राहुल गांधींनी 'मत चोरी'चा आरोप करताना ज्या महादेवपुराचं उदाहरण दिलं, तिथले लोक काय म्हणतायेत?

- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरूहून
गेल्या काही दिवसांपासून कथित 'मतांच्या चोरी'वरून काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत.
मात्र, प्रश्न असा आहे की, मतदार यादीत नाव टाकण्याची किंवा काढण्याची जबाबदारी प्रत्यक्षात कोणाची आहे? ही जबाबदारी मतदारांची आहे की निवडणूक आयोगाची? की हे काम राजकीय पक्षांचं आहे?
या पक्षांना निवडणुकीच्या एक महिना आधी मतदार यादीची एक प्रिंट आउट दिली जाते. विशेष म्हणजे आजच्या डिजिटल युगात ती दिली जाते.
प्रत्यक्षात नेमकी परिस्थिती काय आहे याची पडताळणी करत असताना यासारख्या प्रश्नांना आम्ही सामोरं गेलो.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा मुद्दा मांडत काही प्रश्न उपस्थित केले होते.
राहुल गांधी विशेषकरून बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देत होते.
काँग्रेसनं या कथित 'मत चोरी'ची दोन उदाहरणं दिली आहेत.
पहिलं आहे, महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील घर क्रमांक 35 चं. मतदार यादीनुसार त्या घरात 80 मतदार राहतात.
मुनी रेड्डी गार्डनमध्ये असणाऱ्या घर क्रमांक 35 ला भेट दिल्यानंतर बीबीसीच्या टीमला तिथे अनेक छोट्या-छोट्या खोल्यांचं घर दिसलं.
या खोल्या जवळपास आठ बाय आठ फुटांच्या होत्या. त्यात एक स्वयंपाकघर देखील आहे. तिथे फक्त एकजण उभा राहून काम करू शकतो. जवळच एक बाथरुमदेखील आहे.
आजूबाजूची सर्व घरं जवळपास एकाच आकाराची आहेत.
या घरांमध्ये कोण राहतं?
या प्रॉपर्टीच्या मालकाचे भाऊ गोपाल रेड्डी सांगतात की या घरांमध्ये देशाच्या विविध भागातून आलेले स्थलांतरित मजूर राहतात.
रेड्डी सांगतात, "आम्ही यांना लेबर क्लास शेड म्हणतो. दर तीन ते सहा महिन्यांनी हे लोक इथून इतरत्र जातात. हे लोक इथे आल्यानंतर कंपनी रेंटल ॲग्रीमेंट मागते. जर या लोकांनी ते दिलं नाही तर त्यांना नोकरी मिळत नाही."
"मग त्यांना वोटर आयडी मिळतं आणि त्यांचं उत्पन्न वाढलं की ते इथून इतरत्र निघून जातात. राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत. हे लोक त्यांची दिशाभूल करून त्यांचा अपमान करत आहेत."
ही बातमीही वाचा : मिंता देवी कोण आहेत, ज्यांचा फोटो असलेलं टी-शर्ट घालून प्रियंका गांधी संसदेत पोहोचल्या?
या घरांपैकी एका घरात राहणाऱ्या दीपांकर सरकार यांना आम्ही भेटलो. ते पश्चिम बंगालमधून आले आहेत.
ते त्यांची पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलासह या घरात राहतात.
ते गेल्या एक वर्षापासून बंगळुरूत वास्तव्यास आहेत. मात्र एक महिना आधीच दीपांकर महादेवपुरा भागात आले आहेत. कारण ते ज्या कंपनीत काम करतात, तिथून त्यांची बदली झाली आहे.

फोटो स्रोत, IMRAN QURESHI
दीपांकर सरकारनं सांगितलं की, "मी फूड डिलीव्हरी एजंटचं काम करतो. मी बेलंदूर झोनमध्ये काम करतो, त्यामुळे मी ही खोली भाड्यानं घेतली. मी इथे किती दिवस राहणार हे मला माहित नाही."
दीपांकर यांच्या शेजारी राहणारी व्यक्ती गेल्या 12 वर्षांपासून बंगळुरूत काम करते आहे.
त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "मी इथे मतदान करत नाही. मी पश्चिम बंगालला जातो आणि तिथे मतदान करतो. जे म्हटलं जातं आहे ते खरं नाही. आमच्यापैकी अनेकजण इथे मतदान करत नाहीत. आम्ही आमच्या राज्यात परत जातो."
'मतांच्या चोरी'चं दुसरं उदाहरण दारूच्या एका छोट्या फॅक्टरीचं (मायक्रोब्रूअरी) दिलं जातं आहे.
त्यात आरोप करण्यात आला आहे की या पत्त्यावर 68 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
इथे काम करत असलेल्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की फॅक्टरीची मालकी अलीकडेच बदलली आहे.
काँग्रेसची मोहीम
2024 मध्ये मंसूर अली खान यांनी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या मागणीत तथ्य नाही, असं त्यांना वाटत नाही.
ते म्हणतात की, "तुम्ही याला चुकीची उदाहरणं का म्हणत आहात? मुनी रेड्डी गार्डनमध्ये 80 मतदारांची नोंदणी झालेली आहे. मायक्रोब्रूअरीमध्ये 68 मतदार आहेत. आमचा प्रश्न आहे की एका खोलीच्या पत्त्यावर इतक्या लोकांची नोंदणी कशी काय होऊ शकते? ब्रूअरी एक व्यवसाय आहे. या जागी मतदारांची नोंदणी कशी झाली?"
"बूथ लेव्हलचे अधिकारी काय करत आहेत? आम्ही निवडणूक आयोगाकडे स्पष्ट मतदार यादीची मागणी करत आहोत. आम्ही जेव्हा मतदार यादीतील दोष उघड करतो, तेव्हा निवडणूक आयोग गप्प का बसतं?"
लोकसभा निवडणुकीत, मंसूर अली खान यांचा 32,707 मतांनी पराभव झाला होता. 2009 नंतरच्या लोकसभेच्या सर्व निवडणुकांमध्ये तिथून भाजपाचे पी सी मोहन विजयी झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रकाश जावडेकर आणि पीयूष गोयल यांसारखे भाजपाचे नेते उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील राज्यांमधून येणाऱ्या लोकांसाठी सभा घेतात, तोच लोकसभा मतदारसंघ आहे.
महादेवपुरा-व्हाईटफील्ड आणि त्याच्या आसपास आयटी क्षेत्राचा विकास झाल्यामुळे उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील राज्यांमधून तिथे मोठ्या संख्येनं लोक आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स सिटीनंतर व्हाईटफील्ड हे बंगळुरूतील दुसरं सर्वात मोठं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं केंद्र मानलं जातं.
सुशिक्षित लोकांव्यतिरिक्त इतर राज्यांमधून येऊन लहान-मोठी काम करणारे लोकदेखील याच भागात राहतात.
भाजपाचा युक्तिवाद
वरथुर विधानसभा मतदारसंघातून वेगळं करून महादेवपुरा राखीव विधानसभा मतदारसंघ बनवण्यात आला आहे. या मतदारसंघात भाजपाचे नेते अरविंद लिम्बावली यांचा प्रभाव आहे.
या मतदारसंघातून लिम्बावली तीन वेळा जिंकले आहेत. 2023 मध्ये त्यांची पत्नी या मतदारसंघातून विजयी झाली होती.
अरविंद लिम्बावली तीन जणांचं उदाहरण देतात. यातील दोनजण इतरत्र शिक्षण घेऊन आणि काम करून नंतर बंगळुरूतील कंपनीत नोकरी करण्यासाठी आले होते.
तिसरी व्यक्ती वृद्ध महिला आहे. त्यांची नोंदणी एकापेक्षा जास्त बूथवर झाली आहे.
लिम्बावली म्हणाले, "मी याचा तपास केला. त्यातील एक व्यक्ती लखनौचा आहे. त्याला मुंबईत नोकरी मिळाली होती. त्यामुळे तो तिथे गेला आणि मतदान केलं. मग त्याला बंगळुरूत नोकरी मिळाली. त्यामुळे तो बंगळुरूत भाड्याच्या घरात राहू लागला."

फोटो स्रोत, ANI
"विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यानं त्याच पत्त्यावरून मतदान केलं. मग लोकसभा निवडणूक येईपर्यंत तो एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. काँग्रेस त्यालादेखील चोर ठरवत आहे."
ते असंही म्हणाले की चामराजपेट आणि शिवाजीनगरसारख्या मतदारसंघातून देखील चुकीचे पत्ते आणि एकाच नावानं अनेक मतं दिल्याची प्रकरणं समोर आली आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.
ही बातमीही वाचा : मिंता देवी कोण आहेत, ज्यांचा फोटो असलेलं टी-शर्ट घालून प्रियंका गांधी संसदेत पोहोचल्या?
लिम्बावली म्हणतात, "ते चोर नाहीत, आम्ही आहोत? त्यांनी (राहुल गांधी) समजून घेतलं पाहिजे आणि तपास केला पाहिजे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी या मुद्द्याबाबत थोडंसं भान राखलं पाहिजे."
"आम्हाला माहित आहे की, तुमची प्रतिमा चांगली नाही. मात्र तुम्ही प्रयत्न केला तर यात थोडीशी सुधारणा होऊ शकते."
आरोपांबद्दल स्थानिकांनी काय सांगितलं?
या मतदारसंघातील काही मतदार राहुल गांधींनी केलेले आरोप पूर्णपणे फेटाळतात.
काहीचं म्हणणं आहे की, लोक इथे मतदान तर करतातच, त्याचबरोबर ते त्यांच्या राज्यांमध्येही मतदान करतात.
कृष्णा हे महादेवपुरातील एका दुकानदार आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "राहुल गांधी जे म्हणत आहेत, ते खरं नाही. माझा अरविंद लिम्बावली यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते फसवणूक करत नाहीत."
या भागातील ज्येष्ठ नागरिक मुनि रेड्डी म्हणाले की हे फक्त राजकारण आहे, दुसरं काही नाही.
मुनि रेड्डी म्हणतात, "सर्व आरोप निराधार आहेत. अधिकारी जबाबदार लोक आहेत. फक्त अधिकाऱ्यांना दोष देणं योग्य नाही. ते म्हणतायते की मतांची चोरी झाली आहे. मात्र कशी? तुम्हीच सांगा."

शशिकला या एका स्थानिक महिलेनं सांगितलं, "इथे येणारे लोक भाड्यानं घर घेतात. ते इथे मतदान करतात आणि त्यांच्या गावी जाऊन देखील मतदान करतात."
मात्र एका स्थानिक स्टोअरमध्ये मॅनेजर असलेले दर्शन म्हणाले, "हे स्पष्ट आहे की हे बनावट मतदार आहेत. त्यामुळे मतदार यादीतून त्यांची नावं हटवणं हेच योग्य ठरेल."
काँग्रेस नेते मंसूर अली खान तीन गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
ते म्हणतात, "निवडणूक आयोग गप्प का आहे? आम्ही निवडणूक जेव्हा आयोगाला कोणताही प्रश्न विचारतो, त्यावेळेस आयोगाचा बचाव करण्यासाठी भाजपा का पुढे सरसावते? निवडणूक आयोग भाजपाची बाजू घेतं आहे."
एकवेळ राजकीय युक्तिवाद बाजूला जरी ठेवले, तरी या सर्व प्रकरणात निवडणूक आयोगावर प्रश्न तर उपस्थित झाले आहेतच.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











