजिक प्रवाहातून अव्हेरलेली संस्कृती आजही भेदाच्या भिंती पोसून आहे.
जिने दगडूला जे आकाश पोरके केले तसेच आजही लक्ष लक्ष दगडू आपलं आकाश शोधण्यासाठी तिष्ठत बसले आहेत, म्हणून 'बलुतं'ची आठवण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत व्यवस्थेनं लादलेलं पराकोटीचं दारिद्र्य आहे, तोपर्यंत 'बलुतं' नवनव्या अन्वयार्थाला जन्म देत राहील.
दलितांच्या स्थितीत फरक पडला का?
आंबेडकरी विचार प्रेरणेनं दलितांनी बलुती नाकारली खरी, पण आजही तशीच गुलामी रूप बदलून शोषण करते आहे. वंचित-उपेक्षितांना मग तो गावातला असो वा शहरातला, त्याला आजही राजकीय शहाणपण आलेलं नाही. ते राजकीयदृष्ट्या जागरूक होत नाहीत, तोपर्यंत 'बलुतं'ची आठवण आपल्याला होतच राहणार.
गुरं राखणे, शेण काढणे, दवंडी देणे, मेलेलं जनावर ओढणे, सांगावा पोहचवणे अशी कामं आजही गावागावातून करवून घेतली जातात.
मोफत शाळा का बंद पडू लागल्यात? देहविक्रीचा बाजार भरतोच आहे. गटार साफ करण्याचं, घाण-कचरा साफ करण्याचं काम दलितांनाच करावं लागतं. फरक एवढाच की त्यावेळी जाती-धर्माच्या उतरंडीने ती करवून घेतली आणि आज भाकरीच्या तुकड्याची आमिष देऊन करवून घेतली जातात.
आज आपण काळाच्या अशा टप्प्यावर बलुतंची चर्चा करीत आहोत जिथे दलित, वंचित, आदिवासी, भटके-विमुक्त, स्त्रिया आदी पिडितांवरील अन्याय अत्याचाराने कधी नव्हे तेवढी परिसीमा गाठलेली आहे.
जी जात आपण भारतीय टाकायला निघालो होतो तिची मुळं पुन्हा एकदा अधिकच घट्ट होत चालली आहेत.
वरकरणी जरी आपण प्रगत विचारांचे आधुनिक विज्ञानवादी म्हणून जगत असल्यासारखे भासवत असलो तरी आपल्या समाजाच्या मध्ययुगीन मानसिकतेचा अंत अजूनतरी झालेला नाही, हे आपल्याला पदोपदी तीव्रतेने जाणवू लागलं आहे.
त्यातच स्वार्थी मध्यमवर्गीय मानसिकतेने प्रत्येकाला एकमेकांपासून कायमचे तोडून टाकले आहे. भौतिक सुखांच्या वस्तूंसारखे इंद्रिय सुखांच्या लालसेपोटी माणसांचचं वस्तूकरण करुन बाजारात लिलावात उभं केलं जातं.
जुने प्रश्न अनुत्तरित असतानाच नव-नवे रोग जसे रोज दारात येवून पडावेत आणि त्यावरची औषधं सापडू नयेत तसे नव-नवे जीवघेणे प्रश्न वंचित दलित, पीडित वर्गाला गिळायला जबडा वासून बसले असतांना जगण्याचा लढा पुन्हा कसा उभा करायचा? याचे चिंतन बलुतंच्या निमित्ताने पुन्हा करावे लागणार आहे.

फोटो स्रोत, daya pawar pratishtan
बलुतं आणि त्याच्या पिढीने विचारलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर जर लोकशाहीतला राजा समजल्या गेलेल्या हर एक नागरिकाच्या हातात आणि मतात असेल तर त्याला त्याच्या मताचं मूल्य किती आहे, हे कळलेलं आहे का?
आणि गेल्या सत्तर वर्षात ते का कळू शकलेलं नाही? याचा दोष आजवर शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या अज्ञानी महासागराला देण्यापेक्षा या भयंकर ज्वालामुखीच्या तोंडी जाळ लावायची जबाबदारी ज्या मोरक्यांनी आपल्या खांदयावर घेतली होती त्यांनी आपली स्वार्थाची धोपटी भरण्यासाठी आपल्याच बांधवांचा बळी किती वेळा दिलेला आहे.
या सर्वांची चर्चा बलुतंने चाळीस वर्षांपूर्वी सुरू केली होती. तेच प्रश्न दलित वस्त्यांमध्ये जनावरागत जीणे सोसलेल्या दगडूने जसे मध्यमवर्गीय होत चाललेल्या दया पवारला विचारले होते तसेच प्रश्न आजही गावकुसाबाहेरचे असंख्य दगडू मध्यमवर्गीय मानसिकतेत संवेदनाहीन, विवेकशून्य बनत चाललेल्या आपल्याच बांधवांना आणि कर्तव्याची जबाबदारी झटकू बघणाऱ्या सरकारला देखील विचारताहेत `पाणी कुठवर आलंय?'
आणि जोपर्यंत त्यांना उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते हेच विचारत रहाणार की हे भारतमाते आमच्या स्वप्नांचा लिलाव कुठवर करणार?
आमच्याही स्वप्नांना फुलं कधी येणार?
(वीरा राठोड हे साहित्यिक आहेत. 'सेन साई वेस' या कवितासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे. या लेखातील मतं ही त्यांची वैयक्तिक आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








