गर्भाशयाऐवजी लिव्हरमध्ये 3 महिने वाढत होतं बाळ, डॉक्टरांनाही चक्रावून टाकणारं हे प्रकरण काय आहे?

सर्वेश
फोटो कॅप्शन, सर्वेश
    • Author, प्रेरणा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशच्या एका महिलेच्या गरोदरपणानं सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकलंय. या महिलेच्या गर्भाशयात नाही, तर लिव्हरमध्ये गर्भ वाढत असल्याचं समोर आलं.

बुलंदशहर जिल्ह्याच्या दस्तूरा गावात राहणाऱ्या 35 वर्षांच्या सर्वेश गेल्या काही दिवसांपासून अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या आणि संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाल्यात.

हे नेमकं झालं कसं या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणसांसोबतच तज्ज्ञांनाही पडत आहे. शिवाय, सर्वेश यांच्या आरोग्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मीही दस्तूरा गावात गेले होते.

आम्ही सर्वेश यांच्या घरी गेलो तेव्हा त्या खाटेवर झोपल्या होत्या. त्यांच्या पोटावर एक रूंद पट्टा लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कूस बदलणंही अवघड जात होतं.

पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात 21 टाके पडले असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणतंही जड सामान उचलू नका, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे. पचायला हलकं असं अन्न खाण्याचा आणि जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

खाटेवर उठून बसण्यापासून ते बाथरूमला जाणं, कपडे बदलणं अशा दैनंदिन कामातही सर्वेश यांना त्यांचे पती परमवीर यांची मदत घ्यावी लागते.

लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी सर्वेश यांना दिला असल्याचं त्यांचे पती परमवीर सांगतात.

फोटो स्रोत, प्रभात कुमार/बीबीसी

फोटो कॅप्शन, लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी सर्वेश यांना दिला असल्याचं त्यांचे पती परमवीर सांगतात.

गेले तीन महिने त्यांच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी एक रहस्यमय कोडं सोडवण्यात गेले, असं सर्वेश सांगत होत्या.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मला प्रमाणापेक्षा जास्त उलट्या होत होत्या. खूप थकवा जाणवत होता आणि वेदनाही होत होत्या. मला नेमकं काय झालंय तेच कळत नव्हतं."

त्यांची तब्येत बिघडू लागली तेव्हा डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पोटात संसर्ग झाला असेल असं समजून त्यांना संसर्गविरोधी गोळ्या दिल्या गेल्या.

पण महिन्याभर औषधं घेऊन तब्येतीत काहीही सुधारणा झाली नाही तेव्हा त्यांनी पुन्हा सोनोग्राफी केली.

यावेळी चाचणीच्या अहवालातून जे समोर आलं ते इतकं दुर्मिळ होतं की डॉक्टरांनाही त्यावर विश्वास ठेवणं अवघड जात होतं.

'तुमच्या लिव्हरमध्ये मूल वाढतंय'

सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर सोनिया जेहरा यांनी सर्वेश यांना सांगितलं की त्यांच्या लिव्हरमध्ये गर्भ वाढतोय.

सर्वेश आणि त्यांचे पती परमवीर यांच्यासाठी हा अतिशय गोंधळात टाकणारा क्षण होता.

या सगळ्याची खात्री करण्यासाठी ते बुलंदशहरवरून मेरठला गेले. पुन्हा एकदा अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय या चाचण्या केल्या गेल्या. पुन्हा तेच समोर आलं.

सर्वेश यांच्यासाठी यावर विश्वास ठेवणं फार अवघड होतं. त्यांची मासिक पाळीही नियमित आणि सुरळीत सुरू होती.

इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी जगात अत्यंत दुर्मिळ आहे. या स्थितीत गर्भ गर्भाशयाबाहेर लिव्हरमध्ये वाढू लागतो.

फोटो स्रोत, प्रभात कुमार/बीबीसी

फोटो कॅप्शन, इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी जगात अत्यंत दुर्मिळ आहे. या स्थितीत गर्भ गर्भाशयाबाहेर लिव्हरमध्ये वाढू लागतो.

आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत असं प्रकरण कधीही पाहिलं नसल्याचं एमआरआय करणारे रेडियोलॉजिस्ट डॉ. के. के गुप्ता बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

कोणत्याही निष्कर्षाला पोहोचण्यापूर्वी त्यांनी अनेकदा रिपोर्ट्स पाहिले, त्याचा अभ्यास केला. मासिक पाळीविषयी अनेक प्रश्न सर्वेश यांना विचारले.

"महिलेच्या लिव्हरच्या उजवीकडे बाहेरच्या बाजूला गर्भ वाढत असल्याचं दिसतंय. त्यात कार्डियक पल्सेशन म्हणजे बाळाच्या हृदयाचे ठोकेही स्पष्टपणे जाणवत आहेत.

या स्थितीला इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हटलं जातं. ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. या स्थितीत महिलेला खूप जास्त रक्तस्राव होतो. ते रक्त मासिक पाळीचंच असल्याचा महिलांचा समज होतो. त्यामुळे या पद्धतीच्या गर्भधारणेचं निदान व्हायला जास्त वेळ लागतो," डॉक्टर म्हणाल्या.

आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत असं प्रकरण कधीही पाहिलं नसल्याचं रेडियोलॉजिस्ट डॉ. के. के. गुप्ता सांगत होत्या.

फोटो स्रोत, प्रभात कुमार/बीबीसी

फोटो कॅप्शन, आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत असं प्रकरण कधीही पाहिलं नसल्याचं रेडियोलॉजिस्ट डॉ. के. के. गुप्ता सांगत होत्या.

शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय

गर्भ आणखी मोठा झाला तर लिव्हर फाटण्याचा धोका आहे, असं डॉक्टरांनी जोडप्याला सांगितलं. तसं झालं तर आई आणि बाळ दोघंही जिवंत राहणार नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.

बुलंदशहरमधला एकही डॉक्टर हे प्रकरण हाताळण्यासाठी तयार नव्हता, असं परमवीर सांगतात. मेरठलाही त्यांच्या पदरी हीच निराशा आली.

हे अतिशय अवघड प्रकरण आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. या शस्त्रक्रियेत आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी हात टेकले आणि दिल्लीला जाण्याचा सल्ला दिला.

सर्वेश सांगत होत्या, "आम्ही गरीब आहोत आणि दिल्लीला जाण्यासाठी खर्च करणं आम्हाला शक्यच नव्हतं. अनेक रुग्णालयाच्या वाऱ्या केल्यानंतर इथेच उपचार घ्यायचं आम्ही ठरवलं."

शेवटी मेरठच्या एका खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सर्वेश यांची शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखवली.

सर्वेश यांची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. पारुल दहिया होत्या.

फोटो स्रोत, प्रभात कुमार/बीबीसी

फोटो कॅप्शन, सर्वेश यांची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. पारुल दहिया होत्या.

या डॉक्टरांमध्ये पारुल दहियाही होत्या. त्या सांगतात, "रुग्ण आमच्याकडे आली तेव्हा तीन महिने त्रास होत असल्याचं तिने सांगितलं. तिच्याकडे अल्ट्रासोनोग्राफी आणि एमआरआयचा रिपोर्ट होता. हे इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सीचं प्रकरण असल्याचं स्पष्ट दिसत होतं. या प्रकरणाबद्दल आम्ही वरिष्ठ शस्त्रक्रियातज्ञ डॉ. सुनील कंवल यांच्याशी चर्चा केली.

"अशा प्रकरणात अनुभव असलेल्या डॉक्टरांची गरज असते. त्यांनीही या शस्त्रक्रियेत आम्हाला सोबत करण्यास संमती दर्शवली. त्यानंतर रुग्णाच्या संमतीनं शस्त्रक्रिया केली गेली."

ही शस्त्रक्रिया जवळपास दीड तास सुरू होती, असं डॉक्टर पुढे सांगत होत्या.

डॉ. के. के. गुप्ता यांनी बीबीसीला शस्त्रक्रियेचे व्हीडिओ आणि गर्भाचे फोटोही दाखवले.

इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी काय असते?

साधारणपणे महिलेच्या अंडाशयातून निघालेल्या बिजांडात शुक्राणू मिसळला तर गर्भधारणा होते.

अंडाशयातून बिजांड निघालं की ते फॅलोपियन ट्यूबमधून गर्भाशयाकडे सरकत असतं. तिथे शुक्राणूशी त्याची भेट झाली की गर्भ तयार होतो.

सर्वेश यांचे पती परमेश्वर बीबीसीला वैद्यकीय रिपोर्ट्स दाखवत होते.

फोटो स्रोत, प्रभात कुमार/बीबीसी

फोटो कॅप्शन, सर्वेश यांचे पती परमेश्वर बीबीसीला वैद्यकीय रिपोर्ट्स दाखवत होते.

बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या प्राध्यापक डॉ. ममता सांगतात की काही महिलांमध्ये बिजांड गर्भाशयात येण्याऐवजी फॅलोपियन ट्यूबमध्येच राहतं किंवा एखाद्या दुसऱ्या अवयवाला जाऊन चिकटतं.

या प्रकरणात ते लिव्हरमध्ये जाऊन चिकटलं. तिथे रक्तप्रवाह जोरात सुरू असतो. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांत गर्भासाठी हा अवयव सुपीक जमिनीसारखा काम करतो.

पण काही दिवसांनी आई आणि मूल दोघांच्याही जीवाला यातून धोका निर्माण होतो. त्यासाठी शस्त्रक्रिया करणं हा एकमेव मार्ग असतो.

भारतात अशी किती प्रकरणं आहेत?

इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी किती दुर्मिळ असते? हे समजून घेण्यासाठी आम्ही पाटणाच्या 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' (एम्स) या संस्थेच्या स्त्रीरोग विभागातील प्राध्यापिका डॉ. मोनिका अनंत यांच्याशी चर्चा केली.

गर्भाशयाबाहेर मूल वाढण्याचं म्हणजे इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सीचं प्रमाण जगात फक्त एक टक्काच आहे.

"70 ते 80 लाख गरोदर महिलांमागे एखादंच प्रकरण इंट्रोहॅपॅटिक प्रेग्नन्सीचं असतं," त्या म्हणाल्या.

आत्तापर्यंत जगभरातून फक्त 45 महिलांमध्ये इंट्रोहॅपॅटिक प्रेग्नन्सीची नोंद करण्यात आली आहे. त्यातल्या तीन भारतातल्या आहेत.

डॉ. मोनिका यांच्या मते, जगभरात सरासरी इंट्राहेपॅटिक प्रेग्नन्सीची 1% प्रकरणे नोंदवली जातात.
फोटो कॅप्शन, डॉ. मोनिका यांच्या मते, जगभरात सरासरी इंट्राहेपॅटिक प्रेग्नन्सीची 1% प्रकरणे नोंदवली जातात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारतातल्या तीन प्रकरणांपैकी पहिलं दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमधून 2012 साली समोर आलं होतं. त्यानंतर दुसरं प्रकरण 2022 साली गोव्याच्या मेडिकल कॉलेजात आणि तिसरं प्रकरण 2023 मध्ये पाटणाच्या एम्स रुग्णालायत नोंदवलं गेलं होतं.

पाटणा एम्समध्ये नोंदवलेलं प्रकरण स्वतः डॉ. मोनिका अनंत आणि त्यांच्या टीमने हाताळलं होतं. त्या प्रकरणात मेथोट्रेक्सेट या औषधांच्या मदतीनं महिलेचं गर्भाशय निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर संपूर्ण एक वर्ष महिलेच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवण्यात आलं होतं.

एम्समधल्या या दुर्मिळ प्रकरणाचं डॉ. मोनिका यांनी दस्ताऐवजीकरण केलं आहे. पबमेड या नियतकालिकात भारतातली तिसरी इंट्रोहॅपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणून हे प्रकरण प्रकाशित करण्यात आलं होतं. पबमेड हे अमेरिकेतील मेडिकल रिसर्च डेटाबेस म्हणजे आरोग्य संशोधनावरचं माहितीभंडार आहे.

आता या नव्या प्रकरणाचंही दस्ताऐवजीकरण करण्याची सुरूवात झाली असल्याचं डॉ. पारूल दहिया आणि डॉ. के. के. गुप्ता यांनी सांगितलं.

ही प्रक्रिया पूर्ण झाली की त्याचाही अहवाल एखाद्या चांगल्या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केला जाईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.