दिल्ली मराठी साहित्य संमेलन : थोडी दिल्ली, थोडं साहित्य आणि उरलेलं संमेलन

- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
साहित्य संमेलनाला येण्यासाठी प्रत्येकाने थोडी तयारी करणं आवश्यक असतं. म्हणजे फार नाही. अगदी थोडी.
त्याचा स्टार्टर पॅक सांगतो. पहिला शब्द तुम्ही पाठ करून घ्या सारस्वत. मग त्यात मांदियाळी टाका. मग म्हणा 'सारस्वतांची मांदियाळी'. आता तुम्ही या वातावरणात फिट व्हायला लागलात की पुढचा शब्द म्हणा 'माय मराठी'. मग म्हणा, 'माझ्या मराठीची बोलु कौतुके...' मग असतं 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' म्हणायचं.
ही शब्दावली एकदा फिट्ट बसली की मग तुम्ही एकदम प्रो साहित्य प्रेमी झालात. मग नेक्स्ट लेव्हलला जाण्यासाठी तुम्ही म्हणा, 'मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी मराठी ही माध्यम असलं पाहिजे.'
आता तुम्ही 'मराठीचे एक्सपर्ट' झाला. आणि सर्वांत शेवटची पायरी म्हणजे मराठीचं काय होईल, याची तुम्हाला किती चिंता आहे हे सातत्याने दाखवत राहायचं.
मी पहिल्यांदा साहित्य संमेलनाला गेलो होतो तेव्हा मी 19 वर्षांचा होतो. ते साहित्य संमेलन झालं होतं औरंगाबादला (आताचे छत्रपती संभाजीनगर). 2004 साली ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. अजूनही त्या संमेलनाच्या आठवणी ताज्या आहेत.
देवगिरी महाविद्यालयाचा भव्य परिसर. पटका आणि उपरणं अंगावर घेतलेले मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक. नऊवारी साडी, लुगड्यात असलेल्या आणि ठसठशीत कुंकू कपाळावर असलेल्या आजी, आयोजन समितीत काम करणारे पांढरा कुर्ता पायजमा घातलेले आणि फेटा असलेले तरुण-तरुणी, भव्य ग्रंथनगरी आणि जितके लोक कँटिनमध्ये असतील त्याहून अधिक ग्रंथ नगरीत आणि इतर प्रदर्शनांत दिसत होते. हे सारं काही अजून डोळ्यांसमोर येतं.
रा. ग. जाधव तर त्यावेळी खूप मोठं नाव होतंच पण त्या संमेलनाला इतर मोठे साहित्यिकही आले होते.


इंद्रजीत भालेराव, दासू वैद्य, फ. मुं. शिंदे, द. मा. मिरासदार हे साहित्यिक मी तेव्हा पहिल्यांंदा प्रत्यक्ष पाहिले होते. भरपूर सांस्कृतिक कार्यक्रमही होते. त्यात मला आठवतो तो एक कार्यक्रम होता तो म्हणजे माझ्या कॉलेजचे प्राध्यापक असलेले डॉ. अशोक जोंधळे सरांचा.
त्या कार्यक्रमाचंं नाव होतं 'खान्देशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा'. बहिणाबाई चौधरींच्या गाण्याला जोंधळे सरांनी चाली लावल्या होत्या आणि पूर्ण संच तो सादर करत असे. त्यानंतर, कथा-कथनाचा कार्यक्रम होता. त्यात पूर्ण राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील साहित्यिकांनी कथा सादर केल्या होत्या. द. मा. मिरासदार हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांची 'धोक्याचं वळण' ही हास्यकथा सादर केली होती.

फोटो स्रोत, facebook/abmssdelhi2025
आता तुम्ही म्हणाल की, या शिळ्या कढीला आज ऊत का आणला जात आहे? 20 वर्षांत तर खूप काही बदललं. नोकियाचे फोन जावून आयफोन आले, अँड्रॉइड आले. युट्युबवर बसून हजारो तास तू कथा कथन ऐकू शकतो. मग आजचं काही बोल की.
आज जे काय होत आहे तेव्हा ते नेमकंं कसं आहे, ते कोणत्या दिशेनी आलं हे सांगण्यासाठी मी पूर्वी होत असलेल्या साहित्य संमेलनाची थोडी उजळणी केली इतकंच.
हे सांगण्याचं आणखी एक प्रयोजन आहे, ते म्हणजे जेव्हा हे संमेलन कसं होतं याचा विचार आज करतो तेव्हा असं जाणवतं मराठी साहित्य विश्वात आणि कलेच्या विश्वात ज्या गोष्टी सुरू होत्या त्याचं प्रातिनिधिक प्रतिबिंब त्या साहित्य संंमेलनात पाहायला मिळालं होतं.
आज आपण 20-21 वर्षांनी जेव्हा साहित्य संमेलनं पाहतो तेव्हा त्यात काय बदल झाले?
आताही तसेच परिसंवाद होताना दिसतात. त्यात फारसा काही बदल नाही. आताही एखाद दोन सांस्कृतिक कार्यक्रम होतातच. काही ठिकाणी फिल्म्स, नाटकं यांच्यासाठी एक दालन ठेवलं जातं. पण हळूहळू साहित्यिकांची उपस्थित राहण्याची संख्या आटत चालली आहे.

दिल्लीच्या साहित्यातले संमेलनातले विषय सांगतो. मराठीचा अमराठी संसार, आम्ही असे घडलो, राजकारणाचे साहित्यातले प्रतिबिंब, नाते दिल्लीशी मराठीचे या चार सत्रांचा साहित्याशी काय संबंध हे नेमकं आता कुणाला विचारायचं? सगळीकडे नुसते पत्रकारच. या पत्रकारांना तर मी न्यूजरूममध्ये पाहतोच ना.
सतत स्क्रीनवर असणाऱ्या आणि सोशल मीडियावर दिसणाऱ्या राजकारणी आणि पत्रकारांना पाहायला आम्ही का यावं? हा प्रश्न साहित्यप्रेमी नक्कीच मनातल्या मनात विचारत असतील.
'भूपाळी ते भैरवी' आणि 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्य' हे विषय सोडले तर उरलेल्या विषयात साहित्य कुठे होते हे पाहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप लागेल.
बालाजी सुतारही एका कार्यक्रमात आले होते. ते परिसंवादात होते. 'दोन शतकाच्या सांध्यावरच्या नोंदी' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ते चर्चेत आले. त्यांना बी. रघुनाथ पुरस्कार मिळाला आहे. नव्या दमाच्या लेखकांपैकी ते आल्याने साहित्य प्रेमींना निश्चितच आनंद झाला असेल.
अजून इतर लोक कुणी ब्युरोक्रॅट्स, कुणी राजकारणी हे सत्रात आले. त्यांचं साहित्यातलं स्वतंत्र योगदान काय? त्यांची चार दोन पुस्तकं प्रकाशित झाली असतीलही पण त्यामुळे त्यांना साहित्यिक म्हणता येईल का? याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे.
'राजकारणाचे साहित्यात प्रतिबिंब' या सत्रासाठी तर बहुतेक जण पत्रकारच. त्या सत्रात असं म्हटलं गेलं की राजकीय कादंबरी लिहिली जात नाही. अजूनही 'सिंहासन' आणि 'अरुण साधूं'च्या आठवणींचे उमाळे या शिवाय सत्राला काही हाती लागलं नाही.
बरं या मान्यवरांचं (एखाद-दोन अपवाद वगळता) हल्लीचं वाचन आणि ओटीटीवर ते नवं काय पाहतात हा प्रश्न पण सतावतोच. कारण गेल्या पंचवीस वर्षांत पन्नास एक तरी राजकीय भाष्य करणारे चित्रपट आणि वेबसीरिज आल्या आहेत. अरविंद जगताप हे आताच्या काळातील लेखक आणि त्यांनी कितीतरी चित्रपट लिहिले आणि वेब सीरिजची निर्मिती केली आहे. नुकताच झालेली महाराष्ट्राच्या राजकारणातली उलथापालथ त्यांनी आपल्या 'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजमधून दाखवली आहे.
'सिटी ऑफ ड्रीम्स' मध्येही आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलेलं दिसतं. त्यातील अनेक सिन हे सोशल मीडियावर फिरताना दिसतात. त्यातून आपल्याला लगेच कळतं की आताच्या कोणत्या नेत्याला हा टोमणा आहे.

अवधूत गुप्तेंचा झेंडा, मोरया, देऊळ, ग्रामीण व्यवस्थेवर परखड भाष्य करणारा ख्वाडा, जयंती, हायकमांड असे कितीतरी चित्रपट राजकीय आहेत.
ग्रामीण भागाच्या राजकारणाचे अस्सल चित्रण असलेला 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' असे अनेक चित्रपट राजकीय आहेत. रमेश इंगळे उत्रादकर यांची कादंबरी त्यावर आधारित चित्रपटपण येऊन गेला आहे 'निशाणा डावा अंगठा'. किती तरी नावे घेता येतील, पण अजूनही जर 'सामना' आणि 'सिंहासन'च्या बाहेरच आपले तज्ज्ञ येणार नसतील तर नवीन गोष्टी लोकांसमोर आणायच्या तरी कुणी?
काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनांवर एक नाही तर दोन चित्रपट आले. किती राजकीय चित्रपट पाहिजेत आणखी आपल्याला?
कदाचित कुणी म्हणू शकेल की हे चित्रपट जागतिक स्तरावरचे नाहीत, त्यांचं स्टँडर्ड काय आहे हा प्रश्न येतो? इराणी सिनेमाच्या तुलनेत त्यांचं काय स्थान असं जर विचारलं तर मी इतकंच म्हणू इच्छितो मराठीत झालेल्या कामाची दखल न घेण्याइतकेही हे चित्रपट, वेबसीरिज नक्कीच लहान नाहीत.
एकदा दिग्दर्शक उमेश कुलकर्णींनी म्हटलं होतं की, 'चर्चा सुरू करणं हे समीक्षकांचं काम आहे'. तशी चर्चा या निमित्ताने तरी झाली का? आपल्या चर्चेचा सूर असा असेल की पन्नास वर्षांत नवं काहीच आलं नाही तर तुम्ही नवीन चित्रपट-कादंबऱ्या तरी लोकांना कशा सुचवणार आहात?
असंही काही जण म्हणतील चित्रपट - वेबसीरिज आल्या पण कादंबऱ्या तर आल्या नाहीत. हे म्हणणे अगदी योग्य आहे पण माध्यम बदलत आहेत. बॉब डिलन या गीतकार-गायकाला साहित्याचं नोबेल मिळत असेल तर चित्रपट संहितेला, नाटकाच्या संहितेला देखील साहित्य समजायला काय हरकत आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांची बीबीसी मराठीनं एक मुलाखत घेतली. त्यात बोलताना त्यांनीही साहित्य संमेलनात चर्चा केल्या जाणाऱ्या विषयाबाबत चिंता व्यक्त केली होती.
"काही विषय असे दिसतायेत की ज्याच्यामध्ये फारसा साहित्याचा संबंध असलेले प्रश्न, म्हणजे साहित्य हा शब्द घातला आहे, परंतु साहित्याशी संबंध किती आहे, याची शंका यावी, असे काही विषय आपल्याला दिसतायेत. म्हणजे संबंध अजिबात नाही असं नाही, पण अतिशय अल्प संबंध आहे. म्हणजे पूर्ण साहित्य संमेलनानं तो विषय व्यापावा, असं नाही," असं त्यांनी म्हटलं होतं.
( तारा भवाळकरांची पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.)
रेखता, जयपूर आणि टाटा लिट फेस्टमधून काही शिकणार का?
या काळातलं साहित्य संमेलनांचं स्वरूप खूप बदललं आहे. 'जयपूर लिटरेचर फेस्टिवल', 'केरळ लिटरेचर फेस्टिवल', 'टाटा लिटरेचर फेस्टिवल' या ठिकाणी आलेल्या तरुणांची गर्दी पाहा. नुसते तरुणच नाहीत तर तरुण लेखक मंडळी. अनेक जण वेगवेगळे फॉर्म्स घेऊन आपली कला सादर करत आहेत.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण रेखताच्या सर्व सेशन्सची सर्व तिकीटं विकली गेली होती. नाटक-चित्रपटासारखे ते हाऊसफुल्ल शो होतात. इंडिया टुडे सुद्धा साहित्य संमेलन आयोजित करतं, लोक पदरमोड करुन हे सेशन्स पाहायला जातात.
आता कुणी असं म्हणेल की, हे तर सगळे व्यावसायिक कार्यक्रम झाले. प्रकाशक आणि आयोजक एकत्र येऊन ते करत आहेत. तर मुद्दा तो नाहीये, मुद्दा हा आहे, त्यांच्या विषयांची निवड, फॉरमॅटची निवड, साहित्याची विस्तृत होत जाणारी व्याख्या याचा समावेश यात होतो. किती दिवस गीतकारांना आणि संहिता लेखकांंना ते साहित्यिक नाहीत म्हणून हिणवणार आहोत आपण? कलाकारांनी बदलत्या काळात फक्त माध्यम बदललं आहे.
गुलजार हे एकाच वेळी साहित्यिकही आहेत आणि फिल्ममेकरही आहेत. ते रेखताला येतात, आपल्याकडे अरविंद जगताप, उमेश कुलकर्णी, भाऊराव कऱ्हाडे का येऊ शकत नाहीत? ओम भूतकर दिल्लीत येऊन 'रेखता' गाजवून जाऊ शकतो, पण मराठी असून पण आपण त्याला साहित्य संमेलनात पाहू शकत नाहीत.

फोटो स्रोत, Facebook/Jashn e Rekhta
मी ज्या फॉरमॅटबद्दल बोलत आहे तसं एक सादरीकरण या साहित्य संमेलनात झालं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. समीरा गुजर यांनी लिहिलेला आणि मधुरा वेलणकर यांनी सादर केलेला 'मधुरव' हा कार्यक्रम.
यात त्यांनी प्राकृत काळापासून ते आजच्या काळापर्यंत मराठीची वाटचाल कशी झाली हे गोष्टीच्या आणि नाट्याच्या स्वरूपात मांडलं आहे. अतिशय क्लिष्ट विषय त्यांनी मराठी रसिकांसमोर सादर केला. अन्यथा केवळ भाषेच्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत असतात. या नाटकामुळे त्या हसत-खेळत मराठी प्रेक्षकांसमोर आल्या ही खरंच सकारात्मक गोष्ट आहे.
जास्तीत जास्त तरुणांना सामावून घेण्याचे प्रयत्न झाले तर साहित्य संमेलनाचा चेहरा-मोहरा बदलू शकतो हे देखील खरे आहे. तरुण मराठी लेखक-लेखिकांची कमी नाहीये.
हृषिकेश गुप्ते, पंकज भोसले, गणेश मतकरी, अवधूत डोंगरे, मनस्विनी लता रवींद्र, शरद बाविस्कर, शिल्पा कांबळे, ज्ञानेश्वर जाधवर किती तरुण लेखकांची नावे घ्यायची. यांचे सत्र आपण का ठेवू शकत नाहीत? एक वाचक म्हणून हे प्रश्न मला सतावतात.
तारा भवाळकर आणि त्यांची 'दोन' अध्यक्षीय भाषण
या संमेलनाची सर्वांत जमेची बाजू काय? म्हटलं तर त्याचं उत्तर एका शब्दात देता येऊ शकतं. ते म्हणजे 'अध्यक्ष'. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींसमोर केलेल्या भाषणाची ऐतिहासिक नोंद ठेवली जाईल असंच ते भाषण होतं.
जेव्हा त्या बोलायला लागल्या अगदी पहिल्या वाक्यात त्यांनी सिक्सर नाही मारला पण विकेटच काढली. 'कमी बोलायचंय असा मला दमच भरलाय,' या त्यांच्या वाक्याने सभागृह टाळ्यांनी दणाणून गेला.
त्यांचं भाषण झाल्यावर काही काळ त्यातचं रेंगाळावे असं वाटत होतं, हाच काहीसा अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आल्याचं त्यांनी बोलून दाखवलं बोलून दाखवला. ताराबाईंच्या भाषणात त्यांनाही रेंगाळावे वाटत होते परंतु त्यानंतर त्यांचेच भाषण होते.

फोटो स्रोत, facebook/abmssdelhi2025
'विज्ञान भवन' येथे झालेल्या भाषणात ताराबाईंनी वारकरी संंप्रदायाची विशाल आणि उदार परंपरा कशी आहे याचं अतिशय सुंदर विवेचन केलं. तर तालकटोरा येथे संध्याकाळी झालेल्या सत्रात त्यांनी आणखी विस्ताराने ही मांडणी केली.
मला सर्वांत भावलेली गोष्ट म्हणजे त्यांनी अध्यक्षीय खुर्चीवरुन मराठी शाळांच्या एकूण परिस्थितीवर केलेलं परखड भाष्य ही आहे. त्या स्वतः अध्यापन क्षेत्रात होत्या आणि त्यांनी हे जवळून पाहिले आहे.
अनेक शाळांमध्ये मुलींसाठी चांगले स्वच्छतागृह नसणे ही मोठी समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढी महत्त्वाची गोष्ट पण त्याकडे आपल्या व्यवस्थेचं झालेलं दुर्लक्ष हे सांगण्यासाठी त्यांनी या व्यासपीठाचा वापर केला ही अनेक अर्थांनी महत्त्वाची गोष्ट वाटते.
संंमेलन आणि दिल्ली
आखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला होणार म्हटल्यावर एक उत्साहाचं वातावरण होतं. मराठी माणसाच्या बोलण्यात दिल्ली दूर नही, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गल्ली ते दिल्ली यातून मराठी माणसाचं दिल्ली प्रेम अधून मधून येतच राहतं.
दिल्लीवर राज्य केलं नाही आणि अजून पंतप्रधान मराठी नाही, राष्ट्रपती मराठी झाल्या आहेत. पण दिल्लीवर राज्य न करता आल्याचं शल्य सामान्य मराठी माणसाला वाटत राहतं.
दिल्ली म्हणजे राजधानी आणि राजधानीला काही सांगणं म्हणणे म्हणजे आपण सर्वांत मोठं कर्तव्य बजावल्यासारखं वाटतं. पण त्यासाठी अख्खं अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याचा अट्टहास कशासाठी? स्पेशल ट्रेनमधून आलेल्या साहित्यप्रेमींवरच सगळं ऐकण्याचा भार पडला.
इथे राहणारे, आयटी, सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करणारे किती मराठी बांधव या संमेलनाला येऊ शकले असतील? संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकरांचे तालकटोरा मैदानातील भाषण अतिशय सुंदर झाले पण किती जण असतील ते ऐकायला.
तालकटोरा स्टेडियम म्हटलं तर आपल्या मनात वानखेडे क्रिकेट मैदानासारखं काही येऊ शकतं पण मित्रांनो थांबा. हे इनडोअर स्टेडिअम आहे. एका मंगल कार्यालयात तरी जास्त लोक आपल्याकडे असतात तितके दिल्लीत मुख्य कार्यक्रमात असतील की नाही शंका आहे.

फोटो स्रोत, facebook/abmssdelhi2025
कवी संमेलनात पाच-सहा जणांनी तरी आपल्या कवितेतही दिल्लीचा उल्लेख केला. एकीकडे रेल्वेची वाढती गर्दी, फेब्रुवारीमध्ये निघून गेलेली पण परत कधीही येऊ शकणारी दिल्लीची थंडी यामुळे अनेक जणांनी आपला बेत रद्द केल्याची शक्यता अधिक आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले याचे समाधान साहित्यप्रेमींना असू शकते. पण राज्यातल्या कोणत्याही शहरात साहित्य संमेलन झाले तर तिथेही ते येऊच शकतात ना?
मी तीन वर्षांपूर्वी उदगीर साहित्य संमेलनाला गेलो होतो. तिथे संमेलनाच्या पूर्वसंध्येला भाऊ कदम आले होते. पूर्ण कॉलेजचं मोठ्ठं ग्राउंड खच्चून भरलं होतं. लोक तर गच्चीवरुनही पाहत होते.
भाऊ कदम यांच्या लोकप्रियतेमुळे जरी हे लोक आले होते आणि साहित्यप्रेमी नव्हते असं जरी मला कुणी म्हटलं तरी मी हेच म्हणेल, की त्यातील सगळेच साहित्यप्रेमी नसतील कदाचित पण मराठीप्रेमी तरी नक्कीच होते.
दुसऱ्या दिवशी भारत सासणेंच्या अध्यक्षीय भाषणाला हजारो लोक होते. मुख्य सभामंडप, तीन-चार इतर सभा मंडप, ग्रंथनगरी सगळीकडे लोकच लोक. तेव्हा वाटतं की हा या लोकांसाठीच आपण संमेलनं भरवायला हवं.
कोणत्याही संमेलनाचा प्राण हे त्याला उपस्थित असलेले लोकच असतात. जरी आता युट्युब आणि टीव्हीवर पाहू शकत असलो तरी वर्षभरातून मराठी लोक फक्त मराठी म्हणून जिथं एकत्र येऊ शकतात आणि त्यांना तो ॲक्सेस न देणं हा त्यांचा हक्कच काढून घेण्यासारखं आहे.

फोटो स्रोत, facebook/abmssdelhi2025
मराठी भाषिक प्रदेशाबाहेर संमेलन होण्याची ही नक्कीच पहिली वेळ नाही. याआधी दिल्लीला एकदा संमेलन झाले होते, घुमानला झाले होते. पण त्यातून हा धडा तर नक्कीच घेतला असेल की बाहेरच्या राज्यात, अमराठी प्रदेशात लोक कमीच येतात.
गेल्या तीन दिवसांत एकाच वेळी जास्तीत जास्त पाच हजारांच्या वर लोक कार्यक्रमासाठी दिल्लीतल्या साहित्य संमेलनात नसतील. त्यातही पत्रकार- सोशल मीडियावाले( त्यात मी पण आहे) जास्त दिसत होते.
अनेक जण सहकुटुंब आले होते, आपल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपसह आले होते हे समाधानकारक चित्र आहे पण ते लोक संमेलनाच्या नेमक्या कोणत्या आठवणी घेऊन जातील हे सांगणं कठीण आहे.
ज्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्याच ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन पण होतं. या वेळी ते संभाजीनगरला झाले. त्यामुळे मला हजर राहता आले नाही. पण मला नेहमी विद्रोही साहित्य संमेलन हेच जास्त उत्स्फूर्त वाटत आलेलं आहे.
तिथे फक्त भाषाच नाही तर भाषेच्या विविध स्वरूपांची दखल तर घेतलीच जाते पण त्याच बरोबर तिथे येणाऱ्या सामान्य माणसाच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा विचारलं जातं. तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते संमेलन स्वतःचं वाटतं.
जरी विद्रोही साहित्य संमेलनात सरकारकडून अनुदान घेतले जात नसले तरी देखील ते मराठीचाच प्रचार-प्रसार करत आहेत. जर सरकार अखिल भारतीय संमेलनाला आर्थिक सहाय्य करतं तर सरकारने त्यांची स्वायत्तता जपून त्यांना देखील अर्थसहाय्य करायला हवे.

फोटो स्रोत, facebook/abmssdelhi2025
आता तुम्ही म्हणाल, विद्रोही संमेलन आवडतं तर तिथेच का नाही जात? मी दोन्हीकडे जातो. दोन्ही संमेलनांचं स्थान माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. पण बदलत्या काळानुसार संमेलनंही बदलावी, संमेलनाला येणाऱ्या प्रत्येकाला हे संंमेलन आपलं कसं वाटेल याची अनुभूती यावी आणि त्यात जास्तीत जास्त तरुणांचे प्रतिनिधित्व वाढावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून मी हा लहान तोंडी मोठा घास घेतला आहे.
आता परत येऊ स्टार्टर पॅककडे. तुम्ही मला पुन्हा विचाराल की, जो तू स्टार्टर पॅक दिला होता त्यातल्या गोष्टी 20 वर्षांंपूर्वी नव्हत्या का? नक्कीच होत्या. तेव्हा पण सगळेच सारस्वत होते, त्यांंची मांंदियाळी असायची. तेव्हाही मराठीचं काय होईल ही पण चिंता केली जायची. पण भरपूर साहित्यिक पाहायला मिळायचे.
त्यामुळे नेहमी वाटायचं अरे त्यांचं हे वाचायचं राहिलं, त्यांनी लिहिलेलंं हे नाटक पाहायचं राहिलंय. त्यातून एक ऊर्मी घेऊन बाहेर पडावं वाटायचं. आताची संमेलनं पाहिली तर तुम्हाला हे किती वाटतं? याचा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायला हवा.
माणूस कोणत्याही साहित्य संंमेलनातून त्याने पाहिलेले साहित्यिक आणि त्याच्या आठवणी घेऊन जातो. उद्घाटक कोण होते किंवा कोण होत्या, जेवायला काय होतं, व्यवस्था कशी होती, सेलिब्रिटी कोण आले या गोष्टी वीस वर्षांनी कामाच्या उरत नाही, 'साहित्य संंमेलनाला साहित्यिक आणत चला, बाकी आमचंं आम्ही पाहून घेऊ', असा मनातल्या मनात तर साहित्य प्रेमी पुटपुटत बाहेर पडत नसतील ना?
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












