ढगफुटी म्हणजे काय? फ्लॅश फ्लड कशामुळे येतात आणि त्यांची संख्या वाढते आहे का?

पाकिस्तान पुरात अडकलेली कार
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 670 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 80 ते 90 लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

पाकिस्तानमध्ये आलेल्या 'फ्लॅश फ्लड' अतोनात नुकसान झाले आहे. याआधी उत्तरकाशीमध्ये फ्लॅश फ्लड आले होते. फ्लॅश फ्लड काय असतात हे आपण या लेखातून समजून घेऊ.

जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड अशा अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत अचानक ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडून पूर आणि भूस्खलनाच्या दुर्घटना घडल्या आहेत.

एरवीही अचानक जोरदार पाऊस पडू लागला तर केवढा ढगफुटीसारखा पाऊस पडतोय, असं सर्रास बोललं जातं.

पण ढगफुटी या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

सर्वसामान्य भाषेत सांगायचं, तर ढगफुटी किंवा 'क्लाऊडबर्स्ट' (Cloudburst) म्हणजे एखाद्या लहान भागात अगदी कमी वेळात अतीप्रचंड पाऊस पडणे.

हा शब्द प्रामुख्यानं दक्षिण आशियात वापरला जातो. जगभरात इतर ठिकाणी याला वॉटर बॉम्ब किंवा वेदर बॉम्ब म्हणूनही ओळखलं जातं.

ढगफुटी

फोटो स्रोत, Getty Images

भारतात विशेषतः मान्सूनच्या काळात ढगफुटीच्या घटनांचं प्रमाण वाढतं, कारण या दिवसांत हवेत बाष्पाचं प्रमाण आधीच जास्त असतं.

पण प्रत्येक तीव्र पावसाची म्हणजे Extreme Rainfall ची घटना ही ढगफुटी नसते, हे लक्षात घ्यायला हवं.

भारतीय हवामान विभागाच्या मानकांनुसार एखाद्या 20 ते 30 चौरस किलोमीटर एवढ्या लहान परिसरात एका तासातच शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर त्याला ढगफुटी म्हणतात.

ढगफुटीदरम्यान काहीवेळा पावसासोबतच गारपीट, वीजा आणि गडगडाटही होऊ शकतो.

'ढगफुटी' आणि फ्लॅश फ्लड कशामुळे येतात?

भरपूर बाष्प असलेले ढग एखाद्या ठिकाणी वेगानं जमा होऊन त्यांची उंची वाढत जाते तेव्हा अती तीव्र पाऊस कोसळतो, म्हणजेच ढगफुटी होते.

डोंगरालगतच्या भागात अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते. कारण वाऱ्यासोबत येणारे ढग डोंगरामुळे अडवले जातात आणि वर सरकू लागतात. त्यामुळे डोंगरात उंच ढग तयार होतात.

तसंच जिथे हवेचे थंड आणि बाष्पयुक्त प्रवाह एकमेकांना भिडतात, अशा ठिकाणीही असे उंच ढग तयार होऊ शकतात.

धराली
फोटो कॅप्शन, धरालीत फ्लॅश फ्लडमुळं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाली.

हे ढग वर सरकतात, तसं थंड हवेमुळे बाष्पाचं पाण्याच्या कणांत रुपांतर होतं, म्हणजेच कंडेन्सेशन (condensation) होतं आणि पाऊस पडतो. ही प्रक्रिया अतिशय वेगानं घडली तर ढगफुटी होते.

जेव्हा एखाद्या ठिकाणी कमी काळात अती तीव्र पाऊस पडतो, तेव्हा ते सगळं पाणी जमिन शोषून घेऊ शकत नाही. असं पाणी वेगानं उतारावरून वाहू लागतं किंवा सखल भागात साठून राहतं.

यालाच अचानक येणारा पूर किंवा 'फ्लॅश फ्लड' (Flash Flood) म्हणतात.

एरवी नदी किंवा नाल्यांना येणाऱ्या पावसाळी पुरापेक्षा हा पूर वेगळा असतो, कारण फ्लॅश फ्लड कमी भागात कमी वेळात आणि वेगानं येतात.

शहरात काँक्रिटीकरणामुळे फ्लॅश फ्लड येण्याचा धोका बराच वाढला आहे.

भारतात इथे ढगफुटीचा सर्वाधिक धोका

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार भारतात ढगफुटी आणि फ्लॅश फ्लडच्या घटना प्रामुख्यानं हिमालयाच्या पर्वतराजीत, समुद्रसपाटीपासून 1000 ते 2000 मीटर उंचीदरम्यानच्या प्रदेशात घडतात.

विशेषतः हिमालयाच्या दक्षिणेकील उताराच्या भागातील अरुंद दऱ्यांमध्ये याचा धोका सर्वाधिक आहे.

पश्चिम घाटातली परिस्थितीही ढगफुटीसदृश्य पावसासाठी, विशेषतः फ्लॅश फ्लडसाठी पोषक आहे. म्हणजेच महाराष्ट्रात घाट प्रदेशात आणि कोकणातल्या उंचावरच्या भागात याचा धोका सर्वाधिक आहे.

पण फक्त डोंगराळ भागातच नाही तर इतर कुठेही ढगफुटीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

व्हीडिओ कॅप्शन, ढगफुटी झाली, असं कधी म्हणतात? फ्लॅश फ्लड म्हणजे नेमकं काय?

जगात सर्वात भीषण ढगफुटी 26 नोव्हेंबर 1970 साली कॅरिबियन बेटांतील ग्वाडलूपमध्ये घडला. तिथे तासाभरात 2286 मिलीमीटर म्हणजे मिनिटाभरात तब्बल 38.1 मिलीमीटर पाऊस पडला होता.

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी सांताक्रुझ वेधशाळेत 24 तासांत 944 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, त्यातला 644 मिलीमीटर पाऊस सकाळी आठ ते रात्री आठ या बारा तासांत पडला होता. या पावसाचं वर्णन ढगफुटीसारखा पाऊस असंच केलं जातं.

मोठ्या शहरांमध्ये तसंच अनिर्बंध बांधकामं झालेल्या डोंगराळ भागात थोडासा तीव्र पाऊसही अलीकडे विध्वंसक ठरताना दिसतो आहे.

ढगफुटीचा अंदाज लावता येतो का?

ढगफुटीसारख्या आणि तीव्र अतिवृष्टीच्या घटना स्थानिक पातळीवर अगदी कमी काळात घडतात. त्यामुळे त्यांचा अंदाज लावणं कठीण जातं.

म्हणजे कुठल्या जिल्ह्यात किंवा भागात तीव्र पाऊस पडू शकतो याचा थोडाफार अंदाज लावता येतो, पण नेमका कुठल्या ठिकाणी तो पडेल, हे सांगता येत नाही.

डॉपलर रडार आणि सॅटेलाईटनं जमा केलेल्या माहितीच्या आधारे जेमतेम एक-दोन तास आधी ढगफुटीची माहिती मिळू शकते, असं हवामान तज्ज्ञ सांगतात. त्यासाठीच भारतात स्थानिक पातळीवर रडारची संख्या वाढवण्याची मागणीही केली जाते आहे.

हवामान बदलाचा परिणाम

ढगफुटीच्या आणि तीव्र अतिवृष्टीच्या बातम्या अलीकडे वाढल्या आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यातही तथ्य आहे.

हवामान बदलामुळे मान्सूनवर परिणाम होतो आहे आणि अशा आपत्तींचं प्रमाण आणि वारंवारता वाढते आहे, असं तज्ज्ञांनी वेळोवेळी नमूद केलं आहे.

बर्फ वितळल्यामुळे हिमालय पर्वतरांगांमधील तलावांमध्ये विलिन होणाऱ्या हिमनद्या

फोटो स्रोत, Inpho

फोटो कॅप्शन, बर्फ वितळल्यामुळे हिमालय पर्वतरांगांमधील तलावांमध्ये विलिन होणाऱ्या हिमनद्या

जागतिक तापमानवाढीमुळे हवेतली उष्णता वाढते. उष्ण हवा जास्त बाष्प धरून ठेवते, त्यामुळे दाट ढग तयार होतात आणि कमी काळात जास्त तीव्र पाऊस पडण्याची, ढगफुटी किंवा फ्लॅश फ्लडची शक्यता वाढते.

पण केवळ एवढीच एक गोष्ट नुकसानाला कारणीभूत नाही. विशेषतः हिमालयात आणि डोंगराळ भागांत पर्यावराणाचा विचार न करता केलेली बांधकामं त्यासाठी जबाबदार आहेत, असं तज्ज्ञ सांगतात.

हवामानाचा अंदाज अचूक करण्यासोबतच आपत्तींचा सामना करू शकतील अशी मजबूत बांधकामं करणं, पूरक्षेत्रात बांधकामं टाळणं, पाण्याच्या नैसर्गिक मार्गातले अडथळे दूर करणं गरजेचं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.