'स्फोटासारखा मोठा आवाज आला, सगळीकडे धूर दिसू लागला,' किश्तवाड पीडितांचे भयावह अनुभव

(सूचना : यातील काही वर्णनं विचलित करू शकतात.)
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्हातल्या चाशोटी या भागात गुरूवारी ढगफुटी झाल्यानं साधारण 45 लोकांचा मृत्यू झाला. तर 100 हून जास्त लोक जखमी झाले आहेत.
या माहितीची खातरजमा अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रदिप सिंह यांनी केली आहे.
तसंच, बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांच्याशी बोलताना किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा यांनीही मृतांची संख्या 45 वर गेली असल्याचं सांगितलं आहे.
सध्या जम्मू-काश्मीरमधले पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे (एसडीआरएफ) कर्मचारी, अग्निशामक दल, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रिय राखीव पोलिस दल आणि लष्कराकडून किश्तवाडमध्ये बचाव कार्य सुरू आहे, असं अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रदिप सिंह यांनी सांगितलं.
याशिवाय बचाव कार्यात मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवकही पुढे आले आहेत.
या दुर्घटनेमुळे अनेक लोक बेपत्ता झालेत. पोलीस अधिकारी सांगतात की, मृतांची ओळख पटवली जात आहे. आत्तापर्यंत 8-10 मृतदेहांची ओळख पटली आहे.
ज्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे ते त्यांचे प्रत्यक्षदर्शी अनुभव सांगत आहेत. ढगफुटीनं पाण्यासोबत वाहून आलेल्या ढिगाऱ्यात ते कसे सापडले याचं वर्णन पीडित करत आहेत.
जखमींनी काय सांगितलं?
शुक्रवारी पहाटे 4 वाजता बीबीसीचे प्रतिनिधी किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचले. जखमी लोकांवर तिथे उपचार सुरू आहेत. घडलेल्या घटनेचं सविस्तर वर्णन जखमी लोक सांगत होते.
"माझ्या मुलीच्या नाका-तोंडात माती गेली. ती कोणालाही वेळेवर काढता आली नाही आणि श्वास बंद झाल्यानं तिचा मृत्यू झाला," एक महिला रडत बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांना सांगत होती.
"शिकून डॉक्टर होण्याचं माझ्या मुलीचं स्वप्न होतं. त्यासाठीच्या परिक्षेची ती तयारी करत होती. कुणी माझ्या मुलीला परत आणू शकेल का? मला दुसरं काहीही नको," त्या पुढे म्हणाल्या
मुलीचे वडील म्हणाले, "आठ तासानंतर मुलीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं गेलं. तिचा मृतदेह कसाही असू दे. फक्त तो आमच्या घरापर्यंत पोहोचवा."

फोटो स्रोत, ANI
रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे नाराजीही ते व्यक्त करत होते. ते म्हणाले, "इथं एकही रुग्णवाहिका उपलब्ध नाही. गेले चार-पाच तास आम्ही वाट बघतोय."
एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत चाशोटीला भेट देण्यासाठी आला होता. या घटनेत अनेकांचे मृत्यू झाले असून अनेकजण जखमी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
"आम्ही चहा पीत बसलो होतो. अचानक सैनिकांचा 'पळा पळा' असं सांगणारा आवाज ऐकला. काय चाललंय काही समजलं नाही. पण आम्ही पळत बाहेर आलो आणि लगेचच सारं काही उद्ध्वस्त झालं," ते म्हणाले.
"पूल ओलांडणारे तर सगळेच वाहून गेले," असंही ते पुढे सांगत होते.
ढगफुटीत त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. बीबीसी प्रतिनिधींना राखी दाखवत ते म्हणाले, "घरी जाऊन मी काय सांगू? ही तिने दिलेली शेवटी राखी माझ्यासोबत उरली आहे. ती माझी एकमेव बहीण होती. आता मी एकटा राहिलो आहे."
एका ठिकाणी लंगर म्हणजे सामुहिक अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी बांधलेल्या मांडवाखाली अनेक लोक गाडले गेले. त्यांना वाचवणं फार अवघड होतं, असं एक महिला सांगत होत्या.
'स्फोटासारखा आवाज आला, सगळे ओरडू लागले'
शालू मेहरा यांना ढिगाऱ्याखाली बाहेर काढलं गेलंय. सध्या त्या जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत.
घटनेबद्दल बोलताना त्या सांगतात, "काय होतंय हे समजलंच नाही. अचानक स्फोट होतो तसा मोठा आवाज आला. सगळीकडे धूर पसरला. लोक पळा, पळा, पळा असं ओरडू लागले."
मी पळ काढणार तितक्या एक महिला माझ्या अंगावर पडली. एक वीजेचा खांबही माझ्या अंगावर येऊन पडला आणि मला झटका बसला," त्या पुढे म्हणाल्या.
त्यांनी त्यांच्या मुलीला हाका मारल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना वाचवलं.

बोधराज त्यांच्या कुटुंबातल्या 10 लोकांसोबत किश्तवाडला गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासह कुटुंबातले इतर तीन सदस्यही ढिगाऱ्याखाली अडकल्याचं ते सांगत होते.
"अचानक स्फोट झाल्यासारखं काहीतरी झालं आणि सगळीकडे धूर पसरला. ढगफुटी झाली आहे, सगळे बाहेर पडा, असं आम्ही ओरडू लागलो. पण दोन मिनिटांतच चार फूट मलबा परिसरात सगळीकडे पसरला."
"घटनास्थळी सगळीकडे मृृतदेह पडलेले दिसत होते. नवा पूल बनवण्याचं काम सुरू होतं तिथे अनेक लोक वाहून गेले आणि बाकीचे जे वर होते त्यातले 100 ते 150 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत," बोधराज पुढे म्हणाले.
मलब्यातून मोठमोठी झाडं, दगड काही सेकंदात वाहत आले असंही ते म्हणाले.
'लोक चिनाब नदीत वाहून गेले'
चाशोटीला कुटुंबासोबत आलेली एक महिलाही या घटनेचं भयावह वर्णन सांगत होती.
"आमच्या समोरच ढगफुटी झाली आणि समोरचा सगळा डोंगरच खाली घसरू लागला. त्यासोबतच आम्हीही चिनाब नदीच्या दिशेनं वाहत जाऊ लागलो. गाड्या, वीजेचे खांबही आमच्यासह वाहत होते," त्या म्हणाल्या.
"मी एका गाडीखाली अडकले. आता माझं काही खरं नाही असंच मला वाटलं. पण मग मला माझे वडील दिसले. पुन्हा हिंमत एकटवून मी बाहेर आले."
"माझी आई वीजेच्या खांबाखाली होती. त्यावरही अनेक लोक होते. मी कसंतरी करून स्वतःची सुटका करून घेतली. पण आई जास्त जखमी झाली आहे."

फोटो स्रोत, ANI
"तिथे अनेक लोक होते. आमच्या डोळ्यासमोर ते खाली चिनाबमधे वाहून गेले. आम्ही काहीही करू शकलो नाही," असं त्या म्हणाल्या.
ढिगाऱ्यासह माती, दगड, झाडाच्या फांद्या, संपूर्ण झाडासह सगळा डोंगरच खाली आहे आणि सगळीकडे चिखल पसरला असंही त्या सांगत होत्या.
"काही लहान मुलं होतं. त्यांची मान लचकली. पाय कापला गेला. माझ्या वडिलांनी काही जणांना वाचवलं. तर काहींचा तिथेच मृत्यू झाला. पुढे मागे सगळीकडे मृतदेह पडले होते. आम्ही काहीच करू शकलो नाही."
सरकारकडून सगळ्यांना पटापट मदत पुरवली गेली. सीआरपीएफ, पोलिस सगळ्यांनी मिळून जलद गतीनं बचाव कार्य सुरू केलं, असंही महिला सांगत होती.
बचाव कार्यात वाचवण्यात आलेल्या एका मुलीनं सांगतिलं, "वरून पूर वाहत आला आणि सगळे वाहून गेले. अनेक लोक मारले गेले. अनेकजण जखमी झाले."
मुलगी सांगत होती, "मीही मध्येच अडकले होते. पोलिस काकांनी माझी मदत केली. त्यांनी मला बाहेर काढलं. पण माझी एक बहीण अजूनही सापडलेली नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











