पाकिस्तानमध्ये पुराचा हाहा:कार; 670 हून अधिक जणांचा मृत्यू, 90 लोक अद्यापही बेपत्ता

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, AFP via Getty Images

पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 670 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 80 ते 90 लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

पाकिस्तानच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने ही माहिती दिली आहे.

वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रदेशात ढगफुटीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीत अतोनात नुकसान झालेलं आहे.

दोन दिवसांपूर्वी बचावासाठी गेलेलं सरकारी हेलिकॉप्टरही कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

670 हून अधिक जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या चेअरमन लेफ्टनंट जनरल इनाम हैदर यांनी सांगितलं की, "या मॉन्सून सिझनमध्ये आतापर्यंत 670 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 80 ते 90 लोक अद्यापही बेपत्ता आहेत."

एका पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की, "मॉन्सूनच्या दरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास 670 लोक मारले गेले आहेत, तर एक हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत."

पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 670 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

फोटो स्रोत, ABDUL MAJEED/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 670 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

लेफ्टनंट जनरल इनाम हैदर यांनी सांगितलं की, "80 ते 90 जण अद्यापही बेपत्ता आहेत. जर लवकर त्यांचा ठावठिकाणा कळाला नाही, तर यांनाही मृतकांच्या यादीत समाविष्ट करावं लागेल."

एनडीएमएच्या प्रमुखांच्या मते, मॉन्सूनचा पाऊस 23 ऑगस्टपर्यंत सुरु राहील आणि यादरम्यान परिस्थिती आणखी बिघडू शकते. पुढे त्यांनी असा इशारा दिला की, "ढगफुटीसारख्या घटना आणखी घडू शकतात."

23 ऑगस्टपासून महिन्याच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत मान्सूनचे आणखी दोन टप्पे येण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, "10 सप्टेंबरनंतर परिस्थिती हळूहळू सुधारण्यास सुरुवात होईल आणि सप्टेंबरच्या अखेरीस सामान्य होईल."

पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये हाहा:कार

गुरुवारपासून (14 ऑगस्ट) सुरू झालेल्या पुरामुळे पाकिस्तानमधील बुनेर, बाजौर आणि बट्टाग्रामसह अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजला आहे.

त्यामुळे, हा भाग आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

बुनेर जिल्हा बचाव पथकाचे रिपोर्ट इनचार्ज अब्दुल रहमान यांनी सांगितलं की, गाडझी तहसील परिसरात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे.

यामध्ये 120 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

बचाव अधिकाऱ्यांच्या मते, एकट्या बुनेर जिल्ह्यात आतापर्यंत 157 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

बुनेर उपायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 78 मृतांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

तर, अनेक मृतदेह दुर्गम भागात आहेत. त्याठिकाणी जिथे पायाभूत सुविधांची दूरवस्था झालेली असल्याने पोहोचण्यास अडथळे निर्माण झालेले आहेत.

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, RESCUE 1122

चाघरझाई तहसीलमध्ये एकाच घरातील 22 सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

या जखमींना टीएचक्यू गुलबंदी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पूरग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मदत पुरवण्यासाठीचे प्रयत्न शक्य तितके तीव्र केले जात आहेत.

आपत्कालीन प्रतिसाद पथके पूर परिस्थितीतही काम करत आहेत.

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, SDMA

पाकिस्तानच्या हवामान विभागानं सांगितलंय की, देशाच्या वायव्य भागात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथे अनेक भागांना आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

बचावासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं

खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यात पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे.

या भागात मदतीचं साहित्य घेऊन जाणारं प्रांतीय सरकारचं एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. त्यामध्ये दोन वैमानिकांसह पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, Rescue1122

प्रांतीय सरकारचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी पूर आणि पावसामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल दुःख व्यक्त करत शनिवारी (16 ऑगस्ट) प्रांतव्यापी शोकसभा जाहीर केली आहे.

या दरम्यान राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, NDMA

बचाव कार्यासाठी जाणाऱ्या हेलिकॉप्टरबाबत, मुख्यमंत्री सचिवालय पेशावरने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळलं आहे.

या अपघातानंतर बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बोलावली बैठक

पाकिस्तानमधील पाऊस आणि पुराचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली आहे.

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, @GovtofPakistan

या आपत्कालीन बैठकीत, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटीच्या (एनडीएमए) अध्यक्ष्यांनी ढगफुटी आणि देशाच्या उत्तर भागात अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची आणि बचाव आणि मदत कार्याची माहिती दिली.

पंतप्रधानांच्या घरातून जारी केलेल्या निवेदनानुसार, शाहबाज शरीफ यांनी एनडीएमएला खैबर पख्तूनख्वाचे प्रांतीय सरकार आणि पीडीएमएशी सहकार्य सुरू ठेवण्याचे, बचाव आणि मदत कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आणि सर्व संसाधनांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, AFP via Getty Images

पावसाचा सर्वाधिक फटका बसलेले जिल्हे

प्रोव्हीन्शियल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटीनुसार (पीडीएमए), स्वात, बुनेर, बाजौर, तोरघर, मानसेहरा, शांगला आणि बट्टाग्राम हे जिल्हे पाऊस आणि पुरामुळे सर्वांधिक बाधित आहेत.

पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यात पुराचा हाहाकार

फोटो स्रोत, NDMA

एजन्सीने बाजौर आणि बट्टाग्राम जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे सर्वाधिक प्रभावित म्हणून घोषित केलं आहे.

पीडीएमएने दिलेल्या माहितीनुसार, पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे एकूण 45 घरांचे नुकसान झाले आहे, त्यापैकी 38 घरांचे अंशतः नुकसान झालं आहे तर सात घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.