डॉ. तारा भवाळकर यांची दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

फोटो स्रोत, Facebook/Tara Bhavalkar
लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालीय.
आज (6 ऑक्टोबर) पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी डॉ. भवाळकरांच्या निवडीची माहिती दिली.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे. 70 वर्षांपूर्वी दिल्लीत साहित्य संमेलन आयोजित झालं होतं, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अध्यक्षपदी होते.
1970 पासून 1999 पर्यंत सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत राहिलेल्या डॉ. तारा भवाळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी खर्ची घातलं आहे. लोकसंस्कृतीच्या अभ्यासासह नाटक, स्त्रीमुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हेही त्यांच्या आस्थेचे विषय आहेत.
स्त्रावादी दृष्टिकोनातून संशोधन करून लिहिणाऱ्या करणाऱ्या महत्त्वाच्या लेखिका म्हणूनही त्यांचा आदरानं उल्लेख केला जातो. अलीकडेच त्यांचं 'सीतायन' हे पुस्तक प्रकाशित झालं. यात त्यांनी सीतेच्या वेदाना आणि विद्रोह टिपला आहे.

फोटो स्रोत, Facebook/Tara Bhavalkar
लोकसाहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल उल्लेख होत असताना, अनेकदा त्यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाकडे दुर्लक्ष होतं. त्या केवळ नाट्यचळवळीत सहभागी नव्हत्या, तर त्यांनी सांगलीत प्रायोगिक नाट्यसंस्थाही सुरू केली. राज्यस्तरावरील नाट्यस्पर्धेत त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण : प्रारंभापासून १९२०पर्यंत’ हा विषय डॉ. तारा भवाळकर यांनी पीएचडीसाठी निवडला होता.
डॉ. तारा भवाळकर यांनी चाळीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. अनेक पुस्तकं संशोधनात्मक आहेत. तिसऱ्या बिंदूच्या शोधात, आकलन आणि आस्वाद, महामाया, माझिये जातीच्या, मायवाटेचा मागोवा, लोकपरंपरेतील सीता, सीतायन, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, लोकसंचित, लोकनागर रंगभूमी, मातीची रूपे इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
माझ्या आजवरच्या कार्याचं फलित म्हणून हा सन्मान मिळाला
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्या निवड समितीने माझी निवड केली आहे. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये साहित्य संमेलन हा एक महत्त्वाचा सोहळा असतो. अशा संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर मिळाला. त्याचं निश्चितपणे एक समाधान आहे."
"हा सन्मान हा केवळ माझा नाहीये तर मी ज्या अभ्यासक क्षेत्रामध्ये विशेषतः संस्कृती आणि नात्यांबाबत जे काम करत आले, स्त्रीविचारांबाबत जे काम करत आले अशा सर्वप्रकारच्या साहित्याचा आणि विचारांचा सन्मान आहे. माझ्याआधी काम केलेल्या, माझ्या सोबत काम केलेल्या आणि माझ्या नंतर काम केलेल्या सर्वांचा हा सन्मान आहे असं मी मानते. कारण, लोकसंस्कृतीचा हा जो प्रवास आहे तो माणसाच्या सुरुवातीपासून सलग चाललेला आहे."

तारा भवाळकर पुढे म्हणाल्या की, "माणसाच्या चालीरीती, संस्कृती याचे निरनिराळ्या प्रकारचे अविष्कार, कला या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी स्वतः जन्मभर करत आले. या कामातून मला आनंद मिळाला, माणसाचा प्रवास हा केवळ आजच्यापुरता नसतो तर त्यामागे पूर्वसूरींचं काही म्हणणं असतं."
"पुढची पिढी देखील काही अपेक्षा करत असते, या सगळ्याचं अवधान अभ्यासकाला बाळगावं लागतं. ते घेऊन मी लोकसंस्कृतीचा अभ्यास करत आले आहे. कुणाला शहाणपण शिकवायचं म्हणून नाही तर स्वतःलाच काही शहाणं होता आलं जीवनामध्ये तर या जीवनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण करावा आणि त्यासाठीचं साधन म्हणून लोकपरंपरेतल्या अनेक बाबींचा मला उपयोग झाला."
तारा भवाळकर, "जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांपासून लोकपरंपरेमध्ये विविध कलांचा अविष्कार करणारे, विविध देवीदेवतांच्या उपासना करणारे, उपासनेची गाणी म्हणणारे असे सगळे कलावंत असतील. चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य अशा सगळ्या लोककलांचा यथाशक्ती मागोवा घेण्याचा प्रयत्न मी केला. त्याचं फलित म्हणून कदाचित मला हे पद दिलेलं असावं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











